चला, भाषासमृद्ध होऊया !!!

Submitted by दक्षिणा on 24 September, 2014 - 08:27

महाराष्ट्रात दर मैलागणिक मराठी भाषा बदलते असे म्हटले जाते. यात अतिशोयोक्ती नाही हे महाराष्ट्राच्या भटकंतीत लक्षात येतेच. मराठी भाषा आपल्या या अनेक सख्ख्या, चुलत, मावस, सावत्र बहिणींच्या प्रभावामुळे वेळोवेळी बदलत गेली आहे. हिंदी, इंग्रजीसह महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषातील शब्द विनासायास मराठीच्या पंक्तीत मानाने जागा अडवून आहेत.

चला तर मग या शब्दांना जाणून घेऊ या आणि त्यांचे नेमके मराठी अर्थ शोधूया.

उदाहरणार्थ, पेन या शब्दाचा मराठी शब्द तुम्हाला माहीत असेलच, पण रिफिलला मराठीत काय म्हणतात ?
ताबडणे, खुंदलणे ही क्रियापदे किती जणांना माहीत आहेत ?

आपण सर्रास टेबल खुर्ची म्हणतो. पण टेबल चेअर म्हणत नाही. का बरे ?
विदर्भात तर हिंदीभाषिक मराठी की मराठी भाषिक हिंदी हा वेगळाच घोळ आहे.
अनवट, विमल, उन्मन, कैवल्य, अद्वैत असे शब्द कवितेत जागोजागी बागडत असतात. पण साध्या सरळ मराठी भाषेत यांचे अर्थ काय आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे का ? या शब्दांनी कविता उच्च होत असली तरी ती सर्वसामान्यांना कळत नसली तर काय उपयोग ?

इथे कुणाला कमी लेखायचा किंवा हिणवण्याचा विचार मनात नाही. फक्त मराठी बोलीभाषेत येणार्‍या शब्दांची नव्याने ओळख करून घेण्याचा एक प्रयत्न आहे.

असेही जे शब्द आपण इंग्रजी असूनही सर्रास वापरतो आणि त्यांचे मराठी अर्थ आपल्याला पटकन आठवतात का?

कोणताही मराठी शब्द जो नेहमी सहजपणे वापरला जात असेल पण शब्दकोषात सापडणार नाही असा.

चला तर मग करायची का सुरुवात ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खारुताई, चिऊताई असे गोड नावे ईंग्रजीमधे देता येत नाही. तिथे स्क्विरल आणि स्पॅरो असेच म्हणावे लागेल. हिन्दीमधे देखील हा गोडवा आणता येणार नाही.

खरकटे

>> आमच्याकडे साबा कडक उपास-तापास सोवळं वै. पाळत असल्याने 'खरकटं = जे उपासाला चालत नाही ते'. मग ते अनटच्ड का असेना. उदा. तांदुळ, भात, वरण, पोळी कितीही साधं अन्न असलं आणि ताजं, कुणी पानात वाढुन न घेतलेलं असलं तरीही ते खरकटं.

माझ्या या प्रतिसादाच्या अनुषंगाने..

ताटाला पान म्हणणे (उदा. पानात वाढुन घे, किती पानं बसतील या रांगेत?) इंग्रजीत शब्दशः भाषांतरीत करणे विचित्र होईल.

आणि 'सोवळ्याचा स्वयंपाक' किंवा 'मी सोवळ्यात आहे' किंवा 'ती ओवळ्यात आहे' (नेसतो ते सोवळे नाही) याचे इंग्रजी भाषांतर करणे जवळ-जवळ अशक्य आहे. Happy

कोणतीही भाषा, ही त्या जनसमुदायाच्या रोजच्या अनुभवांची, आठवणींची देवाणघेवाण करण्यासाठी तयार व विकसित होत असते. घोडा व त्यासंबंधीच्या बाबी सांगणारे जितके शब्द इंग्रजीत आहेत, तितके ते मराठीत नाहीत. तेच दर्यावर्दी / नॉटिकल टर्म्स बद्दल.
उदा. सोवळे ओवळे ही कन्सेप्टच जर एकाद्या संस्कृतीत नसेल, तर त्या भाषेत त्याबद्दलचे शब्द असणे अशक्य असते.

इब्लिस, बरोबर आहे तुमचे.

ताटाला पान म्हणणे हेसुद्धा आपल्या संस्कृतीत 'पत्रावळीत किंवा केळीच्या पानावर जेवणे' आहे त्यावरुन आले असावे.

माझ्या मते पाणी घालून शिजवलेला कोणताही पदार्थ हा 'खरकटा' असतो. कोरडे पदार्थ , उपासाचे पदार्थ, दुधाचे जिन्नस हे खरकटे मानत नाहीत. आमची आजी दुधाच्या दशमीला खरकटे समजत नसे.

'...सोवळे ओवळे ही कन्सेप्टच जर एकाद्या संस्कृतीत नसेल, तर त्या भाषेत त्याबद्दलचे शब्द असणे अशक्य असते....'

~ डॉक्टर पूर्ण सहमत. संस्कृतीचे कितीही गोडवे आपण गाईले तरी आपल्यासारख्या पद्धती अन्यत्रही असतील असे गृहित धरण्यात काही अर्थ नसतो. रक्षाविसर्जन, कावळा शिवणे, बाराव्याचे जेवण, मुलाचे नदीकाठी केस कापणे... आदी संस्कृतीच्या क्रिया युरोपमधील एकाद्या मित्राला सांगताना शब्दांच्या किती अडचणी येतात हे मी अनुभवले आहे. शिवाय "विश्वासा' चा अगम्य असा एक घटकही असतोच...तोही डोके काढतोच.
हा मुद्दा तुम्हाला मला नव्हे तर श्री.ना.पेंडसे आणि इयान रेसाईड या दोघांनाही पड्ला. प्रादेशिक पातळीवरील शब्दांचे अर्थ एकाच राज्यातील समभाषिकांना समजत नाहीत तिथे साता समुद्रापल्याड राहाणार्‍याला कसे समजतील. "गारंबीचा बापू" कादंबरीचा इंग्रजीमध्ये रेसाईड अनुवाद करीत होते. त्या दरम्यान पेंडसे व रेसाईड यांच्यात अशाच प्रादेशिक शब्दांबद्दल खुलाशांची देवाणघेवाण पत्राद्वारे होत असे. रेसाईड यानी एका पत्रात विचारले.

"कड्याळ" म्हणजे काय ?
"नाही तर दे गोधे...." हे गोधे काय असते ?
"सल्ले" : हातातील ब्रेसलेट का ?
"काय हसतेस ? फोडणीचा भात ?" ~ फोडणीच्या भाताचा आणि हसण्याचा काय संबंध ?
"खत" ~ एखादी पायाची जखम ?
"धाडवा" ~ जातीवाचक नाम आहे का ?

~ अशा शब्दांचे खुलासे शिरुभाऊंनी करायचे....तेही इंग्लिशमध्ये...मग कादंबरी लेखनाला सुरुवात.

पु.लं. च्या अपूर्वाई मध्येदेखील "खरकटे" नामाबद्दल चर्चा झाल्याचे स्मरते. तिथेही तुमचे कल्चर आणि आमचे कल्चर यात भेद असणार त्यामुळे जे तिथे ते जशेच्यातसे इथे असेल असे गृहित धरण्यात काही अर्थ असत नाही. फक्त पर्यायी शब्द सुचविले जातात, इतकेच.

सांगली आणि नगरातल्या बोलीभाषेत बराच फरक आहे.
कुटाणा, गचपण हे आत्ता आठवलेले नगरी शब्द.
कुटाणा म्हणजे खूप उपद्व्याप. गचपण म्हणजे रद्दी कचरा किंवा निरुपयोगी वस्तूंचा ढिगारा. कुंड्याला आई कोळगा म्हणायची त्याचं खूप हसू यायचं.
उशीचा अभ्रा म्हणायला छान वाटतं पिलो कव्हरपेक्षा!

गचपणच्या अनुषंगाने आठवले की आमच्या भागात बाईने आत्महत्या केली कौटुंबिक वादाच्या अनुषंगाने तर तिच्याविषयी "मारली उडी हिरीत आणि गचकली ती...". आत्महत्या केली इतके शुद्ध रुप इथे वापरले जात नाहीच.

गचके खात जाणे = खेड्यातील एस.टी.च्या प्रवासाचे वर्णन करताना वापरतात...."....आली एकदाची ष्टांड्यावर गचके खात."

मस्त धागा आहे दक्षिणा. फक्त सुरुवातच चुकिच्या अर्थाने झालि आहे.
प्रितीभुषण यांनी बरोबर उलत अर्थ लिहिलाय. ददात म्हणजे कमतरता. पण तो नेहमि निगेटिव वाक्यात वापरला जातो म्हणून झालं असेल तसं. कशाचीही ददात नव्हती म्हण्जे कमतरता नव्हती. Uhoh
खरकटं म्हणजे waste. left over म्हणजे उरलेलं.
बाकी गिच्च्गोळा आणि फुळकवणी मी पण ऐकलाय.
गुरगुट्या म्हणजे ठरवून केलेला जास्त पाण्याचा भात. गिच्च्गोळा म्हणजे पाणी जरासंच जास्त झाल्यामुळे झालेला भात. हा वैतागानी वापर्ला जातो whereas गुरगुट्या हा लाडानी वापर्ल जातो. Happy

हं......मलाही कळलं नाही ददात म्हणजे खूप सारे कसं काय? ददात म्हणजे कमतरता.
दाट झाडी/झुडुपे यांना उद्देशूनही गचपण म्हटलेले ऐकले आहे.>>>>>>>>> हेही बरोबर इब्लिस.

मांजरमुतवणी हा ग्रामीण भागात ऐकलेला शब्द आहे. यातील वणी / वाणी चा अर्थ च्याप्रकारे / च्यासारखा
याच पंक्तीतला आणखी एक शब्द - खुळ्यावानी खुळा = वेडा
आत्ता सहज सुचले म्हणून - मी वर वापरलेला पंक्तीतला हा शब्द पंगत या शब्दापासून आला आहे काय? पंगतीतला चा अपभ्रंश ???

बाकी काही इंग्रजी वाक्प्रचार हिंदी/ मराठीत वापरले जातात तेंव्हा गम्मत वाटते. मी हा पर्याय "निवडेन" च्या एवजी मी या पर्यायासोबत "जायीन" असे काही जन म्हणतात. आय विल गो विथ धिस ऑप्शन चे अपभ्रंश.
KBC मध्ये "मै औडीयंस के साथ जाना चाहुंगी" असे म्हंटल्यावर मला प्रत्येक वेळी हसू येते. Happy

उशीचा अभ्रा आणि बेडशीट म्हणजे पलंगपोस.
तसच खिळा, पत्रा अश्यात अडकुन कापडे फाटले तर त्याला आम्ही खोंबारल अस म्हणतो.म्हणजे साडी खोंबारली वैगरे.
तसच मसाले कुटुन मिळतात त्या गिरणीला डंक म्हणतात.
हे शब्द माझ्या सासरी पहील्यांदा ऐकल्यावर त्यांना खुप विचित्र वाटल होत.

तस माझ्या सासरी केस विस्कटले न म्हणता भिस्स झाले म्हणतात, मला हे पहिल्यांदा कळलच नाही भिस्स म्हणजे काय झाले अस मी विचारलेल..

जर कुणी अगदी अनाकर्षक डल्ल मिक्स कलरचे कपडे घातले असतील तर ..........काय मांजरओकर्‍या रंगाचं घातलंय ते! असंही माझी एक मैत्रिण म्हणते. आहे की नाही ........मांजरमुतवणीपेक्षा भयानक? पण अगदी योग्य शब्द?
हं...आम्हीही खोंबारा लागला असा शब्द वापरतो अनुश्रीसारखाच.

आणि जर कुणी खुपच flashy चकचकीत कपडे घातले असतील तर काय झगरंमगरं घातलंय असं म्हणतात!

"उघडाबंब" हे एक असेच विचार करायला लावणारे विशेषनाम. "स्टार्क नेकेड" हा त्याचा अर्थ लागलीच समजतो. पण आपण जेव्हा केवळ "बंब" शब्दाचा अर्थ पाहतो तेव्हा 'अग्नीशामक दलाची गाडी" अशी व्याख्या मिळते. उघड्यामध्ये बंब का, कसा आला आणि शब्दभांडारात बसला याचा उगम मिळत नाही.

हा बंब अग्निशमन दलातला नाही.
पाणी तापवायचा जाडाजुडा ठेंगणा तो.

पातेल्यात पाणी गरम होताना चहूकडून ज्वाळेने वेढलेला असतो.
बंबाच्या पोटात आग असते त्यामुळे तो बाहेरून उघडाबंब.
Wink

उघडाबंब बरोबरच नागडधुय्या पण शब्द आहे शक्यतो लहान मुलांच्या संदर्भात त्याचा वापर होतो.

दक्षिणा, अनवट, विमल, उन्मन, कैवल्य, अद्वैत असे शब्द कवितेत जागोजागी बागडत असतात. कोणत्या कविता वाचत्येस सध्या, आध्यात्मिक का? Wink

मला तरी असे शब्द मी वाचलेल्या सर्वसाधारण कवितांमधून कधी जागोजागी वगैरे आढळले नाहीत. असो. धागा चांगला आहे. पण ह्याला विस्कळित स्वरूपात ठेवण्यापेक्षा ह्याअंतर्गत 'समानार्थी शब्दांची अर्थ-छटेसकट सुची' तयार करूयात का? किंवा एखाद्या समाजरचनेनुसार वापरले जाणारे शब्द जसे शेती संदर्भात वापरले जाणारे शब्द, सुतारकामासंदर्भात वापरले जाणारे शब्द आणि अशा एकेका विषयाला एकेक आठवडा द्यायचा व महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वापरले जाणारे शब्द इथे मांडा असे आवाहन करायचे. कशी आहे कल्पना?

हर्पेन , आमच्या गावात लहान बाळाला खेळवताना
'नागडधोय, सोन्याचा पोय' अशी एक गाण्यातली ओळ ऐकली आहे.

खोंबारलं - आम्ही त्याला 'धस लागली' असं म्हणतो. धस लागणे, उसवणे, फाटणे, विरणे, घडीवर जाणे हे वेगवेगळे शब्दप्रयोग कापडाच्या बाबतीत वापरले जातात.

केस पिंजारलेले असले की त्याला आई 'भुसारणीसारखे केस' असं म्हणते.

साती....हो, तो पाण्याचा बंब....जो आजही ग्रामीण भागात आढळतो...पाहिला आहे मी. माझा रोख शब्दकोशाकडे होता. या क्षणी माझ्याकडे शासन व्यवहार कोश आहे...तिथे Fire-engine = आगीचा बंब असा अर्थ दिला आहे तर चाऊस डिक्शनरीमध्ये "बंब = फायर इंजिन' एवढाच अर्थ दिला आहे. तुम्ही म्हणता तसा पाणी गरम करण्याचे पातेले असा उल्लेख नाही. मात्र त्या अर्थाने बंब प्रचलित आहे हे मान्य.

वरदा....

"'भुसारणीसारखे केस'".....कित्येक वर्षानंतर केसाबाबत अशी ही उपमा वाचायला मिळाली. धारवाड, उनकल, बिदर भागात सर्रास वैतागाने वापरली जाणारी ही संकल्पना...मुलीच्या बाबतीत....

"फिस्कारलेल्या डोळ्याची...." हे आणखीन एक. तर पोरीला एक गोष्ट चारपाचदा सांगायची वेळ आली की आई करवादून ओरडायची..."कान आहेत की परट्याची भोकं ?" हे परट्याची भोकं प्रकरण मला सुरुवातीला समजलेच नव्हते. नंतर कळाले की नारळाला तिकडे परटे असेही म्हणतात..तर त्याच्या अंगावर उमटलेली दोन तीन भोके, ज्यांचा कुणालाच काही उपयोग असत नाही.

Pages