गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढलाय. तापमान आणि महागाई यांच्यात शर्यत लागलीय असं वाटतंय. माणूस आणि प्राणी हवालदिल झालेत. मिळेल तिथे सावली आणि गारवा शोधताहेत. ज्यांना पाय आहेत आणि जे चालत जाऊन सावलीत बसू शकतात त्यांनीआपलं सावलीतील अढळपद शोधलंय. पण जे चालू शकत नाहीत आणि ज्यांच्या पायांनी अन्नपाण्यासाठी जमिनीला जखडून घेतलंय ती झाडं मात्र सूर्याचा जाळ सोसत आणि पायवाल्यांना सावली देत उभे आहेत.
ओ अप्पा s s ओ अप्पा s s असं मोठ्याने ओरडत अप्पांच्या सुनबाई धावतच अंगणात आल्या. अप्पा अंगणातील झोपाळ्यावर बसून अडकित्त्याने 'कुटूर कुटूर' असा आवाज करत पानासाठी सुपारी कातरत होते. कातरलेल्या सुपारीची, शार्पनरने पेन्सिलीची निघते तशी नक्षीदार पापडी, कात-चुना लावलेल्या रंगीत पानावर पडत होती. 'काय झालं सुनबाई?' असं ताडकन उठत अप्पानी विचारलं. 'अहो अप्पा' s s बोलतांना त्यांना धाप लागत होती. 'बघा ना चिंटूला काहीतरी होतंय, तो कससंच करतोय' हातातला अडकित्ता फेकत आप्पांनी घरात धाव घेतली. अप्पांचा सात वर्षांचा नातू चिंटू’ बेडरुममधे दोन्ही हात पोटाशी आवळून कळवळत पडला होता.