मीलनसंकेत
चंद्राच्या प्रतिदिनी क्षितिजापार होणाऱ्या दर्शनाला तरसणारी शुक्राची चांदणी आज त्याच्या समीप होती! लौकिकदृष्ट्या होतं अंतर कैक योजनांचं, पण प्रेमविव्हल चांदणीला त्या शीतल किरणांच्या मोहपाशात बद्ध होण्याची आज आस होती. युगानुयुगांच्या प्रतिक्षेनंतर ती मनोमीलनघटिका आता आली होती. पश्चिमेच्या आकाशात संध्यासमयी निळ्याशार अंधाराच्या डोहाकाठी संकेताला अनुसरून आज तिचा प्रियकर उगवणार होता. पौरजनांच्या नजरेआड आज तो तिला आपल्या तेजाच्या छायेत कवेत घेणार होता! आला, तो आला... मंद मंद गतीनं तो संकेतस्थळी येत होता.