नटराजा ये करीत तांडव
नटराजा ये करीत तांडव ।
परि हृदयी मम असु दे मार्दव ।।
नटराजा ये दैत्या मारित-
-आतिल, सत्वा ये साकारित ।।
धुधुकारे तव हाती फणिवर ।
शोभे माथ्यावरि रजनीकर ।
नागासम त्या दे चपळाई ।
वृत्ति शांत चंद्रासम देई ।।
नटराजा ये मुक्त जटांनी ।
ऊर्जेच्या अन् विविध छटांनी ।
नटराजा ये सुनृत्यमुद्रा ।
जाळित ये अंतस्थ अभद्रा ।।
डिमडिमतो डमरू तव हाती ।
वामकरी ज्वाळा धगधगती ।
डमरूसम दे यत्न अनाहत ।
ज्वाळेसम शुद्धी अप्रतिहत ।।
नटराजा तव नर्तनमात्रे।
लयास जाती वैश्विक गात्रे ।
नवसृजनास तुझा अभयंकर ।
ब्रह्मयास वरदान परात्पर ।।
नटराजा तव मूर्ति मनोहर ।
पौरुष अन् लास्याची मोहर ।