मभागौदि २०२५ शशक - उशीर - तुष्की
ग्राऊंड च्या कडेला एकटाच शिक्षा म्हणून तो उभा होता.
“आधीच वेळ दिलेली होती आणि गटातले सगळे खेळाच्या सरावासाठी बरोबर आले, तू वेळेवर का आला नाहीस?”, कर्कश्य आवाजात ओरडत सरांचा तिसऱ्यांदा विचारलेला प्रश्न, तरी तो गप्पच होता.
“तुझ्या बाबांना फोन केला तेव्हा तू वेळेवर निघाला हे त्यांनी सांगितले, अरे मग तरीही उशीर कसा झाला? कुठे घालवलास हा वेळ?”, सरांचा थयथयाट शब्दात मावत नसल्याने डोळ्यांवाटे पण प्रकटत होता.
खोटे त्याला बोलायचे नव्हते, जे घडले त्या आनंदासमोर ही शिक्षा काहीच नव्हती.
तो पठ्ठा गप्पच होता.