ऑक्टोबर २०१९ मध्ये किरण पुरंदर्यांच्या निसर्ग निरीक्षण शिबिरासाठी चक्राताला जाऊन आल्यानंतर मी चक्राताचं एवढं वर्णन घरीदारी केलं होतं, की ते ऐकून ऐकून माझ्या घरच्यांनाही चक्राताला जावंसं वाटायला लागलं होतं. त्यामुळे २०२२ मध्ये प्रवास करता येईल अशी खात्री वाटल्यावर एप्रिलमधली चक्राताची सहल ठरवून टाकली. आधी तेव्हा किकांचं शिबिर असणार आहे का, याची चाचपणी केली, पण त्यांचा तेव्हा तरी तसा विचार नसल्याचं कळल्यावर आमचे आम्हीच जायचं ठरवलं.
आठ एप्रिलला सकाळी पुण्याहून विमानाने दिल्लीला पोचून, मग दिवसभर दिल्ली विमानतळावर थांबून संध्याकाळी डेहराडूनला पोचणार होतो. तिथे आधीच ठरवलेला ड्रायव्हर आम्हाला चक्राताला घेऊन जाण्यासाठी येणार होता. हे सुरळीतपणे पार पडेल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात पहाटे लवकर उठणं, मग दिवसभर विमानतळावर बसून राहणं, वेळी-अवेळी खाणं आणि शिवाय डेहराडूनहून चक्राताला जाणारा वळणदार रस्ता, या सगळ्याचा एकत्रित परिणाम झाला आणि (पुलंच्या शब्दात सांगायचं तर ) गाडीला एका अर्थाने लागणारी वळणं मुलांना निराळ्या अर्थाने लागायला लागली! त्यामुळे थांबत थांबत, सावकाश जात आम्ही रात्री नऊ-साडेनऊला हॉटेलला पोचायच्या ऐवजी अकरानंतर पोचलो! आपण आधी मनाशी ठरवलेला, डेहराडूनला एक रात्र राहून मग सकाळी चक्राताला जाण्याचा मूळ प्लॅनच बरोबर होता, पहिल्याच दिवशी एवढा त्रास झाल्यावर आता यापुढचे रोजचे वळणदार प्रवास कसे काय पार पडणार, या विचारांनी मला चांगलीच काळजी वाटायला लागली होती. रस्त्याच्या कडेला दिसणारे शिल्लक किलोमीटरचे आकडे अगदी सावकाश कमी होत होते. कधी एकदा हॉटेलला पोचतो, असं झालं होतं. अखेरीस पोचलो, खोलीत शिरलो आणि थंडीने कुडकुडायला लागलो. ती थंडी पाहून मुलं तर थेट पांघरुणातच शिरली. एवढा उशीर होऊनही हॉटेलच्या स्टाफने गरम गरम जेवण तयार ठेवलं होतं. खरं म्हणजे जेवायची अजिबात इच्छा नव्हती, पण त्यांनी तयार ठेवलेलं स्वादिष्ट गरम जेवण पाहून जेवावंसं वाटलं आणि आम्ही दोघं थोडं थोडं का होईना, पण जेवलो.
दुसर्या दिवशी हॉटेलवरच थांबून विश्रांती घ्यायची असं आधीच ठरवलेलं होतं. तरी सकाळी सहाच्या आधी जाग आलीच. सकाळी सकाळी हॉटेलच्या आवारातून भरपूर पक्षी दिसतात हा गेल्या वेळेचा अनुभव आठवून मी लगेचच बाहेर गेले आणि सुरुवातीलाच चक्क कलिज फेजन्ट हा कोंबड्याच्या कुळातला देखणा पक्षी दिसला. नर आणि मादी, दोघेही दिसले. नर दिसायला जास्त रुबाबदार असतो. हे पक्षी कोंबड्यांसारखेच, जमिनीवरच जास्त दिसतात. झुडपांखालीच जास्त करून वावरतात.
कलिज फेजन्ट नर
हाही तोच आहे.
कलिज फेजन्ट मादी
ब्लू व्हिसलिंग थ्रश (शीळकरी कस्तुर) हा पक्षी यावेळी भरपूर संख्येने दिसला. त्यांचा सध्या प्रियाराधनेचा काळ सुरू असावा, कारण जोडीजोडीने दिसत होते पक्षी. संध्याकाळी काळोख पडण्याच्या सुमारास त्याची सुमधुर शीळही खूप वेळा ऐकली.
शीळकरी कस्तुर
मुलं उशीरानेच उठली आणि हॉटेलचा छान परिसर पाहून खूष झाली. तिथे ज्यूनो नावाची एक पाळलेली कुत्री आहे. एकदम शांत आहे. तिच्याशी हळूहळू मुलांची दोस्ती झाली. रोजचा नाश्ता, जेवण अतिशय चवदार होतं. प्रवासामुळे बिघडलेलं पोटाचं कामही लवकरच रुळावर आलं.
आम्ही चक्राताला एकूण चार दिवस आणि पाच रात्री राहिलो. पहिल्या दिवशी आमच्याव्यतिरिक्त अजून फक्त एक जोडपं हॉटेलमध्ये उतरलं होतं. ते दुसर्या दिवशी चेकआऊट करून गेल्यावर तर फक्त आम्हीच उरलो. शेवटचे दोन दिवस मात्र मुलाबाळांसहित आलेली दोन कुटुंबं होती.
हॉटेलचा परिसर
एप्रिल महिना असूनही, भर दिवसासुद्धा हॉटेलच्या खोलीत चक्क थंडी असायची. फरशी गार गार असायची. त्यामुळे खोलीत ठेवलेला टेबलफॅन कोण, कधी आणि कशासाठी वापरत असावेत असा प्रश्न आम्हाला पडला!
’हल्की ठंड है, आप एक पतला सा जॅकेट रख दीजिये बस’ या हॉटेलमालकांच्या बोलण्यावर विसंबून आम्ही थंडीसाठी फारसं काही नेलं नव्हतं. पण त्यांच्यासाठी हलकी असलेली थंडी आम्हाला कुडकुडायला लावत होती. त्यामुळे पहिल्या दिवशी संध्याकाळी तातडीने चक्राता मार्केटला जाऊन मुलांसाठी एकेक जॅकेट घेतलं. तत्पूर्वी आमच्या ड्रायव्हरने आम्हाला चक्राताजवळच्या चिलमिरी नावाच्या ठिकाणी नेलं. उंचावर असलेलं विस्तीर्ण पठार अशा स्वरूपाची ही जागा आहे. भणाणणारा वारा वहात होता. इथून सूर्योदय आणि सूर्यास्त, दोन्ही सुंदर दिसतात असं तो म्हणाला. त्या दिवशी नाही, पण नंतर एक दिवस आम्ही इथे येऊन सूर्यास्त पाहिला.
चिलमिरीहून दिसणारं दृश्य
तिथून दिसणारा सूर्यास्त
दुसर्या दिवशी टायगर फॉल्स या धबधब्याला गेलो. चालतही जाता येतं, पण आम्ही गाडीनेच गेलो. आमचा ड्रायव्हर स्कॉर्पियो गाडीसह या पूर्ण सहलीत आमच्याबरोबर होता. हिमालयातल्या रस्त्यांवर गाडी चालवणार्या चालकांमध्ये आढळणारे गुण, म्हणजे कौशल्य, प्रसंगावधान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ’सेफ्टी फर्स्ट’ हा दृष्टिकोन त्याच्याकडे असल्यामुळे आमचे सगळे प्रवास उत्तम पार पडले. टायगर फॉल्सला जाणारा रस्ता त्यामानाने सोपा आणि चांगला आहे. गाडी थांबवून पुढे धबधब्यापर्यंत चालत गेलो. खरं तर त्या दिवशी रविवार, पण आम्ही तसे लवकर पोचल्यामुळे आम्ही सोडून तिथे फारसं कुणीच नव्हतं. पाणी बर्फासारखं थंड होतं. मी जेमतेम गुडघ्यापर्यंतच्या पाण्यातच उतरले, पण मुलांनी मात्र भरपूर मज्जा केली. ती नखशिखांत भिजली. मी पाण्यात बुडवलेला पायाचा भाग जवळजवळ बधीर झाल्यासारखा वाटत होता. अर्धापाऊण तास मजा करून आम्ही बाहेर आलो. तिथे तिकिटं वगैरे तपासणारा एक स्थानिक माणूस होता, त्याने उत्साहाने धबधब्याच्या समोरच्या बाजूने वर चढून अजून उंचावरून धबधबा दाखवला. तोपर्यंत धबधब्यावर बरीच गर्दी झाली होती. मग आम्ही परत निघालो आणि जेवायला हॉटेलवर येऊन पोचलो.
टायगर फॉल्स
वाटेत दिसलेलं कांचनाचं फुललेलं झाड
संध्याकाळी आम्ही रस्त्यावर फिरायला निघाल्यावर हॉटेलच्या मॅनेजरने सांगितलं की इथे खाली जवळच ’किमोना फॉल्स’ नावाचा धबधबा आहे. एकदम सुंदर जागा आहे, तिथे जा. आम्ही त्याने सांगितलेल्या वाटेने, शिवाय अजून दोघातिघांना विचारून तो धबधबा शोधण्याचा बराच प्रयत्न केला, पण आम्हाला काही तो सुंदर धबधबा सापडला नाही! काळोख पडायला लागला होता त्यामुळे झाडीतून अजून फिरत बसण्यात काही अर्थ नव्हता. शेवटी परत आलो. वाटेत वळणावर एक पहाडी तांबट (हिमालयन/ग्रेट बार्बेट) एका झाडावर बसून साद घालत होता, पण आम्ही जेमतेम तिथे पोचलो आणि तेवढ्यात एका गाडीच्या हॉर्नच्या आवाजामुळे तो उडून गेला! याने नंतर बर्याच वेळा हुलकावणी दिली, पण आम्ही परत जाण्याच्या आदल्या दिवशी मात्र नीट दिसला.
आम्ही संध्याकाळी आमच्या ड्रायव्हरला परत बोलावलं होतं कारण आज चिलमिरीला जाऊन सूर्यास्त बघायचा होता. हॉटेलच्या परिसरात काळोख पडायला लागला असला तरी चिलमिरी उंचावर आणि उघड्यावर असल्यामुळे तिथे सूर्यास्ताला अजून तसा वेळ होता. त्याप्रमाणे ड्रायव्हर गाडी घेऊन आला. चिलमिरीला सूर्यास्त बघायला आलेले आमच्यासारखे बरेचजण होते. लांबच लांब पसरलेल्या पर्वतशिखरांच्या मागे दिसणारा सुंदर सूर्यास्त बघितला.
दुसर्या दिवशी सकाळी उठून, नाश्ता करून आम्ही बुधेर गुंफांना जाण्यासाठी निघालो. चक्रातापेक्षा हे ठिकाण जास्त उंचावर आहे. रस्ताही तसा चांगला आहे. अर्थात वळणदार आणि चढणीचाच. वाटेत एका ठिकाणी थांबून एका झर्याचं पाणी पिऊन आणि बाटल्यांमध्ये भरून घेतलं. आमचा ड्रायव्हर चांगला होता, पण ही गाडी त्याच्या सवयीची नव्हती. त्यामुळे त्याची पाठ दुखत असल्याचं त्याने आदल्या दिवशी सांगितलं होतं. बुधेर गुंफांपर्यंत चारपाच किलोमीटर चढत जावं लागतं. मी जरी आधी एकदा जाऊन आले असले आणि वाट तशी सोपी असली तरी, तरी आपण कुठे चुकणारच नाही, अशी खात्री मला नव्हती. त्यामुळे चक्रधर आणि मार्गदर्शक अशी दुहेरी जबाबदारी त्याच्यावर होती. पाठ दुखत असेल तर तो कसा काय चढणार अशी शंका आम्ही बोलून दाखवल्यावर तो म्हणाला की पाठदुखी आता कमी आहे, त्यामुळे मला चढायला जमेल. फक्त काल रात्री झोप नीट झाली नाही, कारण आमच्या गावात काल बिबट्या आला होता!! आम्ही एकदम ’बापरे!’ केलं, तर म्हणाला की येतो कधीकधी बिबट्या गावात, बकर्या वगैरे न्यायला. पण आम्ही हाकलतो. काल रात्रभर ओरडत होता.
त्याचं गाव आमच्या हॉटेलपासून एखाद्या किलोमीटरवरच होतं. आपल्यापासून एवढ्या जवळ काल रात्रभर बिबट्या होता या कल्पनेने आम्हाला भीती वाटलीच आणि काल टायगर फॉल्सला जाताना जंगलातून चालत गेलो नाही ते बरं झालं असाही विचार मनात आला. बिबट्या जरी शक्यतो दिवसा दिसत नसला तरी काय झालं?
रस्त्यात एका ठिकाणी बुरांशच्या फुलांचं झाड जवळ होतं, तेव्हा आम्ही त्याला तीनचार फुलं काढून देण्याची विनंती केली. त्यानेही लगेच कडेच्या दरडीवर चढून फुलं काढून दिली. तजेलदार लालभडक रंगाची ही फुलं छानच दिसतात.
होता होता बुधेर गुंफांची वाट जिथून सुरू होते, त्या पायथ्याशी पोचलो. हे शेवटचे सहासात किलोमीटर्स जरा कठीणच आहेत. रस्ता अरुंद, वळणावळणांचा आणि खराब. इथेच एका ठिकाणी आम्हाला बर्फ दिसला. ऊन फारसं पडत नाही, अशा जागी साठून राहिलेला होता. खाली उतरून थोडा बर्फ हातात उचलून आणला. मी आणि मुलांनी पहिल्यांदाच असा बर्फ बघितल्यामुळे आम्हाला मजा वाटली. तो ठिसूळ आणि कुरकुरीत होता, पण सहजासहजी वितळत नव्हता.
पायथ्याशी पोचलो तेव्हा अकराचा सुमार होता. आधी वर चढून परत खाली येऊ आणि मग सोबत आणलेलं जेवण जेवू असं ठरवलं. तिथे खाली वन खात्याचं एक विश्रामगृह आहे. बाहेरच्या बाजूला काही काम सुरू होतं. तिथे एक कुत्राही होता. आम्ही चालायला लागलो, तसा तोपण आमच्याबरोबर आला.
वाटेत अधूनमधून थांबत दीडेक तासात आम्ही वर पोचलो. चढ अगदी सलग असा खूप नाही, पण तसा
बर्यापैकी चढ आहे. पण पूर्ण वाट देवदारांच्या जंगलातून जात असल्यामुळे ऊन अजिबात लागत नाही.
वर पोचल्यावर लहानमोठे उंचवटे आहेत, त्यावर सगळीकडे हिरवं गवत आहे. तिथे झाडं अजिबातच नाहीत. त्यातल्याच एका मोठ्या उंचवट्यावर एक देऊळ आहे. त्या देवळाचा एक उत्सव दोन तीन दिवसांनी सुरू होणार होता, त्याची तयारी सुरू होती. ’बिसू’ नावाचा सण आहे असं ड्रायव्हर आणि बाकीच्या माणसांच्या बोलण्यातून कळलं. आसामात ’बिहू’ असतो, केरळमध्ये आणि कर्नाटकात ’विशू’ असतो, तुळू लोकांचाही ’बिसू’च असतो.
तिथे पोचल्यावर आम्ही बुधेर गुंफा पहायला पुढे गेलो आणि तेवढ्यात आमच्या ड्रायव्हर कम गाईडने एक झोप काढली! गुंफांपर्यंत पोचलो खरे, पण आत जावंसं वाटलं नाही, कारण गुहेच्या तोंडाशी मोठ्या प्रमाणात माश्या उडत होत्या. सकाळी हॉटेलवरही असा सल्ला मिळाला होता की शक्यतो गुहेत जाऊ नका, गेलात तरी सगळ्यांनी एकाच वेळी आत जाऊ नका. या गुहा आतमध्ये बर्याच लांबलचक पसरलेल्या आहेत. पण सगळा भाग अजून कुणी फिरून पाहिलेला नाही.
थोडा वेळ सावलीत विश्रांती घेऊन आम्ही खाली उतरायला लागलो. उतरताना अर्थातच भराभर उतरलो आणि लगेचच खाली पोचलो. हात-तोंड धुवून तिथल्या एका शेडमध्ये जेवायला बसलो. डाळ-भात-दही-सॅलड असं छान जेवण होतं. पण भरपूर प्रमाणात माश्या होत्या आजूबाजूला! शेवटी एकदाचं जेवण झालं. वर जाताना जो कुत्रा आमच्या सोबत आला होता, तो वरच थांबला होता. आमचं जेवण होता होता तो एकदम धावत धावत येऊन पोचला. त्यालाही भूक लागली असणारच. उरलेला सगळा डाळभात त्याला एका पानावर वाढला आणि त्याने तो पाच मिनिटांत संपवून टाकलासुद्धा!
आम्हीही मग तिथून निघालो. मागच्या वेळी किकांबरोबर शिबिराला आलो असताना पहिल्या दिवशी ज्या ’कोटी कनासर’ या ठिकाणी गेलो होतो, ते ठिकाण मी यावेळी यादीत घेतलं नव्हतं. पण ती जागा बुधेरपासून जवळ आहे असं सकाळी हॉटेलवर समजलं आणि त्यामुळे तिथेही जायचं ठरवलं. त्याप्रमाणे बुधेरहून कोटी कनासरला पोचलो. तिथे एक खूप जुनं आणि खूप मोठं देवदाराचं झाड आहे. एक शंकराचं लहानसं घुमटीवजा देऊळ आहे. मागच्या वेळी शांत, स्वच्छ असणारी ही जागा, यावेळी मात्र गजबजलेली आणि अस्वच्छ होती! मोकळ्या जागेत क्रिकेटचा खेळ चालू होता. देवळाच्या आणि झाडाच्या आसपास वेफर्स-कुरकुरे आणि तत्सम वस्तूंच्या प्लॅस्टिकच्या पाकिटांचा कचरा पडलेला होता. रस्त्याच्या पलीकडच्या बाजूलाही अगदी डायपर्सपासून विविध प्रकारचा कचरा होता. तीन वर्षांमध्ये एवढा बदल झालेला बघून वाईट वाटलं. तिथे खरं म्हणजे कचरापेट्याही आहेत. तरीही कचरा असा उघड्यावर का टाकून देत असतील लोक? ही नेमकी काय प्रवृत्ती असते माणसाची, जी सुंदर ठिकाणांना कुरूप बनवते? कधी कचरा टाकून, कधी आपापली नावं कोरून.
तिथे मग फार वेळ न थांबता हॉटेलवर परत आलो. चहा वगैरे पिऊन मग नेहमीप्रमाणे खाली रस्त्यावर चालत एक चक्कर मारली. परत आलो तेव्हा व्हर्डिटर फ्लायकॅचर नावाचा अतिशय सुंदर दिसणारा छोटासा निळा पक्षी, खरं तर त्यांची जोडी, बराच वेळ दिसली. दुर्बिणीतून खूप वेळ त्यांना पाहिलं. भरपूर फोटो काढले.
काळोख पडता पडता दोन गाड्यांमधून दोन कुटुंबं आली. तेही बंगलोरचेच होते. मूळचे हैदराबादचे. आपण जिथे रहात असतो, तिथल्या माणसांच्या दिसण्याची, वागण्याबोलण्याची आपल्याला सवय झालेली असते. पण त्या त्या ठिकाणच्या माणसांची, स्वतःची अशी वैशिष्ट्यं असतात. सांगायची म्हटली तर कदाचित सांगता येणार नाहीत, पण दिसली की लगेच लक्षात येतात. तसे हे टिपिकल बंगलोरवासी होते. आम्हीही त्यांना तसेच वाटलो, की आमच्यावर अजूनही मराठी छाप जास्त आहे, हे सांगता येणार नाही. ’गाववाले’ भेटल्यामुळे चांगल्या गप्पा झाल्या. दुसर्या दिवशी ते बुधेर गुंफा आणि टायगर फॉल्स अशी दोन ठिकाणं करणार होते. आम्ही देवबन आणि खडांबाला जाणार होतो.
हे काही पक्षी
grey-headed canary flycatcher
टकाचोर
हिमालयन बुलबुल
हिमालयन गिधाड
russet sparrow
streaked laughingthrush
व्हाईट थ्रोटेड फॅनटेल (नाचण)
हाही तोच आहे.
पुढचा भाग
सुंदर.
सुंदर.
१)चक्राताची उंची किती? पक्षी दिसतात म्हणजे तीनहजार मिटरसपेक्षा कमी असेल.
२)खर्च ( ३०हजार रु प्रत्येकी) येतो का?
३)वर्डिटरफ्लाइक्याचर सह्याद्रीत दिसतो कधीकधी. निळाच दिसतो. पण verditer शब्द हिरव्या रंगासाठी आहे ते नाव का पडले असा विचार येतो.
४) वेस्टर्न घाट/सह्याद्री कर्नाटका म्हणजे ( कुद्रेमुखा, केमन्नागुंडी, बुदनगिरी,कुमारपर्वता इत्यादी) तेथिल पक्ष्यांचे फोटो आहेत का?
५) फोटो नेहमीप्रमाणे अप्रतिम, नावेही दिलीत. फेजंट आणि मोनाल हे फोटोंतच पाहावे लागतात.
विडिओ असतील तर यूट्युब चानेलवर टाकावे ही विनंती. 'Not in Office' चानेल पाहतो. पण पक्षी नाहीत हो.
मराठी अधिक इंग्रजी सबटायटलस.
क्रमांक (४) आणि (५) करा.
वाह पक्षीनिरीक्षणाला एवढे
वाह पक्षीनिरीक्षणाला एवढे लांब आणि हौसेने लोकं जातात याची कल्पना नव्हती.
पण बरेच भारी पक्षी आहेत. मुलांनाही याची आवड असणे कौतुकास्पद.
हॉटेलचा परीसर बाकी अगदी गूढ निसर्गरम्य आहे. नेहमीच्या गजबललेल्या परीसरापेक्षा पेक्षा अशी ट्रिप केव्हाही उत्तमच.
सर्वच सुंदर !
सर्वच सुंदर !
सुंदर फोटो, सुंदर वर्णन,
सुंदर फोटो, सुंदर वर्णन, सुंदर निसर्गरम्य एके काळी verdant असावा असा भासणारा परिसर. छान.
ऋन्मेष, कुमार सर, हीरा,
ऋन्मेष, कुमार सर, हीरा, मनापासून धन्यवाद.
मुलांना खास पक्षी बघण्याची अशी नाही, पण फिरण्याची, विशेषतः चढउतार करण्याची आवड आहे
Srd
१. बरोबर आहे. उंची साधारणपणे दोन हजार मीटर आहे चक्राताची.
२. खर्च आम्हाला डेहराडून ते डेहराडून माणशी पंधरा ते अठरा हजार आला. जेवण, प्रवास, हॉटेल सगळं धरून.
३. तुमचा प्रश्न वाचल्यावर गुगल केलं. तेव्हा हे मिळालं.
https://cameo.mfa.org/wiki/Verditer#:~:text=8%20Sources-,Description,exp....
व्हर्डिटर शब्दाचा अर्थ.
तुम्ही विचारलं नसतंत तर मी हे शोधलं नसतं
४. या कुठल्या ठिकाणी मी गेलेली नाहीये अजून. गेले तर नक्कीच लिहीन इथे.
५. व्हिडिओ असतील काही. बघते. चांगले वाटले तर पाठवते तुम्हाला.
प्रतिसाद आवडला तुमचा. धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान वर्णन आणि फोटोसुद्धा.
छान वर्णन आणि फोटोसुद्धा. व्हर्डिटर फ्लायकॅचरचा निळा रंग किती सुंदर आहे!
विश्रामगृहाचा कुत्रा हा 'झाडाचाबुंधाहाजणुकाहीदिव्याचाखांबआहे' पोझ घ्यायच्या एक सेकंद आधीचा आहे वाटतं![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
छान लिहिलं आहेस. फोटो पण एक
छान लिहिलं आहेस. फोटो पण एक नंबर. सगळ्याच पक्ष्यांचे रंग पण किती देखणे आहेत
विश्रामगृहाचा कुत्रा हा 'झाडाचाबुंधाहाजणुकाहीदिव्याचाखांबआहे' पोझ घ्यायच्या एक सेकंद आधीचा आहे वाटतं >>>
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
वावे, अगं किती छान! परत
वावे, अगं किती छान! परत चक्राता. मस्त प्लॅन केला होतास. मस्त फोटो!
माझी चक्राता सिरीज ची रिक्षा फिरवण्याचा मोह होतोय.
By the way, ऑक्टोबर मधे परत चक्राता लावला आहे किकांनी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर आलेत फोटोज्
सुंदर आलेत फोटोज्
वॉलपेपर म्हणून छान कलेक्शन होईल
छान लिहिलय.फोटो सुंदर आहेत
छान लिहिलय.फोटो सुंदर आहेत.चक्राताही सुंदर आहे.मागील महिन्यात आम्ही म्हैसूरला गेलो होतो माघारी येताना बेंगलोर वरुन आलो येताना डाव्या बाजूला रंगनथिटटुला जाणारा रोड लागला तेंव्हा तुम्ही मागे रंगनथिटटुचे लेख लिहिले होते त्याची आठवण झाली.छान होते लेख आणी फोटोही सुंदर होते.पुढे बेंगलोर जवळ आल्यावर वंडरला ला जाणारा रोड ही लागला.
सुंदर फोटोज वावे !! इतका
सुंदर फोटोज वावे !! इतका सुंदर निसर्ग बघून डोळे निवले . बऱ्याच जणांचे पक्षी निरीक्षण चे फोटो बघून एखादे शिबिर करावेसे वाटत आहे . तुम्ही किरण पुरंदरेंचे शिबिर केले आहे ना ? कसा असतो अनुभव ? मी या आधी असे काही केले नाहीये , त्यामुळे जमेल की नाही शंका वाटल्याने विचारले.
पाणपक्षी नकोच. रानपक्षीच हवे.
पाणपक्षी नकोच. रानपक्षीच हवे.
चिलिका सरोवर (ओडिशा), कुमारकोम ( केरळ) हे टाळलेच होते.
सुंदर फोटो, सुंदर वर्णन, छान
सुंदर फोटो, सुंदर वर्णन, छान लिहिलय.
फारच मस्त फोटो
फारच मस्त फोटो
तो व्हर्डिटर फ्लायकॅचर चा तर अप्रतिमच
खरेच देखणा पक्षी आहे
सुरेख वर्णन नी सुरेख फोटो.
सुरेख वर्णन नी सुरेख फोटो.
ह.पा., नताशा, साक्षी, जाई,
ह.पा., नताशा, साक्षी, जाई, सोना पाटील, अश्विनी, शर्मिला, आशुचँप, देवकी, मनापासून धन्यवाद!
सोना पाटील, रंगनथिट्टूच्या लेखाची तुम्हाला आठवण झाली हे वाचून छान वाटलं
अश्विनी, किकांच्या शिबिराचा अनुभव अतिशय छान होता माझा. साक्षीच्या आणि माझ्या लेखनात आमच्या चक्राता कँपच्या लेखमाला आहेत पहा. ती एप्रिल २०१९ मध्ये गेली होती आणि मी ऑक्टोबर २०१९ ला. त्यांच्याबरोबर गेलं की आपल्याबरोबर पक्ष्यांचा चालताबोलता ज्ञानकोश असतो
त्यांचं प्लॅनिंगही परफेक्ट असतं. कुठेही घाईघाई करत नाहीत.
चक्राता कँप करायला कठीण नाही. खूप अवघड ट्रेकिंग नाहीये कुठे. आमच्याबरोबर वयस्कर मेंबर्सही होते, ते गाडीजवळच थांबायचे त्यांना चालणं शक्य नसेल तेव्हा.
साक्षीने लिहिल्याप्रमाणे यावर्षी ऑक्टोबरमधे किकांचा चक्राता कँप आहे.
Srd![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर!!!
सुंदर!!!
अशक्य सुंदर लेख आहे हा !
अशक्य सुंदर लेख आहे हा ! तुझ्या पिल्लांनापण घेऊन गेली होतीस. धमाल फॅमिली ट्रिप झाली असेल. Enjoy these precious moments with your little ones.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपण जिथे रहात असतो, तिथल्या माणसांच्या दिसण्याची, वागण्याबोलण्याची आपल्याला सवय झालेली असते. पण त्या त्या ठिकाणच्या माणसांची, स्वतःची अशी वैशिष्ट्यं असतात. सांगायची म्हटली तर कदाचित सांगता येणार नाहीत, पण दिसली की लगेच लक्षात येतात. >>> अगदीच सहमत.
पक्ष्यांचे फोटो खासच. लेख वाचून 'The Big Year' पाहिल्यावर आम्हीपण पुढील कित्येक महिने 'bird watcher' मोडमध्ये होतो, हे आठवले. सध्या मात्र आमच्या बॅकयार्डमधील बर्ड आणि हमिंगबर्ड फीडरला अनेक पक्षी, हमिंगबर्ड (खारुताई) भेट देतात, तेच आमचे पक्षी निरीक्षण.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सध्या मायबोली 'पुल'मय असल्याने, " असे दिवस आपल्या आयुष्यात वारंवार येवोत." या शुभेच्छा !
छान प्रचि आणि लेखनही
छान प्रचि आणि लेखनही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख लेख व तितकेच सुरेख
सुरेख लेख व तितकेच सुरेख प्रचि.
खूपच सुंदर लेख आणि फ़ोटो ही.
खूपच सुंदर लेख आणि फ़ोटो ही. तो निळा पक्षी खुओ आवडला.
वावे, ती लाल फुलं
वावे, ती लाल फुलं rhododendron (र्होडोडेंड्रॉन) आहेत. ( पुढल्या भागात तू या फुलांचा (बुरांश) उल्लेख आणि त्याच्या सरबताचा उल्लेख केलेला वाचला आत्ता. )
राधिका, ही शुभेच्छा मात्र
राधिका, ही शुभेच्छा मात्र योग्य ठिकाणी पोचली![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रायगड, हो, ऱ्होडोडेंड्रॉनचीच फुलं आहेत.
ममो, प्राची, आबा., धन्यवाद!
छान लेख आणि माहिती!
छान लेख आणि माहिती!
सुंदर लेख आणि प्रचि.
सुंदर लेख आणि प्रचि.
वावे धन्यवाद !! साक्षी यांची
वावे धन्यवाद !! साक्षी यांची लेखमाला सापडली . वाचून बघते आणि मग ठरवीन .
हपा. कुत्र्याचा फोटो बघुन
हपा. कुत्र्याचा फोटो बघुन मला पण तसेच वाटले. ओ एम जी. पर पंच्छी ओके टाइप्स.