आठवणींतील काही : सुरस आणि चमत्कारिक

Submitted by कुमार१ on 5 November, 2020 - 01:09

बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात.

अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे.

सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता:

“आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन”

तर या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्‍यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.

ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी.

एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले.

अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे:

“आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.”

लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली.
तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच.

अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. एका कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे.
त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आठवतात.
अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात.

आपल्या देशाच्या इतिहासात एकमेव आणीबाणी 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादली होती. ती प्रत्यक्ष लादाण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली.

रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा.

सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत.

शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती:

“मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “

शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात.

...
एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही.
पण एक करा...
नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान २० वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल.
************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती साली ते आता नक्की आठवत नाही. देशातील कामगारांचे किमान मासिक वेतन ४०० रुपये असावे असा एक कायदा सरकारने मंजूर केला होता. त्याची खूप ठळक टाईपात पहिल्या पानावर बातमी वाचलेली आठवते.

इंदिरा गांधींचा खून, संजय गांधींचा विमान अपघात आणि मरण आणि राजीव गांधींना लोकसभेवर मिळालेलं घणाघाती बहुमत याही ठळक व बहुचर्चित बातम्या होत्या.

अस्मिता आणि साद,
धन्यवाद.

मृत्यूच्या खोट्या बातम्या हे एक भारी प्रकरण असतं. अशा अन्य काही पण ऐकल्या होत्या. एक तर अविश्वसनीय आहे. मी ती माझ्या आजोबांकडून ऐकली आहे. वाचलेली नाही. 1960 च्या दरम्यान गोवा मुक्ती आंदोलन झाले होते. त्यात एक मराठी सैन्याधिकारी बेपत्ता झाले होते. खूप तपासाअंती ते काही सापडले नाहीत. मग त्यांना आंदोलनात मृत असे घोषित करण्यात आले होते. गमतीची बाब पुढे आहे.

मग त्यांची एका शहरात शोकसभा पण आयोजित करण्यात आली होती. मग एक चमत्कार घडला - अगदी चित्रपटात शोभावा असा ! बरोबर त्या सभेच्या दिवशी ते कुठून तरी आले आणि तिथे प्रकट झाले. त्यामुळे तेव्हाच्या वृत्तपत्रात संपूर्ण आठवडाभर ही घटना गाजत होती.
.............
* साद,
गांधी कुटुंबीय बातम्यांसाठी +१११ .

अस्मिता, संध्यानंद पेपर खूपच मनोरंजक बातम्यांनी भरलेला असायचा. नवलरसाची आणि अ आणि अ गोष्टींची मेजवानीच!
तसा जेव्हा The Onion वाचायला घेतला तेव्हा पहिल्यांदा जाम गोंधळायला झालं होतं. मग लक्षात आलं की हेच या पेपरचं वैशिष्ट्य आहे. उपरोधिक बातम्या देणे!

एक महानगर नावाचा पेपर यायचा.त्या लोकांना जनरल मध्ये अक्कल नसावी.पेपरमध्ये बॉम्ब स्फोटाच्या बातमी बरोबर rdx ची पूर्ण कृती(म्हणजे अमके किलो हे तमके किलो ते असं मिसळायचं) होती.शिवाय मुंबई त ड्रग्स वाढले तेव्हा 'lsd म्हणजे नक्की काय' म्हणून lsd ची सविस्तर कृती होती.
पोलीस टाइम्स तर भयंकर प्रकार होता.2 ओळींची यमकं वापरून सगळ्या बातम्या असायच्या. 'बाप ठरला कर्दनकाळ,डोक्यात घातला कुऱ्हाडीचा फाळ' अश्या.पोलीस टाइम्स आणून त्यातली अंडरवर्ड ची पूर्ण कुंडली आमच्याकडे पाठ केली जायची.
आता आश्चर्य वाटतं. आजच्या घडीला पेपर उघडून या सर्व बातम्या वाचणं सुन्न करतं. नका सांगू हे सर्व, काहीतरी पॉझिटिव्ह सांगा म्हणून वाईट वाटतं.त्यावेळी मात्र या बातम्या आवर्जून वाचल्या जायच्या.आपलं जग अतिशय सुरक्षित आहे, या सर्व नाट्यमय घटना कोणत्यातरी वेगळ्याच समांतर लांबच्या विश्वात घडतात असं वाटून असेल.

"पोलिस टाईम्स" ! अति भयंकर पेपर ! "हेडिंग मध्ये यमक नसेल तर कानाखाली देइन !" अशी धमकी बहुदा संपादक देत असावेत.
उल्हासनगर मध्ये "चालिहो" नावाचा सिंधी धार्मिक कार्यक्रम असतो त्यात एकदा चेंगराचेंगरी झाली
"उल्हासनगरचा चालिहो ! त्यात चेंगराचेंगरी झालीहो ! "

वरील सर्वांच्या पोलिस टाईम्सच्या आठवणी रोचक !
धन्यवाद.

बाकी काही वृत्तपत्रे फक्त चित्रपट जाहिराती तर काही 'कल्याण बाजार शुभराशी' यांवर चालत असत !

ते फक्त अंडरवर्ल्ड बद्दल लिहिणारं युवा की अश्या काही नावाचं पेपर होतं ना?आता आठवत नाही.बाबा वाचायचे(ते तेव्हा युवा बिवा अजिबात नव्हते Happy )

सोनिया गांधी यांचे हात बळकट करण्याची गरज- शरद पवार हे एका वृत्तपत्रात वाचल्यावर मित्राला म्हणालो याचा अर्थ सोनिया गांधींचे पाय खेचण्याची सुरवात.

रोचक विषय. मला अजून आठवतेय सकाळी साडेआठच्या मराठी बातम्या (ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत असत) त्याआधी "लोकरुची बातमीपत्र" असा कार्यक्रम असे. नियमित नाही पण बहुतेक आठवड्यातून एकदा असावा. त्यामध्ये चित्रविचित्र बातम्या सांगितल्या जात. हा लेख वाचून मला त्याची आठवण झाली. लेखात म्हटल्याप्रमाणे एखादी अतिमहत्वाची "ब्रेकिंग न्यूज" त्याकाळात वृत्तपत्राच्या नावाच्या सुद्धा वरती देण्याची पद्धत होती. काही वृत्तपत्रे तर हि वरची बातमी काळ्या पार्श्भूमीवर पांढऱ्या अक्षरात छापत. पहिल्या पानभर जाहिराती देण्याचा पायंडा अगदी अलीकडे म्हणजे मागच्या काही वर्षात पडला आहे तेंव्हापासून वृत्तपत्र वाचायचेच सोडून दिले आहे. पूर्वी कुटुंबातील प्रत्येकाकडून आतुरतेने वाट पाहिले जाणारे आणि आल्याआल्या सर्वांच्या नजरेखालून जाणारे वृत्तपत्र आता थेट रद्दीत जात आहे. याला जसे स्मार्टफोन आणि सोशल मिडियाचे आजकालचे वाढते प्रस्थ कारणीभूत आहे तसेच पहिल्या पानभर जाहिराती देण्याची पद्धत सुद्धा कारणीभूत आहे.

१. इंदिरा गांधी यांच्या हत्येचा दिवस व त्या बातम्या स्पष्ट आठवत आहेत. त्यादिवशी दिवसभर भारतीय माध्यमांमधून (म्हणजे आकाशवाणी आणि दूरदर्शन) त्या गंभीर आहेत अशी बातमी सांगितली जात होती. पण सिलोन रेडिओवरून (श्रीलंका ब्रॉडकास्टिंग) कि जो भारतात बहुसंख्य प्रमाणात ऐकला जायचा, त्यानी मात्र दुपारी दिडच्या बातम्यांमध्येच मृत्यू झाल्याचे जाहीर करून टाकले होते. आकाशवाणीवरून हे वृत्त संध्याकाळी सहा वाजता अधिकृतरीत्या जाहीर केले गेले होते. तेंव्हा एका स्थानिक वृत्तपत्राने इंदिराजींचा मोठा फोटो छापून केवळ एका पानाचे वृत्तपत्र बनवून संध्याकाळी शहरभर ते प्रसिद्ध केले होते, हे सगळे स्पष्ट आठवते. सर्वत्र फारच तणावपूर्ण आणि उदास असे वातावरण होते त्या संध्याकाळी. एकत्र येऊन लोक गटागटाने चर्चा करत होते.

२. "आकाशवाणी से बडे दु:ख के साथ हम ये सूचित करते है कि भूतपूर्व प्रधानमंत्री तथा कॉंग्रेस आय अध्यक्ष श्री राजीव गांधी कि कल रात मद्रास के पास पेरांबूदूर में एक शक्तिशाली बमविस्फोट में हत्या की गयी. श्री गांधी वहां एक कॉंग्रेस कार्यकर्ताओं की रैली को संबोधित करने जा रहे थे" २२ मे १९९१ च्या सकाळी आठ वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्यांतील (कि ज्या बातम्या देशातील आकाशवाणीची सर्व केंद्रे सहक्षेपित करीत) हे वाक्य अगदी जसेच्या तसे स्पष्ट आठवत आहे. "राजीव पर्व संपले. राजीव नेत्र निमाले" असे काहीसे शब्द त्यादिवशी एका मराठी वृत्तपत्रात (बहुतेक दैनिक सकाळ) मथळ्यात ठळकपणे छापले होते ते आठवते. बातमीत त्या रात्री स्फोट झाल्यांनतर "लोक ओरडू लागले राजीव एंगे, राजीव एंगे (राजीव कुठे आहेत, राजीव कुठे आहेत)" हा अगदी असाच उल्लेख सुद्धा ठळकपणे आठवतोय.

३. १९९३ साली दरम्यान मराठवाड्यात किल्लारी येथे झालेल्या भूकंपाच्या बातम्या पण आठवताहेत. पुणे आकाशवाणीवर सकाळी सात च्या बातम्यात "भूकंप झाला असून काही जणांचा मृत्यू झाला आहे" अशा स्वरुपाची बातमी सांगितली होती. सकाळी सर्वांचाच समज होता कि किरकोळ भूकंप असेल. पण हाच आकडा जसजसा दिवसभरात भराभर वाढत गेला तेंव्हा सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. तो भूकंप प्रत्यक्षात किती प्रलयकारी होता ते कळल्यानंतर अख्खा देश हादरला होता. या घटनेबाबत उपग्रहामार्फत अमेरिकेला कि ब्रिटनला या घटनेची सर्वात आधी कुणकुण आधी लागली होती व त्यांनीच सर्वात प्रथम आपल्या सरकारला "तुमच्या इथे मोठा भूकंप झालाय" असे कळवले होते अशी वदंता पण तेंव्हा उठली होती. खखोदेजा. पण गणेश चतुर्थीच्या काळातच (कि विसर्जनाच्या रात्री) हे घडले होते. वृत्तपत्रात किल्लारीच्या एका आजीबाईंची खूपच बोलकी व अंगावर काटा आणणारी प्रतिक्रिया आली होती "आरं बाबा, संध्याकाळी मांडवात गणपतीम्होरं पोरं नाच नाच नाचली आणि सकाळी साऱ्यांचे मुडदे झाले"

४. रंगीत छपाई अजून आली नव्हती तेंव्हाची वृत्तपत्रे सुद्धा आठवतात. त्याकाळात महाराष्ट्र टाईम्स मधली अक्षरे अजिबात सुबकता नसलेली अशी होती. इकार आणि उकार अक्षराशी पूर्णपणे फारकत घेतलेले. बरेच अंतर सोडून असायचे. वाचायला नुकताच शिकलो असल्याने वाचताना प्रचंड चिडचिड व्हायची त्यामुळे महाराष्ट्र टाईम्स सर्वात बकवास पेपर आहे लोक कसे काय वाचतात असे वाटायचे. इतर वृत्तपत्रात त्यामानाने बरी अक्षरे असत. आमच्याकडे जो महाराष्ट्र टाईम्स यायचा त्यावर तारीख ज्या त्या दिवशीचीच असायची पण बातम्या मात्र दोन दिवसापूर्वीच्या असायच्या (आदल्या दिवशीच्या नव्हे, त्याच्याही आधीच्या). एकदा वडिलांचे एक मित्र मुंबईहून आले होते. "ताजा" म्हणून वाचायला घेतलेल्या पेपरमधली एक बातमी वाचून ते म्हणाले "अरे हि बातमी तर परवाच आली होती. हे पुन्हा घडले कि काय? पेपर तर आजचाच दिसतोय" तेंव्हा काकूंनी (त्यांच्या धर्मपत्नी) त्यांना सांगितले कि अहो हि मुंबई महाराष्ट्र टाईम्सची डाक एडिशन आहे. तेंव्हा आम्हाला पण कळले कि ती डाक एडिशन आहे. म्हणजे पुढची तारीख घालून ते अंक ते पार्सलने पाठवत, असे काहीसे असावे बहुतेक.

५. लोकप्रभा हा रंगीत छपाईच्या आधीचा आठवतोय. अजूनही मला तोच लोकप्रभा वाचनीय वाटतोय (काही ढ कळत नव्हते तेंव्हा. पण ते अंक आईवडिलांनी जपून ठेवले असल्याने नंतर वाचयला मिळाले). तर त्याकाळात (हे खूप खूप जुने अंक आहेत व ते अजूनही कुठेतरी असतील घरात) रंगीत छपाई बघायला मिळणे हे सुद्धा नेत्रसुख असे. जेंव्हा नियतकालिक छपाईत रंग नुकतेच यायला लागले तेंव्हा लोकप्रभेच्या कृष्णधवल अंकाच्या मुखपृष्ठावर "मध्यवर्ती बहुरंगी चित्रासहीत" असा ठळक उल्लेख करून ते त्याची जाहिरात करायचे. या अंकात मध्यभागी एक मोठे (दोन पानांचे मिळून पण दुमडलेले) पोस्टरवजा रंगीत चित्र असायचे (मुख्यत्वे एखाद्या अभिनेत्रीचे किंवा निसर्गचित्र इत्यादी). लोकप्रभेप्रमाणेच त्याकाळात मनोहर, नवनीत मराठी डायजेस्ट, अमृत हि नियतकालिके असत. त्यात खूपच सुरस आणि रोचक कथा व लिखाण असे. या नवनीत मराठी डायजेस्टचे काही अंक अजूनही घरात कुठेतरी जतन करून ठेवले आहेत. वेळ काढून ते आता स्कॅन करून ठेवतो.

६. दिवाळी अंक आणि त्यातली व्यंगचित्रे म्हणजे अक्षरशः पर्वणी असायची. काही अजूनही आठवतात. मराठी वाहिन्या नुकत्याच सुरु झाल्या होत्या तेंव्हाचे दिवाळी अंकातील एक व्यंगचित्र आठवते. या वाहिन्यामध्ये त्याकाळात बहुतांशी अमराठी लोक असत, ज्यांना मराठी लेखक किवा मराठी साहित्य याविषयी फारसे ज्ञान नसे. यावर त्या व्यंगचित्रकाराने बोट ठेवले होते. त्यात अशाच एका वाहिनीतला एक अधिकारी कोणालातरी सांगत आहे कि "अरे मराठी ह्युमर असलेल्या कथा कोण शोधत बसणार? त्यापेक्षा ते कोण विनोदी लेखक चि वि जोशी आहेत त्यांनाच पैसे देऊन आपण बोलवू घेऊ ना. खूप फन येईल" आणि चित्राचे शीर्षक होते "फणफणलेली मराठी"

चित्रलेखा चा एक दिवाळी अंक होता लहानपणी. त्यात अत्तरं (परफ्युम) मेकिंग आणि रुद्राक्ष याबद्दल खूप छान माहिती होती.
आणि त्या दोन कथा सिरीज होत्या, अरुणा शानभाग च्या कथेवर आधारित अंधार यात्रा आणि संसारी साधू.
एका दिवाळी अंकात सुंदर घड्याळं बनवणाऱ्या जादूगार विक्रेत्याची काळपुरुष नावाची कथा होती ती पण मस्त.
एका अंकात इन्स्टंट कॉफी ची माहिती वाला लेख पण होता.
माझी सकाळची शाळा असल्याने दुपारच्या वेळात हे सर्व खूप वाचायचे मी.जत्रा पण वाचायचे.त्यातले नॉन व्हेज विनोद डोक्यावरून जायचे पण जेम्स बॉण्ड सारखा जनू बांडे होता त्याची कॉमिक स्ट्रीप एकदम आवडीने वाचायचे.(ते मी वाचणं अपेक्षित नव्हतं.पण ते मला सापडणार नाही अश्या जागी लपवायला कोणाला वेळ नसावा बहुतेक Happy )

वरील सर्वांच्या विविध आठवणी रोचक !
धन्यवाद.
.......................

1983 मधील एका बातमीची नोंद माझ्याकडे आहे. बातमी अशी आहे :
पाकिस्तानात एका तरुणीला विवाहपूर्व संबंधातून मुलास जन्म दिल्याबद्दल फटक्यांची शिक्षा न्यायालयात सुनावण्यात आली. परंतु, नंतर बर्‍याच महिलांच्या विनंतीवरून ती सक्‍तमजुरीवर आणण्यात आली.
…………………………
प्रत्येक दैनिकाच्या वयानुसार त्यामध्ये ‘पंचवीस/ पन्नास किंवा शंभर वर्षांपूर्वी’ अशी सदरे असतात. त्यात जुन्या काळचा काही रोचक मजकूर अथवा घटना दिलेल्या असतात.
1984 मध्ये मी ‘पन्नास वर्षापूर्वी’ या ‘सकाळ’च्या सदरात 1934 मधील एक बातमी वाचली होती. ती अशी:

‘प्रेमविवाह की विवाहोत्तर प्रेम यावर कॉलेजात परिसंवाद झाला’.
.................................

1980च्या दशकात शहरी भागात सुद्धा हुंडाबळी, महिलांना जाळले जाणे अशा घटना बऱ्यापैकी घडत होत्या.

त्यासंदर्भात ‘जाळल्या जाणाऱ्या महिला’ हा केसरीचा चांगला अग्रलेख आठवतो.

अर्र. मी लिहिलेल्या आठवणी सुरस आणि चमत्कारिक नाहीत.
लोकरुची वार्तापत्र शुक्रवारी असे.
मुंबईच नव्हे तर दिल्लीतल्या सकाळी साडेसातच्या news magazine मध्येही शुक्रवारी अशा रंजक बातम्या सांगत.
अजूनही सांगत असतील. मी ऐकायचं सोडलं.

या घटनेबाबत उपग्रहामार्फत अमेरिकेला कि ब्रिटनला या घटनेची सर्वात आधी कुणकुण आधी लागली होती व त्यांनीच सर्वात प्रथम आपल्या सरकारला "तुमच्या इथे मोठा भूकंप झालाय" असे कळवले होते अशी वदंता पण तेंव्हा उठली होती. खखोदे.जा.

किल्लारी भूकंप नव्हे , १९७९ ला मोरवी डॅम फुटला त्याची बातमी प्रथम अमेरीकेत प्रसारीत झाली ( अमेरीकेच्या उपग्रहाने टिपले होते. ) गुजरात सरकारला अतिवृष्टीमुळे पूर आला असे वाटले होते , पुरामुळे तेथील दळण वळण यंत्रणा बंद पडल्याने डॅम फुटल्याचे २४ तासानंतर कळाले .
किल्लारीच्या भूकंपात जिवीतहानी भूकंपाच्या तीव्रतेपेक्षा दगड मातीची कच्ची घरे पडल्यानी झाली.

अतुल,
त्याकाळात महाराष्ट्र टाईम्स मधली अक्षरे अजिबात सुबकता नसलेली अशी होती.
>>> मटाच्या तत्कालीन टाईपबद्दल सहमत. तो सदोष असल्याचे मी तज्ञांकडून ऐकले होते.
…………………..
गणेश चतुर्थीच्या काळातच (कि विसर्जनाच्या रात्री) हे घडले होते
>>
होय, अनंत चतुर्दशीचा दिवस. पुण्याच्या मिरवणुकीतील एक बैलजोडी भूकंपाआधीच्या ‘चाहुलीने’ बिथरल्याचे विजय कुवळेकरांच्या लेखात वाचले होते.

पोखरण च्या अणुचाचणी ची सकाळ मधली पहिल्या पानावर ची बातमी आठवतीये.
अण्वस्त्र सज्ज वगैरे शब्द पहिल्यांदा वाचले होते

हाथी मेरे साथी चित्रकरणाच्या दरम्यान राजेश खन्नाला दुखापत झाली होती . ही बातमी ऐकून .. नव्हे वाचून आमच्या वाड्यातल्या बायकांनी हो हो बायका इतक्या दु:खी झाल्या होत्या की जेवल्या नाहीत.
दुसरी एक बातमी होती एक कोवळी तरुण मुलगी साधवी झाली होती.
पाक्षिक होतं की मासिक की साप्ताहिक होतं रसरंग मला वाटतं हमो संपादक होते आवडीने वाचायचो ..
माझ्या वडिलांना ब्लिट्झ त्यातले शब्दकोडे सोडवायचे किती बारीक अक्षर असायची पण पूर्ण वाचायचेच ..

मर्यादित मनोरंजनाच्या काळातील कृष्ण धवल "लोकप्रभा" खूप आवडते होते, विशेषतः चित्रपट परीक्षण व कथा. त्याकाळी (१९७७-८५) वाचलेल्या चित्रपट कथा अजूनही लक्षात आहेत (सुहाग मधील कादरखानचे "पास्कल" हे नाव खूप वेगळे वाटायचे) . निखळ मनोरंजनासाठी वासू मेहेंदळेंचे "विचित्र विश्व " आणि मराठीतले उत्तम डायजेस्ट "अमृत", मुलांचा खास चांदोबा याबरोबरच अर्नाळकरांच्या कथामाला . त्याकाळी वडिलांच्या ऑफिस मध्ये वर्गणी काढून दिवाळी अंक आणले जात, आवाज, दक्षता, धनंजय, किर्लोस्कर (मेनका मुलांना वर्ज्य होत) इत्यादी .

विचित्र विश्व >>> सुरेख आठवण !

सर्वांच्या आठवणी छान आणि रोचक आहेत.
चर्चेत भाग घेतल्याबद्दल आणि पूरक माहितीबद्दल सर्वांचे मनापासून आभार.

छान आहे धागा... ! पोलिस टाईम्स वाचायचे मी ही. त्यातले रक्तरन्जित फोटो मात्र आवड्त नव्ह्ते. अति करत होते हे पेपरवाले. दक्षता मासिकही लावले होते. अमृतचेही अंक वाचलेत. त्यातच 'संपादकांच्या कोलांटउड्या', 'याला जीवन ऐसे नाव' असे सदर असायचे ना?
गृहशोभा/ गृहशोभिका हिंदी मराठी दोन्ही वाचले. त्यात, हाय मै शर्म से लाल हुई' हे सदर भन्नाट असायचे. 'कॉलेज कट्टा' नावाचा एक पेपर यायचा. तो ही वाचायचो.
<<चित्रलेखा चा एक दिवाळी अंक होता लहानपणी. त्यात अत्तरं (परफ्युम) मेकिंग आणि रुद्राक्ष याबद्दल खूप छान माहिती होती.<< चित्रलेखाचा रुद्राक्ष हा अंक मलाही आठ्वतो. ठाण्यात दोन रुद्राक्षाची झाडे आहेत असा उल्लेख होता.
मायापुरी हा सिनेजगतातिल घडामोडीवर अंक काकांकडे यायचा. त्यात गौतमराजाध्यक्षानी काढलेले एक से एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आठवतात. त्यात तेव्हा त्यान्ना एक प्रश्न विचारण्यात आला होता की आजच्या काळात तुम्हाला कोणती हिरोईन सुंदर वाटते.त्यांनी सारिका (कमल हसन ची बायकॊ) ही सुंदर असल्याचे म्हटल्याचे आठवते. मग त्यांनी स्पष्टीकरणात तिची जॉ लाईन सुंदर आहे असे सांगितले. माधुरी दीक्षित, श्रीदेवी यांची हि जॉ लाइन चांगली आहे. तशी महिमा चौधरीची नाही.

माझी दुसरी आठवण ' श्री' पेपर. माझ्या खूप खूप लहानपणी, या पेपरमध्ये शोभराजला पकडल्याची, जोशी -अभ्यंकर खटला , गीता आणि संजय चोप्रा यांची किडनेपिंग केस .. या सगळ्या घटना मोठमोठ्या मथळ्याखाली तपशीलवार दर आठवड्यात येत होत्या. वाचूनच धडकी भरायची.

आर्या,
मस्त आठवणी.
'संपादकांच्या कोलांटउड्या',
>>>
मुद्राराक्षसाचा विनोद आणि उपसंपादकांच्या डुलक्या अशी ती नावे. त्यातली काही वाक्यं उदाहरणार्थ :

- तू उगी चहात पाय गाळतोस.
-बंदूक घेऊन पळणाऱ्या सशाचा पाठलाग करताना तो ठेच लागून पडला.

- पाच सुवासिनींनी मंत्र्यांना आवळले.
- दाताचा ठोसा लागून तो खाली पडला !!

"याला जीवन ऐसे नाव" फार रोचक सदर होते. विनोदी गंभीर ह्रदयस्पर्शी असे सर्व प्रकारचे किस्से त्यात असायचे. त्यातले काही किस्से अद्यापही आठवतात अधून मधून. आता लगेच आठवताहेत असे दोन किस्से:

१. मुंबईला कि नागपूरला एका सिनेमागृहात मध्ये बोलपट सुरु होता (बोलपट हा त्या किश्श्यात वापरलेलाच शब्द). त्यामध्ये एक दृश्य होते. नायक हा शिकत असतो आणि दरम्यानच्या काळातच त्याचे नायिकेबरोबर प्रेमप्रकरण सुरु असते. तर त्यातल्या एका दृश्यात ते दोघे नायकाच्या घरी बेडवर बसून गप्पा मारत असताना नायक तिला जवळ ओढतो. तर ती लटका विरोध करते आणि सांगते "आधी अभ्यास कर". यावर तो म्हणतो "आता अभ्यासच करूया" असे म्हणून तिला अंगावर ओढून घेतो व ते दोघे बेडवर आडवे होतात, तेंव्हा नायक एक हात वर करून लाईटचा स्वीच बंद करतो आणि त्यानंतर पडद्यावर काही क्षण काळोख राहतो. असा काहीसा तो प्रसंग आहे. तर चित्रपटाचा हा खेळ सुरु असताना नेहमीप्रमाणेच नायकाने तिला मिठीत घेऊन अंगावर ओढून आडवे झाल्यावर दिवा मालवला, पडद्यावर अंधार झाला. आणि बरोबर त्याचवेळी बाल्कनीत बसलेल्या एका मिश्कील प्रेक्षकाने हातातल्या विजेरीचा झोत पडद्यावर टाकला. काय प्रकार आहे अचानक कोणाच्या लक्षात आले नाही. पण काहीच क्षणांनंतर मात्र त्यातला गर्भितार्थ लक्षात घेऊन सगळे प्रेक्षागृह हास्यकल्लोळात बुडाले.

२. एक लहान मुलगी आजारी असते. आजार गंभीर असतो (मूळ किश्श्यामध्ये बरेच तपशील दिले आहेत. पण बहुतेक न्युमोनिया असावा). तर एका रात्री तिला अचानक ताप चढायला सुरवात होते. रात्रभर ताप कमी जास्त होत राहतो. ताप डोक्यात गेल्यावर मुलगी असंबंध बडबड करायला सुरवात करायची. त्यात तिचा एक प्रश्न असायचा "किती वाजले?". जवळजवळ दर एक तासांनी रात्रभर ती हा प्रश्न विचारायची. घरच्यांना कळत नसते कि ते असे का विचारत आहे. ते बिचारे घड्याळात बघून जी वेळ झाली ती तिला सांगायचे. करता करता पहाट झाली. सहाच्या आसपास ती ग्लानीत गेली ती कायमचीच. कारण सात वाजायला काही मिनिटे असतानाच तिचे प्राणोत्क्रमण झाले. तिचे अखेरचे सर्व विधी आटोपल्यावर तिच्या मैत्रिणींशी बोलत असताना एक मैत्रिणीने जे सांगितले ते ऐकून घरचे स्तब्ध झाले. ती म्हणाली "तिला कोणीतरी सांगितले होते म्हणे कि तिचा मृत्यू एके दिवशी सकाळी सात वाजता होईल. आणि हे ती माझ्याशी अनेकदा बोलली होती. तिची भीती अखेर खरी ठरली". तिच्या मैत्रिणीचे हे बोलणे ऐकले तेंव्हा घरच्यांना उलगडा झाला कि ती रात्रभर असे का विचारत होती.

@ अतुल डी पाटील : भारी आहेत तुमचे अनुभव.

पेपरमध्ये वाचलेल्या काही लेखमाला पण सुंदर होत्या. त्यामध्ये विजय तेंडुलकर, शिवाजीराव भोसले, व्यंकटेश माडगूळकर यांची सदरे छान असायची.

Pages