पश्चिमेवर असता उन्हे
ऐक निळाईचे रडणे.
निशेस धरणी विचारी
ना आवडत तुज रंगणे?
निःशब्दशाही तूच सांग
का रे इथे पडले सुने?
शांततेत दडले असते
सोसत अपुले घाबरणे.
विषण्णता घेरा घाली
रोजचेच झाले बुडणे.
रात्र होते जर्द शाई
आपण पानी उतरवणे.
- आर्त. (१९.०३.२०२१)
टीप: मी गझल हा प्रकार नव्यानेच हाती घेतला आहे. जर कुणाला सुधारणा, अभिप्राय इत्यादी कळवायचे असेल, तर मुक्तपणाने बिनधास्त कळवा. आभारी.
निशेच्या गर्द अंधकारमय गर्भातून
प्रभाकराचा जन्म झाला.
नभी साद घालती पाखरे
उठा उठा अरुणोदय झाला..
उठा उठा अरुणोदय झाला....
भगवी शाल पांघरून
सूर्य हा नभी अवतरला.
नेसून हिरवा शालू
धरती उभी त्याच्या स्वागताला.
उठा उठा अरुणोदय झाला..
उठा उठा अरुणोदय झाला....
निळ्याशार सागरात
लाटांचा उन्माद झाला.
काल अस्तास गेलेला
रवी आज पुन्हा उगवला.
उठा उठा अरुणोदय झाला..
उठा उठा अरुणोदय झाला....
हाक देती हंबरूनी
गोठ्यात गुरे वासरे.
खोप्यात करती चिवचिव
सारी चिमनपाखरे