चहा, क्रिकेट आणि रेल्वे! ज्या ट्रीप मधे हे मुबलक व सहज दिसेल्/मिळेल त्या ट्रिप बद्दल मला जरा जास्तच उत्सुकता असते. न्यूझीलंडला जायचे ठरल्यावर याचा रिसर्च लगेच केला. चहा तेथे सहज मिळतो असे कळाले, क्रिकेटबद्दल माहिती होतेच. रेल्वे फार नाहीत असेही कळाले. पण एक दोन प्रवास चांगले आहेत ही माहिती मिळाली.
क्रिकेटबद्दल तर प्रचंड उत्सुकता होती. लहानपणीपासून पहाटे ३-४ वाजता उठून पाहिलेल्या मॅचेस, चौकोनी/पंचकोनी मैदाने, अत्यंत क्लिअर कव्हरेज, आणि भारतीय वन डे क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणारी सचिन ची एक इनिंग हे सगळे न्यूझीलंड मधल्या क्रिकेटशी निगडीत झालेले होते. त्यामुळे जाऊ तेथील स्टेडियम्स पाहण्याचा प्रयत्न करायचा हे नक्की होते.
या ट्रीप मधे तेथील निसर्गसौंदर्य बघणे हा मुख्य प्लॅन होता, तरीही जमेल तेव्हढे क्रिकेटबद्दल पाहायचे हे ही डोक्यात होतेच. येथे बहुतांश क्रिकेटबद्दल लिहीत आहे. तेथील इतर फोटो व माहिती दुसर्या लेखात टाकेन.
ख्राइस्टचर्च मधे २०११ साली मोठा भूकंप झाला. असे म्हणतात की त्यात शहराच्या मध्यवर्ती भागातील ६०-७०% बांधकामाचे नुकसान झाले. अजूनही तेथे अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत.
येथील प्रसिद्ध स्टेडियम म्हणजे AMI Park - जे पूर्वी लँकेस्टर पार्क वा जेड स्टेडियम या नावांनी ओळखले जात होते. याच्याही एका स्टॅण्डचे नुकसान झाले आणि तेव्हापासून येथे मॅचेस खेळल्या जात नाहीत. असे ऐकले की आता ते पुढे वापरले जाणार नाही - बहुधा डिमॉलिश करून टाकणार आहेत. तेथे पुन्हा बांधणार की नाही ते माहीत नाही.
आपण गेली अनेक वर्षे ख्राइस्टचर्चला पाहिलेले सामने येथे होत असत. न्यूझीलंड क्रिकेटचा बराच इतिहास येथे नाहीसा होणार आहे. याचा यापेक्षा जवळून फोटो काढायचे तेव्हा लक्षात आले नाही. जरा घाईत काढला आहे.
मात्र त्याचबरोबर याच शहरात एक नवीन ग्राउंड तयार केले जात आहे. हा लेख लिहीपर्यंत तेथे पहिली कसोटी सुद्धा झालेली आहे (न्यूझीलंड-श्रीलंका). तसेच २०१५ च्या वर्ल्ड कप ची पहिली गेम - याच दोन संघांतली- येथेच होणार आहे. हे ते हॅगली ओव्हल. ख्राइस्टचर्च च्या मध्यावर एक मोठे पार्क आहे - हॅगली पार्क म्हणून. तेथेच बोटॅनिकल गार्डन, अगदी लहान असलेली अॅव्हन नदी, कँटरबरी म्युझियम वगैरे आहे. तसेच ख्राइस्टचर्च मधला हा एक मुख्य टुरिस्ट स्पॉट समजला जातो. अनेक ठिकाणांसाठी जाणार्या शटल्स येथून निघतात. तेथूनच जवळ हे नवीन ग्राउंड आहे. न्यूझीलंडच्या इतर अनेक ग्राउंडप्रमाणेच हे ही तसे लहान आहे.
ख्राइस्टचर्च पासून आर्थर्स पास ला जाणार्या ट्रेन चा प्रवास हा अतिशय सुंदर आहे. आम्ही तेथे गेलो त्याच्या २-३ दिवस आधी त्याच ट्रेनच्या प्रवासात वर्ल्ड कप कॅम्पेन चा एक भाग म्हणून रिचर्ड हॅडली होता. त्याला भेटण्याची संधी थोडक्यात हुकली. सगदी सहज भेट होऊ शकली असती व कदाचित थोडेफार बोलणेही - कारण ही ट्रेन तशी फार मोठी नाही.
अर्थात ख्राइस्टचर्चच्या गोष्टी हुकण्याची माझी हिस्टरी जुनी आहे. सचिन ने २००९ च्या मार्च मधे जेव्हा तेथे सणसणीत शतक मारले होते (१६३*), तेव्हा पुण्यातील काही कारस्थानी लोकांनी मायबोलीवरच्या दोन दिग्गजांचे गटग 'वैशाली' मधे आयोजित केल्याने मी तेथे गेलो होतो - तेथे आणखी काही दिग्गज भेटल्याने ती भेट लांबली, व त्यामुळे हे शतक लाइव्ह पाहणे हुकले होते
असो. आर्थर्स पास वर एक "वॉबली किया" नावाचे कॅफे आहे. आम्ही हाईक करून आल्यावर तेथे बसलो. तर तेथील काउंटरच्या बाजूला एक फ्रेम केलेली बॅट दिसली. नीट पाहिले तर ती सचिन तेंडुलकरची सही असलेली बॅट होती. मात्र तेथील स्टाफ ला विचारले तर त्यांना ती तेथे कशी आली याबद्दल काहीच माहिती नव्हती. कदाचित त्या कॅफेचा मालक क्रिकेट फॅन असावा. तेथे येणारे भारतीय लोक लगेच थबकत व फोटो काढत.
हे तिसरे क्वीन्सटाउन चे. मागे "रिमार्केबल्स" नावाच्या पर्वतरांगा खूप भव्य आणि सुंदर आहेत. त्याच येथे पार्श्वभूमीवर दिसतात. अगदी बाजूलाच क्वीन्सटाउन चे विमानतळ आहे, त्यामुळे मॅच चालू असताना सतत विमानेही जवळून दिसत असतात. क्रिकइन्फोनेही जगातील सर्वात सुंदर मैदान म्ह्णून उल्लेख केलेला आहे याचा. तेथे गेल्यावर ते जाणवते. ही क्लिप पाहिलीत तर तुम्हालाही पटेल (माझी नाही).
मैदान अगदी लहान आहे. येथेच २०१४ च्या सुरूवातीला न्यूझीलंडच्या कोरी अॅण्डरसनने ३६ बॉल्स मधे शतक मारून नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले होते वन डे मधले. क्वीन्सटाउन मधे आम्ही अगदी कमी काळ होतो - फक्त मिलफोर्ड साउण्ड साठी एक दिवस व आधीची संध्याकाळ. हे छोटे गाव व तेथील तळ्याजवळचा भाग फिरायला मस्त आहे.
पण वेळ कमी असल्याने तेथे गेल्यापासून ग्राउंड बघायची संधी मिळत नव्हती. आमची तेथून पुढची फ्लाईटही सकाळी लौकर होती. शेवटी त्याआधी अर्धा तास निघून टॅक्सीच थोडा वेळ ग्राउंडकडे वळवून घेऊ असे ठरले. सुदैवाने आमची टॅक्सी चालक क्रिकेट फॅन निघाली - तिच्या कुटुंबात वडील, नवरा, मुले सगळे क्रिकेटवालेच होते.
ऑकलंडच्या इडन पार्कची लॉर्ड्ससारखी टूर आहे. मात्र ती फक्त सोम-शुक्र असते. आम्ही ऑकलंडला शुक्रवारी ११:३० च्या सुमाराच पोहोचत होतो व रविवारी तेथून निघणार होतो. त्यामुळे हॉटेलवर गेल्या गेल्या लगेच निघालो व इडन पार्कला गेलो. टूरला इतर कोणीच नव्हते त्यामुळे ती गाईड व आम्ही. मात्र याच मैदानावर रग्बीचेही सामने होतात. न्यूझीलंड मधे रग्बी हे क्रिकेट्पेक्षा जास्त लोकप्रिय आहे. त्यात येथेच २०११ मधे येथील "ऑल ब्लॅक्स" संघाने रग्बीचा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे येथे येणारे बहुसंख्य लोक हे रग्बी फॅन्स असतात, त्यामानाने क्रिकेटसाठी येणार्यांची संख्या कमी आहे. गाइड्सही बहुधा रग्बीबद्दलच बोलायला लागेल अशा तयारीत असावेत. त्यामुळे टूरवर गाईड पेक्षा पाहायला येणार्या लोकांनाच जास्त माहिती, असे दुर्मिळ दृश्य आमच्या टूरवर इतर कोणी असते तर त्यांना दिसले असते
या इडन पार्क चे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. याचे कारण १९९४ च्या दौर्यातील ती मॅच. एका मित्राकडे आम्ही ती बघितली होती, ते अजून आठवते. ती मॅच बघितलेल्या बहुतेकांना त्यावेळी आपण कोठे होतो ते अजूनही आठवत असेल, इतर अनेक महत्त्वाच्या मॅचेस प्रमाणे. पहिल्या मॅच नंतर सिद्धू जखमी झाल्याने या दुसर्या मॅच मधे सचिन पहिल्यांदा ओपनिंग ला आला. आणि ४९ बॉल्स मधे ८२ मारून त्याने धुंवॉधार बॅटिंग केली व मॅच जिंकून दिली. त्यानंतर पुढच्या मॅच मधेही तो ओपनिंग ला आला व त्यानंतर थोडे अपवाद वगळता कायम येतच राहिला. वन डे गेम्स ची लोकप्रियता भारतात आणखी प्रचंड वाढण्याचे, त्याचे प्रचंड कमर्शियलायझेशन होण्याचे कारण हा बदल होता असे मला वाटते. कारण सचिन चौथ्या नंबर वर अशी फटकेबाजी करत नसे. तोपर्यंत त्याचे एकही शतकही नव्हते वन डेत. एकूणच या एका इनिंग मुळे प्रचंड फरक पडला असे मला तरी वाटते.
हा फोटो स्टॅण्ड मधून. मधे पिचच्या जागी नुसतेच चौकोनी गवत दिसते. त्याचे कारण म्हणजे क्रिकेट मॅचेस नसल्या की ते पिच उचलून हलवून ठेवतात, व याच मैदानावर इतर गेम्स खेळतात. मग मॅच असली की पुन्हा तो सगळा ठोकळा आणून बसवतात.
हे 'टनेल' - खेळाडू येथून मैदानात जातात. १९६८ साली तेथे जिंकलेल्या सिरीज ची टीम, कप्तान फारूख इंजिनियर, नंतर गावसकर पासून तेंडुलकर पर्यंत अनेक खेळाडू येथूनच बोलिंग फेस करायला गेलेले आहेत!
ही 'चेंजिंग रूम' - ही उभट लांब असल्याने येथे पूर्ण बोलिंग प्रॅक्टिस करण्याएवढी जागा मुद्दाम केलेली आहे. ते बाजूला छोटे कप्पे व त्यावरची नावे ही रग्बी खेळाडूंची आहेत. २०११ साली तेथे रग्बी वर्ल्ड कप जिंकल्यावर कोणत्यातरी स्पॉन्सर कंपनीने प्रत्येकाच्या नावाने एक कप्पा तेथे करून ठेवलेला आहे. तेथे येणारे रग्बी फॅन्स ते हरखून पाहतात असे आमची गाईड म्हंटली. आमची तयारी 'हे सगळे रग्बी खेळाडू आहेत का?' पासून असल्याने आम्ही फार खोलात गेलो नाही
पण एकूण न्यूझीलंड मधे आता क्रिकेट वर्ल्ड कप ची वातावरण निर्मिती खूप जोरात सुरू आहे. ऑकलंड च्या फेरी टर्मिनल जवळ एका ठिकाणी उभारलेले हे विश्वचषकाचे 'काउंटडाउन'!
मस्त रे.. बाकिची माहिती पण
मस्त रे.. बाकिची माहिती पण टाक लवकरच
वा वा मस्त !! १९६८ साली तेथे
वा वा मस्त !!
१९६८ साली तेथे जिंकलेल्या सिरीज ची टीम, कप्तान फारूख इंजिनियर, नंतर गावसकर पासून तेंडुलकर पर्यंत अनेक खेळाडू येथूनच बोलिंग फेस करायला गेलेले आहेत! >>>> अश्या ठिकाणी अगदी असच वाटतं! केश्विनीने पंढरपुरबद्दल लिहिलं होतं, ती भावनाही अगदी हीच !
मस्तच रे. मार्च मध्ये नाही
मस्तच रे. मार्च मध्ये नाही का जाणार ?
मस्त माहिती!
मस्त माहिती!
मस्त सुटसुटीत लेख सचिनची ती
मस्त सुटसुटीत लेख
सचिनची ती इनिंग पुन्हा पाहिली. पहिली पंधरा षटके, क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून, ते देखील सरळ फटके. मला फारशी कल्पना नाही, पण तेव्हा हे कोणाला बघायची सवय नसावी बहुधा. सुरुवात विकेट सांभाळूनच करावी, ३० ओवरमध्ये ज्या धावा होतील त्या उर्वरीत षटकांत डबल कराव्यात असा साधारण हिशोब असायचा. श्रीकांत बहुधा उचलून खेळायचा, पण तो सचिन नसल्याने त्याला मिळालेले मर्यादीत यश या डावपेचाला मर्यादीत यश मिळते या समजास कारणीभूत असावा. पुढे जयसुर्याने तर धुमाकूळ घातला, आणि त्यावर गोलंदाजांना उत्तर सापडेसापडेपर्यंत बरेच हात साफ केले, खास करून भारतीय उपखंडात. माझ्या वयानुसार मला जयसुर्याची फटकेबाजी जास्त आठवते. ९६ च्या वर्ल्ड्कपपासूनची... सचिनला मात्र त्यानंतर फार काळ फटकेबाजीचे फुल्ल लायसन मिळाले नाही, अँकर रोल सुद्धा निभवायची जबाबदारी आली.
१९९४ च्या दौर्यातील ती
१९९४ च्या दौर्यातील ती मॅच.>>> वाह क्या याद दिलाई... मस्तच.
मिनीस्कर्ट म्हणुन हिणवली जाणारी ही मैदाने फार सुंदर आहेत.
न्यू झीलंडची अशी अनोखी ओळख,
न्यू झीलंडची अशी अनोखी ओळख, क्या ब्बात है.
पण तसेही तिथे जनरल पब्लिकला या खेळात फारसा रस नाही. मी अगदी कसोटी काळात तिथे होतो, फारसे काही जाणवत नाही.
चहा जास्त करून श्रीलंकेतून जातो, केनयातूनही जातो आणि अर्थातच चायनाहून !
पुढच्या भागाची वाट बघतोय.
फारेण्डा, लई ब्येस., आपल्या
फारेण्डा, लई ब्येस.,
आपल्या मॅचेस असलेल्या ठिकाणी नवस बोलून आला की नाही.
त्यामुळे टूरवर गाईड पेक्षा
त्यामुळे टूरवर गाईड पेक्षा पाहायला येणार्या लोकांनाच जास्त माहिती, असे दुर्मिळ दृश्य आमच्या टूरवर इतर कोणी असते तर त्यांना दिसले असते <<< हा हा हा!
१९६८ साली तेथे जिंकलेल्या सिरीज ची टीम, कप्तान फारूख इंजिनियर, नंतर गावसकर पासून तेंडुलकर पर्यंत अनेक खेळाडू येथूनच बोलिंग फेस करायला गेलेले आहेत! >>>> अश्या ठिकाणी अगदी असच वाटतं! <<< अगदी!
फा 'ती' मॅच कुठे बघितलेली ते
फा 'ती' मॅच कुठे बघितलेली ते अजूनही आठवतेय नि त्या मॅच नंतर लार्सनचे कॉमेंट्री करतानाचे 'हायलाईट्स ओव्हर' हे उद्गार अजूनही आठवतायत
मस्त लेख! पुढील भागांच्या
मस्त लेख!
पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
मस्त लेख, फा!
मस्त लेख, फा!
सह्हीच! लई आवडली ही
सह्हीच! लई आवडली ही न्यूझिलंडची सफर.
१९९४ साली नव्या संसारात घरात टी.व्ही. नव्हता. पण त्या मॅचचं दुसर्या दिवशीच्या पेपरमधलं वर्णन अगदी मन लावून वाचल्याचं आठवतंय
छान माहितीपुर्ण लेख.
छान माहितीपुर्ण लेख.
मस्त माहिती!
मस्त माहिती!
छान माहिती फारएंड ..... आणि
छान माहिती फारएंड ..... आणि फोटोही. लकी आहात की तुम्हाला फोटो काढायला मिळाले. आपल्याकडे बी सी सी आई च्या धोरणांमुळे भारतीय मैदानांचे आतील फोटो काढायलाच मिळत नाहीत. युएई मध्ये ipl च्या वेळी सुद्धा परवानगी नव्हती .... पुढच्या भागाची वाट पाहतोय ...
छान! पुढील भागांच्या
छान!
पुढील भागांच्या प्रतीक्षेत..
मस्त फोटो आणि लेख.
मस्त फोटो आणि लेख.
धन्यवाद लोकहो. दुसरा भाग
धन्यवाद लोकहो. दुसरा भाग लिहीत आहे. टाकतो लौकरच.
वा ! छान !
वा ! छान !
न्यूझीलंडच्या mataches बघताना या सगळ्या मैदानांच्या प्रेमात पडायला होतं. त्यामुळे हा देश बघायची इच्छा आहे खूप..
"आमची तयारी 'हे सगळे रग्बी खेळाडू आहेत का?' पासून असल्याने आम्ही फार खोलात गेलो नाही", "त्यामुळे टूरवर गाईड पेक्षा पाहायला येणार्या लोकांनाच जास्त माहिती" >>> हाहाहाहा
१९६८ साली तेथे जिंकलेल्या सिरीज ची टीम, कप्तान फारूख इंजिनियर >>>> पतौडी होता ना कॅप्टन