पिंकी, परी आणि मोर -

Submitted by विदेश on 17 July, 2011 - 00:43

परीने विचारले, पिंकीच्या कानात -
' यायचं का तुला आंब्याच्या वनात ?

मोराचा पिसारा छान पहायला
मोरासंगे खूप खूप नाचायला ! '

पिंकी परीसंगे गेली पटकन
मोर तो समोर आला झटकन -

मोराने पिसारा फुलवला छान
पिंकीने हलवली खुषीत मान !

मोर कित्ती नाचला आनंदाने
पिंकीने मोठ्ठ्याने म्हटले गाणे -

पिसाऱ्यात बघून एकेक रंग
पिंकी झाली होती भलतीच दंग !

जां तां ना हि पा नि पि आठवले
रंग सारे डोळ्यांत साठवले -

जांभळा तांबडा.. पिंकी म्हणू लागे
कौतुकाने परी तिच्याकडे बघे !

" झोपेत किती बघा बडबडते -
दिवसाही नको तिथं धडपडते ! "

- आई पुटपुटे जाता पिंकीपाशी
ओढते चादर तिची खस्सदिशी !

मोराचा पिसारा गेला कुणीकडे ?
परी होती इथे - गेली कुणीकडे !

कुठली परी आणि कुठला मोर -
डोळे चोळता दिसे आई समोर !

गुलमोहर: 
शब्दखुणा: