रंगिला रे...
"लहानपण देगा देवा" हे बरेचदा मोठं झाल्यावरच समजतं. लहानपणी मात्र नावडत्या विषयांचा अभ्यास, आवडत्या मित्रांचं शाळा सोडून जाणं, आवडत्या विषयाचा खूप अभ्यास केल्यानंतरही थोडक्यासाठी पहिला नंबर हुकणं, एक ना अनेक त्रास! सगळं नकोसं होऊन जातं. आठवी-नववीमधे गेल्यावर मोठं झाल्यासारखं वाटतंही, पण 'लहानपणी थोडं बरं होतं नाही का' असंही वाटू लागतं. दहावीबद्दल तर 'नो-कमेंट्स!' सायकलवर टांग मारून घर ते क्लास ते शाळा आणि नंतर घर ते क्लास ते कॉलेज(ज्यु) अशी तंगडतोड सुरु होते, तेव्हा कायनेटिक किंवा स्प्लेंडर्स वरुन जाणारी कॉलेजची पोरं भारी वाटू लागतात. त्यांच्या आयुष्यातला आराम खुणावु लागतो.