उंदिरायण
आमच्या घरात एक उंदीर शिरला. तो फारच Happy- Go- Lucky स्वभावाचा होता. आनंदाने चूं चूं असे गाणे गात तो घरभर हिंडायचा. खेळायचा. खाऊन पिऊन सुखी रहायचा. लपाछपी हा त्याचा अत्यंत आवडीचा खेळ. त्याच्या दृष्टीला बहुधा प्रकाशाचा त्रास होता. दिवसापेक्षा रात्री तो अधिक चपळ वावरू शकायचा. आधी तो फार धीट नव्हता. पण आमच्या घरातली माणसं कनवाळू आहेत हे त्यालाही पटले आणि तो आम्हाला वॉशिंग मशिनच्या खालून ते सोफ्याच्या सांधीत असे धावून दाखवू लागला. तो बहूधा अटेंशन सीकर सुद्धा असावा. कारण "अले, लब्वॉड किती चान पलतो ले" असे आम्ही कुणीच कौतुक न केल्याचा राग, तो सोफा इत्यादि कुरतडून व्यक्त करायचा.