मी फार लहान असताना, माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान होता.
पण मग मी ताई असल्याने, मी लहानपणीही मोठी होते... ही त्या दिवसांची गोष्ट!!
माझ्या लहान जीवाच्या मानाने, जमेल तितकं त्याला सांभाळण्याची मी माझ्याही नकळत जबाबदारी उचलली. (ती फार फार उत्कृष्ट पार पाडत असे, आई सांगते, असो तर तो मुद्दा नाही) पण भाऊ आलम दुनियेच्या व्याख्येत 'द्वाड लेकरू' ह्या वर्गवारीत मोडत असल्याने, माझ्या इवल्या जीवाचा इवला संयम लवकरच सरून "आई, घे ह्याला, ऐकत नाही बघ" अशी हाळी जायचीच तेव्हा आई हातातले काम सोडून, माझी दया येऊन, माझ्या गालावरुन हात फिरवून द्वाडाला मांडीवर घेई तेव्हा त्याची झोपेची वेळ झालेली आहे आणि आताचं रडणं त्यासाठी आहे हे आईला कुठल्या पद्धतीने कळायचं न कळे... आणि त्याला मांडीवर घेत, त्याच्या आवडीच्या कोमट तापमानाचं दूध असलेली बाटली त्याच्या बोळक्यात देत तिची उजवी मांडी वर-खाली होऊ लागे आणि त्या द्वाडाच्या डोळ्यांत 'कसं हातातलं काम सोडून मला शरण आलीस' चे भाव उमटत... आई माझ्याकडे कौतुकाने, त्याच्याकडे प्रेमभराने पहात विशुद्ध हसे.. तिची डोलणारी मांडी, त्याच्या कपाळावर थोपटण्याचा ताल आणि तिची शुन्यात लागलेली नजर अशा समाधीतून तिच्या ओठांवर येऊ लागे...
" लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी न शोधूनी दुसऱ्या लाख
किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले
हासती केसही सुंदर काळे कुरळे
अंगात शोभला झगा रेशमी लाल
केसांवर फुलले लाल फितीचे फूल
कितीतरी बाहुल्या होत्या माझ्या जवळी
पण तीच सोनुली फार मला आवडती"
माझ्या मनात लाल झग्याच्या बाहुलीचं स्वप्न रुजवणासाठी ह्याच ओळी कारणीभूत होत्या, हे फार नंतर मला समजलं. मला कांजण्या उठल्या तेव्हा तापाच्या भरात मी मला बाहुलीच हवी असा हट्ट धरून बसले होते, असं आई सांगते. कधीही कसलाही हट्ट न धरणारी मी आलम दुनियेच्या व्याख्येत 'गुणी लेकरू' ह्या वर्गवारीत मोडत असल्याने असा हट्ट पाहून आई-बाबांना अचंबित करुन टाकलं होतं... (असो तर तो मुद्दा नाही )
तर "शांताताई शेळके" अगदी लहानपणीच बाहुलीचं स्वप्न घेऊन मनात मुक्कामाला आल्या. आपल्याला आवडणारं माणूस लाख माणसांत आपल्यासाठी विशेष व्यक्तिमत्त्व असतं. त्याची प्रत्येक साधी गोष्टही आपल्याकरिता खास असते, हे त्या बाहुलीनं नकळत रुजवलं.
आई गातच असते...
"मी तिजसह गेले माळावर खेळाया
मी लपुनी म्हटले साई-सूट्यो या या
किती शोध-शोधली परी न कोठे दिसली
परतले घरी मी होऊन हिरमुसलेली"
आईच्या आवाजात नकळत हिरमूसलेपणा येई. आम्हाला शब्दांचे अर्थ ती असे पोहोचवायची. बाहुली म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून आपल्याला सर्वाधिक प्रिय असणारी व्यक्ती हे समजून आलं. इतकी लाडकी की तीच व्यक्ती आपल्यासाठी सर्वस्व! मग दु:खंही त्याच्यासोबतच वाटायची, सुखंही! त्याच्याचबरोबर सगळे खेळ...
असेच खेळ खेळता खेळता माळावर हरवलेली बाहुली सोडून हिरमसून परत आलेली ती, मला आईत दिसू लागे. ह्या वेळेपर्यंत द्वाडाला चांगली ग्लानी येई... आईच्या मांडीचा झुला थांबला, तर तो उठेलच आणि बाहुलीचं पुढे काय झालं हे माझ्या डोळ्यातलं कुतुहूल ओळखत आई गाऊ लागे......
"वाटते सारखे जावे त्याच ठिकाणी
शोधूनी पहावी पुन्हा पुन्हा ती चिमणी
जाणार कशी पण पाऊस संततधार
खल मुळी न तिजला वर झोंबे फार"
आपलं लाडकं माणूस जे कदाचित आपल्यापेक्षा जरा दुबळं आहे, ते फार व्यक्त होऊ शकत नाही.. कुठे हरवलं तर घरी परतू शकत नाही अशा त्या माणसाला शोधायला पुन्हा आपणच निघायला हवं हे रुजलं. पण एखादवेळी तुमच्यावरही पावसाळी मर्यादा येऊन पडतात, तेव्हा संयम अंगी बाणवत उघड पडेपर्यंत तग धरायची असते... हे ही समजलं.
आईच्या शब्दांत, डोळ्यांत मूर्तीमंत कारुण्य उभे राही आणि दररोज हेच गीत ती इतक्या संवेदनशील हृदयाने गाऊ शकते पाहून, मातृत्व उसनं घेता येत नाही ते जन्मतः काळजात असावं लागतं, कळू लागे..
पुढच्या ओळी गाण्याआधी तिचे डबडब डोळे, तिला तिच्या मांडीचा झुला थांबायला भाग पाडत मात्र हाताने द्वाडाच्या कपाळावर धरलेला थोपटण्याचा ताल सुटलेला नसे.... डोळ्यातली डबडब शब्दांत येई..
" पाऊस उघडता गेले माळावरती
गवतावर ओल्या मजला सापडली ती
कुणी गेली होती गाय तुडवूनी तिजला
पाहुनी दशा ती रडूच आले मजला
मैत्रिणी म्हणाल्या काय अहा हे ध्यान
केसांच्या झिपऱ्या रंगही गेला उडून.....
आता तिच्या आवाजात प्रचंड दु:ख दाटून येई... खेळण्याच्या, गमतीच्या नादात माझ्या माणसाची दशा झाल्याचं दु:खं, नको त्या वेळी पावसाने का दाटून यावं, ह्याची तक्रार आणि गाईने जरा पाहून पावलं टाकू नयेत का ह्याचा त्रागा तिच्या आवाजात उमटे. तिची सुंदर रुपवान बाहुली परिस्थीतीच्या एका फटका-याने रंगहीन झाल्याची खंत तिच्या आवाजात झिरपे...
द्वाड मात्र ह्या कडव्यापर्यंत नेहमीच झोपलेला असे आणि मी नकळत्या वयात आईचे डोळे पुसू लागे.
मग मला अगदी घट्ट जवळ घेत. माझे केस मागे सारत, आयुष्याचा फार मोठा संदेश ती तिच्या कारुण्यपूर्ण आवाजातून सांगे...
".... पण आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली माझी, माझी म्हणुनी..."
एकदा एखाद्याला आपलं म्हटलंस ना, मग ते आहे तसं आपलंच राहतं. त्याला कधी म्हणून सोडायचं नाही.
हाच तो संदेश आईच्या साश्रू डोळ्यांत मी लाख वेळा वाचलाय. पुढे आम्ही मोठे झालो. आई तिच्या कामात मग्न असताना हळूच हे गुणगूणू लागे, आम्हीही तिला साथ देऊ... आमचं अनुभवविश्व पसरू लागलं तेव्हा एक एक कडवं जगण्यातून हे असं समजत गेलं..
आज आईने तिच्या आवाजात ही कविता रे़कॉर्ड करून पाठवली, म्हणाली "माझी आठवण जपून ठेव"...
तिच्या आवाजात त्या कडव्यांशी आजही डबडब येते...
-बागेश्री देशमुख
छान लिहीलय. माझीपण ही आवडती
छान लिहीलय. माझीपण ही आवडती कविता. माझ्या मुलांना, भाचेमंडळींना इतक्यांदा ऐकवली की त्यांचीही पाठ झालीये.
मस्त लिहिलंय माझी ही फार
मस्त लिहिलंय माझी ही फार आवडती कविता आहे ही
मस्त लिहीलंय.
मस्त लिहीलंय.
अग काय सुरेख लिहून गेलीस.
अग काय सुरेख लिहून गेलीस. ही कविता पूर्ण पहिल्यांदाच वाचली.
माझ्या घरात सासरी आणि माहेरी
माझ्या घरात सासरी आणि माहेरी सुध्दा सगळ्यांची खुप आवडती कविता. माझी आई म्हणायची आम्हांला दोघी बहीणींसाठी, आता माझ्या मुलासाठी पण म्हणते. माझे सासरे पण म्हणायचे.
खुप छान लिहिलं आहे.
कविता माला वाटतं इंदिरा
कविता माला वाटतं इंदिरा संतांची आहे .
कित्ती दिवसांनी दिसते आहेस
कित्ती दिवसांनी दिसते आहेस बागेश्री !!!
मधल्या काळात ---- कविता नाही, ललित नाही, लेख नाही .......... ???
आणि आज अचानकच "लाडकी बाहुली"च्या खाली "बागेश्री देशमुख" वाचल्यावर लक्षात आलं....
मस्त लिहिलंस...... लिहित जा, थांबू नकोस...
शिर्षक वाचून हिच कविता आठवली.
शिर्षक वाचून हिच कविता आठवली. छान लेख.
बालपणीची आवडीची कविता
किती सुरेख लिहिलंय.. तुमच्या
किती सुरेख लिहिलंय.. तुमच्या आईचे भाव अगदी डोळ्यापुढे उभे राहिले.
हि कविता आज प्रथम ऐकली (वाचली)..परंतु पहिल्याच वेळी इतक्या सुंदर रसग्रहणासह वाचायला मिळाली तुमच्यामुळे.
धन्यवाद शशांक
धन्यवाद
शशांक
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
आई गं... बागेश्री, किती सुरेख
आई गं... बागेश्री, किती सुरेख लिहिल आहेस. अगदी पहिल्या वाक्यापासून पकड घेतलिये.
<<पण मग मी ताई असल्याने, मी लहानपणीही मोठी होते... ही त्या दिवसांची गोष्ट!!>>
शशांक म्हणतोय ती तूच का? खूप दिवसांनी तुझं काही वाचलय. लिही गं.. लिहीच
सुरेख लिहिलयं!
सुरेख लिहिलयं!
नमस्कार दाद, होय .. तिच
नमस्कार दाद, होय .. तिच बागेश्री
तुमचा इमेल आयडी माझ्याकडे नाही आता, नाहीतर "आठवण आली म्हणून" एखादा इमेल नक्कीच आला असता तुमच्यापर्यंत...
सुरेख लिहीले आहे. करुणा रस
सुरेख लिहीले आहे. करुणा रस प्रधान लिखाण आहे. आवडले.
Mast lihilay...kavita pan
Mast lihilay...kavita pan khaas ch...
किती सुरेख लिहीले आहे खरच!!
किती सुरेख लिहीले आहे खरच!! डोळ्यात पाणी आले.
>>>>>>>मातृत्व उसनं घेता येत नाही ते जन्मतः काळजात असावं लागतं, कळू लागे..>>>>>>> आहाहा!!
खुप खुप सुंदर लिहिलय, खरच
खुप खुप सुंदर लिहिलय, खरच डोळे पाणावले.
छान लिहीलय, माझी अतिशय आवडती
छान लिहीलय, माझी अतिशय आवडती कविता . मलासुद्धा हि कविता म्हणताना फार रडू येतं. अत्ता सुध्दा डोळे भरून आले.
मधल्या काळात खुप शोधली हि कविता, तशी पाठ होती पण मधली काही कडवी आठवत नव्हती. मैत्रिणीच्या आईने लिहून दिली पूर्ण कविता.
मी अत्ता गुगल केलं तर आठवणीतल्या कवितांमध्ये हि शांता शेळके यांच्या नावानेच आहे. आता माझा ही गोंधळ होतोय कि नक्की कोणाची.