ओढ
विमान क्रूजिंग अल्टिट्यूडला पोचलं असावं. डोळे किलकिले केले तेव्हा केबिन क्रू खाण्या-पिण्याच्या गाड्या घेऊन फिरताना दिसला. शेजारच्या सीटेवर एक बर्याच वयस्कर बाई बसल्या होत्या. एअर होस्टेस आमच्या रांगेजवळ आली होती.
"मिस थाँम्सन, कॉफी हवीय का आणखी?"
नावाने प्रवाशाला बोलवून विचारणं झालं म्हणजे ओळखीची किंवा प्रसिध्द व्यक्ती असली पाहिजे. मी मनातल्या मनात.
"तुम्ही काय पिणार?" बाईंच्या कपात कॉफी ओतून, तिनं मला विचारलं. मी तोवर पुन्हा डोळे मिटले होते.
"थकलेला दिस्तोय. झोपू दे." माझ्या वतीनं बाईंनी सांगून टाकलं, सुंदरी पुढे गेली. मी पुन्हा मनातल्यामनात त्यांचे आभार मानले.
