मग गाईन अंगाई
चांदोमामाने ओढली छान ढगांची दुलई
घास भरवते बाळा, मग गाईन अंगाई
चिऊताई ही पिलांस चोची दाना भरवूनी
गोष्ट घरट्याची सांगे वर पंख पांघरूनी
मनीमाऊची ही बाळे दुध चुटुचुटु पिती
त्यांचे निळेशार डोळे हळूहळू पेंगुळती
उड्या मारून दमले शुभ्र वासरू गाईचे
दुध पिऊनच झोपे, ऐके आपुल्या आईचे
कसे बाबाही जेवती, त्यांना वाढे त्यांची माय
हात मऊसूत तिचा, जणू दुधावरली साय
तू ही ऐकतोस सारे, गुणी बाळ आहे माझे
संपवून भात सारा, येई पापण्यांवर ओझे
- रोहन