पावसाची मिठी
भरदिसा पडे
पावसाची मिठी
नाही रीती भाती
कशी म्हणू प्रिती
तुडवीतो राने
करी चोळामोळा
धावे सैरावैरा
कसा याचा चाळा
थेंब किती भारी
सरीवर सरी
करी शिरजोरी
लगटतो उरी
पावसाची मिठी
ओलावली दिठी
किती दिसा झाली
सजणाची भेटी
उणावे आवेग
पुरेपूर संग
उन्हात हसुनी
निहाळी नि:संग
लाजली धरणी
मुख घे झाकोनी
हासू झळकले
पदरा आडोनी ....
उमलला मोगरा मंद
उमलला मोगरा मंद, कसा बेधुंद
वेली पाचूच्या ....
वैशाखी काहिली दूर, करी कापूर,
शुभ्र ज्योतींचा ....
उष्म्याचा होत आघात, रोज आकांत
उसळला पुरता ....
हा भलताचि स्वच्छंद, परि नि:संग
रात्रीतून फुलता.......
माळिती कुणी या शिरी, धरिती का उरी
तनू शांतवायाला ....
ज्योत्स्नेचा सहचर खुळा, परि कोवळा
भुलवी जगताला ....
ऋतुराजाचा सांगाती, गुंगली मती
कितीदा या वानावे ....
घ्या भरुनि ओंजळीतुनी, गंध भरभरुनि
सुगंधी न्हाऊनी जावे.....
आस नवचैतन्याची ...
घुसमट तगमग शब्दही झाले नको नकोसे
आकाश मोकळे अता निरखू दे जराजरासे
येऊ दे जरा तो झुळझुळणारा रेशीमवारा
श्वासात भरु दे रानसुंगध हा घमघमणारा
शीळ कुणा पक्ष्याची येवो अर्ध जरिही
तुटलेली ही तार जुळावी सहज मनींची
मनपक्षी वेडा विहरत जावो दिगंतरासी
कंठात घेऊनी गाणी नवनवचैतन्याची .....
एक थेंबुटा...
एक थेंबुटा उनाड
आभाळात हरवला
पहाटेला पानांवर
दंवरुप झळकला
एक थेंबुटा निवांत
झर्याकाठी पहुडला
चोच रान-पाखराची
वेडा करीतसे ओला
एक थेंबुटा गगनी
ढगामधेच दडला
दंगा करुनिया फार
धरेवर विसावला
एक थेंबुटा बिचारा
पापण्यात उमटला
हाक घालूनी मेघांना
उगामुगाच आटला
एक थेंबुटा थेंबुटा
धरतीला लेई लेणं
जाई स्वतः हरपून
देई दुसर्याला जिणं
दृष्टी
त्यांची होते कशी वारी
माझी नित्य फिराफिरी
त्यांना होतो तो सोहळा
इथे गोंधळ सावळा
निसर्गचि त्यांना सखा
झालो मी का त्या पारखा
सूरताल त्यांना साथी
मला गोंगाट का होती
काय करावे कर्मासी
जशी दृष्टी तशी सृष्टी ...
आभाळात आले किती .... काळे काळे ढग
आभाळात आले किती .... काळे काळे ढग
येना बाहेर लवकर आई ....बघ वर बघ
आरडाओरडा कित्ती यांचा .... गडाडगुडूम
वीज कशी मधूनच .....जाते सणाणून
वारे कसे घोंघावती .... आवाज करून
पाला पाचोळ्याने गेले .... आभाळ भरून
टपटप टपटप आले आई .... थेंब हे वरून
भिजू मस्त पावसात ..... गोल गोल फिरून
गाणे गाऊ पावसाचे ..... हात उंचावून
ये ना आई लगेच बाहेर .... काम दे सोडून
पाऊस आला पाऊस आला
गडगड गडगड कोण गरजले
लखलख लखलख कसे चमकले
टपटप टपटप थेंब टपोरे
रस्ते अंगण ओले सारे
सुगंध भारी कुठून आला
अरे हा तर वळिव पडला
तडतड तडतड गारा पडल्या
मजेत वेचू खाऊया चला
गाणे गाऊन नाचू या चला
पाऊस आला पाऊस आला
कार माझी लाले लाल
कार माझी लाले लाल
पळते भारी हे धमाल
आहे जरी छोटी फार
स्लीम स्लीक स्पोर्ट कार
बेडवरुन कपाटावर
जमिनीवरुन टेबलावर
दमत नाही अज्जिबात
अस्ली पळते ना सुसाट
पेट्रोल-बिट्रोल काही नको
हातात धरुन पळवतो
कित्ती नाचवतोस ती कार
आई ओर्डू नकोस फार
म्हणे लगेच आवरा आवरा
आत्ता कुठे वाजले बारा .....
जागू -राधा स्पेशल...
माय लेकी पी सी वर ..... पी सी वर
गप्पा रंगल्या नि ग वर .... नि ग वर
(गप्पा रंगल्या मा बो वर .... मा बो वर)
झाडे पाने फुले पहा .... फुले पहा
राधा जरा शांत रहा .... शांत रहा
एवढे पोस्ट करते मी .... करते मी
चळवळ जरा कर कमी .... कर कमी
मधेच लाऊ नको बोट ...... नको बोट
बघ पडली तिन्दा पोस्ट .... तिन्दा पोस्ट
की बोर्ड लवकर सोड सोड ..... सोड सोड
राधा हसली गोड गोड .... गोड गोड....
कसे नि कुठून ???
उंच उंच आकाशात ढग येतात कुठून ?
ढगात या एवढाल्या पाणी भरतात कुठून ?
पाणीवाले ढेरपोटे ढग कसे पळतात ?
ढकलाढकली करताना दंगा किती करतात ?
वीज कशी चमकते काळ्या ढगातून ?
पाणी कसे पडते बदाबदा त्यातून ?
ढग तर काळा काळा दिसतो किती दुरुन ?
पांढर्या शुभ्र गारा पडतात कशा त्यातून ??
किती प्रश्न विचारशील कसे नि कुठून...
खा जरा गारा नि ये मस्त भिजून ....