सांजकेशरी

Submitted by संतोष वाटपाडे on 1 November, 2015 - 07:33

केशरी तळे केसरी मळे केशरी हिंडतो रावा
केशरी ऊन बावरी धून केशरी वाजतो पावा..
केशरी बिंब पाण्यात चिंब केशरी फ़ुलांच्या माळा
केशरी तनु स्पर्शते जणू एवढा गंध का यावा...

तू ओल्या कातरवेळी
चांदणे होऊनी यावे..
मी डोळे मिटल्यावरती
पांघरुन माझे व्हावे..

केशरी मिठी केसरी दिठी केसांवर भिरभिर वारा,
केशरी चंद्र ओंजळीमधे केशरी बरसती धारा,
केशरी पदर मोगरा तुझा केशरी मण्यांच्या माळा,
पाकळ्या धुंद पेटल्या कळ्या केशरी वितळला पारा..

काहूर दाटुनी येते
बाहूत जायच्या वेळी..
अंतरते अलगद विरते
सावली तुझी सावळी..

केशरी खुळ्या डोळ्यात पुन्हा तेवती केशरी वाती
विरहात सरकतो दिवस कधी विरहात जागल्या राती
अंधार जुना पडताच पुन्हा मन व्याकुळ हळवे होते
केशरी अंग बदलून रंग जांभळे उसासे येती..

अश्रूंचे काजळ उरले
पापणीत पाणी भरले
ये पहाट होण्याआधी
मी हरले रे मी हरले...

--- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केशरी खुळ्या डोळ्यात पुन्हा तेवती केशरी वाती
विरहात सरकतो दिवस कधी विरहात जागल्या राती
अंधार जुना पडताच पुन्हा मन व्याकुळ हळवे होते
केशरी अंग बदलून रंग जांभळे उसासे येती..>>>हे कसं काय सुचते तुम्हाला ! सुरेखच,अप्रतिम व्वा! कविता खूप आवडली!धन्यवाद!

mast