बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात.
अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे.
सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता:
“आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन”
‘तर या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.’
ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी.
एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले.
अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे:
“आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.”
लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली.
तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच.
अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. एका कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे.
त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आठवतात.
अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात.
आपल्या देशाच्या इतिहासात एकमेव आणीबाणी 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादली होती. ती प्रत्यक्ष लादाण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली.
रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा.
सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत.
शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती:
“मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “
शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात.
...
एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही.
पण एक करा...
नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान २० वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल.
************************************************
छान लेख.
छान लेख.
20 वर्षापूर्वीचे जास्त काही आठवत नाहीये पण हो शाळेत असताना वर्तमान पत्रात येणाऱ्या कारगिल युद्धाच्या कात्रणांची एक वही बनवली होती.
नेहमीप्रमाणे चांगला लेख.
नेहमीप्रमाणे चांगला लेख.
लेख वाचल्याक्षणी विशेषतः शेवटच्या ओळी वाचल्यावर एक मथळा लग्गेच आठवला. तो असा :'जयाप्रदा ची डमी करते नवऱ्याशी ढिश्याँव' P माझ्या काकाला पोलीस टाईम्स वाचण्याची हौस असे. त्याच्या पहिल्या पानावर हे शीर्षक वाचून (सोबत त्या बाईचा फोटो होता) शाळकरी वयात मला अगदी उत्सुकता वाटली होती नि सगळी बातमी वाचून काढली की मग. -)
अस्थानी वाटत असेल तर सांगा डॉक्टर. संपादन करेन.
छान आहेत आठवणी
छान आहेत आठवणी
मृ, प्रा आणि कि.
मृ, प्रा आणि कि.
धन्यवाद.
अस्थानी वाटत असेल तर सांगा >>> बिलकूल नाही !
बर्याच वेगवेगळ्या गोष्टी
बर्याच वेगवेगळ्या गोष्टी लक्षात आहेत तुमच्या!
अमेरिकन चांद्रवीर आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन भारतभेटीला आले होते. त्याच्या बातम्यांची व छायाचित्रांची कात्रने थोरल्या बहि णीने वहीत चिकटवलेली ती पुढे कधीतरी पाहिल्याचे आठवते.
वृत्तपत्र वाचून प्रश्न पडायची , बापरे असं पण असत्म सुरुवात १९७७ साली झाली हे लक्षात आलं. त्या निवडनुका आणि कारागृहातील अनुभव.
पुढे आमच्या महाविद्यालयात आरक्षणाबद्दल वादविवाद स्पर्धा होती त्याच दिवशी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटलांनी आपल्या मुलीचे गुण वाढाण्यासाठी केलेल्या घोटाळ्याची मुख्य बातमी होती, हे लक्षात राहिले. कॉलेजला जायच्या आधी पेपर पहायला मिळत नसे. पण वादविचाद स्पर्धेला परीक्षक असलेल्या प्रा नलिनी पंडित यांनी त्या बातमीचा उल्लेख केला होता.
टीव्हीवरची बातमी सांगायची तर राकेश शर्मा व इंदिरा गांधींचा तो "सारे जहां से अच्छा" संवाद.
तेव्हा नऊवारी आणि पाचवारीचा
तेव्हा नऊवारी आणि पाचवारीचा सकच्छ - विकच्छ असा वाद रंगला होता असे वाचल्याचे आठवते आहे
* भरत,
* भरत,
छान आठवणी. चान्द्रवीरांच्या बाबत +१ .
बरेच जणांनी तसे केले होते.
*चामुंडराय,
सकच्छ - विकच्छ असा वाद रंगला होता
>>> अगदी ! आजीच्या पिढीकडून ते ऐकले होते.
हे कसं विसरलो!
हे कसं विसरलो!
१२ मार्च १९९३ चे बाँबस्फोट. घटना घडलेली प्रत्यक्ष कळली आणि मग त्याची बातमी पाहिली असे झाले.
ऑफिसात आधी बाँबे स्टॉक एक्स्चेंजच्या स्फोटाची बातमी कळली. मग एअर इंडियातल्या स्फोटाचा आवाज ऐकू आला.
दुसर्या दिवशी एअर इंडिया स्फोटाच्या वेळी लिफ्टमध्ये असलेले टी सी एसचे ब्रिगेडियर नटराजन यांचे छायाचित्र पहिल्या पानावर होते. ते आमच्या संस्थेच्या मुख्यालयात एका मीटिंगसाठी निघाले होते. खरं तर आमचेच लोक टीसीएसच्या ऑफिसात जाणार होते, पण ऐन वेळी त्यांनी यायचे असे ठरले.
छान धागा !
छान धागा !
ही बातमी २००० च्या आसपास सकाळ मध्ये वाचली होती पण त्यावेळी बाळगोपाळ गटात असल्याने नक्की साल आठवत नाहीये. नगरला ला सिविल हॉस्पिटलजवळ सिग्नल आहे. दुपारी सिग्नलला गाड्या थांबल्या होत्या. वरून एक घार साप तोंडात घेऊन चालली होती आणि तो तिच्याकडून निसटला. तो थेट एका स्कुटरवाल्याच्या गळ्यात पडला. साप त्याला कडाडून चावलाच आणि नेमका तो विषारी निघाल्याने तो माणूस जवळ सिविल रुग्णालयात दाखल केले तरी दगावला. ही असली दुर्मिळ योगाची बातमी कायमस्वरूपी लक्षात राहिली. नंतर २-३ वर्षांपूर्वी एका आध्यात्मिक पुस्तकात दक्षिणेला घडलेली अशीच घटना वाचली पण त्यात सिग्नलऐवजी रेल्वे क्रोसिंगचे ठिकाण होते. आता ती खरी होती का माहित नाही पण सगळे डिटेल सेम असल्याने मला डेजाउ फिलिंग आली वाचताना.
* भरत,
* भरत,
+१ मुंबई बॉम्बस्फोटाच्या अनेक घटना व बातम्या थरकाप उडवणाऱ्या होत्या.
माझ्या माहितीतील एकजण १९९३ला झालेल्या मुंबई - बाँबस्फोटाचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. त्या घटनेचा ‘आँखो देखा हाल’च त्याने आम्हाला सादर केला. त्याने, त्यावेळी वाटलेल्या प्रचंड भीतीमुळे त्याच्या नाडीचे ठोके तिप्पट झाल्याचे सांगितले.
* जिद्दू,
>>> +१. पहिली घटना अंधुकशी आठवतीय. भारीच.
धन्यवाद.
एकदा गणपती दूध पितो म्हणून
एकदा गणपती दूध पितो म्हणून अफवा उडाली होती. अर्थात घरून असल्या प्रयोगांना परवानगी मिळाली नाही मी ही काही आवर्जून खोडकरपणे देवळात दूध घेऊन गेले नाही. पण दुसर्या दिवशी पेपरात बातमी वाचल्याचे आठवते आहे. ट्विटर इ काही साधने नसताना कशी काय अशी अफवा उडाली असेल देव जाणे... बहुतेक देशभरात अफवा होती. आता तपशील अजिबात आठवत नाहीत.
सीमंतिनी,
सीमंतिनी,
बरोबर. मनोहर जोशी मुख्यमंत्री असण्याच्या काळात ती घडली होती आणि बहुतेक त्यांनीसुद्धा त्या घटनेवर मान डोलावली होती ! असे काहीसे आठवते.
नंतर त्याचे स्पष्टीकरण पेपरात झाले होते. केशाकर्षण असं काहीतरी ते शास्त्रीय तत्व असतं असं मला आता अंधुक आठवते.
सुंदर आठवणी. टकलू संमेलन तर
सुंदर आठवणी. टकलू संमेलन तर लय भारी
माझ्या काकांना आणि बाबांना कात्रणवह्या बनवण्याचा छंद होता त्यांच्या तरुणपणी. त्यामुळे जुन्या अनेक बातम्यांची वृत्तपत्रातील कात्रणे वाचली आहेत - भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधींचा खून, बुल्गानीन क्रुश्चेव्ह भारतभेट आणि त्यांची मिरवणूक, बांगलादेश मुक्तीयुद्ध, राकेश शर्माची अंतराळ मोहीम... अनेक.
क्रिकेटच्या बर्याच बातम्या
क्रिकेटच्या बर्याच बातम्या आठवतात. १९९६ चा वर्ल्डकप श्रीलंकेने जिंकल्यानंतर ती टीम अजिंक्यच वाटायची.
वर्ल्डकपनंतर भारत-श्रीलंका पहिलीच जी वन-डे झाली, त्यात भारत १९९ वर ऑल आउट झाला आणि श्रीलंकेला १८७ वर रोखून मॅच जिंकली. तेन्व्हा पेपरला हेडिंग होतं "भ्रमाचा भोपळा फुट्ला".
एकदा गणपती दूध पितो म्हणून
एकदा गणपती दूध पितो म्हणून अफवा उडाली होती ===>
होय मलाही हि बातमी आठवली वहुतेक १९९६ (?) ची ही बातमी. तेव्हा "आजतक" नुकतेच बहर होते, तेव्हा कोणत्या वस्तू दुध पिल्या हे आठवले की हसू येते...
ट्विटर इ काही साधने नसताना कशी काय अशी अफवा उडाली असेल देव जाणे. ==> NEWS channels नुकतीच बहरत होती...
क्रिकेटच्या बर्याच बातम्या
क्रिकेटच्या बर्याच बातम्या आठवतात. १९९६ चा वर्ल्डकप श्रीलंकेने जिंकल्यानंतर ती टीम अजिंक्यच वाटायची. = >
जयसुर्याची भिती वाटायची......बिचारा प्रभाकर , spin bowling he tried.....
अनिंद्य,महात्मा गांधींचा खून,
अनिंद्य,
महात्मा गांधींचा खून, >>>
यावरून हे डकवतो. तुमच्या पिताजींकडे बहुतेक असेल !
चीर्कुट व सतीश ,
चीर्कुट व सतीश ,
छान आठवणी. क्रिकेट म्हणजे आठवणीचा सागर आहे !
सामन्यातल्या शेवटच्या षटकात,
सामन्यातल्या शेवटच्या षटकात, शेवटच्या धेंडूवर... चेतन शर्माला जावेद मियांदादने मारलेला षटकार.
अनेक वर्षे त्रास दिला त्या पराजयाने.
झिब्बब्वे विरुद्ध ५ बाद १७ अशी भारताची दयनीय अवस्था असतांना, कर्णधार कपिलदेवने जिगरबाज खेळ करुन नाबाद १७५ केल्या, सामना जिंकला... आणि पुढे विश्वचषकही जिंकला.
छान आठवणी. क्रिकेट म्हणजे
छान आठवणी. क्रिकेट म्हणजे आठवणीचा सागर आहे ! ==>
हो सर १९९६ विश्वचषक चे खूप कलेक्शन केलेल. सेमी मध्ये झालेले पानिपत व विनोद कांबली चे रडणे आजही त्रास देते.....
सामन्यातल्या शेवटच्या षटकात, शेवटच्या धेंडूवर... चेतन शर्माला जावेद मियांदादने मारलेला षटकार.
अनेक वर्षे त्रास दिला त्या पराजयाने. ==> अनेकदा शारजा म्हणजे हारजा झाले होते.
शारजात सचीनने खेळालेली 'Desert Storm'... म्हणाजे ह्यच देही आगदी.....
https://www.icc-cricket.com/news/1660287
आम्ही शाळेत असताना गुरु
आम्ही शाळेत असताना गुरु ग्रहावर आदळलेले शुमाकर लेवि धूमकेतूचे तुकडे आणि टिपलेले छायाचित्र.
अजून लहान असताना एका रविवारी सकाळी माझे वडिल आणि शेजारचे काका यांच्यात राजीव गांधीच्या मृत्यूवर चर्चा करत होते. त्यावेळी कळत नव्हते की राजीव गांधी कोण होते पण कोणितरी मोठी व्यक्ती असावी असे वाटायचे.
सियोना,
उदय व सतीश
>>> +१११
सियोना,
वा ! पण टिपलेले छायाचित्र इथे डकवायचे विसरलात का ?
की फक्त पाहिलेले होते ?
कुमार सर,छायाचित्र सकाळ मध्ये
कुमार सर,छायाचित्र सकाळ मध्ये आले होते. आता माझ्याकडे कात्रण नाही.
छान धागा.
छान धागा.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळेस झालेल्या दंगली च्या बातम्या खूप वाईट असायच्या.
अभिताभ बच्चनना शूटिंग दरम्यान झालेला जीवघेणा अपघात पण आठवतो.
मजेशीर बातम्यांमध्ये कर्तारसिंग थत्ते चांगले आठवतात. ते अनेक वेळा राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उभे राहायचे आणि जोरदार आपटी खायचे. त्यांना नक्की किती मते पडायची ते त्यांनाच माहिती ! पण अशाप्रकारे पराभूत होण्याचा त्यांनी एक विक्रम करून ठेवलेला होता.
लहानपणी वृत्तपत्रात मंदा
लहानपणी वृत्तपत्रात मंदा पाटणकर खुनाच्या आणि तीच्या भूताच्या बातम्या वाचून रिकाम्या लोकलमध्ये बसायला भीती वाटायची. रामन राघवनच्याही अतिरंजीत बातम्या असत त्यामुळे संध्याकाळी अंधार पडल्यावर घराबाहेर बसायलाही आम्ही घाबरायचो .
मीना कुमारीच्या निधनाची बातमी पहिल्या पानावर काळ्या मोठ्या चौकटीत छापली होती , एखादी प्रसिद्ध व्यक्तीचे निधन झाल्यास अशा प्रकारे बातमी दिली जाते असे वडिलांकडून समजले होते .
स्कायलॅब पृथ्वीवर कोसळण्याच्या दिवशी ती भारतावर कोसळू नये म्हणून वाराणसीला मोठा यज्ञ केल्याची बातमी वाचली होती .
७० च्या दशकात परदेशात क्रिकेटचे सामने असले की सामन्याची छायाचित्रे पेपरमध्ये दोन दिवसांनी छापून येत , परंतू काही वृत्तपत्रात रेडीओ फोटोद्वारे दुसर्याच दिवशी छापले जायचे. रेडीओ फोटो अस्पष्ट असत.
रेडीओ फोटो अस्पष्ट असत. >>>
रेडीओ फोटो अस्पष्ट असत. >>> +११ आठवते.
.........................................
वर क्रिकेटबद्दल अनेकांनी लिहिले आहे. म्हणून मी आता अन्य मैदानी खेळांची एक आठवण देतो.
पी टी उषाचे ऑलिंपिकमधील ब्राँझपदक अगदी म्हणजे अगदी सेकंदाच्या काही भागाने (०.००३ असेच काही) हुकले होते. तेव्हा संपूर्ण देश हळहळला होता. यासंबंधी माझ्याकडे असलेले हे कात्रण :
मला क्रिकेट्च्या दोन गोष्टी
मला क्रिकेट्च्या दोन गोष्टी आठवताय.
१. हेन्स ने चेंडु हाताळला तेव्हा....
२. वेस्ट इंडिजने रचला ६११ धावांचा डोंगर.
ह्या दोन्ही बातम्या त्या त्या वेळेस प्रथम पानावर मोठ्या नी बोल्ड अक्षरात छापलेल्या होत्या.
डॉक. सहज वाटलं की नेटवर शोधाव तर सगळा खजिनाच सापडला.
https://www.cricketcountry.com/articles/india-vs-west-indies-1983-desmon...
जोशी-अभ्यंकर हत्याकांड झाले
जोशी-अभ्यंकर हत्याकांड झाले त्या बातम्या आठवत आहेत. नंतर खुनी पकडले गेले तेव्हा सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला होता.
अवांतरः मुनव्वर शहा याने आत्मचरित्र लिहिले होते "येस, आय एम गिल्टी" त्याच्यावर शासनाने बंदी घातली होती. पण माझ्या मित्राने ते कुठून तरी मिळवले होते आणि आम्ही दोघांनी ते लपून-छपून वाचले होते.
वेस्ट इंडिजने रचला ६११
वेस्ट इंडिजने रचला ६११ धावांचा डोंगर. >>
माझ्या आठवणीत तेव्हा बहुतेक त्यांनी पाच किंवा सहा बाद वरच डाव घोषित केला होता. अजून एक. वेस्टइंडीज आपल्याकडे आलेले असतानाची थरारक कसोटी मालिका आठवते. पाच सामन्यांच्या मालिकेत आधी 2-2 ची बरोबरी झालेली होती. पाचवा मुंबईत होता आणि तेव्हा त्यांचा कर्णधार क्लाइव्ह लॉइड याने मारलेला झेल-फटका बेदींच्या हातून निसटला होता. तेव्हा लॉइड फक्त दहा धावांवर होता. त्या जीवदानाचा फायदा घेत त्याने द्विशतक मारले. आपण तो सामना बहुतेक 200 धावांनी हरलो होतो.
…………………..
जोशी-अभ्यंकर हत्याकांड झाले त्या बातम्या >>>
अगदी बरोबर तेव्हा रोज संध्याकाळी सात वाजल्यानंतर आबालवृद्ध सगळेच घाबरून जायचे घराचे दारे-खिडक्या आतून कडेकोट लावली जायची.
छान लिहीलयं. टकले अधिवेशन
छान लिहीलयं. टकले अधिवेशन धमाल
मी लहान असताना एकदा आजोळी छोट्या खेड्यात गेले होते. तिथे टिवी असूनही लाइट नसल्याने रेडिओवर 'विनोद मेहेरा' गेल्याची बातमी आली होती. ती अर्धवट ऐकून 'विनोद खन्ना' गेला असेच एका गड्याने सांगितले. मला दोघेही माहिती नव्हते. सगळीजणं दोन दिवस 'विनोद खन्ना' साठी हळहळली मगं तिसऱ्या दिवशी कळले तो 'मेहेरा' होता. दोन्ही मामी , आई , मावशी (खन्ना हळहळ) चर्चा करताना आठवून हसू येते. अशाच अफवा पसरत असतील.
वडिलांनी पण एकदा सांगितले होते अशीच 'धर्मेंद्र' गेला ही अफवा पसरली होती , शेवटी रेडिओवरून त्याने स्वतः स्पष्ट केले की तो जिवंत आहे.
स्मिता पाटील गेली तेव्हा सगळे मोठे पेपर वाचत 'मेंदू ज्वर' वगैरे वर बोलत होती. मला मेंदू म्हणजे असेल कुठेतरी पोटात/पायात वाटलं होते. माहिती नव्हते तरी विचारले नाही मनानेच ठरवले.
शिवाय 'संध्यानंद' नावाचा पेपर होता त्यात अचाट व अतर्क्य बातम्या असायच्या . California मध्ये एक बाई अंडे देते वगैरे... ते आम्ही मुलं नियमित वाचून जगात काय काय 'घडते' म्हणून अवाक व्हायचो. आता त्याची जागा कायप्पाने घेतलीये .
Pages