बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दही पोहे , ढोकळा, हांडवो, शेवयांचा उपमा, भेळ, पाणी पुरी, चिवडा -चकली -शंकरपाळी, वेगवेगळी सँड्विचेस...
करु तितके थोडे आहे मैत्रिणी साठी! Happy

अरे वा…पटकन किती ऑप्शन सुचवलेत. शेव बटाटा पुरी/दही वडे आणि ढोकळा जमेलसं वाटतंय.
@मंजूताई >>>> कांदा वड्याची रेसिपी सांगा ना. कधी खाल्ला नाहीये.

मिक्स डाळी (हरभरा डाळीचे प्रमाण जास्त) व थोडेसे तांदूळ चार पाच तास भिजवून वाटायच्या त्यात भ र पू र कांदा. डाळी दोन वाट्या तर सहा वाट्या कांदा जाडसर चिरलेला, हि.मि बारीक चिरलेला कढीलिंब, कोथिंबीर,जिरे, ओवा, मीठ तिखट. थोडं मोहन घालून पुरीच्या आकारात थापून तळावे. ओ.ना चटणी बरोबर छान लागतात.

आपली महाराष्ट्र स्पेशल साखी करा, जोडीला खमंग काकडी, गोड दह्याची वाटी, बटाटा किंवा केळ्याचे चिप्स, देवकी ने लिहिलेला चितळे ढोकळा आणि गोडासाठी जिलेबी किंवा एखादा बर्फी चा तुकडा ..

मैत्रीणीच्या चहा पार्टी साठी मी केलेले काही मेनू कॉम्बिनेशन :

1. साबुदाणा खिचडी, दही, कोथिंबीर वडी, विकतचा लाडू kiwwa बर्फी
2. Puff पेस्ट्री मध्ये बटाटावडा kiwwa समोसा सारण भरून veggie puffs + रवा केक (आंब्याचा केक रेसीपी आहे मायबोली वर)
3. दडपे पोहे + दही वडे
4. बॉम्बे सँडविचेस + भेळ

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बेत काय करता येईल? गोपालकाला करणार आहे पण त्याशिवाय जेवणात (लंच साठी) काय काय पदार्थ करता येतील?
कृष्ण जन्माष्टमीचा उपवास सोडताना काही विशेष पदार्थ असतात का?

वत्सला, आमच्याकडे भरली केळी करतात नैवेद्याला. त्याशिवाय जन्माष्टमीला प्रसाद म्हणून वाटायला पंजेरी.

कृष्ण जन्माष्टमीचा उपवास सोडताना काही विशेष पदार्थ असतात का?....... शेगलाच्या (शेवगा) पानांची भाजी, सांजोऱ्या(मैद्याच्या पारीत गोड शिरा भरून),काळ्या वाटाण्याची आमटी/ भाजी ,पंचखाद्य हे सारे आजोळी केले जायचे. बाकी वरण भात कोशिंबीर असावी.त्यांच्याकडे कृष्णजन्म साजरा केला जायचा.पुढे कित्येक वर्षांनी भावाने सुरू केला होता.

30-35 माणसांसाठी गणपतीचा मेनूकाय करता येईल.( कांदा  लसूण विरहित)., मदतीसाठी  धन्यवाद ! 

गोडात काय?
डीश देणार की पूर्ण जेवण? लहान मोठे किती?
तरी वानगीदाखल हे पाहा -
गोडात मोदकच असतील तर मग सोबत अळूवडी, साधा भात - वरण - तूप, मसालेभात (तोंडली किंवा फ्लॉवरचा), उकडलेल्या बटाट्याची भाजी किंवा दुसरी कुठली सुकी भाजी, मटकी किंवा चवळीची रस राखून केलेली उसळ, फुलके किंवा घडीच्या पोळ्या. काकडीची कोशिंबीर/ खमंग काकडी किंवा लाल भोपळ्याचं भरीत.

दुसरं कुठलं गोड असेल तर त्यानुसार मेनू ठरवता येइल.
उदा. पुरणपोळी किंवा खव्याची पोळी, फ्लॉवर, बटाटा, मटार अशी रस्साभाजी, सुकी एखादी उसळ, पुरी, तोंडलीभात किंवा दहीबुत्ती; चिरून ठेवलेलं सलाद.

३०-३५ लोकांचं जेवण म्हणजे २ भाज्या + २ भाताचे प्रकार असले म्हणजे पुरवठ्याला सोयीचं पडतं.

डिश ठेवणार असाल तर -
गोडाचं काही किंवा मोदकच सरळ कारण सर्विंगला सोपा पडतो. तिखट मिठाच्या पुर्‍या, डुबकीवाले आलू, मसालेभात + एखादी कोशिंबीर किंवा काकडीचं दह्यातलं रायतं किंवा अक्रोड + द्राक्षांचं रायतं, किंवा बूंदीरायता.

आलू पराठा, दही, हरी चटनी, गोड काही आणि बिसिबेळेआण्णा हाही सुटसुटीत मेनू होऊ शकेल.

बाकी मग नेहेमीची यशस्वी कलाकार आहेत इडली, मेदूवडा, समोसा, कचौडी इ.

खारा पोंगल/बंगाली स्टाईल खिचडी/जिरा राईस, टोमॅटो सार, मुगा गाठी, काश्मिरी दम आलू, मक्याचे सुंदल, चपाती, मोदक/ओल्या नारळाच्या करंज्या/फिरनी
आदल्या दिवशी मक्याचे दाणे उकडून, सुंदल पावडर तयार करून, माणशी २-३ बेबी पोटॅटो पारबॉईल करून व फ्राय/मावे करून, मोदकाचे/करंज्यांचे सारण करून ठेवू शकता.

सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद, मी थोडी अधिक माहिती लिहायला हवी होती , क्षमस्व.
रात्रीच जेवण ( Early Dinner ) सध्या  भारताबाहेर आहोत त्यामुळे बाहेर मराठी पदार्थ मिळणार नाहीत. इतक्या लोकांचे मोदक मला एकटीला जमणार नाहीत. म्हणून  श्रीखंड, पुरी, बटाटा भाजी, पालक पनीर   हे  पदार्थ डोक्यात होते. अमराठी लोक जास्त आहेत. तोंडली भात, मसाले भात वेगळा optionआहे. सुंदल मी कधी केलं नाहीये, पाककृती बघते. कचोरी बाहेर मिळेल, काश्मिरी दम आलू साधारण किती बटाटे लागतील माणशी ( अंदाजे)?  

बेबी पोटॅटो असतील तर माणशी २-३. मोठा बटाटा तुकडे करून वापरणार असाल तर माणशी एक.
मी ही मका सुंदल रेसिपी वापरते.
https://www.vegrecipesofindia.com/sweet-corn-sundal-recipe/

लोकहो,
मला दिवाळी पार्टी साठी अंदाज हवा आहे. २ करी करणार आहे. बाकि भात , रोटी , सॅलड, पकोडे, स्वीट. तर करी साठी, एका half tray (us size) मधे किती लोक जेवतील ? सगळी देशी कपल्स आहेत. no kids.

नरकचतुर्दशीच्या रात्रीच्या जेवणाचा बेत ठरवायचाय. Pure veg. मंडळींना शक्यतो काहीही काँटिनेंटल वगैरे प्रकार नको असतो. आणि २-३ पदार्थच करायची डिमांड आहे. कालच दहीवडे, पालक पुलाव + रायता आणि रसगुल्ले असा मेनू झालाय. त्याच धर्तीवर काहीतरी हवं आहे. प्लीज सजेस्ट!
वि. सू. करणारी मी एकटीच आहे आणि मदतनीस दिवाळीच्या सुट्टीवर गेलीय

मसालेभात + कांटोका कोशिंबीर किंवा बुंदीचे रायतं / साधा किंवा मटर पुलाव किंवा जिरा राईस किंवा मसाला खिचडी + टोमॅटो सार
+ सुंदल / पनीर किंवा मश्रूम तंदूरी (शॅलो फ्राय करून)
+ कणकेचा शिरा / कडाह प्रसाद / मूग डाळीचा हलवा (सुंदल नसले तर) / जिलेबी आयती आणून

स्टार्टर बाहेरून (अगदी घरचंच हवं असा हट्ट नसेल तर) - मिनी बटाटेवडे / चटणी, कॉकटेल समोसे फ्रोझन मिळत असतील तर आयत्या वेळी गरम करता येतं, कोथिंबिर वडी, अळूवडी, ढोकळा, स्प्रिंग रोल , कचोरी
स्टार्टस घरचे - चाट डीप/पुर्‍या, शेव खमणी, कोरडी भेळ आयत्या वेळी कालवून, चिवडा असेल दिवाळीचा तर कांदा कोथिंबीर चिरून वर फरसाण घालून

मेन कोर्स - मिसळ - दहिबुत्ती, दाबेली -दहीबुत्ती हे काँबि किंवा नुसता राईसचा एखादा प्रकार हेवी स्टार्ट्स ठेवणार असाल तर तवा पुलाव, पिज पुलाव , बिसिबेळे राईस, टॉमेटो राईस.
डेजर्ट बाहेरचे - गुलाबजाम, रसमलाई, डॉलर जिलेबी /दिवा़ळीचे लाडू, शंकरपाळे, काजूकतली
घरचे - कोणतीही खीर जरा ड्रायफुट घालून रिच करू शकाल, फार उत्साह असेल गाजरं किसायचा तर गाजर हलवा, पनीरचा कलाकंद

उद्या साबांचा वाढदिवस. त्यानिमित्त दीर, जाऊही येतील. महाशिवरात्रही आहे. तर एक वेळच्या जेवणाचा व संध्याकाळच्या नाश्ता कम जेवणाचा मेन्यू सुचवा. उपवास कुणाचाच नाही. परंतु अचानक उन्हाळा फार वाढलाय त्यामुळे सात्विक, थंडावा देणारा मेन्यू असावा असं वाटतंय.
गोड म्हणून मी थंडगार बासुंदीचा विचार केलाय तर त्यासोबत काय ठेवू? 7-8 मोठ्या माणसांसाठी बासुंदी करायची झाली तर दूध किती घ्यावे?इतर गोडाचे पदार्थही सुचवले तरी चालतील. किंवा गोडाचा पदार्थ स्किप करून काश्मिरी पुलाव कसा वाटेल? त्यांना मिष्टान्न आवडते पण आता वयोमानानुसार त्यांनी ते कमी केले आहे.
अजुनी गाजरं छान मिळताहेत आणि गाजराची पचडीही आवडते घरात तर ती ही करेन.

नाश्त्यासाठी -दही वडा ,वेज पॅटिस ,कोथींबीर किंवा अळूवडी (वडी बाहेरूनही आणता येईल वाढायला सोपी) ,चटणी सँडविच ढोकळा जेवणासाठी कोणताही पुलाव बुंदी रायता किंवा कोशिंबीर)

गोडासाठी- रसमलाई किंवा अंगुर मलई (ही पण बाहेरून आणता येईल)पण दहिवडा असेल तर नको हे कॉम्बिनेशन नाही चालणार मग गाजर हलवा आधी करून ठेवता येईल किंवा
गुलाबजाम.,चमचम .व्हेज केक असेल तर तोही गोडात मोडेल.

वेळ खाऊ आहे पण बासुंदी करायचीच असेल तर साधारण २ते 3 लिटर दुध( अमूल गोल्ड )लागते साधारण 7 ते 8 माणसांसाठी. एका लिटरचं दूध आटून पाव लिटर होते साधारण आणि बासुंदी किती लागेल खाणार्यावरही डीपेंड आहे.

लहान मुलं असतील आणि उपास असेल नसेल त्यांच्यासाठी तरी उपासाची खोबरे घातलेली तिखट गोड कचोरी विकत आणू शकता.
गोडात अजून पायनॅपल शिरा करता येईल जर आवडत असेल तर ,जेष्ठांना विचारून, पण तो फार साध्या मेनू मध्ये येतो.
शेवटी ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या आवडीचा एकतरी पदार्थ असावा.

थँक यू सिमरन
कोथिंबीर किंवा अळुवडीचा पर्याय आमच्याकडे बाद. कारण साबा स्वतःच इतक्या सुरेख बनवतात की मुलं सांगतात तिलाच करू दे.
पुलाव चालेल सर्वांना. दही वडा त्यांना आवडतो. तो धावेल. पण मग दुधाच्या सगळ्या मिठाया बाद. गाजर हलवा करून ठेवलाय. पण तो वाढता येणार नाही. जिलबी त्यांना आवडते पण दातांच्या प्रॉब्लेममुळे त्यांना खाता येणार नाही. दहीवडा केला तर टोमॅटो सार करेन पुलावसोबत. दहीवड्यासोबत चालून जाईल असा काय गोड पदार्थ ठेवावा?

दहीवड्यासोबत चालून जाईल >> दुधाच्या नको म्हणून मग म्हैसूर पाक, बेसन लाडू असे काही तरी कोरडे पण गोड चांगलं लागेल. बालुशाही, खाजा असे पण चालू शकेल.

Pages