कोवळे चिंब पोपटी तुरे स्वच्छंद जांभळी फ़ुले
गवतात थेंब थांबले धुक्याचा पदर मलमली झुले
मातीत मिसळला गंध उसळला घमघमला मारवा
मंजूळ कुहुक नाजूक झुळुक तन गोठवणारी हवा
या ओल्या बांधावरती
पावले कुणाची पडली
का फ़ुलराणीची काया
लाजून पुन्हा अवघडली
सोवळे नेसली तंग झाकुनी अंग कोण ही तरुणी
घायाळ कुणा करणार पुन्हा शृंगार आगळा करुनी
क्षितिजाच्या उंच गवाक्षातुन पाहतो देखणा रवी
सांडते कधी बेधुंद तिचे तारुण्य मुके एरवी
ही चंचल अल्लड तरुणी
जाहली दवाने ओली
थरथरत्या गालावरती
साकळली थोडी लाली
मोतिहार पाचुची कुंडले टांगली बाभळीवरी
घसरते नजर सारखी कटीच्या रुंद साखळीवरी
केशरी तळे केसरी मळे केशरी हिंडतो रावा
केशरी ऊन बावरी धून केशरी वाजतो पावा..
केशरी बिंब पाण्यात चिंब केशरी फ़ुलांच्या माळा
केशरी तनु स्पर्शते जणू एवढा गंध का यावा...
तू ओल्या कातरवेळी
चांदणे होऊनी यावे..
मी डोळे मिटल्यावरती
पांघरुन माझे व्हावे..
केशरी मिठी केसरी दिठी केसांवर भिरभिर वारा,
केशरी चंद्र ओंजळीमधे केशरी बरसती धारा,
केशरी पदर मोगरा तुझा केशरी मण्यांच्या माळा,
पाकळ्या धुंद पेटल्या कळ्या केशरी वितळला पारा..
काहूर दाटुनी येते
बाहूत जायच्या वेळी..
अंतरते अलगद विरते
सावली तुझी सावळी..
केशरी खुळ्या डोळ्यात पुन्हा तेवती केशरी वाती
नउवार नेसुनी घरामधे एकटी एकटी फ़िरु नको
नथ नाकातील उगाच हलवुन काळीज माझे चिरु नको
पाहीन तोवर पाहीन मीही राग मलाही येतो आहे
धावत येईल तुला बिलगण्या तेव्हा रुसवा धरु नको...
वर अंबाडा गच्च बांधुनी शेवंती माळते कशाला
तुझा पदर सरकला पाहुनी कोरड पडते बये घशाला
रात्र कालची गेली ..तळमळ झाली..पण तू आली नाही
स्वप्न आपले तेच जुने मी घेऊन निजलो शांत उशाला ....
आई-नाना शेतामधुनी लवकर येणे शक्यच नाही
काम तुझे कर...सारे सारे.. अजून माझी हरकत नाही
पदर खोचुनी जेव्हा येशील तू वैतागुन आरामाला
तेव्हा बघ...छळतोच तुला..जोवर काटा सरकत नाही....
तोंड-नाक वाकडे करुन तू जाते येते.. बघतो आहे
लहान मुलांना फ़ार लवकर कंटाळा येतो कुठल्याही गोष्टीचा. त्यात जर एखादी गोष्ट करताना चिडचिड होत असेल तर विचारालाच नको. गारगोट्या रांगेत लावून थकली होती गट्टु. लावता लावता काही गोट्या गडबडत दूर जात होत्या. रांगत जाऊन त्यांना पुन्हा एकत्र ठेवताना तारांबळ उडत होती तिची. मी मधे हात घातला तर तेही आवडत नव्हते. शेवटी अगदीच असह्य होऊन तिने पायाने सगळ्या गारगोट्या लाथाडून दिल्या आणि माझ्या पसरलेल्या पायांवर पालथी झोपली. खुप गंमत वाटत होती लाडुबाईची. मी तिच्या पाठीवर हात फ़िरवताना फ़ुगलेल्या गुलाबी गालांकडे एकटक पहात होतो. मला गट्टु रडल्याचे कधी आठवलेच नाही.
काळ्या पाठीच्या उडदाचे वरण दर शनिवारी बनवायचे असा ठरलेला नियम असायचा. इंद्रायणी तांदळाचा पांढराशुभ्र भात ...बारीक उभ्या फ़ोडी केलेला ताजा कांदा...बागेतून नुकत्याच तोडून आणलेल्या तळलेल्या हिरव्यागार मिरच्या आणि माझी आवडती भजी.... गट्टुचा फ़्रॉक खराब केल्याचा राग अजुन गेलेला नव्हता त्यामुळे माधवी मुद्दाम आग्रह करुन करुन वाढत होती..गालातल्या गालात हसत होती...ताटात उष्टे राहिलेले नानांना अजिबात आवडत नव्हते ही गोष्ट तिला चांगलीच ठाऊक होती. अशा वेळी तिचा खोडकरपणा उफ़ाळून येतोच बहुधा. जागेवरुन हलणंही मुश्किल झालं एवढा जेवलो होतो मी...
"गट्टु "
हातातली कपड्याची बाहुली फ़ेकून ती दुडुदुडु पुढे पळाली....मला भिती वाटत होती तिच्या नाजुकशा पायात खडे तर टोचणार नाहीत !! गोबर्या गालात हसू मावत नव्हते ...तांबूस भुरकट केस वार्याच्या झुळकीवर उडून कपाळावर आलेले पाहून ऊर भरुन आला होता....तीन वर्षाची झाली होती माझी गट्टू... काही दातही चमकायला लागले होते...