आधीचा भाग
https://www.maayboli.com/node/81819
बंगलोरच्या त्या दोन कुटुंबांनी ही सहल अगदी भरगच्च आखलेली होती. चक्राताला येण्याआधी ते अजून दोन ठिकाणी दोन दोन दिवस फिरून आले होते. सकाळी लवकर, म्हणजे साडेसातलाच त्यांनी नाश्ता सोबत पॅक करून घेतला आणि ते बुधेर गुंफांना जाण्यासाठी निघाले. एकाच दिवसात बुधेर आणि टायगर फॉल्स, अशी दोन्ही ठिकाणं त्यांनी केली.
ऑक्टोबर २०१९ मध्ये किरण पुरंदर्यांच्या निसर्ग निरीक्षण शिबिरासाठी चक्राताला जाऊन आल्यानंतर मी चक्राताचं एवढं वर्णन घरीदारी केलं होतं, की ते ऐकून ऐकून माझ्या घरच्यांनाही चक्राताला जावंसं वाटायला लागलं होतं. त्यामुळे २०२२ मध्ये प्रवास करता येईल अशी खात्री वाटल्यावर एप्रिलमधली चक्राताची सहल ठरवून टाकली. आधी तेव्हा किकांचं शिबिर असणार आहे का, याची चाचपणी केली, पण त्यांचा तेव्हा तरी तसा विचार नसल्याचं कळल्यावर आमचे आम्हीच जायचं ठरवलं.
गेली दोन वर्षे मी आजूबाजूचे पक्षी उत्सुकतेने बघायला लागले आहे. पक्ष्यांचे फोटो काढायलाही मला आवडतात. पण एक रंगनथिट्टू सोडलं तर खास पक्षीनिरीक्षणासाठी असं कुठे लांबवर जायला जमलं नव्हतं. मायबोलीवर साक्षीने लिहिलेलं चक्राताचं प्रवासवर्णन मला खूप आवडलं होतं. तोपर्यंत मी चक्राता हे नावही ऐकलं नव्हतं. पण साक्षीचे लेख वाचून चक्राताला जावंसं तीव्रतेने वाटायला लागलं. त्यामुळे किकांच्या ऑक्टोबरमधल्या चक्राता कॅम्पबद्दल समजताच, काहीतरी करून हे जमवूयाच असं ठरवलं. माझ्या एका आतेबहिणीचंही माझ्याबरोबर यायचं ठरलं.