जखमा

चार जखमा काळजावर गोंदल्या

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 20 April, 2020 - 10:06

चार जखमा काळजावर गोंदल्या
- महेश मोरे (स्वच्छंदी)

चार......ओठांवर खुबीने पेरल्या
चार जखमा काळजावर गोंदल्या

बोलले नाही कुणी दोघांतले
पापण्या.. पण आसवांनी बोलल्या

वेळ आली एवढी काट्यावरी
पाकळ्यासुद्धा छळाया लागल्या

मी तुझ्या चौकात जेव्हा थांबलो
चालणाऱ्या चार वाटा थांबल्या

वादळाला त्रास होतो ना ? म्हणुन
मीच उघड्या दोन खिडक्या ठेवल्या

बाप लेकींना जसा सांभाळतो
मी तशा सल-वेदना सांभाळल्या

शेवटी आला तुझा आवाज अन्
मिट्ट काळोखात पणत्या पेटल्या

कातरवेळ

Submitted by दत्तात्रय साळुंके on 27 October, 2017 - 04:48

कातरवेळ

क्षितिजाजवळ खरवडलेले भकास आकाश
तांबडया पिवळया जखमा, चेहरा उदास

ओहोटीच्या वळवळीत, हरवला भरतीचा थरार
खारे पाणी साकाळत डोळा , किनारा निराधार

आकाशाच्या पोकळीत अजूनही गुंजतेय
परागंदा पाखरांची फडफड, भरतीची गाज

हळूहळू दाटतो अंधार अंतर्मुख निळया जळी
ठसठसु लागतं चांदणं आठवांचं कातरवेळी

दत्तात्रय साळुंके

Subscribe to RSS - जखमा