न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!!
----------
न्यूझीलंडला जायचं तर नेचर-टुरिझमसाठी, असं तिथे जाऊन आलेल्यांकडून ऐकलेलं होतं. आमचंही नेचर वॉक्स, जंगल-ट्रेल्स, समुद्रकिनारे यांनाच प्राधान्य होतं. मानवनिर्मित स्नो-वर्ल्ड, डिज्नी-वर्ल्ड, अम्युझमेंट पार्क्स असल्या गोष्टींवर आम्ही आधीपासूनच फुली मारलेली होती. मात्र जगभरात केवळ न्यूझीलंडमधेच अस्तित्त्वात असणार्या काही नैसर्गिक गोष्टी असू शकतात, त्यांचा शोध घ्यावा, हे काही डोक्यात आलेलं नव्हतं. तो उजेड पडला TripAdvisor मुळे.
माओरी - हे न्यूझीलंडचे आदिवासी, हे शाळेत असताना कधीतरी वाचलेलं लक्षात होतं. दूर जगाच्या एका कोपर्यातल्या चिटुकल्या देशातल्या आदिवासी लोकांशी या पलिकडे आपला का म्हणून संबंध यावा? नाही म्हणायला माओरींशी आपल्याकडच्या क्रिकेटप्रेमींचा आणखी एक बारीकसा संबंध मानता येईल. न्यूझीलंडचा एक बॅट्समन रॉस टेलर माओरी वंशाचा आहे हे आपण ऐकत आलेलो आहोत. तरी आम्ही न्यूझीलंडला जायचं ठरवलं तेव्हा तिथले माओरी काही विशेष डोक्यात नव्हते.
चहा, क्रिकेट आणि रेल्वे! ज्या ट्रीप मधे हे मुबलक व सहज दिसेल्/मिळेल त्या ट्रिप बद्दल मला जरा जास्तच उत्सुकता असते. न्यूझीलंडला जायचे ठरल्यावर याचा रिसर्च लगेच केला. चहा तेथे सहज मिळतो असे कळाले, क्रिकेटबद्दल माहिती होतेच. रेल्वे फार नाहीत असेही कळाले. पण एक दोन प्रवास चांगले आहेत ही माहिती मिळाली.