तेजोमय स्वराकार - किशोरीताई आमोणकर

Submitted by आशयगुणे on 8 June, 2015 - 23:41

कुठलीही व्यक्ती भोवती घडणाऱ्या क्रियेला दोन प्रकारे सामोरे जाते. पहिला प्रकार म्हणजे ती क्रिया समजणे तर दुसरा प्रकार म्हणजे ती क्रिया अनुभवणे. समजण्याच्या क्रियेत आपल्या साथीला असतात शब्द. आणि आपण एका विशिष्ट भाषेत व्यक्त होतो. परंतु अनुभवण्याच्या स्थितीत आपल्या साथीला असतात बऱ्याच अनामिक भावना. आणि त्याच्या जोडीला असतात बरेच अमूर्त विचार आणि अगणित पैलू! त्यामुळे अनुभवण्याची स्थिती ही अधिक व्यापक आणि गूढ असते. उदाहरण द्यायचे झाले तर अशी कल्पना करूया की आपण एक रम्य भूप्रदेश पाहत आहोत. किंवा सूर्योदय होताना त्या ठिकाणी उपस्थित आहोत. आपण जर ह्या घटना समजून घेतल्या तर काही वाक्यांमध्ये त्या घटनांचे वर्णन आपल्याला करता येईल. परंतु त्या अनुभवण्याचा प्रयत्न केला तर मनात तर्हे-तर्हेचे विचार येतात! हीच घटना दुसऱ्या दिवशी आठवली तर तिच्याशी संबंधित अजून काही पैलू आपल्याला लक्षात येतात. महिनाभर नंतर जर ती घटना आठवली तरीही स्वतःशीच अजून काही पैलू उलगडले जातात. ह्याचे कारण असे की आपल्याला सौंदर्याची अनुभूती होत असते.

सौंदर्याची अनुभूती ही आपल्या भावनांशी निगडीत असते. त्यात तंत्र, शास्त्र ह्यांच्या सीमा केव्हाच ओलांडलेल्या असतात. आपण समोर असलेल्या कलाकृतीशी शाब्दिक भाषा न बोलता भावनिक भाषा बोलतो आणि तिला दाद देतो. ह्याच प्रकारे साऱ्या कला आपल्याशी त्यांच्या विशिष्ट भाषेत संवाद साधतात आणि आपण त्यांना ह्याच भावनिक भाषेने दाद देत असतो. चित्रकला ही रेषांची किंवा रंगांची भाषा असते. किंवा संगीत ही स्वरांची भाषा आहे.

ह्याच पार्श्वभूमीवर ज्यांच्या स्वरभाषेमुळे 'राग संगीत' ह्या माध्यमातून मी हा भावनिक संवाद साधू शकलो आहे आणि पुढेही साधत राहीन त्या गानसरस्वती किशोरीताई आमोणकर ह्यांचे स्थान माझ्या आयुष्यात फार महत्वाचे आहे.

त्यांच्या गाण्याचे वर्णन करणे हे ह्या लेखाचे प्रयोजन नाही आणि तसे धाडस मी करणार देखील नाही. शिवाय, वर्णन म्हणजे 'समजण्याची' प्रक्रिया आणि म्हणजेच शाब्दिक भाषेत बंदिस्त करायचा प्रयत्न! त्यामुळे त्यांच्या गाण्यातून मला कोणता अनुभव येतो हे सांगणे मला अधिक महत्वाचे वाटते.

किशोरीताई ह्यांचा सूर म्हणजे संपूर्ण गोलाई! एक स्वच्छ, तेजोमय आकार ज्याला एक भेदक तीव्रता आहे. परंतु ह्या गोलाईची सखोलता अशी की त्यात निर्माण होणाऱ्या कंपनात अगणित भाव समाविष्ट झालेले जाणवतात. खरं तर स्वर केवळ सात आणि त्यांचे प्रकार मोजून त्यांची एकूण संख्या बारा एवढी होते. त्यात संगीताचे नियम असे की एका रागात एक विशिष्ट स्वर-समूहच असावा लागतो. परंतु वरील लिहिलेले 'कंपन' आणि स्वरांच्या गोलईची सखोलता ही प्रत्येक रागाचे रूप आणि त्यातून निर्माण होणारे विशिष्ट भाव कसे काय निर्माण करते हे एक शब्दांच्या पलीकडले अनुभवणे आहे. कदाचित ह्यालाच 'दिव्यत्व' असे म्हणत असावेत.

अनेकदा माझ्या पहाटेची सुरुवात ताईंच्या 'ललित पंचम', 'बिभास' किंवा 'मिया की तोडी' ह्या रागांनी होते. हिंदुस्थानी राग संगीतात वेळेला खूप महत्व आहे. पहाट ,सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र असे राग सादर करण्याचे विभाजन केले गेले आहे. पहाटे त्यांचा 'मिया की तोडी' ऐकला की त्यांच्या त्या सुरांमध्ये उगवत्या सूर्याचे तेज झळकते. मात्र 'ललित पंचम' हा राग गाताना जेव्हा त्या 'उडत बुंद' ह्या रचनेत 'बुं' ह्या शब्दाने समेवर येतात तेव्हा त्या क्षणाला एका अनामिक भूप्रदेशावर झालेला सूर्योदय डोळ्यासमोर येतो. ह्या रागात मात्र त्यांच्या सुरांमध्ये रम्यता अधिक भासते. ह्या पेक्षा वेगळा अनुभव येतो जेव्हा त्या बिभास रागात 'नरहर नारायण' गातात. त्या वेळेस मात्र सूर्योदय होण्याच्या आधीचा एक भूप्रदेश डोळ्यासमोर येतो. ह्याच्या जोडीला आपला आजचा दिवस कसा जाईल ह्या विचाराची किंचित हुरहूर देखील जाणवते!

जसा दिवस पुढे आपल्याला प्रभावित करत जातो तशी आपली मनःस्थिती देखील बदलत जाते. दुपारच्या वेळेस सूर्याचे डोक्यावर स्थिरावणे, कामामुळे निर्माण झालेला क्षीण आणि पुढे शिल्लक असलेल्या कामांचा वेध ,अशा वेळेस माझ्या समोर ताईंचे 'शुद्ध सारंग' आणि 'मधमाद सारंग' हे राग येतात. मनाच्या ह्या अवस्थेत ह्या रागांमुळे प्राप्त होणारी शीतलता केवळ अवर्णनीय! 'शुद्ध सारंग' मधला त्यांचा दोन मध्यमांचा हळुवार प्रयोग ही शांती प्राप्त होण्यासाठी कारणीभूत ठरतो. तीच किमया त्यांच्या 'मध्यमाद सारंग' मधल्या 'जबसे मन लागो' ह्या बंदिशीची! ‘त्यात 'शुद्ध सारंग' हा मला बाहेरच्या वातावरणाशी अधिक संबंध जोडणारा वाटतो तर 'मधमाद सारंग' हा मला ह्या वातावरणामुळे मनात डोकावणारा वाटतो. अशा वेळेस रागाचे नाव, त्यात वापरलेले स्वर ह्या तांत्रिक बाबींना काहीही अर्थ उरत नाही. मात्र सकाळची रम्यता आणि दुपारची शीतलता हे मनावर बदलेल्या वेळेनुसार होणारे परिणाम अनुभवण्या शिवाय लक्षात यायचे नाही.

ह्याच बदलत्या मनःस्थितीत संध्याकाळची व्याकुळता त्यांचे 'ललितागौरी', 'पुरिया धनश्री' आणि 'भीमपलास' हे राग व्यक्त करीत आलेत. कोणतीही व्यक्ती - मग ती जगाच्या पाठीवर कुठेही असो - संध्याकाळच्या वेळेस एक प्रकारची अस्वस्थता अनुभवतेच. मनात एक अनामिक पोकळी निर्माण होतेच होते! सूर्यास्थाची ही वेळ 'माझे कुणीतरी ऐका' हे सर्वात प्रकर्षाने सांगणारी असते. त्यांचे ह्या वेळेस ऐकलेले राग ह्या गोष्टीची पुष्टी नक्कीच करतात की शास्त्रीय संगीत किंवा रागसंगीत हे उच्च दर्जाचे भाव-संगीत आहे! तंत्र आणि शास्त्र ह्या पलीकडे जाऊन भावना व्यक्त करणारे संगीत!

परंतु इथे एक गोष्ट कबुल करावी लागेल की मी त्यांच्या रात्रीच्या आणि मध्यरात्रीच्या रागांचा अधिक चाहता आहे. कारण मी ह्या वेळेस स्वतःला अधिक मुक्त समजतो! दिवसभरतील ताण-तणाव संपल्यामुळे स्वतःकडे अधिक लक्ष देऊ शकतो. त्यामुळे त्यांनी ह्या वेळेस गायलेले राग मला अधिक भिडतात आणि माझ्या मनात डोकवायला अधिक प्रवृत्त करतात! ह्याच वेळेस एक उत्साह आणि आनंद बाळगून परंतु अलगद पावलं टाकीत त्यांचा 'भूप' माझ्या मनात प्रवेश करतो! ह्या रागात त्यांनी गायलेले 'सहेला रे' हे सर्वश्रुत आहेच. किंचित लडिवाळ आणि लाजत येणाऱ्या बागेश्रीचे सूर तो ऐकून झाल्यावर रुंजी घालत राहतात. 'शुद्ध कल्याण' आणि 'रागेश्री' ह्या रागांमध्ये तर त्यांचे सूर मातृत्वाचे रूप धारण करतात! नुकताच दिनांक ४ फेब्रुवारीला वरळीला नेहरू सेंटर येथे त्यांचा 'शुद्ध कल्याण' अनुभवला. त्या वेळेस त्या 'ए. सी' असलेल्या सभागृहात त्या सूरांनी मला पांघरूण घातले होते. तसाच त्यांचा रागेश्री प्रत्यक्ष अनुभवायचे भाग्य मला लाभले आहे. त्यातील 'देखो शाम गहरी नींद' ऐकताना त्या सुरांनी अक्षरशः मला प्रेमाने थोपटले आहे. त्यांचा 'भूप नट' ऐकला की माझ्यासमोर एक स्वतःशीच हसत आणि किंचीत लाजणारी तरुणी उभी राहते! मात्र त्यांचा 'मालकंस' साधनेचे रूप धारण करतो आणि ऐकणाऱ्याला देखील एका विशिष्ट उंचीवर नेउन ठेवतो!

किशोरीताई ह्यांच्या संगीताचा एकूण ‘कॅनव्हास’ फार मोठा आहे आणि इथे नमूद केलेले राग ही उदाहरणं आहेत. ह्याच बरोबर त्यांचे ऋतुप्रमाण राग देखील आहेत! ह्या जागेत प्रत्येकाचा समावेश करणे अशक्य आहे. परंतु इथे महत्वाचा प्रश्न असा येतो की ही गायकी अनुभवायची तरी कशी? ह्या प्रश्नाचे उत्तर थोडे विस्तारित आहे. कारण किशोरीताई ह्यांचे गाणे हे एव्हरेस्ट पर्वताच्या उंचीचे आहे! एव्हरेस्टवर पोहोचायला जसे काही मुलभूत प्रयत्न अपेक्षित असतात तसंच इथे आहे. एव्हरेस्ट सर करणारी व्यक्ती ज्या समर्पित भावनेने त्या पर्वतांना समोरे जाते तसेच श्रोत्यांनी ह्या गाण्याकडे पाहणे गरजेचे आहे. मनात कोणतेही प्रश्न न ठेवता केवळ ऐकणे! समोर येणाऱ्या एक एक सूराला एकाग्रतेने ऐकणे! पुढचे कार्य आपले मन स्वतः करते. परंतु असे होण्यासाठी मनात काही प्रमाणात संयम असायला हवा! गाणं ऐकताना कुणाशीही न बोलण्या एवढा मनावर ताबा असायला हवा. समोरून येत असलेल्या सूरांमध्ये आपल्या टाळ्यांनी आणि 'वाह वाह' अशा क्रियांनी व्यत्यय न आणण्यासाठी देखील ताबा हवा! तरच समोर सादर होणाऱ्या रागाच्या स्वभावाशी आपले मन 'साम्यावस्था' साधेल.

'ह्या हृदयीचे त्या हृदयी घातले' हे ह्यापेक्षा वेगळे काय असते?

परंतु अशा प्रकारच्या गायकीची आज समाजात आणि विशेषतः तरुण पिढीला गरज आहे असे राहून राहून वाटते. ह्याचे कारण असे की समाजात पसरलेली एकूण अस्वस्थता. बदलत्या जीवनशैली मुळे म्हणा किंवा आणखी काही पण साऱ्या समाजाला कसलीशी घाई लागली आहे. सारे काही लगेच हवे! कामाचे व्याप वाढले. ते पूर्ण करायला वेळ अपुरा पडायला लागला आणि त्यामुळे एकंदर धावपळ वाढली. माझी पिढी ही मोठी झाली ती ह्याच धावपळीत. पुढे ज्या पिढ्या येत आहेत त्यांची देखील हीच गत! अशा वेळेस एका जागी शांत बसायला वेळ आहे? आणि वेळ असल्यास त्याची सवय आहे? ह्याच सवयीचा अभाव सगळीकडे जाणवतो! सिग्नल 'लाल' चा 'हिरवा' होईपर्यंत पुढे पुढे सरसावणारी वाहनं ह्याच अशांततेचे प्रतीक आहे. समोर गाडी एक सेकंद जरी थांबली तरी मागच्याने लगेच वाजवलेला हॉर्न हे पण त्याचेच उदाहरण. हीच अस्वस्थता आणि अशांतता घेऊन लोकं सभागृहात शिरतात. शास्त्रीय संगीताची मैफल सुरु असताना सतत हालचाली करतात. कलाकाराने जर थोडा सूर टिकवला तर तो शांतपणे ऐकायचे सोडून लगेच टाळ्या वाजवून त्या सूराची अखंडता भंग करतात! माझ्या पिढीतील बरेच कलाकार देखील ह्या अस्वस्थ समाजाचे परिपाक असल्यामुळे त्यांची देखील राग मांडणी करायची पद्धत अधिक घाईची होत चालली आहे. आणि अर्थात त्यामुळे टाळ्या मिळविण्याकडे ओढ देखील! ह्या साऱ्याचे एकमेव कारण म्हणजे समोर येणारे क्षण पेलायला आणि पुढे अनुभवायला लागणाऱ्या संयमाचा अभाव! आणि राग संगीत आपल्याकडून नेमकं ह्याच गोष्टीची अपेक्षा करतं. किंबहुना सर्व प्रकारची शास्त्र ह्याच आधारावर उभी आहेत. त्यांची उपासना करणारी व्यक्ती ही मुलभूत संयम बाळगून हवी! आणि ह्याच पार्श्वभूमीवर किशोरीताईंची गायकी आजच्या तरुण पिढीला आमंत्रित करते आहे. जरा एके ठिकाणी बसा. शांत बसा. मनातील भाव आणि रागातील भाव ह्यांचा समतोल साधायचा प्रयत्न करा. एक एक क्षण अनुभवायला शिका आणि असे करता करता स्वतः मधील संयम वाढवा. ऐकण्याच्या ह्या कलेमुळे दैनंदिन आयुष्यात देखील समोरचा काय बोलतो आहे हे लक्ष देऊन, संयम ठेवून आणि मध्येच अडथला न आणता ऐकायला शिकाल! संगीत हे केवळ मनोरंजन नव्हे. त्याने व्यक्तिमत्वाचा आणि पर्यायाने समाजाचा देखील विकास होऊ शकतो. आज त्याची नितांत गरज आहे. आणि किशोरीताई ह्यांचे संगीत पदोपदी ह्याची जाणीव करून देत असते!

ह्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या 'एन.सी.पी.ए' मध्ये एक पाश्चात्य संगीताची मैफल ऐकल्याचे आठवते. मैफल होती पाश्चात्य शास्त्रीय संगीतातील एका श्रेष्ठ आणि ज्येष्ठ गायिकेची. मैफल अगदी अवर्णनीय अशीच झाली. प्रत्येक सूर अगदी मनावर छाप पडणारा. पण तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे तिथे आलेले श्रोते. सादर होणारी रचना पूर्ण होईपर्यंत कुणीही टाळ्या वाजवत नव्हते. एकमेकांशी बोलत नव्हते. अगदी कुजबुज देखील नाही. समोर असलेल्या कलाकाराला स्वतःच्या शिस्तीने आणि शांततेने मानवंदना देत होते. पांढरा शुभ्र 'कॅनवास' असेल तरच रंग अधिक उठुन दिसतील ना? तो 'कॅनवास' स्वछ ठेवायची जबाबदारी आपली असते. रंग आपल्या सर्वांसाठीच असतात. तसंच शांतता ठेवली नाही तर सूरांची किमया अनुभवायची कशी? किशोरीताईंचे सूर आपल्या सर्वांसाठी आहेत. प्रश्न फक्त आपण काही मूलभूत गोष्टी पाळतो आहोत का हा आहे.

- आशय गुणे Happy

हा लेख दैनिक दिव्य मराठीच्या 'रसिक' ३१ मे पुरवणी मध्ये प्रकाशित झाला होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह आशय, किती सुंदर लिहिलंस - मन अगदी स्वच्छ झाल्यासारखे वाटले ...

कित्येक परिच्छेद वाचताना अगदी अगदी होत होते ....

विशेषतः - <<<<परंतु अनुभवण्याच्या स्थितीत आपल्या साथीला असतात बऱ्याच अनामिक भावना. आणि त्याच्या जोडीला असतात बरेच अमूर्त विचार आणि अगणित पैलू! त्यामुळे अनुभवण्याची स्थिती ही अधिक व्यापक आणि गूढ असते. >>>

<<<एव्हरेस्ट सर करणारी व्यक्ती ज्या समर्पित भावनेने त्या पर्वतांना समोरे जाते तसेच श्रोत्यांनी ह्या गाण्याकडे पाहणे गरजेचे आहे. मनात कोणतेही प्रश्न न ठेवता केवळ ऐकणे! समोर येणाऱ्या एक एक सूराला एकाग्रतेने ऐकणे! पुढचे कार्य आपले मन स्वतः करते. परंतु असे होण्यासाठी मनात काही प्रमाणात संयम असायला हवा! गाणं ऐकताना कुणाशीही न बोलण्या एवढा मनावर ताबा असायला हवा. समोरून येत असलेल्या सूरांमध्ये आपल्या टाळ्यांनी आणि 'वाह वाह' अशा क्रियांनी व्यत्यय न आणण्यासाठी देखील ताबा हवा! तरच समोर सादर होणाऱ्या रागाच्या स्वभावाशी आपले मन 'साम्यावस्था' साधेल. >>>

<<<<जरा एके ठिकाणी बसा. शांत बसा. मनातील भाव आणि रागातील भाव ह्यांचा समतोल साधायचा प्रयत्न करा. एक एक क्षण अनुभवायला शिका आणि असे करता करता स्वतः मधील संयम वाढवा.>>>>

संगीत हे केवळ मनोरंजन नव्हे. त्याने व्यक्तिमत्वाचा आणि पर्यायाने समाजाचा देखील विकास होऊ शकतो. आज त्याची नितांत गरज आहे. आणि किशोरीताई ह्यांचे संगीत पदोपदी ह्याची जाणीव करून देत असते! >>>> हे वाक्य तर अगदी जोरकस तानेनंतर अलगद समेवर उतरल्यासारखे .... - या वाक्याकरता हॅट्स ऑफ ...

किशोरीताईंसारख्यांचे गाणे प्रत्यक्षात ऐकायला मिळणे यासारखे आयुष्यात दुसरे भाग्य नाही रे बाबा ...

नितांत निर्मळ अनुभूति देणारा लेख वाचायला दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ...

Lekh atishayach awdla Happy mobile warun mabo operate karat aslyane savistar pratisaad deta yet nahiy. Pn taainchya surabaddal, ragachya bhawabaddal lihilela waachtana agadi , 100% kharay asa manaat aala!

आदा
आशय, लेख खुप आवडला. किती महत्वाचे मुद्दे तुम्ही किती सुगमपणे उलगडून मांडले आहेत. त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.
ताई आणि एव्हरेस्ट हे समीकरण छानच. संयमाचं महात्म्यही फार सुंदर. अगदी पटलं.

अप्रतिम... अप्रतिम जमलाय लेख, आशय गुणे.
किशोरीताईंच्या गाण्याबद्दल वाचताना तर अगदी अगदी झालं.
तसच, गाणं 'अनुभवण्यासाठी मनाची स्वस्थता' हा विषयही छान मांडला आहे. किशोरीताईंचंच नव्हे तर एकुणातच... एखादी कलाकृती 'अनुभवण्यासाठी.. भेटण्यासाठी, भिडण्यासाठी' मनाची स्वस्थता... पर्चमेंन्ट ... स्थिती आवश्यक आहे.

धन्यवाद @शशांक पुरंदरे! तुम्ही एवढे मोठे वर्णन केले हे पाहून मला देखील आनंद झाला. Happy
kulu आणि सई, धन्यवाद! Happy
दाद, अगदी खरंय! म्हणून मी शेवटी साऱ्या शास्त्रीय कलांचा एक संदर्भ दिला आहे. Happy
धन्यवाद अवल! Happy
सुमेधान्वी, धन्यवाद! हो, मी परवाच्या कार्यक्रमाला होतो. माझे सौभाग्य की हा लेख किशोरीताईंच्या पर्यंत पोहोचला आणि त्यांनी देखील त्यावर पसंती दर्शवली. त्यांनी दिलेली दाद आयुष्यभर लक्षात राहील. Happy

"तेजोमय स्वराकार..." पाहाताक्षणीच लक्ष खेचून घेणार्‍या या शीर्षकामुळे मुख्य लेखाकडे नजर जाण्यापूर्वीच प्रसन्नतेचा फुलोरा मनावर पडला होता आणि प्रत्यक्ष वाचनाला सुरुवात केल्यावर मजकुरातील सुंदरतेने पूर्णतया भारावून गेलो. "किशोरी आमोणकर" इतके नाव जरी टंकायला मिळाले तरी बोटांची होणारी अस्पष्ट थरथर जाणवते कारण प्रश्न उभारतो, "अरे आहे का आपली योग्यता या सागराला स्पर्श करण्याची ?". एक श्रोता निव्वळ ह्या एकाच साध्यासरळ भूमिकेतून त्या दैवी आवाजाला हृदयात साठवून ठेवण्याची आपली पात्रता असल्यामुळे असे मनापासून लिहिलेले त्यांच्याविषयीचे लेखन वाचताना सातत्याने जाणवत गेले की श्री.आशय गुणे यानी किती खोलवर या तेजाचा पाठलाग केला आहे.

खूपच सुंदर. किशोरीताई यांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास नजरेसमोर येतो तो त्यांच्या आवाजातील नैसर्गिक मोकळेपणा आणि सहजता...शिस्तशीरपणा आणि आलापांची निर्मळता.... सारा श्रोतृवर्ग भान हरपून पहाटेपर्यंत ह्या तेजोमय स्वराकारासोबत राहतो तो यासाठीच.

वरील एका प्रतिसादात श्री.शशांक पुरंदरे म्हणतात...."नितांत निर्मळ अनुभूति देणारा लेख...." पूर्णपणे मी सहमत आहे त्यांच्या या मताशी....धन्यवाद आशय.

अतिशय सुरेख लेख.
कुलदीप आणि सईचे आभार ह्याची लिंक दिल्याबद्दल.
मनाच्या स्वस्थतेचा विषय अतिशय महत्वाचा आणि खूप योग्य रीतीने मांडलेला आहे.
त्याबद्दल खरोखर आभार _/\_

आशयगुणे,

लेख आवडला. अगदी मनापासून लिहिलंय. शास्त्रीय संगीतातलं फारसं कळंत नसल्यामुळे लेखाची सांगीतिक दृष्ट्या प्रशंसा करणे मला अशक्य आहे. मात्र लेखातल्या भावनेशी पूर्णत: सहमत आहे.

बकाबका खाणे आणि अन्नब्रह्मपदी लीन होत एकेक घास रसिकोचितपणे खाणे यांतला फरक नेमक्या शब्दांत सांगूनही कळणार नाहीये. तो अनुभवावाच लागतो.

आ.न.,
-गा.पै.

अप्रतिम!
एन्टरटेनमेंट्च्या पलिकडे जाऊन एनलायटनमेंट करवणारे हे संगीत आहे, सादरीकरणाच्या फार पलीकडे पोचलेले हे कलाकार, त्यांचे गाणे हा निव्वळ आत्मसंवाद, आपल्याला तो ऐकायला मिळतो हे आपले भाग्य.
माझा अनुभव असा की दिवसाच्या कोणत्या प्रहरातील राग आहे ही देखील किशोरीताईंसारख्या कलाकारांच्या बाबतीत एक तांत्रिक बाब उरते, कधीही ऐका.

मैथिली पिंगळे - धन्यवाद! Happy
अशोक - धन्यवाद! Happy
चैतन्य दीक्षित - तुमचे धन्यवाद! शिवाय कुलदीप आणि सई ह्यांचे देखील. मी त्यांना ओळखत नाही. परंतु त्यांनी वाचून सुचविला म्हणून विशेष धन्यवाद! Happy
स्वाती: धन्यवाद Happy
गामा: धन्यवाद! बकाबका खाणे ह्या संदर्भातले उदाहरण अगदी समर्पक Happy
आगाऊ: धन्यवाद! वेळे संदर्भात माझे सुरुवातीला असे होयचे. पण आता वेळे प्रमाणे ऐकतो Happy