गट्टु- ४ आणि ५

Submitted by संतोष वाटपाडे on 18 August, 2015 - 08:30

" गट्टु भाग-४"
"अं अं बाss अंs ब्बाss" अशी हाक कानावर येताच माझे लक्ष गट्टुकडे गेले. मी तोवर काही अबोलीची फ़ुलं ओंजळीत जमा करत होतो. चिकुच्या झाडाच्या पलिकडे उंच जास्वंद आहे. तीन वेगवेगळ्या रंगांच्या जास्वंदांचे कलम केलेले आहेत एकाच झाडावर. लालभडक पुणेरी पगडीतून बाहेर आलेल्या झुपक्यासारख्या शेंड्या डोकावत होत्या लाल जास्वंदाच्या फ़ुलामधून. ही टपोरी टपोरी फ़ुलं दुरुनही दिसायची हलताना. एक इवलासा काळा भुंगा पिवळ्या जास्वंदाच्या फ़ुलावर आपल्याच नादात टोचा मारत होता पण गट्टुला वाटले तो तिच्याकडे येईल आता. त्यामुळे तिला आधीच घाम फ़ुटला होता...हातातली परडी खाली ठेवून पायाखालची फ़ुलझाडं तुडवत माझ्याकडे धावत आली आणि गुडघ्यांना बिलगली.

ओंजळीतली फ़ुलं कोरड्या जागेवर ठेवत मी गट्टुला उचलून घेतले. ती तर जास्वंदाकडे बघायलाही तयार नव्हती. घराकडे ओढत होती जणू मला. खांद्याला घट्ट बिलगलेल्या गट्टुला मी जास्वंदाच्या झाडाजवळ नेले. भुंगा पिवळ्या फ़ुलात शांतपणे बसला होता. फ़ुलाच्या आतला गारवा त्याला सुखावत होता म्हणूनच अगदी पंख दुमडून पाय गोळा करुन डोळे मिटून शांत बसला होता तो. गट्टुच्या केसात हात फ़िरवत मी म्हणालो " ए गट्टु हे बघ गंमत आहे इकले...बघ बघ कोण आहे"... माझ्या टी-शर्टला घट्ट पकडून भोळेपणाने तिनेही मान वळवली...समोरंच तिला अगदी जवळून जास्वंदाचं भलं मोठं फ़ुल आणि त्यात चिडीचुप बसलेला भुंगा दिसला. अगोदर थोडी दचकली होती मात्र नंतर खुदकन हसली. एखाद्या भिंतीवर चिकटवलेल्या चित्राप्रमाणे जिवंत तरीही निर्जिव भासणार्‍या त्या भुंग्याकडे बघत राहिली. माझ्या गालाला हात लावून" बाss भुऊऊ....बाssबाss भुऊऊ" असे इवल्याशा बोटाने खुणावून सांगत होती. फ़ुलाला हात न लावता आम्ही पुन्हा अबोलीकडे वळलो. कडेवरुन खाली उरतल्याबरोबर नव्या जोमाने गट्टु अबोलीची फ़ुलं तोडून परडीत टाकत होती. म्हातार्‍या आज्जीबाईसारखी एक हात गुडघ्यावर ठेवून वाकून उभी असलेली गट्टु खरोखर खुप गोड दिसत होती.परडी गच्च भरली होती. तरी गट्टु वरुन फ़ुले टाकतंच होती. शेवटी तिला सांगावे लागले"गट्टुबाळा पुरे आता...ज्याऊ या का घली.." मान हलवून मुक संमती....हसू आले मला तिच्या होकाराचे... खरंच अगदी गोडंबी माझी गट्टू!!

एका हातात परडी...दुसरा हात माझ्या हातात देऊन ती माझ्यासोबत फ़ाटकाकडे चालत आली. शेवंतीची दोनचार ताजी फ़ुलं मी तोडून परडीत खोचली. ही पांढरीशुभ्र पिवळसर छटा असलेली फ़ुलं मला खुप आवडतात...फाटक बंद करुन आम्ही घराच्या वर्‍हांड्यात आलो. आई मेथीची भाजी निवडत बसली होती. नाना खाली जमिनीवर बसून सार्थ भजनमालिका वाचत होते. आमची "मोहीम गजरा" सुरु करायला सुई आणि दोरा लागणार होता म्हणून गट्टुला आईच्या शेजारी बसवून मी देवघरातल्या ड्रॉवरमधून जाड दोरा आणि मोठी सुई घेऊन आलो. तोवर परडी खाली ओतून काही फ़ुलांशी गट्टु खेळत होती. खुप लवकर चुरगळली जातात अबोलीची फ़ुलं. मी सर्व फ़ुलं माझ्यापुढे घेऊन दोर्‍यात ओवत होतो. अर्धाअधिक गजरा बनतो न बनतो तोच लाडुबाईचे इशारे सुरु झाले. डोक्याकडे हात दाखवून ती सांगत होती मलाही गजरा हवाय. शेवटच्या टोकाला शेवंतीचे एक फ़ुल अडकवून तो छोटा गजरा मी दोरा तोडून तिच्या इवल्याशा केसात बांधला.

हट्ट पुर्ण झाल्याचे एक वेगळेच समाधान तिच्या चेहर्‍यावर दिसत झळकले. आजी-बाबांना डोक्याचा गजरा दाखवून ती माधवीकडे चालली होती. नानांनी तिच्या पायातले सॅंडल्स काढून घेतले. अगदी डुलत डुलत ती घरात गेली. माधवी आईनानांच्या खोलीत बसून कसलंसं पुस्तक वाचत होती. आईने तिला काही वेळ आराम करायला सांगितलेला होता त्यामुळे मेथीची जुडी निवडून होईपर्यंत ती निवांत होती. गट्टु अगोदर माधवीला शोधत किचनमधे गेली. स्टुलवर ठेवलेल्या खोबर्‍याचा किस मुठीत पकडून जेवढा शक्य होईल तेवढा तोंडात भरुन घेतला नंतर स्वारी पुढे सरकली. बांगड्याचा आवाज ऐकू आल्याबरोबर ती खोलीकडे वळली. "म्मा..अं अं..." तिच्या गोडुल्या भाषेत खुणावून ती डोक्यावरचा गजरा माधवीला दाखवत होती. हातातले पुस्तक बाजूला ठेवून पदर खांद्यावर घेत माधवी उठली आणि तिने गट्टुला दोन्ही हातांनी उचलून मांडीवर घेतले. गालांवर दोन्ही बाजुंनी नाजुकशी बक्षिसे मिळाली होती तिला. मिशन लाडुबाई फ़त्ते झाले!! गाल पुसले नाहीत शहाणीने... इतर कुणी गालावर पप्पी दिली कि लगेच पुसायची घाई होते गट्टुला. पण खुद्द मातोश्रींनी दिलेली पप्पी पुसली नाही तिने. माधवीचा हात सोडवून घेत ती पटकन बाहेर पळाली. माधवीच्या हाका बराच वेळ कानावर येत होत्या.

गुडघ्यावर हात ठेवत पायर्‍या उतरून गट्टु वर्‍हांड्यात आली. माझा दुसरा गजरा तोवर पुर्ण झाला होता. दोन्ही बाजुला एक एक आणि मध्यभागी एक शेवंतीचे फ़ुल असलेला गजरा खुप छान दिसत होता. गट्टुच्या हातात खेळायला काही अबोलीची फ़ुलं देऊन मी उठलो आणि घरात गेलो. वळून पाहिले तर गट्टु माझ्या मागे मागे येत नव्हती. मला एकांतात माधवीच्या वेणीवर गजरा माळायचा होता. दिवाणावर माधवी पाय हलवत पुस्तक वाचत होती. तिच्या पायातली सोनेरी साखळ्यांकडे बघत पायांचा आवाज न करता मी जवळ गेलो. दोन बोटांच्या चिमटीत गजरा पकडून खांद्यावरुन खाली गेलेल्या वेणीला गजरा बांधणार तोच मागून दुडुक दुडुक धावत आलेली गट्टु कॉटवर उडी मारुन माधवीच्या पाठीवर घोडा करुन बसली....भामटु खरंच खुप बदमाश !! गट्टुला तसेच पकडून माधवीने कुस बदलली आणि तिला पोटावर घेतले. माझ्या हातातला गजरा पाहून सुखावली ती...पाठीखाली अडकलेली वेणी माझ्याकडे देत तिने नजरेनेच मला खुणावले...मी मुकाटपणे गजरा वेणीला बांधून कॉटवर उरलेल्या जागेत माझे बस्ताण टेकवले...."माधवीईईई आज भाकरी करतेस कि पोळ्या टाकते गं.....?" आईची हाक माधवीसाठी. विजेचा झटका बसावा तशी खाडकन उठली माधवी. गट्टुला खाली ठेवून पदर सारखा करुन खोलीतून बाहेर पळाली.....स्वयंपाकाची तयारी करायची होती तिला....

माधवीने उघडून ठेवलेल्या पुस्तकाचे पान दुमडून मी पुस्तक खिडकीत ठेवले. गट्टु तोवर माझ्या कडेवर बसण्यासाठी तुरुतुरु धावत जवळ आली. तिला तसेच फ़िरवून मी पाठगुळीवर घेतले आणि साखरेचं पोतंss...साखरेचं पोतंss करत वर्‍हांड्यात गेलो. मेथीची निसलेली भाजी अ‍ॅल्युमिनिअमच्या मोठ्या चाळणीत भरुन आई मेथीच्या काड्या गोळा करत होती. आई किचनमध्ये गेल्यावर मला काही तिकडे फ़िरकता येणार नव्हते त्यामुळे मी गट्टुला मांडीवर घेऊन नानांशेजारी झुलणार्‍या झोक्यावर बसलो. झोका उंच जाताना खळखळून हसणारी गट्टु खाली येताना घाबरून माझे शर्ट घट्ट पकडत होती. ...तिच्या चेहर्‍यावरचे सतत बदलणारे भाव बघायला मला मात्र जाम मजा येत होती.अर्थात नानांना उंच झोका घेतलेले आवडत नव्हते. लहानपणी मी एकदा बाभळीच्या झाडाला बांधलेल्या झोक्यावरुन पडलो होतो उताणा...पुढचे दोन दात ओठात घुसले होते...तेव्हापासून आमचा बाभळीचा झोका सुटला कायमचा...

गट्टुला हसताना पाहिले कि सगळ्या जगाचा विसर पडतो नेहमीच. कितीही कामाचा व्याप असो किंवा वैताग असो...गट्टु हसत हसत पायात बिलगली की सगळा शीण क्षणात गळून जातो. जमिनीला टेकणार्‍या पायाचा जोर लावून आगाऊसारखी मी झोका लोटतच होतो. नानांना पुस्तक वाचायचे होते त्यामुळे ते झोक्यावरुन उतरून बाजुच्या सनमाइकच्या लाकडी कपाटावर बसले. गेले. आमचा झोका मात्र मंद गतीने हलत होता...

सायंकाळ जसजशी गडद व्हायला लागते तसतशी या चिमण्यांचा गजबजाट कानावर येत होता.वर्‍हांड्यात टांगलेल्या कृत्रिम खोप्यांमधे एव्हाना चिमण्यांची वर्दळ सुरु झाली होती. सायंकाळी पिलांच्या ओढीने धावत आलेले सर्व चिमणे-चिमण्या खोप्यांभोवती घिरट्या घालून पिलांच्या चोचीत दाणे भरण्यात मग्न होते. इवली इवली पिले गुलाबे चोचा उंचावून स्पर्शातली माया टिपत होते.माझी चिमुकली गट्टु बोट दाखवून मला चिऊताई दाखवत होती. .जिकडे चिमण्या जातील तिकडे मान वळवून घाईने बघत होती. आत आतुरतेने वाट पहात असलेली छोटी पिले आईवडिलांना पाहून सुखावत असतील. नानांची हाक ऐकून मी भानावर आलो.

संधीप्रकाशात न्हालेली कंपांऊंडबाहेरची झाडे शेंदराने माखलेली वाटत होती. दूर पडिक मैदानावर अस्ताव्यस्त पसरलेल्या राजस्थानी लोकांच्या झोपड्यांमधून पांढराशुभ्र धूर आकाशात झेपावत होता. भाताच्या पेजेसारखा वास हवेत दरवळायला लागला तसतसा पोटातला अग्नी उसळी मारत होता. भाजीमार्केटच्या पलिकडच्या हायवेवर सुसाट वेगाने धावणार्‍या मोटारींचे लाईट्स चमकताना दिसत होते. आमच्या कॉलनीच्या मागच्या बाजूला द्राक्षाची बरीच शेते होते. त्या शेतांतून भुर्रकन उडणारे पाखरांचे थवे बघता बघता आभाळात दिसेनासे होत होते.घरातून खरपूस भाकरी भाजण्याचा सुगंध यायला लागला. भाकरी बाजरीची असो वा ज्वारीची माधवीची त्याबाबतीत स्पेशालिटी होती. जेवढा मोठा तवा तेवढी मोठी तिची भाकरीची असायची. ज्वारीची भाकरी काला मोडून गरम गरम दुधासोबत खाताना खवा खाल्ल्याचा भास व्हायचा व्हायचा.पहिल्यापासूनच सर्व स्वयंपाक छान करता येतो तिला.(ती हे सर्व आईकडूनच शिकली होती असे जर मी कधी चुकून बोललो तर काय होईल याचा अंदाज न केलेला बरे...)

बाहेरचा उजेड कमी झाल्याने नानांना पुस्तक वाचायला त्रास होत होता. ते आत गेल्यावर पाठोपाठ मीही गट्टुला उचलून कडेवर घेतले आणि सरळ जिना चढून आमच्या खोलीत गेलो.गट्टुचा ड्रेस काढून जागोजागी ओडोमॉसचे ठिपके लावले. मऊ मऊ ढेरीवर बोट टोचले कि ती झटकून टाकायची शहाणी. वळणीवर आडवा टाकलेला पांढराशुभ्र फ्रॉक हाताने ओढून मी गट्टुच्या अंगावर चढवला. फ़्रॉक कसला तो जवळपास बनियानसारखाच होता. खांद्यावरुन खाली ओघळणारे त्याचे दोन्ही बंद सावरताना बिचारी गट्टुची कसरत व्हायची नेहमी. पण मला मात्र या ड्रेसमधे तिला बघून खुप आनंद व्हायचा.

उद्या गट्टुला स्कुलमधे पाठवायचय या विचाराने अजुनही माझी चलबिचल होत होती. ती कदाचित तिथे छान रमेलही पण आमचे सर्वांचे घरी चित्त रमेल की नाही हे सांगत येत नव्हते. आईने गट्टुच्या स्कुलचे साहित्य आधीच आणुन ठेवले होते. आई अगोदरपासून खुप धडपड करायची आमच्या शिक्षणासाठीसुद्धा. स्वतः फ़क्त चौथी इयत्ता शिकली मात्र आम्हाला खुप खुप शिकवून मोठं करण्याची तिची जिद्द खरोखर कमालीची होती. कोपर्‍यातल्या जुन्या लाकडी कपाटातून मी साहित्याची पिशवी बाहेर काढली. कॉटवर सर्व साहित्य रांगेत मांडून बघत होतो. डार्क मरुन रंगाची कॉलर असलेला बेबी पिंक फ़्रॉक...त्याच रंगाची इटुकली पिटुकली वॉटरबॉटल...अर्धा डजन सुती हातरुमाल.....हत्तीच्या तोंडाचा आकार असलेली मऊ केसाळ स्कुलबॅग....मुंगेरीलालसारखा बसून माझी गट्टु स्कुलमधे जाताना उद्या कशी दिसेल असे स्वप्न डोळे उघडे ठेवून मी रंगवत होतो. तोवर कॉटवरुन वॉटरबॉटल आणि बॅग गायब झाले होते. महाराणी त्या दोन्ही वस्तू कशाबशा गळ्यात टांगून ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर उभ्या होत्या. गालातल्या गालात मुरकत लाजत स्वतःला न्याहाळताना मी तिला बघतोय याचाही तिला विसर पडला होता. मी घाई घाई तिच्याकडून दोन्ही वस्तू घेऊन सर्व सामान पुन्हा कपाटात ठेवले. आईला कळले तर आई माझ्यावर ओरडली असती. साखरेचं पोतं पुन्हा पाठीवर घेऊन मी खाली हॉलमधे आलो.टीव्हीवर मराठी चॅनल लावून आई आणि माधवी किचनमध्ये काम करत रेडिओ लावल्यागत सिरीअल ऐकत होत्या. हिरव्या मिरच्या घातलेली मेथीची रस्साभाजी घरभर हवेत पसरत होती. आरामखुर्चीत गट्टुला बसवून मी शेजारी कारपेटवर बसलो.
(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users