आजवर अनेक शुद्ध सारंग अनुभवले! माझा अतिशय आवडता राग आहे. खरं तर एकापाठोपाठ एकाच स्वराच्या शुद्ध आणि कोमल श्रुती ज्या रागांत येतात ते सगळेच राग आवडतात, मग तो दोन गंधारांना वापरून रात्रीला जगवणारा जोग असो कि दोन्ही निषादांच्या ढगांवरून बरसणारा मिया मल्हार असो किंवा कोमल गंधाराच दुखणं शुद्ध गंधाराने संहत करणारी शिवरंजनी असो! ती शुद्ध स्वरावरून कोमल स्वरावर येणारी अलगद उतरण काही तरी करते काळजात एवढं नक्की!
कुठलीही व्यक्ती भोवती घडणाऱ्या क्रियेला दोन प्रकारे सामोरे जाते. पहिला प्रकार म्हणजे ती क्रिया समजणे तर दुसरा प्रकार म्हणजे ती क्रिया अनुभवणे. समजण्याच्या क्रियेत आपल्या साथीला असतात शब्द. आणि आपण एका विशिष्ट भाषेत व्यक्त होतो. परंतु अनुभवण्याच्या स्थितीत आपल्या साथीला असतात बऱ्याच अनामिक भावना. आणि त्याच्या जोडीला असतात बरेच अमूर्त विचार आणि अगणित पैलू! त्यामुळे अनुभवण्याची स्थिती ही अधिक व्यापक आणि गूढ असते. उदाहरण द्यायचे झाले तर अशी कल्पना करूया की आपण एक रम्य भूप्रदेश पाहत आहोत. किंवा सूर्योदय होताना त्या ठिकाणी उपस्थित आहोत.