हल्लीच मी आणि अजून काही मायबोलीकरांनीही आपापले युट्यूब चॅनेल्स सुरू केलेत. त्याबद्दल मायबोलीवर सांगावे यास्तव हा धागाप्रपंच. मी माझ्या चॅनेलंबद्दल सांगेन. बाकीचे आपापल्या चॅनेलबद्दल सांगतील.
मी गेले नऊ वर्ष तांब्यापितळ्याच्या तारांपासून स्वतः डिझाईन करून दागिने व कलाकृती बनवते आहे. साडेपाच वर्षे झाली नी याच नावाने माझा छोटासा ब्रॅण्डही आहे तारांचे दागिने आणि इतर वस्तूंचा. काही मायबोलीकरांशी माझा इतर ठिकाणी संपर्क आहे त्यामुळे त्यांना माझ्या या सगळ्या उद्योगांबद्दल माहिती आहेच.
भरपूर उजेड आहे इथे.
इतका उजेड मला झेपेल का?
इतका उजेड मला पुरेल का?
हा उजेड माझा व्हायला हवा.
करू अशी आशा?
आहे मला परवानगी?
की नकोच?
जराशी तिरीप आणि
कुणीतरी तारस्वरात भुंकू लागतो.
कुणी हिडीस नाचत ती तिरीप कापून टाकतो
बरेचसे चोची मारतात
तरीही उजेड हवाय मला.
माझा माझा.
तळघराचा तळ गाठून झाला असावा.
आता बाहेर यायचंय.
हवा, पाणी, उजेड सगळ्यांचाच असतो.
माझा वाटा हवाय.
- नी
(लिखाणातून)
पेशी दुंभगतात आणि जोडून राहतात
असे काही तुकडे.
शिवण घालून जोडले जातात, अंगचेच होतात
असे गोधडीसारखे काही तुकडे.
माझे आणि माझ्या जगाचेही.
जगाचा एक तुकडा माझ्या एका तुकड्याला ओळखतो.
दुसरा दुसर्याला.
जग तुकड्यापुरतं
मीही तुकड्यापुरतीच
अनोळखी तुकड्यांची वाट दिसत नाही,
बघाविशी वाटत नाही
जगाला आणि मलाही.
जगाला मी कळलेली असते आणि मला जग.
- नी
फेसबुकावर एका मित्राने साकुराच्या बहराचा एक अप्रतिम फोटो टाकला होता. आणि कुठले गाणे सुचते असे विचारले. त्यावर मी अतिशहाणपणाने गाणे सुचत नाही. मी स्वतःच काही लिहिन, उधार शब्द नकोत असे बाणेदार उत्तर दिले. तर मित्र म्हणे लिहा लवकर... आता आली का पंचाईत!! मग लिहिले.. ते हे.
----------------------------------------------
स्तब्ध निवळशंख पाणी
बर्फाळ गुलाबी आसमंत
ओलसर स्वच्छ शांतता
पहाटेची वेळ
गार पडलेले नाक
पापण्यांवर झुरझुर बर्फ
तसलेच झुरमुर वय
अशी एक साद घातली होती
तुझा प्रतिसाद
आला
की नाही आला?
आला तर कुठल्या दिशेने आला?
आठवतही नाही..
ती साद आठवते