भाग पहिला https://www.maayboli.com/node/72222
आदल्या दिवशी कोटी कनासर आणि मंगटाडला जाताना जे जेवण आम्हाला हॉटेलमधून सोबत दिलं होतं ते अगदी रोटी-भाजी-डाळ-भात- सॅलड असं साग्रसंगीत होतं. जेवणाची चव अप्रतिम असायची. पण भरल्या पोटी डोंगर चढणं थोडं त्रासदायक झालं. त्यामुळे दुसर्या दिवशी बुधेर गुंफा पहायला जाताना किकांनी हलकं जेवण सोबत देण्याची सूचना केली होती. त्यामुळे त्यांनी आपल्याकडे आपण सोजी करतो तसा भात, उकडलेली अंडी आणि केळी असं जेवण दिलं होतं. जाताना हवा पावसाळी होती. बुधेर गुंफांच्या पायथ्याशी पोचलो. तिथे जंगल खात्याच्या विश्रामगृहाच्या आवारात जेवलो. तोपर्यंत सुदैवाने हवा स्वच्छ झाली. गुंफा पाहण्यासाठी अडीच-तीन किलोमीटरचा चढणीचा रस्ता आहे. किका आणि आम्ही तिघे (मी, बहीण आणि ग्रुपमधले अजून एक) निघालो. ज्यांना चढणं जमणार नव्हतं ते खालीच बसून राहिले. वाटेत आम्हाला अनेक ठिकाणी झाडांवर किड्यांनी सोडलेली कात बघायला मिळाली.
किड्याची कात
शिवाय रानटी स्ट्रॉबेरी पण दिसल्या. विविध प्रकारची फुलं, फुलपाखरं होती.
१
२
३
४
५
फुलपाखरू
mistle thrush नावाचे चारपाच पक्षी दिसले.
मिसल थ्रश
सावकाश चढत एका खिंडीजवळ पोचलो. पलीकडे गेल्यावर अजून एक-दोन बर्यापैकी चढ चढून शेवटी माथ्यावर पोचलो. इतका वेळ जंगलातून चालत होतो, पण जिथे पोचलो तिथे सगळा गवताळ प्रदेश होता. चार-पाच रुबाबदार घोडे आणि काही गायी-बैल चरत होते.
त्या सगळ्या परिसरात गुज्जर नावाची भटकी पशुपालक जमात आहे. धर्माने ते मुस्लिम असतात. उन्हाळा आणि पावसाळ्यात हे लोक हिमालयात जास्त उंचीवर आपापली गुरं घेऊन राहतात. थंडी पडायला लागली की त्यांचे तांडे हळूहळू खाली उतरायला लागतात. आम्हाला रोज वेळोवेळी रस्त्यात असे खाली उतरणारे अनेक गट भेटले होते. गाई-म्हशींची मोठीच्या मोठी खिल्लारं असायची. त्या थंडीतही ते उघड्यावर तंबू टाकून मुक्काम करत होते. भटके जरी असले, तरी त्यांच्याकडे मोबाईल वगैरे असतात. जिथे असतील तिथून दूधदुभत्याचा रतीब खाली गावांमध्ये रोजच्या रोज पोचवण्याची व्यवस्थाही पक्की असते. तिथे वर चरणारे बैल त्यांचेच असतील किंवा आसपासच्या खेडेगावांमधले असतील.
प्रत्यक्ष गुंफेत आम्हाला जाता आलं नाही कारण पावसाळा नुकताच संपलेला असल्यामुळे आत पाणी भरलेलं होतं. अर्थात हे आधीच ठाऊक होतं की आत जाता येणार नाही. त्या गुहेत लवणस्तंभ आहेत. ते पाहता आले नाहीत, पण तिथपर्यंतच्या वाटेवर जे पाहता आलं तेही समाधान देणारंच होतं. तिथे गवतावर बसलो असताना spotted nutcracker या पक्ष्याची जोडी दिसली. हा पक्षी ४ दिवसांत एकूण तसा २-३ वेळा दिसूनही नीट फोटो मात्र एकदाही मिळाला नाही. थोडा वेळ बसून मग परत निघालो. खाली येऊन गाड्यांमध्ये बसून परत हॉटेलवर आलो. येत असताना रस्त्यावरच्या पाण्याच्या डबक्यात आंघोळ करणारा सुरेख निळ्या रंगाचा सागर ( ultramarine flycatcher) हा पक्षी गाडीच्या आवाजामुळे उडाला, पण किकांचं बारीक लक्ष असल्यामुळे त्यांनी आम्हाला दाखवला. निळ्या रंगाचे अजून दोन सुरेख पक्षी आम्हाला हॉटेलच्या आवारातून दिसायचे. एक verditer fllycatcher आणि दुसरा small Niltava. ( verditer हे निळ्या रंगाच्या त्या छटेचं नाव आहे.)
verditer flycatcher 1
verditer flycatcher 2
small niltava
रोज रात्री जेवायला जाण्यापूर्वी आम्ही सगळे एकत्र बसून आज दिवसभरात दिसलेल्या पक्ष्यांच्या नावांची उजळणी करत असू. आम्हाला सगळेच पक्षी नवीन होते. त्यामुळे नावांमध्ये खूप गोंधळ होत होता. तो गोंधळ किका सोडवून देत होते. कधीकधी त्यांनाही चटकन बघितल्या बघितल्या एखाद्या पक्ष्याच्या नावाची खात्री वाटत नसली की ते परत आल्यावर पुस्तकात बघून खात्री करून मगच नाव सांगत होते. या रोजच्या बैठकांमध्ये आणि गाडीतल्या प्रवासात त्यांच्याकडून खूप किस्से आणि ते सध्या करत असलेल्या कामाबद्दल बरेच अनुभव ऐकायला मिळाले. शिवाय रोज रात्री जेवताना सगळ्यांच्या भरपूर गप्पा होत होत्या. जेवण अतिशय चविष्ट असायचं. अजिबात तेलकट-तुपकट नाही. एक दिवस चक्क अळूची भाजी होती. अर्थात वेगळ्या प्रकारे केलेली, पण मस्त होती. अळकुड्याही विविध प्रकारे रोज असायच्या. राजमा वेगवेगळ्या स्वरूपात बर्याच वेळा होता. पनीरही विविध प्रकारे बनवलेलं असायचं. शिवाय रोज काहीतरी गोड पदार्थ. खीर, गुलाबजाम, दलिया. चार कशाला, आठ घास जास्तच जात होते.
पक्ष्यांचं नीट निरीक्षण करायचं असेल तर दुर्बीण किंवा कॅमेरा, यापैकी किमान एक वस्तू सोबत पाहिजेच. माझ्या गळ्यात सतत कॅमेरा असल्यामुळे मी चक्राताला दुर्बीण नेली असली तरी वापरली नाही. तिथे हॉटेलवर खास पक्षीनिरीक्षकांसाठी स्पॉटिंग स्कोप ठेवलेला आहे. हा साधारणपणे छोट्या टेलिस्कोपसारखा दिसतो. एखादा पक्षी जर बराच वेळ एकाच जागी बसलेला असेल तर त्याचं निरीक्षण करायला हे उपकरण अतिशय उपयुक्त आहे. एकदा एक सुतारपक्षी (ग्रे हेडेड वुडपेकर) हॉटेलच्या डाव्या बाजूला एका झाडावर येऊन बसला. किकांनी स्पॉटिंग स्कोप आणला आणि त्या सुतारपक्ष्यावर फोकस केला. त्याच्यातून तो सुतारपक्षी काय सुंदर दिसला! किकांनंतर मी स्कोपमधून बघितला आणि आपोआप तोंडातून ’ आहाहा’ आलं. किकांनी आनंदाने अक्षरशः जागच्या जागी तीनचार उड्या मारल्या आणि मला जोरात टाळी दिली. आकाशनिरीक्षण करताना टेलिस्कोपमधून शनीची कडी किंवा शुक्राची कोर, कितव्यांदाही पाहिली तरी तितकीच सुंदर वाटते. किकांनाही इतकी वर्षं पक्षीनिरीक्षण करूनसुद्धा त्या सुतारपक्ष्याकडे पाहून उड्या माराव्याश्या वाटल्या यातच त्यांच्या उत्साहाचं गमक आहे.
grey-headed woodpecker 1
grey-headed woodpecker 2
grey-headed woodpecker 3
स्पॉटिंग स्कोपमधून पाहिलेला दुसरा पक्षी म्हणजे गरुड. एक दिवशी सकाळी जवळच्या रस्त्यावर चालत असताना हा short toed snake eagle (सापमार गरूड किंवा संस्कृतमध्ये नागांत) लांबवरच्या डोंगरावर उडताना दिसला आणि हळूहळू तिथेच लांब कुठेतरी एका दगडावर बसला. आमच्या नवख्या नजरांना तो दिसत नव्हता पण किकांनी चिकाटीने तो बरोब्बर शोधून दाखवला. स्पॉटिंग स्कोपमधून त्या गरुडाला पाहिल्यावर परत एकदा सामुदायिक ’ आहाहा’ !
त्या दिवशी नंतर आम्ही देवबन आणि खडांबा या दोन ठिकाणी गेलो. दोन्ही ठिकाणं जास्त उंचीवर आहेत आणि रस्ताही जास्त वळणावळणांचा आणि जास्त खडबडीत होता. देवबनलाही जंगल खात्याचं विश्रामगृह आहे. तिथे गाड्या उभ्या केल्या आणि व्यासशिखरावर चढत गेलो. या व्यासशिखरावरून, जर हवा स्वच्छ असेल तर लांबवरची बद्रीनाथ, केदारनाथ, नंदादेवी अशी काही शिखरं दिसतात. पण आम्हाला दिसली नाहीत.
१
२
तिथून खाली उतरताना मात्र विविध प्रकारच्या पक्ष्यांची एक मिश्र टोळी (mixed hunting party) दिसली. त्यात सुतारपक्षी (himalayan woodpecker), long-tailed minivet ( लांब शेपटीचा निखार), white-tailed nuthatch (शिलींध्री), bar-tailed treecreeper (रुखोडा) आणि इतरही काही बारीक बारीक पक्षी होते. यापैकी long-tailed minivet चा रंग ' निखार’ या नावाला साजेसा तेजस्वी लालभडक होता. कॅमेर्यात मात्र तो तितका तेजस्वी पकडला गेला नाही. treecreeper चा रंग अगदी झाडाच्या खोडासारखा असतो. त्यामुळे तो पक्षी पटकन लक्षात येत नाही.
himalayan woodpecker 1
himalayan woodpecker 2
long-tailed minivet 1
long-tailed minivet 2
bar-tailed treecreeper 1
bar-tailed treecreeper 2
हे वेगवेगळ्या जातींचे पक्षी एकत्र किडेपाखरं खायला निघतात. भरपूर पक्षी एकदम आल्यामुळे झाडांच्या खोडांवरचे कीटक इकडेतिकडे उडतात आणि या पक्ष्यांना खायला मिळतात. शिवाय या पक्ष्यांची एकमेकांशी स्पर्धा नसते. कुणाला खोडाच्या सालीतले किडे हवे असतात, तर कुणाला फांदीजवळ उडणारे लहान कीटक. अशी सगळ्यांना फायदेशीर अशी ही व्यवस्था असते. अर्थात किड्यांसाठी फायदेशीर नाही!! पक्ष्यांची कीटकांची आणि आमची पक्ष्यांच्या दर्शनाची मेजवानी संपली आणि आम्ही परत खाली विश्रामगृहाच्या आवारात आलो. जेवायला बसणारच होतो तेवढ्यात किकांनी समोर लांबवरच्या एका झाडाच्या फांदीवर बसलेला एक मोठा पक्षी ’ स्पॉट’ केला. तो नेमका कुठला आहे हे जरी लगेच लक्षात आलं नाही, तरी कुठला तरी शिकारी पक्षी आहे हे नक्की होतं. आम्ही हळूहळू थोडं थोडं पुढे जाऊन अजून जवळून त्याचे फोटो काढले. तो पक्षी oriental honey buzzard ( मराठीत मोहोळघार) आहे हे नंतर कळलं. जेवण झाल्यावर थोडा वेळ तिथेच बसलेलो होतो तेव्हा eurasian jay नावाचे पक्षी दिसले.
मोहोळघार
eurasian jay 1
eurasian jay 2
देवबननंतर पुढचा टप्पा होता खडांबा. खडांबा गावाच्या थोडं अलीकडे एक जागा अशी आहे की जिथे रस्त्याच्या दरीकडच्या बाजूला बसण्यापुरती थोडी सपाट जागा आहे. तिथे बसलं की दरीत डावीकडे एक डोंगराची सोंड दिसते. समोर विस्तीर्ण मोकळी दरी, खाली तळात एक गाव. या जागेत असं काय विशेष? तर या जागी बसलं की एका विशिष्ट जातीच्या गिधाडाचं निरीक्षण करता येतं. bearded vulture किंवा lammergeier नावाचं एक गिधाड असतं. याचे पंख उघडल्यावर आठ-नऊ फूट रुंद असू शकतात. ( नेमकं सांगायचं तर ७.६ ते ९.३ फूट) गिधाडं मेलेली जनावरं खातं हे तर आपल्याला माहिती आहेच. पण हे गिधाड मेलेल्या प्राण्यांची हाडं खातं. या हाडांमधला मगज खातं. हाडं पचवण्यासाठी लागणारे पाचकरस त्याच्या पचनसंस्थेत असतात. हाडाचे तुकडे करण्यासाठी आपल्या पंजांमध्ये हाड पकडून ते उंच उडत उडत एखाद्या कातळाच्या वर येतं. पंजातलं हाड खाली सोडून देतं. कातळावर आपटून ते हाड फुटतं. आपण टाकलेलं हाड नेमकं कुठे पडलं ते त्याच्या तीक्ष्ण नजरेतून सुटत नाही. ते घिरट्या घालत हळूहळू बरोबर तिथेच खाली उतरतं आणि ते हाडांचे तुकडे खातं. तरीही एखादा बराच मोठा तुकडा राहिला असेल तर परत तो उचलतं आणि परत उंच जाऊन खाली सोडतं. हे सगळं करायला त्याला जी कातळाची योग्य जागा लागते ना, ती या खडांबाजवळच्या स्पॊटवरून खाली नजरेच्या टप्प्यात येते. आम्ही तिथे येऊन बसलो.
आम्ही असे बसलो होतो
आमच्या समोरचं दृश्य
डावीकडच्या डोंगराच्या सोंडेमागून ही गिधाडं उडत येतात असं किका सांगत होते. वाट बघण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नसतो. पण सब्र का फल मीठा होता है! थोड्या वेळाने खरंच त्या डोंगरामागून एक लॅमरगियर रुबाबात उडत आलं आणि त्याने आपल्या पंजातलं हाड आमच्या डावीकडच्या बाजूला दरीत टाकलं. पाठोपाठ ते खाली उतरलं. नेमकी मधे झाडं आल्यामुळे आम्हाला त्याने हाडं खाल्लेली नीट दिसली नाहीत. मग आम्हाला दाखवण्यासाठी खास त्याने परत एक ’ शो’ केला. राहिलेला एक तुकडा घेऊन ते उडालं आणि आमच्या समोरच्या बाजूला आलं. तिथे त्याने परत ते हाड टाकलं आणि खाली उतरलं. यावेळी मात्र आम्हाला बर्यापैकी स्पष्ट दृष्य दिसलं. त्याचं खाऊन झाल्यावर ते उडून गेलं. ती विस्तीर्ण दरी पार करायला त्याला एकदा, फार तर दोनदा पंख हलवावे लागले असतील.
१
२
३
४
५
बर्याच वेळाने अजून एक लॅमरगियर आलं आणि परत एकदा आम्ही ही सगळी अचाट कृती पाहिली. निघायला उशीर होईल म्हणत म्हणत तरीही "अजून एक दिसलं तर?" या आशेने अजून थोडा वेळ बसलो आणि अजून एक दिसलं. मग मात्र निघालो कारण लांब जायचं होतं आणि संध्याकाळ व्हायला आली होती. येताना वाटेत सुंदर सूर्यास्त दिसला. चिटुकले पिटुकले, फांद्यांवर उड्या मारणारे, तळहातावर मावतील असे गोड पक्षी आणि लॅमरगिअरसारखं आठ-नऊ फुटांचा पंखविस्तार असणारं, खोल दरीच्या वरून धीरगंभीरपणाने उडणारं गिधाड..दोन्ही तितकीच विलोभनीय दृश्यं आम्हाला दाखवून आजचा दिवस संपला.
भाग तिसरा ( शेवटचा)
https://www.maayboli.com/node/72273
ता. क. या आणि चक्रातावरच्या सगळ्या लेखांमधली पक्ष्यांची नावं, माहिती अर्थात श्री. किरण पुरंदरे यांच्याकडून आणि खडांबाला बसलेलं असतानाचा आमचा फोटो ग्रुपमधल्या एका मैत्रिणीकडून साभार
सुपर्ब ! मस्त वर्णन ! फारच
सुपर्ब ! मस्त वर्णन ! फारच गोडुले पक्षी आहेत. तुम्ही बसलात ती जागा टेररच आहे, मला तर झेपलीच नसती. मी पहिल्या मजल्यावरुन देखील खाली बघु शकत नाही. तो निळा पक्षी काय सही दिसतोय.
हा भागही मस्त! काय सुंदर आहेत
हा भागही मस्त! काय सुंदर आहेत एकेक पक्षी !
मस्तच! ,
मस्तच! ,
सुपर्ब ! मस्त वर्णन ! फारच गोडुले पक्षी आहेत. तुम्ही बसलात ती जागा टेररच आहे, मला तर झेपलीच नसती. मी पहिल्या मजल्यावरुन देखील खाली बघु शकत नाही. तो निळा पक्षी काय सही दिसतोय.>>>>>>> सेम हाच विचार माझ्या मनात आला, (मीच एकटी अशी घाबरट नाहीये हे बघून बरं वाटलं) मला व्हर्टीगोचा त्रास आहे म्हणून असेल पण माझी अजिबात डेअरिंग नाही अशा ठिकाणी बसण्याची
काय क्यूट आहेत सगळे पक्षी.
काय क्यूट आहेत सगळे पक्षी. मस्त वर्णन केलंय तुम्ही. आता इथे जावंच लागणार.
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.
रश्मी, मंजूताई, धनुडी,
रश्मी, मंजूताई, धनुडी, स्वप्ना, धन्यवाद!
तुम्ही बसलात ती जागा टेररच आहे> >> हो, आम्हीही सांभाळूनच बसलो होतो. पण आमचे ड्रायव्हर्स मात्र बिनधास्त अगदी टोकाला जात होते. लॅमरगिअर खाली उतरल्यावर आम्हाला नीट दिसत नव्हतं, तेव्हा एक ड्रायव्हर आमच्यापैकी एकांचा कॅमेरा घेऊन त्या कड्यावरून थोडा खाली उतरला. त्याच्याकडे बघूनच आम्हाला भीती वाटत होती.
स्वप्ना, नक्की जा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच झाला आहे लेख. फोटो तर
मस्तच झाला आहे लेख. फोटो तर अगदी खासच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे पक्षी फार छळतात कधी कधी. दहा मिनिटे व्ह्यू फाईंडरला डोळा लावून बसलो तरी आपल्याकडे पहात नाहीत आणि कॅमेरा खाली केला की मस्त छाती काढून रुबाबदार पोझ देतात. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
eurasian jay ने ऐनवेळी तोंड फिरवलेले दिसते.
स्वप्ना तुम्हाला तेथले निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल तर तिकडेच जावे लागेल पण पक्षी पहायचे असतील तर भिगवण, नांदूर माध्यमेश्वर, माळशेज घाट येथे या काही महिन्यात भरपुर पहायला मिळतील. मुंबईजवळ कर्नाळा, संजीव गांधी पार्क, उरणजवळ पाणजे वगैरे ठिकाणीही बरेच सुंदर पक्षी पहायला मिळतील.
आता जागूताईच्या मागे लागून पाणजे टुरचे जमवायला हवे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फुलांचे फोटोही खुपच मस्त आलेत
फुलांचे फोटोही खुपच मस्त आलेत.
सुंदर. जवळचे ठिकाण नांदूर
सुंदर. जवळचे ठिकाण नांदूर माध्यमेश्वर.मस्त.
दुसरा भागही भारीच.
दुसरा भागही भारीच.
ती किड्यांची कात सिकाडाची आहे का?
रानफुलं मस्तच. Small Niltava, verditer fllycatcher अप्रतिम फोटो.
रोजच्या बैठकांमध्ये आणि गाडीतल्या प्रवासात त्यांच्याकडून खूप किस्से आणि ते सध्या करत असलेल्या कामाबद्दल बरेच अनुभव ऐकायला मिळाले.>>>>>> नशीबवान, मेजवानीच..
सगळेच फोटो अप्रतिम...
पुढील लेखासाठी शुभेच्छा
अहाहा ! काय सुंदर पक्षी आहेत
अहाहा ! काय सुंदर पक्षी आहेत एकेक
अनुभवाचं वेगळंच विश्व आहे,
लेख आणि फोटो दोनी एक नंबर
पुभाप्र...
सुंदर...
सुंदर...
वावे , दोन्ही भाग वाचले .
वावे , दोन्ही भाग वाचले . काय अप्रतिम वर्णन केलंयत ! तुमच्यासोबत आम्ही चालतोय आणि पक्षी बघतोय असं वाटतय अगदी !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
वर्णन वाचताना आणि फोटो बघताना तुमच्यासारखाच माझ्या तोंडातून हि "अहाहा " उद्गार येत होते
मला हि तो निळ्या रंगाचा पक्षी जाम आवडला .. काय सुरेख आहे खरंच !
गरुडाचा खास शो पण भारीच !
mixed hunting party हे नवीनच कळलं असं काही असतं माहित नव्हतं ! हि आयडिया मस्त आहे पण पक्ष्यांची
तुमची सहल अगदी संस्मरणीय आणि नवनवीन पक्ष्यांच्या ओळखीने खचाखच भरलेली दिसतेय ..
पु भा प्र.
हा भाग पण मस्तच झालाय.
हा भाग पण मस्तच झालाय.
गरुडाची माहिती फारच मनोरंजक. फोटो पण सगळे मस्त आहेत.
हा भाग सुद्धा अप्रतिम
हा भाग सुद्धा अप्रतिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पक्षी फार छळतात कधी कधी>> हो
पक्षी फार छळतात कधी कधी>> हो ना![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ती किड्यांची कात सिकाडाची आहे का?>> नाही माहिती ऋतुराज
खूप होत्या अशा काती. किड्याचं नाव नाही माहिती पण.
)
पॅपिलॉन, srd, दत्तात्रय साळुंके, ममो, अंजली, किल्ली, मनःपूर्वक धन्यवाद!
अंजली, खास शो गिधाडाने केला. गरूड आम्हाला डोळयांना आधी दिसतच नव्हता. किकांनी शोधून दिल्यानंतर दिसला. अंदाजाने फोटोही काढलाय. पण अजून मला तो गरूड फोटोत सापडला नाहीये. (व्हॉट्सपवर कोडं म्हणून पाठवावा का?
खूप मस्त आहेत दोन्ही भाग.
खूप मस्त आहेत दोन्ही भाग.
हो मला गिधाड च म्हणायचं होतं
हो मला गिधाड च म्हणायचं होतं चुकून गरुड लिहिलं !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
व्हॉट्सपवर कोडं म्हणून पाठवावा का?>> हाहा! गुड आयडिया !!
>>स्वप्ना तुम्हाला तेथले
>>स्वप्ना तुम्हाला तेथले निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल तर तिकडेच जावे लागेल ण पक्षी पहायचे असतील तर भिगवण, नांदूर माध्यमेश्वर, माळशेज घाट येथे या काही महिन्यात भरपुर पहायला मिळतील. मुंबईजवळ कर्नाळा, संजीव गांधी पार्क, उरणजवळ पाणजे वगैरे ठिकाणीही बरेच सुंदर पक्षी पहायला मिळतील.
शालीजी धन्यवाद!
जबरदस्त अनुभव
जबरदस्त अनुभव
खरोखरच उत्तम प्रतीच्या दुर्बिणीतून पक्षी बघितले की तोंडून अहाहा शिवाय दुसरं काही येतच नाही.
फुलांचे, पक्ष्यांचे , निसर्गाचे सगळेच फोटो देखणे आलेत.
झेलम, हर्पेन, धन्यवाद
झेलम, हर्पेन, धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)