गेली अनेक शतके मनुष्याला अखंड साथ लाभत आली, ती स्वर आणि सूररूपी संगीताची! मात्र या प्रवासात अनेकदा अशी वळणे येतात, जेव्हा या कलेची मीमांसा करणे गरजेचे होऊन जाते. काही टोकदार प्रश्न विचारावे लागतात, प्रसंगी कलेच्या काही अंगांवर अभ्यासक-समीक्षकांना कठोर शब्दांत टीकादेखील करावी लागते. कारण, या संगीतकलेचा तिच्या उगमस्थानाशी असलेला संपर्क तुटलेला असतो.
प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे त्या देशाचे लोकसंगीत. भारताला तर लोकसंगीताची समृध्द परंपरा आहे. भारतीय अभिजात संगीताचा उगम या लोकसंगीतामधूनच झाला. पण दुर्दैवाने वाढत्या नागरीकरणाबरोबर शहरातल्या माणसांची या संगीत प्रकाराशी फारकत होत गेली. आज मला महाराष्ट्रातल्याच लोकसंगीताची पुरेशी ओळख नाही. मराठी लोकसंगीत म्हटले की फक्त लावणी आणि कोळीगीतेच समोर येतात. पोवाडा, भारुड, गोंधळ असे अनेक प्रकार आज सहसा ऐकू येत नाहीत. वासुदेवगीते, ओव्या हे प्रकार तर त्यापेक्षाही दुर्मिळ.