बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात.
अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे.
सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता:
“आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन”
‘तर या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.’
ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी.
एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले.
अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे:
“आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.”
लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली.
तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच.
अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. एका कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे.
त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आठवतात.
अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात.
आपल्या देशाच्या इतिहासात एकमेव आणीबाणी 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादली होती. ती प्रत्यक्ष लादाण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली.
रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा.
सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत.
शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती:
“मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “
शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात.
...
एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही.
पण एक करा...
नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान २० वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल.
************************************************
कालौघात लुप्त झालेले आणखी दोन
कालौघात लुप्त झालेले आणखी दोन वाड्मयप्रकार ( हा शब्द कसा लिहायचा ?)
१ हँडबिल्स : एखादा सिनेमा रीलीज होत असे तेव्हा त्याची दोन मोठी मोठी पोस्टर्स एका हातगाडीच्या दोन्ही बाजूना लावून हलगी चा साथीनी मिरवणूक निघत असे. त्या मागे एक माणून हँडबिल्स वाटत असे. एकाच कागदाच्या दोन घड्या घातलेल्या असत, त्यावर सिनेमाची क्रेडिट्स, त्रोटक कहाणी, वगैरे असत. गावाकडे जुन्या ट्रंक मध्ये सापडली तर स्कॅन करून टाकेन. "तलाश" सिनेमाचे मला अजूनही आठवते. "या सिनेमाची तुलना अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यासाठी श्री क्र्रूष्णाने उघडलेल्या तोंडाशीच काय ते करता येइल" असे वाक्य होते.
२ सोलापुर च्या "उमा" थेटर मध्ये इंग्रजी (!) (A) सिनेमे मॉर्निग शो ला लागत. त्याच्या पोस्टर वर मजकूर लिहिणारे प्रतिभावान लेखक अनामिकच रहातील बिचारे.
"कमी कपड्यात पोहायचा छंद असलेल्या तीन सुंदर तरुणी एका तलावात पोहायला जातात, अचानक एक गोरिला सदृष्या प्राणी येतो, पुढे काय होते ? .. ". शिवाय अठरा वर्षाखालील मुलांनी थिएटर कडे फिरकू नये अशी तंबीही दिलेली असायची पेपर मधल्या जाहीरातीत .
विजय,
विजय,
झकास अनुभव. तुमच्या ट्रंकेत तो खजिना मिळाल्यास इथे जरूर आणा. प्रतीक्षेत !
वाड्मयप्रकार ( हा शब्द कसा लिहायचा ?) >>
बाकी या शब्दाबाबत मी देखील फार त्रास करून न घेता त्याऐवजी साहित्य हा सोपा शब्द वापरणे पसंत केले आहे.
'वाड्मय' हा शब्द गूगल इनपुट टूल्स किंवा बोल-लेखनसुविधा या दोन्ही प्रकारे टंकायचा प्रयत्न केल्यास त्याचे वांग्मय होते हे अनुभवले आहे !
वाङमय
वाङमय
गूगल ट्रान्सलेट मध्ये इंग्लिश => मराठी असे सेटिंग ठेवून Literary लिहिल्यास वाङमयीन असे भाषांतर दिसेल.
त्या शब्दावर डबल क्लिक करून, बॅकस्पेस वापरून वाङमयीन या शब्दाला वाङमय असे बदलता येते.
टीपः गूगल ट्रान्सलेट मध्ये मराठी => इंग्लिश असे सेटिंग ठेवून vaangmaya लिहिल्यास वाङ्मय असा शब्द मिळतो.
धन्यवाद, उबो !
धन्यवाद, उबो !
त्या चौकटीत मी मराठीतच असे थेट टंकन केले :
वाङ्मय
जमले !
वाचकांची पत्रावरुन पेपरमध्ये
वाचकांची पत्रावरुन पेपरमध्ये अजून एकमजेशीर छोटासा रकाना असायचा आठवतोस का कुणाला 'सोडचिठ्ठी' इतकी फुसकी व हास्यापद कारणं असायची ... शेवटचं वाक्य असायचं .... दिवसांत नांदायला न आल्यास हीच सोडचिठ्ठी समजावी. विरंगुळ्यात एक धागा कोणीतरी काढा बरं ...
लहानपणी विचित्रविश्व वाचायची
लहानपणी विचित्रविश्व वाचायची आवड झाली. खूप मजा वाटायची.
छान !
छान !
मं ता ,
सोडचिठ्ठी >> कोणता पेपर ?
...............................
'सकाळ'चा चिंटू आठवतोय का ?
एकेकाळी तो त्या वृत्तपत्राचा अविभाज्य भाग होता. मध्येच एखाद्या वर्षासाठी लोकसत्ता'ने त्याला पळवला होता. पण नंतर तो पुन्हा सकाळ'कडे आला होता.
कुमार सर 'मराठवाडा'
कुमार सर 'मराठवाडा' औरंगाबादहून प्रसिध्द व्हायचा ..
'जाहीर सोडचिठ्ठया' मीही
'जाहीर सोडचिठ्ठया' मीही वाचल्या आहेत भरपूर. त्यांची सुरुवात हमखास ' सर्वांना कळवण्यात येते की मी अमुक अमुक तुमच्या लग्नाची बायको असून...' अशी असायची. त्यावरून मग 'ही एकटी 'सर्वांची' लग्नाची बायको कशी असेल?' असे बाष्कळ विनोद आम्ही शाळकरी दोस्त करत असू
कसलं अपमानकारक वाटत असेल ना
कसलं अपमानकारक वाटत असेल ना लोकांना त्या काळी
आपला डिव्होर्स असा वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करायचा.
हो कुमार सर! ते बीएसएनएल,
हो कुमार सर! ते बीएसएनएल, खोदकाम, लँडलाईन शी संबंधित पत्र आठवतात
चिंटू सुरू झाल्यावर त्याची
चिंटू सुरू झाल्यावर त्याची लोकप्रियता पाहून इतर पेपरांच्या रविवार पुरवण्यांत त्याची नक्कल करणारे गोटू, बंड्या वगैरे सुरू झाले होते. पण ही मंडळी फारशी टिकली नाहीत.
चिंटू अनेक वर्षे कृष्णधवल होता. त्याचं पहिलं रंगीत चित्र त्याचं पुस्तक आलं तेव्हाच मुखपृष्ठावर पाहिलं. पुढे तो सकाळमध्ये सुटीच्या पानावर आला की रंगीत व्हायचा. नंतर नंतर पूर्ण पेपर रंगीत छापू लागले तसा चिंटू रोजचाच रंगीत झाला.
दिवाळीच्या दिवसात एक स्पेशल
दिवाळीच्या दिवसात एक स्पेशल पुरवणी यायची ती आठवते का कोणाला? स्पेशली लहान मुलांसाठी. वेगवेगळ्या प्रकारची कोडी, रांगोळ्या, ठिपके जोडून चित्र बनवा, जोक्स असायचे.
नंतर नंतर पूर्ण पेपर रंगीत
नंतर नंतर पूर्ण पेपर रंगीत छापू लागले तसा चिंटू रोजचाच रंगीत झाला.
>>>
वर्तमानपत्र हे कृष्णधवल छापलेले असे हे विसरूनच गेलो होतो
सोडचिठ्या भारीच !
सोडचिठ्या भारीच !
चिंटू आठवणीही छान.
...................................
आता बजाज स्कूटर सारख्या 2 stroke दुचाकी खूप कमी आहेत. त्यामुळे टाकीत पेट्रोल अधिक तेल एकत्र भरणे जवळपास दिसत नाही. रिक्षाही बहुतेक वायुरूप इंधनावर चालत आहेत. त्यामुळे एकेकाळची पेट्रोल पंपावरची ही पाटी आता जुन्या आठवणी मध्ये धरायला हरकत नसावी.
रिक्षा व लेडीज
रिक्षा व लेडीज
अरे हो आठवले.
अरे हो आठवले.
माझी एक लहान स्कूटी होती. त्यात तो पाऊच विकत घेऊन घालावा लागायचा.
नंतर पेप घेतल्यावर कसलं छान वाटलं पाऊच घालावा लागत नाही म्हणून.
आता घरातली एक गाडी अजून थोडी मोडकळीला आली की बीएस६ केपेबल गाडी घेणार आहे.
'रिक्षा' आणि 'लेडीज' हे एका रांगेत का? रिक्षा पण कमी संख्येत असायच्या की काय?
एम एटी, स्कूटर बायका जास्त
एम एटी, स्कूटर बायका जास्त चालवत असतील म्हणून असेल.
मी कॉलेजला असताना ची ही बातमी
मी कॉलेजला असताना ची ही बातमी आहे. नाशिक रोड येथे राहणारी एक बाई जी पोलिस स्टेशन मध्ये क्लर्क म्हणून काम करायची. तिच्या घरात पोलीसाना तिच्या आईचा आणि मुलीचा सांगाडा मिळाला होता. खूप दिवस त्यात पुढे काय तपास झाला छापून येत होते. माझी मैत्रीण त्या बाईच्या घराजवळील भागात राहत असे. ती मला ही घटना घडल्यावर सांगत होती की त्या बाईची मुलगी आणि आई काही वर्षे झाली गायब होते. कोणीही त्या बाईला विचारले तर ती सांगायची की गावाला गेलेत.
ह्या बातमीचे कात्रण नाहीये पण गुग्ल्या वर हे सापडले.
https://zeenews.india.com/home/nasik-lady-clerk-remanded-to-police-custo...
खूप वेगळीच बातमी होती. त्या दिवसांत फक्त पेपरात असे जवळपासच्या घटना कळायच्या. टीव्ही वर मुंबई कडील बातम्या दाखवत. नाशिक चे एक लोकल न्यूज चॅनेल होते तेव्हा नजर.. काय माहिती आता आहे की नाही.
आमच्या कॉलेज मध्ये छोटी चोरी झाली होती कॉलेज मध्ये घुसून काही रोख रक्कम चोरीला गेली होती. ती बातमी पण नजर वाले शूट करून गेले. आम्ही पोरीनी जाऊन त्या लोकांना शिताफीने, 'हे कधी दाखवणार' वेळ वगैरे विचारून घेतली. आणि अगदी काहीतरी महान घडले ह्या थाटात, सगळ्या गल्ली ला दाखवले. ही पाहा आमच्या कॉलेज ची बातमी.
सध्या लस हा बहुचर्चित शब्द
सध्या लस हा बहुचर्चित शब्द असल्याने त्याबाबतची एक खूप जुनी कटू आठवण सांगतो. सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची आणि माझ्या एका सहकार्याबाबत घडलेली. तेव्हा पोलिओची लस बहुतेककरून सरकारी दवाखान्यांमध्ये असायची. असेच एकदा एक लसीचा साठा दवाखान्यात आलेला होता. बहुधा वीज बिघाडातील (किंवा अन्य काही) कारणांमुळे तेथील फ्रीजचे काम काही बरोबर झाले नाही आणि त्याचा लसीवर अनिष्ट परिणाम झाला.
तरीही अज्ञानाने ती अनेक बालकांना दिली गेली. त्यानंतर काही काळाने त्या ठराविक लसीने लसीकरण झालेल्या बहुतांश बालकांना पोलिओ झाला. माझे सहकारी त्यापैकीच एक.
त्या काळातील लसी या प्रत्यक्ष रोगजंतूपासून केलेल्या असायच्या. त्यामुळे जर का त्यांची साठवण नीट झाली नाही, तर त्यांच्यामुळे प्रत्यक्ष रोग होण्याचा धोका होता. यावरून आता वैज्ञानिक प्रगतीचे महत्त्व दिसून येईल.
सध्या तयार होणाऱ्या अनेक लसी या प्रत्यक्ष रोगजंतू न वापरता तयार केलेल्या आहेत. त्यामुळे त्या शरीरात गेल्यानंतर प्रत्यक्ष रोग निर्माण होत नाही. काही कारणाने जर त्यांची साठवण नीट झाली नाही तर त्या एकवेळ निष्प्रभ ठरतील, परंतु त्यांच्यामुळे संबंधित रोग होणार नाही हा फार महत्त्वाचा फायदा आहे.
ओह कुमार
ओह कुमार
हे फारच वाईट.
अशीच व्लादिमीर हाफकीन ची गोष्ट वाचली होती. कोणीतरी इंजेक्शन देताना सिरिंज खाली पाड्ली आणि वापरली, आणि कॉलरा लसीकरणानंतर धनुर्वाताने गेलेल्या काही जणांचा आळ हाफकीन वर आला.
माझ्या आजोळी माझ्याच वयाची एक
माझ्या आजोळी माझ्याच वयाची एक मुलगी होती. तिला आठवीत का नववीत असताना डॉक्टरने काहीतरी चुकीचे इंजेक्शन दिले होते आणि त्यातून कायमचे अपंगत्व आले. नंतर तिने ९५सालच्या आसपास नैराश्यातून आत्महत्या केल्याचे कळाले. तुमची पोस्ट वाचून ती घटना आठवली.
<<वाचकांची पत्रावरुन
<<वाचकांची पत्रावरुन पेपरमध्ये अजून एकमजेशीर छोटासा रकाना असायचा आठवतोस का कुणाला 'सोडचिठ्ठी' इतकी फुसकी व हास्यापद कारणं असायची<< छान माहिती मंजुताई!!
दै लोकमत मधिल 'हाय राणी' आणि ' वहिनिचा सल्ला' हे सदर आठवते का कुणाला? खान्देश आवृत्ती मधे येत असे. तुफान लोकप्रिय झाले होते हे सदर. हाय राणी ला काहिही प्रश्न विचारायचे लोक.
हिन्दी गृहशोभा मधे 'हाय मै शर्म् से लाल हो गयी' नावाचे सदर यायचे. अगदी लेडीज काय पुरुषसुद्धा हे वाचत. धम्माल अनुभव असायचे महिलांचे. मुलगा पहायला आलेल्याचे, लग्न ठरवतांनाचे, लग्नानन्तरचे एकेक किस्से .
' वहिनिचा सल्ला' >>>
' वहिनिचा सल्ला' >>>
या धर्तीवरचे उषावहिनीचा सल्ला हे दैनिक सकाळ मध्ये बऱ्याच पूर्वी होते.
..
माबोवरील 'कोतबो' ही त्याची आधुनिक आवृत्ती म्हणावी काय ?
वरील अनु यांच्या प्रतिसादातील
वरील अनु यांच्या प्रतिसादातील ‘सिरिंज’वरून माझ्या तारुण्यातील दवाखान्यात असलेल्या ( आणि मी वापरलेल्या) काचेच्या सिरिंजेसची आठवण येणे अपरिहार्य आहे !
आमच्या शिक्षणादरम्यानही त्याकाळी बहुतेक सगळीकडे काचेच्या सिरिंजेस असायच्या. त्या आणि सुया वीस मिनिटे पाण्यात उकळून निर्जंतुक केल्या जात. मग त्या निर्जंतुक चिमट्याने उचलून एकमेकाला जोडल्या जात.
साधारण 1990 नंतर जन्मलेल्या पिढीला हे माहिती असण्याचे काहीच कारण नाही, कारण तोपर्यंत जगभर सध्याच्या एकदाच वापरायच्या प्लॅस्टिक सिरिंजेस प्रचलित झालेल्या होत्या.
दै लोकमत मधिल 'हाय राणी' आणि
दै लोकमत मधिल 'हाय राणी' आणि ' वहिनिचा सल्ला' हे सदर आठवते का कुणाला? खान्देश आवृत्ती मधे येत असे. तुफान लोकप्रिय झाले होते हे सदर. हाय राणी ला काहिही प्रश्न विचारायचे लोक. >>
काकूंकडे Women's Era यायचं त्यातही असं सदर असायचं. आता हे मासिक चालू आहे का ते माहीत नाही.
<<हिन्दी गृहशोभा मधे 'हाय मै
<<हिन्दी गृहशोभा मधे 'हाय मै शर्म् से लाल हो गयी' नावाचे सदर यायचे. <<<
या 'हाय मै शर्म से... ' या सदरातले दोन किस्से अजूनही आठवतात.
मोस्टली नॉर्थकडच्या लेडीज लिहायच्या त्यात. एकीने लिहिले होते. तिला सुपारी खायची फार सवय होती. आणि सुपारीला सुपारी म्हणायच्या ऐवजी ती 'शिवप्यारी' म्हणायची. तर तिला बघायला मुलगा आणि त्याचे कुटुंबीय आले होते. चहा पाणी झाल्यावर हिने हळूच, लहान भावाला सांगितले, कि 'कोने मे रखी शिवप्यारी को ला ना जरा ' . गंमत अशी होती कि त्या मुलाच्या आईचे नाव 'शिवप्यारी होते आणि ती कोपऱ्यात बसली होती. झाल, तिचे हे बोलणे मुलाकडच्यांना ऐकू गेले आणि सगळे अचंबित ! मग नंतर जेव्हा खुलासा झाला तेव्हा सगळे हास्यकल्लोळात बुडाले आणि मग हि बया ... हाय माई शरम से लाल वै.
दुसरा किस्सा कोणी पंजाबी कुडीचा. ती त्यांच्या नेहमीच्या किराणा दुकानात सामान आणायला जात असे. एक दिवस नवीनच हॅण्डसम मुलगा बसलेला दिसला.
हिने विचारले, 'ओ जी, वो लिप्टन दि चाय है?' त्या पोराने मिश्किलीने हिला म्हणाला, "हां बिलकुल जी! लिपटन दि चाह किसको ना होगी! '
आणि मग हि 'शरम से लाल वै वै.
लिपटण दी चाह
लिपटण दी चाह
लोकमतच्या हाय राणी सदरासोबत
लोकमतच्या हाय राणी सदरासोबत एका मोठ्या डोळ्याच्या क्यूट पोरीचा फोटो असायचा राणी म्हणून. तोही सदराईतकाच आकर्षक आणि नॉटी असायचा. लोकमतचे ग्राफिक्स तेव्हाही अगदी छान असायचे. फ्लॅश गार्डन वगैरे कॉमिक्स स्त्रिप असायची. बच्चे कंपनीसाठी लोकमतने इंद्रजाल कॉमिक्स च्या धर्तीवर एक लोकमत कॉमिक्स सुरू केलेले. त्यातला छोटा सुपर हिरो ची हेअरस्टाईल लोकमत फाँट मधील ल प्रमाणे असायची. हे कॉमिक्स मुख्यत्वे खलिल खान इलस्त्रेत करायचे. एक काळ लोकमत आणि इतर काही दिवाळी अंक ह्यातील व्यंगचित्रांचे जग खलिल खान ह्या बार्शीच्या चित्रकाराने गाजवले नंतर त्यांची प्रतिभा ओसरली आणि पाट्या टाकणं सुरू झाले.
दर रविवार सकाळ मध्ये
.
Pages