मराठी भाषा दिवस -२०२२: सरस्वतीची चिरंजीव मुले - शांता शेळके: अमितव
साधीशीच वाटेल अशी सुती साडी, गोरा रंग, कपाळावर ठसठशीत नजरेत भरेल असं कुंकू, कानात मोत्याच्या कुड्या, मोठे डोळे आणि त्यावर मोठ्या फ्रेमचा चष्मा, डोक्यावरुन पदर घेतलेला, हसतमुख चेहरा, साधंसच वाटेल असं रसाळ, ऐकत रहावं असं प्रेमळ बोलणारी आजी ही शांताबाईंची झालेली पहिली ओळख. त्याकाळी दूरदर्शनवर एक कवितांचा कार्यक्रम सादर होत असे, आणि घरी आजी तो मनोभावे ऐकत असे. त्यात म्हटल्या जाणार्या कित्येक पारंपारिक कविता आजीला तोंडपाठ होत्या आणि दूरदर्शनवर त्या सुरू झाल्या की इकडे आजी त्या पूर्ण करत असे.