चला, भाषासमृद्ध होऊया !!!

Submitted by दक्षिणा on 24 September, 2014 - 08:27

महाराष्ट्रात दर मैलागणिक मराठी भाषा बदलते असे म्हटले जाते. यात अतिशोयोक्ती नाही हे महाराष्ट्राच्या भटकंतीत लक्षात येतेच. मराठी भाषा आपल्या या अनेक सख्ख्या, चुलत, मावस, सावत्र बहिणींच्या प्रभावामुळे वेळोवेळी बदलत गेली आहे. हिंदी, इंग्रजीसह महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषातील शब्द विनासायास मराठीच्या पंक्तीत मानाने जागा अडवून आहेत.

चला तर मग या शब्दांना जाणून घेऊ या आणि त्यांचे नेमके मराठी अर्थ शोधूया.

उदाहरणार्थ, पेन या शब्दाचा मराठी शब्द तुम्हाला माहीत असेलच, पण रिफिलला मराठीत काय म्हणतात ?
ताबडणे, खुंदलणे ही क्रियापदे किती जणांना माहीत आहेत ?

आपण सर्रास टेबल खुर्ची म्हणतो. पण टेबल चेअर म्हणत नाही. का बरे ?
विदर्भात तर हिंदीभाषिक मराठी की मराठी भाषिक हिंदी हा वेगळाच घोळ आहे.
अनवट, विमल, उन्मन, कैवल्य, अद्वैत असे शब्द कवितेत जागोजागी बागडत असतात. पण साध्या सरळ मराठी भाषेत यांचे अर्थ काय आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे का ? या शब्दांनी कविता उच्च होत असली तरी ती सर्वसामान्यांना कळत नसली तर काय उपयोग ?

इथे कुणाला कमी लेखायचा किंवा हिणवण्याचा विचार मनात नाही. फक्त मराठी बोलीभाषेत येणार्‍या शब्दांची नव्याने ओळख करून घेण्याचा एक प्रयत्न आहे.

असेही जे शब्द आपण इंग्रजी असूनही सर्रास वापरतो आणि त्यांचे मराठी अर्थ आपल्याला पटकन आठवतात का?

कोणताही मराठी शब्द जो नेहमी सहजपणे वापरला जात असेल पण शब्दकोषात सापडणार नाही असा.

चला तर मग करायची का सुरुवात ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सारे.. हा शब्दप्रयोग आता आताच मराठीत व्हायला लागला आहे. आपण खुप / पुष्कळ / भरपूर असे शब्द वापरत असू.

डांबरट हा Damn Rat आणि डँबिस हा Damn Beast वरून मराठीत आलाय, हे पण अलिकडेच मला कळले. अगदी सर्रास हे शब्द वापरतो आपण पण त्या मूळ ब्रिटीश लोकांनी नेटीव्ह लोकांना घातलेल्या शिव्या आहेत.

दक्षिणा मस्त आहे हा धागा.

दिनेशदा छान माहीती. हे खरंच माहीती नव्हतं.

भाषासंस्कृती आणि समृद्धी या दोन्ही कारणांसाठी अतिशय उपयुक्त होईल असा धागा प्रस्ताव आहे हा आणि त्याबद्दल दक्षिणा यांचे अभिनंदन करणे भाग आहे.

इथे मी "भाग" या नामाचे प्रयोजन मुद्दाम केले आहे. एरव्ही याचा अर्थ "पार्ट, पोर्शन, पीस, शेअर, एलेमेन्ट, फ्रॅक्शन" मुख्यत्वे या अर्थाने आपण घेतो, पण अगदी क्वचित प्रसंगी "हॅव टु" = गरज आहे....या अर्थानेही घेण्यासाठी "भाग" नाम वापरले जाते. अशा विविधतेने नटलेल्या शब्दांचा संग्रह स्वतःच करणे आवश्यक ठरते. क्रमिक पुस्तकातून अशी शब्दयोजना आढळली तर त्याना वाचून पुढे जाण्यापेक्षा त्याचा सखोल अर्थ समजून घेतल्यास भाषाआनंदाबरोबर ज्ञानातही भर पडते.

अमुक एक शब्द वापरला तर ते विशेषण नेमका कोणत्या घटनेकडे बोट दाखवित आहे त्याचा अर्थ तुम्ही सामाजिक पातळीवर वा बोलीभाषेच्या भोवताली वावरत असाल तरच उमगतो. उदा. "गेला बाजार काही फायदा झाला नाही त्या व्यवहाराचा !" ~ इथे कुणाला तरी कशाबद्दल तरी 'फायदा झालेला नाही' इतपत समजते, कारण ते स्पष्ट आहे....पण "गेला बाजार" म्हणजे नेमका काय अर्थ आहे हे कितीजणांना समजेल ? यासाठी अवांतर वाचनाची खूप गरज आहे. दक्षिणा यानी रीफिलबाबत विचारणा केली आहे....मलाही एके ठिकाणी "सहा पीसकाड्या झिजल्या लिहून" असे वाक्य भेटले. पीसकाडी = पेन्सिल याचे ज्ञान त्यावेळी झाले.

विषयाची व्याप्ती खूप आहे....प्रतिसादाच्या आधारे आणखीही लिहिता येईल.

कोल्हापूरात भाजी खूप शिजली तर त्याला 'गिर्र' शिजली म्हणतात.
भात अगदी मऊ आणि गोळा झाला तर त्याला गिच्चगोळा म्हणतात.
चहा - ज्यात दूध, साखर, चहा पावडर अत्यंत कमी असेल अशा चहाला 'फळकवणी' म्हणतात.

अगो मी पण चक्कर मारली होती भाषा सेक्शन मध्ये पण मला असा धागा दिसला नाही. म्हणून उघडला. भाषेची सरमिसळ वगैरे आहेत. असा धागा दिसला नाही. Sad

दक्षिणा....

"गिर्र"....हो, आपल्याकडील अगदी पेटंट शब्द. असाच एक "गिळगिळीत" = पाणचट वा बेचवसाठी वापरतात.

"गुंजारव" हे क्रियापद ऐकले आहेस का ? कुजबूज या अर्थाने वापरले जाते.....अर्थ दोन्हीचा "मर्मर" असला तरीही गुंजारव दोन प्रेमी हृदयासाठी राखीव आहे तर कुजबूज अनेकांचे रहस्यभेदासाठी म्हणून वापरले जाते.

"खरकटे" याला = Leftovers याच्याबरोबरीने Leavings....Scraps असेही पर्याय मिळतात. तरीही लेफ्टओव्हर्सचा वापर दिसतो सर्वसाधारणपणे.

पण खरकटे आणि लेफ्टोवर सेम वाटत नाही.

जेवताना खाली संडलेले अन्न म्हणजे खरकटे.

लेफ्ट ओवर्स म्हणजे भांड्यात शिल्लक उरलेले अन्न ना ?

जेवताना खाली संडलेले अन्न म्हणजे खरकटे.<<<

असे वाटत नाही. जेवून उठल्यानंतर ताटात जे अन्नाचे अवशेष राहिलेले असतात, जे माणसाला खाता आलेले नसतात (भाताची काही शिते / आमटीचा थोडा भाग वगैरे) / पोट भरल्यामुळे खायचे नसतात (कोणतेही पदार्थ) / खाण्यास योग्य नसतात (बोन्स / निव्वळ चवीसाठी घातलेले मसाल्याचे काही पदार्थ वगैरे) त्याला खरकटे म्हणतात असे मला वाटते.

संमि....

अर्थ आणि कृती यात काहीसा फरक आहे. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो.

जेवताना खाली सांडलेले अन्न हे निश्चित स्वरूपात "टाकून देणे" या गटात येते....त्या घटकाला लेफ्टओव्हर म्हणता येणार नाही. चौघांसाठी भात केला आहे....पण जेवायला तिघेच आले....साहजिकच एकाच्या वाट्याचा भात शिल्लक राहिला....या भाताला लेफ्टओव्हर म्हणता येईल....[तरीही तो भात चांगला असल्याने लागलीच टाकाऊ वा खरकटा होत नाही]....इथे खरकटा शब्दाचा प्रयोग चुकीचा वाटू शकतो. दुसर्‍या दिवशी हा शिलकीचा भात टाकून देताना मात्र त्याचे रुपांतर लेफ्टओव्हरमध्ये होईल.

काहीशी किचकट आहे अर्थाची छटा....पण व्यावहारिक पातळीवर समजून घ्यावे लागेल.

जेवताना खाली सांडलेले अन्न हे निश्चित स्वरूपात "टाकून देणे" या गटात येते.<<<

असेही वाटत नाही. जेवताना खाली सांडलेले अन्न हे चुकून सांडलेले असते, टाकून दिलेले नसते. मुद्दाम पानाबाहेर काही नको असलेल्या गोष्टी काढून ठेवल्या तर त्या पानाच्या एका बाजूला नीट रचून ठेवल्या गेलेल्या असतात, त्या कुठेही सांडलेल्या अवस्थेत नसतात आणि वाटेल तश्या 'टाकून दिल्यासारख्या'ही दिसत नसतात.

खाली सांडलेले अन्न, टाकून दिलेले (पद्धतशीरपणे बाजूला ठेवलेले) अन्न आणि खरकटे ह्यात कोणतेही साम्य नाही असे माझे मत आहे.

बेफिकीर....

"...जेवताना खाली सांडलेले अन्न हे चुकून सांडलेले असते..." ~ अगदी योग्य निरिक्षण....माझा मुद्दा असा की लग्नाच्या पंगतीत ताटाबाहेर सांडलेले...वा ठेवलेले अन्नपदार्थ....गोळा करणारे इसम वा पोरे ते अन्न टाकून द्यायचे आहे या अर्थानेच ते वेगळ्या पातेल्यात गोळा करीत असतात....रीसायकलिंग होत नाही या अन्नाचे. तुम्ही म्हणता, पानाच्या एका बाजूला नीट रचून ठेवल्या गेलेल्या असतात काही गोष्टी....पण ही बाब त्या पोरांच्या गावी नसते. जेवणारा पाहुणा उठला खुर्चीतून म्हणजे ताटाभोवतालचे अन्न हे टाकण्याच्या पात्रतेचे झाले.

खरकटेची व्याख्या अशा उदाहरणांनी अस्तित्वात आली असेल.

पण रिफिलला मराठीत काय म्हणतात ?>> गावाकडे कान्डी म्हणायचे.
शिवाय वॉशिन्ग पावडरला खिस म्हणायचे.
ज्याला शहरात बॉबी म्हणले जाते त्या खाउला फुकणी असा साधा सरळ सोपा शब्द होता.

ताबडणे, खुंदलणे ही क्रियापदे किती जणांना माहीत आहेत ?>>

ताबडणे - एखादी गोष्ट भरपुर वापरली तर ताबडली म्हणतात.

खुंदलणे
- चेचणे, कुटणे ह्या अर्थाने वापरलेला ऐकलाय.

मामा अनुमोदन. खरकटं म्हणजे उष्ट्या ताटात जे उरलेले अन्नाचे कण असतात ते,
आणि लेफ्टओव्हर म्हणजे उरलेले अन्न.

कोल्हापूरात खरकटे काढणे, आणि अन्न काढून स्वच्छता करणे याला 'उष्टशेण' करणे म्हणतात. जेवणं झाल्यावर जमिनीवर सांडलेलं उचलून तिथे पाण्याचा हबका मारून तेव्हढ्या भागावर शेणाचा गोळा फिरवला जाई चक्क. माझ्या आईने हे केलेलं मी पाहिलं आहे लहानपणी.

"....भागावर शेणाचा गोळा फिरवला जाई चक्क...."

~ फार सुंदर वाटायची ही क्रिया.....परिसर लागलीच स्वच्छही वाटायचा. त्यातही गोळा फिरविणारा हात आपल्या आईचा असेल तर त्याचा आनंदही आगळाच. आजकालच्या यांत्रिकीकरणाने ही परंपरा जवळपास लुप्त झाली आहे दक्षिणा.

कोकणात पण 'उष्टशेण' हा शब्द प्रचलित आहे.

मऊभाताला कोकणात गुरगुरीत भात किंवा गुरगुट्या भात असेच म्हणतात.

मला वाटते खरकटे म्हणजे उष्टा हात लागलेले जेवण जे इतर कुणी पुन्हा खाणार नाहीत / खाऊ शकणार नाहीत असे . ते सांडलेले असु शकते, ताटात उरलेले असु शकते किंवा भांड्यातलेही असु शकते.

मांडीत बसलेलं कारटं अत्यंत चुळबुळ करत असेल, तर त्याने अंग खुंदळून काढलं, असा शब्दप्रयोग आहे.
ताबडणे हा शब्द 'रफ यूज'/'ओव्हर यूज' या अर्थाने. अर्थात एकादी जीन्सची पँट नेहेमीच 'ताबडली' जाते.
डिशमधे उरलेले ते स्क्रॅप.

मामा अनुमोदन. खरकटं म्हणजे उष्ट्या ताटात जे उरलेले अन्नाचे कण असतात ते,<<<

मामा अनुमोदन काय मामा अनुमोदन? मी पहिल्यांदा लिहिले आहे ते! Proud

Pages