मीलनसंकेत

Submitted by Abuva on 26 March, 2023 - 04:26

चंद्राच्या प्रतिदिनी क्षितिजापार होणाऱ्या दर्शनाला तरसणारी शुक्राची चांदणी आज त्याच्या समीप होती! लौकिकदृष्ट्या होतं अंतर कैक योजनांचं, पण प्रेमविव्हल चांदणीला त्या शीतल किरणांच्या मोहपाशात बद्ध होण्याची आज आस होती. युगानुयुगांच्या प्रतिक्षेनंतर ती मनोमीलनघटिका आता आली होती. पश्चिमेच्या आकाशात संध्यासमयी निळ्याशार अंधाराच्या डोहाकाठी संकेताला अनुसरून आज तिचा प्रियकर उगवणार होता. पौरजनांच्या नजरेआड आज तो तिला आपल्या तेजाच्या छायेत कवेत घेणार होता! आला, तो आला... मंद मंद गतीनं तो संकेतस्थळी येत होता. त्या मीलनसमयी आपल्या तेजानं तिचा हिरमोड होऊ नये म्हणून दो कलांचाच साज त्यानं आज पेहेनला होता. ती सलज्ज अभिसारिका स्वरगंगेच्या किनारी आपल्या साजणाच्या आठवणींचं अवगाहन करीत होती, भावगर्भ शृंगारगीत गात अवगुंठून उभी होती. जणू आपल्या शब्दस्वरांतून अनिर्वचनीय प्रीतीची ग्वाहीच ती त्या सुधांशुला देत होती. ती गात होती, चंद्राच्या कलांनुसार सागराला येणाऱ्या भरतीप्रमाणे तिच्या मनःसागरात उठणाऱ्या प्रीतीलहरींची वेणा. ती सांगत होती त्याच्या विरहात झालेल्या वेदना, उललेलं काळीज, अन् त्याच्या दर्शनाची आस..

*कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी
कितीदा नव्याने तुला आठवावे
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी
कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे
किती हाक द्यावी तुझ्या मनाला
किती थांबवावे मी माझ्या दिलाला..

सखे, हा माझा प्रियतम, माझ्यासमीप असताना, मला ही विरहाची गीतं का सुचताहेत? ज्या भेटीच्या उत्कंठेनं मी इथपर्यंत आले, ती सोडून मी मागेमागे का सरकते आहे? ज्या शीतल तेजाच्या केवळ आठवणींने मी उल्हसित व्हायची ती किरणे माझ्या पदकमलांवर लोळायला आतुर आहेत, तर मग मी ही पावले दडवित का आहे? युगानुयुगे घडत आलेल्या या भेटींत आज हे काय अघटीत होते आहे, सखये? ज्या क्षणाची अगणित वर्षें आतुरतेने मी वाट पहात होते त्याच क्षणी मी निष्क्रीय कशी झाले? क्षणार्धात माझं मन पालटलं कसं? मीलनोत्सुक मन अचानक विरहोत्सुक का झालं? या समीपतेचंच बंधन तर नाही झालं मम मना? जे अंतर पार करून मी इथवर पोहोचले त्या अनुभवांनी माझा विरस तर नाही ना केला? आणि.. आणि जो विरह मला विकल करत होता, त्याच वेदनांचं गारूड का होतंय मनावर? आज मीलनाच्या आरंभालाच मला प्रीतीचा अंत का दिसतोय? इतकी मनस्विनी का झाले मी? विरहाच्या आठवणी मला मीलनाच्या रमलापेक्षाही रम्य भासत आहेत. नाही, नाही! सखे, हे रहस्य मला‌ उकलत नाहिये. पण या भेटीतील उत्कटता, प्रत्यक्षानुभूति मला सहन होईना... चल सखे, चल, प्रियतमाच्या नजरेस येण्यापूर्वीच चल. कदाचित ठरला संकेत मोडल्याने त्याचा विरस होईल, संकेत विसरल्याबद्दल तो मला दोष देईल. पण ते, त्याच्या आगमनाच्या चाहूलीने गडबडून तोंड फिरवून निघून जाणाऱ्या प्रणयिनीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघण्याइतके हृदयभेदी नसेल. त्या दूषणांना तोंड देणे मला जमेल का? आज मला नको तो सहवास, नको ती साथ, ते दूरचेच दर्शन लखलाभ. त्यातली असोशीच मला भावते आहे. माझ्या प्रीतीची परिणिती विप्रलंभ शृंगारात व्हावी हेच या युगातलं माझं प्रारब्ध असावं...

s3.jpg

(* गीत: देवयानी कर्वे-कोठारी, चित्रपट: ती सध्या काय करते? आंतरजालावर सापडलेली माहिती)
(Photo Credits: @amabirdman, @SevoSpace from Twitter)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान