“अरे हाssड!” चार वेळा हाकलूनही कुत्री त्यांच्या पायापाशी घोटाळत राहिली. "भूक्कड साSSली", त्याने शिवी हासडत पेकाटात लाथ घातली.
एका हाताने कम्मोला जवळ ओढत दुसऱ्या हातात अर्धवट खाल्लेला तुकडा धरत त्याने विचारलं “द्यायचा का तीला?”
खुरटलेल्या दाढीवर चिकटलेला रस्सा, कमी ओंगळवाणा वाटत होता आत्ता त्याच्या नजरेतल्या भावापुढे. अंग आकसून घेत ती मागे झाली.
“तिच्यायला! माज आला काय?” परत जवळ ओढून घेत, पकड घट्ट करत तो भेसूर हसला.
माझ्या दोन मनांमध्ये संघर्ष सुरु होता.
सर्व सत्ता त्याला मिळेल आणि मग तुझा मुलगा त्याचा दास बनून राहील.
नाही, माझा राघव असा नाही. त्याचे माझ्या भरतवर जीवापाड प्रेम आहे.
सत्ता आल्यावर माणसे बदलतात, सर्व नाती संपतात.
खरंच असे होईल? माझा राघव बदलेल?
नाही, राघव माझ्या भरतला अंतर देणे शक्य नाही.
पण कोणी सांगावे उद्या काहीही होऊ शकेल.
पण महाराजांनाही राघवच त्यांचा उत्तराधिकारी व्हावा असे वाटते.
मग मला असे काहीतरी करावे लागेल कि ज्यामुळे राघव हे राज्य सोडून निघून जाईल.
मी त्याच्यापाशी पोचलो तेंव्हा तो डाराडूर झोपला होता. त्याला उठवावे का? माझे मन म्हणाले, हो, तेच योग्य आहे. पण माझे दुसरे मन म्हणाले, नको. त्याच्याजागी तू असतास तर त्याने तुला मदत केली असती का?
शेवटी मी त्याला उठवायचे ठरविले. पण मी त्याला उठवणार इतक्यात मला त्याचे दर्पोक्तीपूर्ण शब्द आठवले. “तू? अन माझी बरोबरी करतोस? तू यत्किंचित मंदगती आहेस, तर मी वाऱ्याशी स्पर्धा करणारा.”
त्याला धडा शिकविणे गरजेचे होते.
मी त्याला तसाच सोडून पुढे निघालो. मी अंतिम ठिकाणापाशी पोचलो तेंव्हा तो अजूनही तिथे आला नव्हता.
आज बऱ्याच दिवसांनी मला बक्षिस मिळाले होते. ते घट्ट पकडून मी लगबगीने घरी चाललो होतो.
वाटेत विश्रांतीसाठी मी क्षणभर थांबलो. इतक्यात माझे लक्ष खाली गेले. आणि मला “तो” दिसला. तो माझ्याकडेच रोखून पाहत होता.
त्याच्याकडे असलेली गोष्ट पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले. ती मला मिळाली तर? पण त्यासाठी मला त्याच्याशी दोन हात करावे लागणार होते.
क्षणभर वाटले, त्याच्याकडे दुर्लक्ष करावे आणि आपल्या वाटेने निघून जावे. पण अशी संधी सोडायचे माझे मन होईना.
तो अंगापिंडाने माझ्याएवढाच होता. पण मी त्याला सहज लोळवू शकेन. हि संधी मी सोडता काम नये.