बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात.
अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे.
सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता:
“आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन”
‘तर या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.’
ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी.
एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले.
अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे:
“आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.”
लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली.
तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच.
अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. एका कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे.
त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आठवतात.
अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात.
आपल्या देशाच्या इतिहासात एकमेव आणीबाणी 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादली होती. ती प्रत्यक्ष लादाण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली.
रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा.
सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत.
शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती:
“मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “
शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात.
...
एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही.
पण एक करा...
नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान २० वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल.
************************************************
आभार सर्वांचे _/\_ अपघातानेच
आभार सर्वांचे _/\_ अपघातानेच सापडले हे तसे काल काहीतरी गुगल करत असताना. धनंजयराव गाडगीळ ग्रंथालयातून स्कॅन झालेले दिसत आहेत हे अंक. क्रमात थोडा गोंधळ आहे बहुतेक. काही काही वर्ष/महिन्यातील अंक सापडत नाहीत. शिवाय १९९१ मधल्या अंकांची साईझ सुद्धा ५०० मेगाबाईट वगैरे म्हणजे भलतीच आहे. १९९१ नंतरचे अंक मिळत नाहीत (त्यानंतर माणूस बंद झाले कि अंक स्कॅन करायचे बाकी आहेत माहित नाही)
हो, "स्कॅन केलेली जुनी मराठी पुस्तके" धाग्यावर लिंक देतो. अश्चिग यांचा ऑनलाइन पुस्तकांबद्दल धागा कोणता आहे तो सापडल्यास तिथेही देतो.
माणूसच्या 1961 अंकातले हे
माणूसच्या 1961 अंकातले हे काही रोचक :
'2050 साल कसे असेल' यावर एक चौकट आहे. त्यात एका तज्ञांचे मत आहे ते असे :
"अजून नव्वद वर्षानंतर अन्न पाणी व शुद्ध हवा यांचासुद्धा दुष्काळ होईल. कोळसा, तेल व नैसर्गिक गॅस यांचा मागमूसही उरणार नाही"...
2050 साली आपण असू किंवा नसू !
काय होइल ते तेव्हाच कळेल
हो हो, डॉक्टर! वाचलं ते, सौर
हो हो, डॉक्टर! वाचलं ते, सौर उर्जेशिवाय पर्याय नाही म्हटलं आहे.
अतुल, फार छान काम केलेय
अतुल, फार छान काम केलेय तुम्ही
अतुलजी, तुम्ही खजिनाच उघडून
अतुलजी, तुम्ही खजिनाच उघडून दिलाय मोठा .. धन्यवाद !!
त्याच लिंक वर इतर ही बरंच काही आहे. अर्थ साप्ताहिक, SIS चे अंक लगेच दिसले, काही पुस्तके देखील आहेत..
माणूस :15 जानेवारी 1972
माणूस :15 जानेवारी 1972
यातल्या काही विशेष गोष्टी :
१. एका लेखात मद्रास राज्य, मद्रासच्या माननीय आरोग्यमंत्री असे उल्लेख आहेत. परंतु त्याच लेखात तमिळनाडू असाही उल्लेख आहे.
२. निरोधच्या जाहिरातीत त्याची किंमत "पंधरा पैशांना ३( सरकारी मदतीने) "असे लिहिले आहे.
३. तीन हिंदी चित्रपटांचे एकत्रित परिक्षण असून त्यात प्रत्येकाची जवळपास संपूर्ण कथा सांगितलेली दिसते. त्या लेखाचा शेवट-
"अशी ही तीन हिंदी चित्रपटांची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण"
अशी केली आहे !
४. दुकानाच्या जाहिरातीतील फोन क्रमांक ५ अंकी
" चार आण्याचे तीन आणलं काय ग
" चार आण्याचे तीन आणलं काय ग तूनी केलं " म्हणजे आठ वर्षात फक्त १० पैसे वाढले.
** आठ वर्षात फक्त १० पैसे
** आठ वर्षात फक्त १० पैसे वाढले. >>
आमचे वैद्यकीय शिक्षण चालू असताना सरकारी रुग्णालयात निरोध मोफत वाटले जात.
फुकट आहे म्हणून काही विद्यार्थी देखील ते घेऊन येत, याची आठवण झाली !
हे एक सुरस आणि चमत्कारिक :
हे एक सुरस आणि चमत्कारिक :
२००७ पासून ही आहे असे दिसते
https://www.msn.com/en-in/news/other/india-has-zero-rupee-notes-too-chec...
अमेरिकी पालकांनी त्यांच्या
अमेरिकी पालकांनी त्यांच्या पाल्याच्या अनुपस्थितीबद्दल शिक्षकांना लिहिलेल्या चिठ्ठ्या:
Botch & co , हे खूपच औपचारिक
हे खूपच औपचारिक भाषेत आणि तपशीलासहीत लिहिलेले आहे. (आम्ही आता दोन ओळीत स्कूल नोट/इमेल आवरतो, हे वाचून मजा आली. )
आता डॉक्टर व डेंटिस्ट स्वतःच्या छापील नोट्स वर मुलांची नावं लिहून देतात.
म्हणजे पालकांचे काम डॉक्टर
म्हणजे पालकांचे काम डॉक्टर करत आहेत
हो, आणि शाळांचा पालकांवरचा
हो, आणि शाळांचा पालकांवरचा विश्वास उडालाय, ते पुरावा मागतात
<< अमेरिकी पालकांनी त्यांच्या
<< अमेरिकी पालकांनी त्यांच्या पाल्याच्या अनुपस्थितीबद्दल शिक्षकांना लिहिलेल्या चिठ्ठ्या: >>
उगीच बळंबळं केलेले विनोद वाटत आहेत.
याप्रकारचे अजून, हे घ्या माझ्यातर्फे.
पायलटची बायको ... " गेलास उडत..."
मंत्र्याची बायको ... "पुरे झाली तुमची आश्वासनं."
शिक्षकाची बायको ..."मला नका शिकवू..."
रंगारयाची बायको ...."थोबाड रंगवीन."
धोब्याची बायको ... " चांगली धुलाई करीन."
सुताराची बायको ... "ठोकून सरळ करीन."
तेल विक्रेत्याची बायको ..." गेलात तेल लावत."
न्हाव्याची बायको ... "केसाने गळा कापलात की हो माझा."
डेंटिसची बायको ... "दात तोडून हातात देईन."
शिंप्याची बायको ..."मला शिवलंस तर याद राख."
अभिनेत्याची बायको ..."कशाला नाटक करता?"
वाण्याची बायको ... "नुसत्या पुड्या सोडू नका."
स्पायडरमॅनची बायको - आमचे हे
स्पायडरमॅनची बायको - आमचे हे भलतेच चिकट!
(संदीप खरेची कविता आहे)
सर्व प्रतिसाद छान
सर्व प्रतिसाद छान
Absence नोट्स नावाचा त्या मासिकातील तो लेख आहे. त्यांनीसुद्धा सुरस आणि चमत्कारिक ह्या प्रकारचे ते काहीतरी लिहिलेले आहे
म्हणून मी ते इथे घेतले
हे नियतकालिक म्हणजे तिकडचे
हे नियतकालिक म्हणजे तिकडचे विचित्र विश्व असावे. कोणी ते वाचले असल्यास त्याबद्दल लिहावे
>>Absence नोट्स >>> भारीच !
>>Absence नोट्स >>> भारीच !
1987 सालातील एका
1987 सालातील एका महाविद्यालयीन वार्षिकाचे मुखपृष्ठ : अश्मयुग ते एकविसावे शतक छान चितारले आहे.
आजचा दिनांक वैशिष्ट्यपूर्ण
आजचा दिनांक वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणून इथेच ही नोंद करतो. दरवर्षी या दिनांकाला त्याची आठवण काढता येईल.
चित्रावरून तुमच्या लक्षात येईलच की ही संख्या डावीकडून वाचली काय किंवा उजवीकडून, ती एकसारखीच असते (palindrome).
पण इतकेच त्याचे वैशिष्ट्य नाही. ही संख्या पूर्णपणे उलटी केली असता सुद्धा पहिल्या प्रमाणेच दिसते (ॲम्बीग्राम).
<< आजचा दिनांक वैशिष्ट्यपूर्ण
<< आजचा दिनांक वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणून इथेच ही नोंद करतो. >>
नम्रपणे सांगू इच्छितो की जगात सगळीकडे ddmmyyyy फॉरमॅट वापरत नाहीत.
धन्यवाद
धन्यवाद
भारतीय पद्धतीनुसार समजावे
रशियाचा रुबल आणि भारताचा
रशियाचा रुबल आणि भारताचा रुपया यांच्या विनिमयासंबंधी १८९७ पासून आजपर्यंतचा रोचक इतिहास :
https://madrascourier.com/insight/the-curious-connection-between-russian...
पुरुषोत्तम आत्माराम चित्रे ,
पुरुषोत्तम आत्माराम चित्रे , दि पु चित्रे, 'अभिरुचि' या संबंधीचे सुरस किस्से इथे :
https://maharashtratimes.com/editorial/samwad/purushottam-atmaram-chitre...
खरंच सुरस आणि चमत्कारिक चालू
खरंच सुरस आणि चमत्कारिक चालू घडामोड !
एका तरुणाने अडीच लाखांची नवी मोटरसायकल निव्वळ एक रुपयाची नाणी देऊन विकत घेतली
https://www.cartoq.com/tamil-nadu-man-buys-bajaj-dominar-worth-rs-2-6-la...
हे बियरचे दर मुंबईत तर त्या
हे बियरचे दर मुंबईत तर त्या दिवशी गोव्यात कितीला? मांडा गणित
भारी आहे बुवा
भारी आहे बुवा
तुमची सफेत बाटली !
(या माहितीसाठी वेगळा धागा
(या माहितीसाठी वेगळा धागा नसल्यामुळे इथे लिहितो)
जिवाणू (Bacterium) आपल्या डोळ्यांना दिसत नाही हे झाले सर्वसामान्य ज्ञान. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या माहितीनुसार पृथ्वीवरील सर्वात मोठा जिवाणू नुसत्या डोळ्यांना दिसतोय इतका मोठा आहे !
तो कॅरिबियन बेटामध्ये सापडला आहे.
https://www.nature.com/articles/d41586-022-01757-1
वैज्ञानिकांनी त्याला जीवाणूमधल्या माउंट एव्हरेस्ट ची उपमा दिली आहे !
101 वर्षांपूर्वी डॉक्टर
101 वर्षांपूर्वी डॉक्टर भास्कर केळकर यांना उच्च शिक्षणासाठी लंडनला जाण्यासाठी ब्रिटिश सरकारने दिलेला पासपोर्ट :
हा विशेष प्रक्रिया करून जतन केलेला आहे.
1976 मध्ये इंग्लंडमध्ये देखील
1976 मध्ये इंग्लंडमध्ये देखील पाणी मिळवण्यासाठी रांगा लागल्या होत्या त्याची स्मृती चित्रे इथे पाहता येतील:
https://www-express-co-uk.cdn.ampproject.org/v/s/www.express.co.uk/news/...
Pages