बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात.
अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे.
सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता:
“आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन”
‘तर या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.’
ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी.
एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले.
अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे:
“आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.”
लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली.
तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच.
अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. एका कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे.
त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आठवतात.
अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात.
आपल्या देशाच्या इतिहासात एकमेव आणीबाणी 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादली होती. ती प्रत्यक्ष लादाण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली.
रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा.
सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत.
शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती:
“मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “
शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात.
...
एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही.
पण एक करा...
नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान २० वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल.
************************************************
आम्ही पद्मावती मंदिरात रोज
आम्ही पद्मावती मंदिरात शाळा सुटली की जायचो. पूर्वी खूप वडाची झाडे मंदिर परिसरात होती. आमची आई, काकू,आत्या सगळ्या वटपौर्णिमेला अजुनही जातात मंदिरात. नवरात्र आणि दसर्यला खूप गर्दी असते. बदलले ते आता सगळे .
जुन्या पुस्तकांच्या प्रचि
जुन्या पुस्तकांच्या प्रचि अत्यंत चार्मिंग वाटतात. .. Nostalgic ! आठवणींंची देवाणघेवाण आवडली.
अतुल,
अतुल,
तुमचे देवनागरीतले सदस्यनाव पाहून आनंद झाला !
आम्ही पद्मावती मंदिरात शाळा
आम्ही पद्मावती मंदिरात शाळा सुटली की जायचो. पूर्वी खूप वडाची झाडे मंदिर परिसरात होती. आमची आई, काकू,आत्या सगळ्या वटपौर्णिमेला अजुनही जातात मंदिरात. नवरात्र आणि दसर्यला खूप गर्दी असते. बदलले ते आता सगळे >>
अगदी खरंय. त्या वडांच्या सानिध्यात मंदिरात बसल्यावर, एका वेगळ्याच पौराणिक विश्वात असल्यासारखं वाटायचं.
तुम्ही अरण्येश्वर स्कूल मध्ये होतात की विद्या विकास?
मी शिंदे हायस्कूल मध्ये होते.
मी शिंदे हायस्कूल मध्ये होते.
प्राध्यापकांचे पगार हा नेहमीच
प्राध्यापकांचे पगार हा नेहमीच बहुचर्चित विषय असतो. त्यासंदर्भातील हे एक स्फुट.
त्यातील आकडा वाचून आता गम्मत वाटेल.
आता डोकावूयात १९३१ मधील
आता डोकावूयात १९३१ मधील मल्लयुद्धात !
पहिली सूचना बघा:
पहिली सूचना बघा:
लढणाऱ्याबरोबर दोन इसमांनी लंगोट बांधण्यास आखाड्यात यावे
नंतरच्या इतक्या स्पष्ट नाहीत पण मजेशीर असाव्यात असे वाटते.
कुमार सर फारच दुर्मिळ कलेक्शन आहे तुमचे
सगळ्या आठवणी मस्त आहेत. एकेक
सगळ्या आठवणी मस्त आहेत. एकेक गोष्टी आठवत आहेत. कुमार सर फारच दुर्मिळ कलेक्शन आहे तुमचे >>>>>>>>+++११११
हाकमारी वर उपाय म्हण्जे दारावर फुली काढून ठेवायची असं काहीतरी होतं. मग ती हाका मारत नाही. ओ स्त्री कल आना टाईप्स.
पोलिस टाईम्स आठवला. बापरे फार डेंजर फोटो असायचे त्यात.
संध्यानंद पेपर आठवतो का कुणाला? फुल टू फेकू बातम्या असायच्या बहुतेक.
त्या पेपरची अजून एक आठवण म्हण्जे कॉर्पोरेशन वरून निगडीला यायला बसेस असायच्या . मी आई बाबा मी पुण्यातली कामं संपवून किंवा गण्पती बघून रात्री घरी यायला तिकडे बसच्या लाईन मधे थांबायचो. तिथे हे पेपर विकणारे बसलेले असायचे. तिथून हमखास संध्यानंद घ्यायचो. लाईनमधे वेळ घालवायला.
मला संध्यानंद आठवतो. पप्पा
मला संध्यानंद आठवतो. पप्पा टाईमपाससाठी घेऊन यायचे. पुर्वीचे इंटरनेट.
त्यातल्या अचाट बातम्यांचे/सदरांचे पाच प्रकार असायचे.
१. चक्क खोट्या आचरट बातम्या: शक्यतो इटलीतील फर्मंटो शहरात किंवा चिनच्या हुंघिआंग प्रांतात घडलेल्या. 'आणि तिने केले चक्क स्वतःशीच लग्न!' किंवा 'त्याने केले चक्क तक्क्याशीच लग्न' किंवा 'महिलेच्या घरावर पडला विष्ठेचा गोळा!' असल्या बातम्या. कुठल्या तरी उनाड कार्ट्याला एखादी चपटी देऊन असल्या अवली बातम्या टाकायला बसवत असावेत.
२. ज्योतिष/तोडगे/मंत्रतंत्रसंबंधीत: वशीकरणासाठी आवडत्या व्यक्तिचे वस्त्र तीन दिवस पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ करावी. किंवा धनलाभासाठी तोडगे वगैरे! मणिलाल छेडा आणि त्या आचर्टोत्तम अनिल थत्तेचे बिभत्स मोठे फोटो असायचे.
४. अतरंगी इसमांच्या गिनिज किंवा लिम्का बुकच्या निरूपयोगी विक्रमांबद्दलच्या बातम्या: बदलापुरच्या बाबुराव भुसनळेंची सर्वात लांब कानातले केस असणारा पुरूष म्हणून लिम्का बुकात नोंद(म्हणजे असा विक्रम नावावर असणारी बाईसुद्धा अस्तित्वात असावी! यक्क!) किंवा बाराबंकीच्या दिनू शर्माने एका तासात खाल्ल्या २८ ट्युबलाईट्स वगैरे!!
४. चौथा प्रकार म्हणजे टिपिकल सेक्स विषयक आजकालच्या क्लिक बेट्स सारख्या बातम्या: अमुक केल्याने होतो शिघ्रपतनावर इलाज वगैरे!!
५. बॉलिवूडच्या नट- नट्यांबद्दलचे भिकार गॉसिप्स: चिची सेटवर उशीरा आल्याने संजुबाबा नाराज! किंवा बेबोचे किंगखानच्या पार्टीत लोलोसोबत भांडण वगैरे!
मायकेल एस असल्या फिरंगी नावाचा कुणीतरी झरोका नावाचे सदर लिहायचा आपल्या शशकसारखेच. ते मात्र हृदयस्पर्षी असायचे. आई व मी वाचत असू!
संध्यानंद जाहिर वाचत ख्या ख्या करण्याची मज्जाच वेगळी होती. असली दिव्य फेकाफेकी फेसबुकवरसुद्धा नसते.
ज्योतिष वरून आठवले - म.टा
ज्योतिष वरून आठवले - म.टा किंवा कुठल्याशा वर्तमानपत्रात दैनिक राशीभविष्य अगदी २-४ शब्दांचे द्यायचे. तेव्हा नुकतीच मराठी वाचायला शिकले होते आणि बरेच वेळा माझ्या राशीला - "घबाड गवसेल" असे भविष्य असायचे ते घबाड अजून पर्यंत नाही मिळालं....
अतुल,दुर्मिळ कलेक्शन आहे >>>
अतुल,
दुर्मिळ कलेक्शन आहे >>> त्या फोटोचे श्रेय माझे नसून मित्राचे आहे. त्याच्यापर्यंत पोचवतो.
* अंजली,
संध्यानंद घ्यायचो. लाईनमधे वेळ घालवायला. >>> अगदी अगदी ! तशा पेपरांचे हे योगदान आहे खरे.
पुंबा,
अरे वा, किती वर्षांनी भेट ! छान आठवणी.
शिघ्रपतनावर इलाज वगैरे!! >>> अगदी, जाळ्यात ओढणारी वाक्ये !
सीमंतिनी,
"घबाड गवसेल" >>> अगदी ठरलेले.
बस मध्ये (एसटी त) मिळणारी 10
बस मध्ये (एसटी त) मिळणारी 10 रु वाली पुस्तकं आठवतात का कोणाला?
त्यात एकदम भन्नाट उपाय होते
घुबडाच्या अंड्याची राख जाळून ती गरुडाच्या विष्ठेत 3 दिवस भिजवून त्याची वात करून त्या दिव्यावर काजळी धरून ते काजळ डोळ्यात घातल्यास गडद अंधारात पण डोळ्यांना लख्ख दिसतं.
कुंभाराच्या तळ्यात आपण गुडघाभर पाण्यात उभे असताना आपल्या उजव्या हाताला पांढऱ्या रंगाचा साप चावल्याचे स्वप्न पडल्यास मुलगा होईल.
स्वप्नात पाण्याची भिंत आपण बांधत असल्यास घरातल्या पैश्याचा नाश होईल
स्वप्नात आपले लग्न झाल्यास मृत्यू होईल
मांडीवर तीळ: जीवनात 2 वेळा प्रेम, स्त्री असल्यास पती आधी मृत्यू, पुरुष असल्यास 2 लग्नांचा योग.
मी_अनु, "घबाड गवसेल" असे उपाय
मी_अनु, "घबाड गवसेल" असे उपाय द्या.. तळ्यात स्वप्न पडेल, पैसे जातील, मृत्यू होईल इ पण गडद अंधारात लख्ख दिसेल... अरे, कशाला??? काय राहिलं बघायचं
यापेक्षा भारी एक होतं
यापेक्षा भारी एक होतं
चिखलाने भरलेल्या कुंभाराच्या तळ्यात बुडल्याचे स्वप्न पडल्यास विवाहबाह्य संबंधांचा योग (हे पुस्तकातल्या भाषेत अजून रॉ भाषेत आहे. इथे नको बै तरी व्यवस्थित 'स्वप्नचिंतामणी' असं लिहिलेलं पांढरं पुस्तक आहे.पिवळं नव्हे.)
(म्हणजे स्वप्नात चिखलाच्या डबक्यात पडल्यास आधी ते शेतातलं साधं डबकं आहे, की रस्त्याव्रचा खड्डा आहे की कुंभाराच्या ओनरशिप चं तळं याची नीट विचारुन चौकशी करावी लागेल.नाहीतर स्वप्न फाऊल.)
मी खूप वैतागलेली असते तेव्हा माळ्यावरच्या गठ्ठ्यातून स्वप्नचिंतामणी आणि वास्तुरत्न ही दोन एसटीत मिळालेली पुस्तकं वाचते. हमखास करमणूक.
अनु,
अनु,
मांडीवर तीळ ( आणि अन्यत्र देखील !) , स्वप्नचिंतामणी >>> भारीच !
पांढरं पुस्तक आहे.पिवळं नव्हे.>>> पिवळी पुस्तके हा स्वतंत्र विषय आहे. या कक्षेबाहेरचा
>> 10 रु वाली पुस्तकं आठवतात
>> 10 रु वाली पुस्तकं आठवतात का कोणाला?
यावरून मला जरा वेगळी पुस्तके आठवली. आता नेटवर आठवणीतील गाणी वगैरे बऱ्याच वेबसाईट आहेत. पण पंचवीस तीस वर्षापूर्वी छोटी पुस्तके मिळायची रफी-किशोर-मुकेश-लता ह्या सर्व दिग्गज मंडळींच्या गाण्यांची. रस्त्याकडेच्या किंवा बस-स्थानकावरच्या पुस्तक विक्रेत्यांकडेच असायची. हा हा हा
http://marathi-lekh-blogs-in
http://marathi-lekh-blogs-in-blog.blogspot.com/2012/11/blog-post.html
स्वप्नचिंतामणी
खूप रत्ने आहेत यात: भरलेल्या तळ्याच्या मध्यभागी बसून कमळाचे पानावर जेवताना स्वप्नामध्ये पाहिल्यास राज्यप्राप्ती होईल.
दिवाणखान्यातील खांब आणि पलंगाचे खूर याशिवाल सर्व जळताना पाहिल्यास मोठा प्रख्यात मुलगा होईल. परंतु खांब व खूर जळताना पाहिल्यास आपला मुलगा वाईट चालीचा निघून त्याचा नाश होईल.
इंद्रधनुष्य पूर्वेला पाहिले तर गरिबांना चांगले व श्रीमंताना वाईट. आणि पश्चिम दिशेला पडलेले पाहिले तर श्रीमंताना चांगले व गरिबांना वाईट.
सर्प पाहणे चांगले संततीदायक. त्यात पांढ-या सर्पाला पाहिले तर फारच चांगले. पांढ-या सर्पाने उजव्या भुजेस दंश केला असे पाहिल्यास दहा दिवसांनी पुष्कळ द्रव्य मिळेल म्हणून समजावे. लाल, हिरवे रंगाचे सर्व स्वप्नामध्ये कोणी पाहिले तर धननाश. उदकामध्ये उभे असता विंचू, सर्प यांनी दंश केला असे पाहिले तर जय, पुत्र, धन यांची प्राप्ती होते. सर्प आपले घरामध्ये प्रवेश करताहेत असे पाहिले तर कोणाबरोबर तरी विरोध होईल. ते विळखा घालून पडलेले आहेत किंवा त्यांना कोणी बांधले आहे असे पाहिले तर अती दु:ख, त्यांना आपण अगर दुस-यांनी ठार मारिले असे स्वप्न पडले तर जय. मासे, बेडूक यांना पाहिले तर चांगले. कुजलेले मासे पाहिले तर रोग, आपण मासे धरीत आहो असे स्वप्न पडले तर लाभ. मासे आनंदाने पोहतात असे स्वप्नात पाहिले तर आनंदाने दिवस जातील. कासव पाहिले असता अती श्रम व गमन होऊन यश, धन प्राप्त होईल असे समजावे. मगर पाहणे वाईट. मगर आपणास धरून नेत आहे असे पाहणे चांगले. निरूपद्रवी जंतू पाहिले असता सौख्य व क्रूर उपद्रवी जंतू पाहिले तर कष्टप्राप्ती असे समजावे.
मस्त आठवणी अनु.
मस्त आठवणी अनु. स्वप्नचिंतामणी
येस अजिंक्य हेच ते रत्न
येस अजिंक्य
हेच ते रत्न
"मनुष्याने आतडे आपल्या गळ्यामध्ये घालून ग्राम मध्येभागी आपण उभे आहो असे पाहिल्यास पुष्कळ ग्रामावरचा अधिकार मिळेल"
इतके सॉलिड कस्टमायझेशन वाले स्वप्न कसे पाडावे याचे ट्रेनिंग कुठे मिळेल?
पर्यावरणविषयक मासिकातील ही एक
पर्यावरणविषयक मासिकातील ही एक आठवण
हे बघून सकाळमधली काय म्हणता
फी-किशोर-मुकेश-लता ह्या सर्व दिग्गज मंडळींच्या गाण्यांची. रस्त्याकडेच्या किंवा बस-स्थानकावरच्या पुस्तक विक्रेत्यांकडेच असायची. हा हा हा Lol>>>>>>>>>>>>> हो बरोबर आठवलं.
बस-स्थानकावरच्या पुस्तक विक्रेत्यांकडेच>>>>>>>>> तिथे मायापुरी, गृहशोभिका बरोबरच लहान मुलांचे पण अंक असायचे.
सकाळमधली काय म्हणता आणि वाचकांची पत्रे सदर काय मजा यायची ते पण वाचायला.
https://in.pinterest.com
https://in.pinterest.com/satishkumaria/r-k-laxman-cartoons/
हे कुणीतरी पिन्ट्रेस्ट वर काय म्हणता (You said it) टाकले आहे. प्रताधिकार झाला असेल भंग पण शेवटी कॉमन मॅनला कुठला तरी नियम तोडल्याशिवाय आनंद मिळणे कठीण झाले आहे.
हे कुणीतरी पिन्ट्रेस्ट वर >>>
हे कुणीतरी पिन्ट्रेस्ट वर >>>
तो दुवा दिसत नाही.
>> पिन्ट्रेस्ट वर काय म्हणता
>> पिन्ट्रेस्ट वर काय म्हणता (You said it) टाकले आहे
वाह! मेजवानी आहे हि
(मला तरी दिसतोय दुवा. कुमार सर काय एरर येतेय?)
>>>> वाचकांची पत्रे सदर
>>>> वाचकांची पत्रे सदर Happy काय मजा यायची ते पण वाचायला. >>>>>
बरेच वर्षांपूर्वी एक छोटे पत्र वाचले होते त्याची ही आठवण.
पत्रलेखकाने त्याचा आरटीओ चा कटू अनुभव लिहिला होता. त्याने कार चालवायचे शिक्षण एका खाजगी ड्रायव्हर कडून घेतले होते. व्यक्तिगत शिकल्यामुळे त्याला कार चालवणे छान जमले होते. आता वेळ आली लायसेन्ससाठी परीक्षा द्यायची. तो मोठ्या आत्मविश्वासाने त्याला सामोरा गेला. कार व्यवस्थित चालवली. पण त्याला नापास केले गेले. पुढे असेच 3 वेळा झाले. आता त्याची चिडचिड वाढली. शेवटी तिथल्या एजंटने स्पष्ट सांगितले की या परीक्षेसाठी ड्रायव्हिंग स्कूल कडूनच या, तरच पास व्हाल !
अडला नारायण, करतो काय ? नाईलाजाने स्कूलचे पैसे भरून तिथे गेला. त्या परीक्षेत 5 मिनिटात त्याला पास केले गेले.
सदर पत्रात त्याने सर्वांना कळकळीने लिहिले होते की अजिबात खाजगीरित्या जाऊ नका, स्कूलमार्फत ‘हप्ता’ पोचविल्या शिवाय ते लोक पास करीत नाहीत.
अतुल, होय बऱ्याच वेळा प्रयत्न
अतुल, होय बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही एरर (This site can’t be reached) काही जात नाहीये.
अंजली,
वाचकांची पत्रे सदर काय मजा यायची
>>>
यावरून दोन रंगलेले विषय आठवतात. एक आहे लँडलाईन फोन क्षेत्रात फक्त बीएसएनएल उपलब्ध होते त्या काळातील. तेव्हा त्यांची मक्तेदारी होती. लोकांचे दूरभाष अनेक वेळा बंद असत- काही वेळेस तर महिनोन्महिने. मग जर 15 दिवसांपेक्षा अधिक काळ फोन सेवा बंद असेल तर बिलात कपात करावी असा नियम होता. परंतु त्या बाबतीत नागरिकांना एकूणच सरकारी खाक्याचा अनुभव यायचा. कुठेही रस्ता खोदणे सुरू झाले की संबंधित भागातले दूरभाष महिनाभर बंद पडणे हे नित्याचे असायचे. मग अशा वेळेस एखाद्या नामवंत व्यक्तीचे बीएसएनएलची हजेरी घेणारे मोठेच्या मोठे पत्र प्रसिद्ध व्हायचे. मग कधीतरी अशा एखाद्या गृहस्थाचे बिल नियमानुसार कमी केले जायचे.
दुसरी आठवण आहे एक डॉक्टर आणि एक प्रसिद्ध आहारतज्ञ लेखिका यांच्यातील दीर्घकालीन वादावादीचे. या तज्ञ बाईंच्या मते त्यांचे शास्त्र पूर्ण वेगळे असून त्यात डॉक्टरांनी लुडबूड करू नये असे होते ! ते डॉक्टरही काही कमी नव्हते. तेही त्यांच्याशी पुरेसा वाद घालायचे. अर्थात त्या चर्चेतून वाचकांना काही उपयुक्त माहितीही मिळत होती.
साद,
वास्तव आणि रोचक !
>> बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही
>> बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही एरर (This site can’t be reached) काही जात नाहीये
हि लिंक दिसेल बहुतेक:
https://www.pinterest.com/satishkumaria/r-k-laxman-cartoons/
धन्यवाद अतुल.
धन्यवाद अतुल.
आता ते दिसत आहे. फक्त तिथे सशर्त बघण्याची सोय उपलब्ध आहे (ईमेल किंवा अन्य काही खाते ).
याचा अर्थ हे "मुक्त" स्वरूपात नसते बहुतेक.
हो, इमेलने किंवा गुगल अकौंट
हो, इमेलने किंवा गुगल अकौंट वापरून खाते लगेच सुरु होते तिथे.
Pages