देवघर
आपल्यापैकी बहुतेकांच्या घरांमध्ये छोटे-साधे का होईना देवघर असायचे-असते. मराठी लेखनात संध्याकाळी दिवेलागणीला आजी-आजोबा-वडीलधारी मंडळी कशी लहान मुलांना शुभम करोति, रामरक्षादि प्रार्थना परवचा म्हणायला उद्युक्त करत, शिकवत अशी वर्णने फार येतात. त्यावरून दैनंदिन प्रार्थना हा बहुसंख्य घरांमध्ये रुळलेला उपचार होता असा निष्कर्ष काढता येतो. आजही घरोघरी देवघर दिसते. कुणाकडे मोठे, कुणाकडे साधे, फळीवरचे. मनःशांतीसाठी, अडचणीच्यावेळी करुणा भाकण्यासाठी, आनंदाच्या प्रसंगी आभार मानण्यासाठी, सणावाराचा आमोद साजरा करण्यासाठी देवघरात देवपूजा-प्रार्थना करणे घरोघरी परंपरेने चालत आलेले आहे.