भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारखं सगळ्या गोष्टींना 'हो हो'+'जी जी' करावं लागतं नाही तर सासूचे व नवऱ्याचे कान फुंकण्यात येतात. ही व्युत्पत्ती असावी कदाचित.

तेलुगुमधे ते बावा किंवा बावागारू (validated by अमा)
हे बहुदा चूक आहे. तेलुगु मध्ये साडू ला वेगळा शब्द नाही असे मला वाटते.

साडू-संशोधन करताना या दोन रंजक म्हणी सापडल्या:

१.सोयर्‍यांत साडू आणि भोजनांत लाडू
२ (माण.) पाहुण्यांत साडू आणि हत्यारांत माडू (घातकी असतो).

माडू-डु
पु. हरिणाच्या दोन जोडलेल्या शिंगांना पोलादी पातीं बसविलेलें हत्यार. म्ह॰ सोयऱ्यांत साडू, हत्यारांत माडू, भोजनांत लाडू.

ओह ओके, धन्यवाद. Happy
इतकं काय करत होते साडू कोण जाणे! Lol

आपल्या बहिणीच्या नवऱ्याला भाऊजी म्हणण्याची प्रथा कोंकणात, गोव्यात आणि कारवारमध्ये आहे. आणि मग तो नवरा सगळ्या गावाचा भाऊजी बनतो. कारण त्याची बायको ही गावातल्या पुरुषांची बहीण मानली जाते.
देशावर जसा दाजी तसा कोंकणात भाऊजी .
आपल्या दिरालासुद्धा भाऊजी म्हणतात. पण हा शब्दार्थ त्या दोघांच्या नात्यापुरताच मर्यादित आहे

इतकं काय करत होते साडू कोण जाणे!
>>
या म्हणीचे मला सुद्धा आश्चर्य वाटले.
लग्नसंबंधांमधून जी नाती निर्माण होतात त्यातली काही प्रथम तर काही द्वितीय दर्जाची असतात.

आपण जर काही प्रथम दर्जाच्या नात्यांचा विचार केला (बायकोचा भाऊ, बहिणीचा नवरा, इत्यादी), तर त्या तुलनेत साडू हे नाते (त्या दोन पुरुषांत) तसे दुय्यम दर्जाचे आहे. सर्वसाधारण अनुभव (अपवाद वगळता) असा आहे, की प्रथम दर्जाच्या नात्यांमधला संघर्ष नेहमी जास्त असतो. जसे आपण दुय्यम आणि तिय्यम दर्जांकडे जातो तसा थेट संघर्ष कमी होत जातो.

म्हणून आश्चर्य वाटले.

'सशक्य' हा शब्द इथे प्रथमच वाचनात आला:
पाकिस्तानशी चर्चा सशक्य आहे?
https://www.loksatta.com/sampadkiya/features/autobiography-of-a-late-dip...

शक्य हा शब्द इथे खरे तर पुरेसा वाटतो. मुळात त्यांना शक्य म्हणायचे आहे की अशक्य ?
सशक्य हे आधुनिक रूप समजायचे की वृत्तपत्रातील नजरचूक ? समजत नाही.

अच्छा, समजले.
सहज एक शंका.
'शक्य' ला जोरकसपणा येण्यासाठी सशक्य असे रूप करता येते का ?

स उपसर्ग लागतो तेव्हा सह असा अर्थ घ्यायचा असतो. सशक्त, सादर (प्रणाम), सालंकृत वगैरे. शक्यतेसह असा अर्थ असेल तर सशक्य ठीक आहे. पण बातमीत तसं दिसत नाही. त्यामुळे इथे सशक्य चूक.

अच्छा, समजले.
.....
असाच एक मजेशीर शब्द अन्य संस्थळावर काहींनी रूढ केला आहे तो म्हणजे
' सवांतर' .
एखादी चर्चा चालू असताना अवांतर आणि संबंधित या दोघांच्या मधली अवस्था ' सवांतर' मध्ये अभिप्रेत आहे.
पण ' सवांतर' भाषेच्या दृष्टिकोनातून योग्य आहे का ते माहित नाही.

हा शब्द मजेशीर वाटला. पण व्याकरणदृष्ट्या चूक आहे. अवांतर हा अव + अंतर असा बनला आहे. त्यात अव हा उपसर्ग आहे. तिथे स वापरायचा असेल तर सांतर होईल. किंवा अवांतरासहित अशा अर्थाने हवा असेल तर सावांतर असा होईल. पण तो काही अवांतरच्या विरुद्धार्थी होणार नाही.

लोकसत्तेच्या काही दिवसांपूर्वीच्या अग्रलेखात (यूपीएससी निकालांबद्दलच्या) स्त्रैण हा शब्द, जो एरवी सामान्यतः पुरुषांसाठी हेटाळणीच्या स्वरूपात वापरला जातो, तो स्त्रीचे गुण, या अर्थाने, feminine या अर्थाने वापरलेला दिसला आणि आधी विचित्र वाटलं तरी नंतर तो बरोबर असल्यामुळे गंमत वाटली.

ह पा, बरोबर !
रच्याक ने ..
संस्थळावरील मजेशीर शब्द अशा अर्थाने तो अधूनमधून वापरायचा Happy

स्त्रैण >>
छान शब्द आहे. नाम म्हणून त्याचा तो मूळचा अर्थ; विशेषण झाले की बाईलबुद्ध्या हा अर्थ.

तसेच त्याचा इंग्लिश प्रतिशब्द
uxorious लॅटिनमधून आलेला असून मजेदार आहे.

हो रच्याकने, विकांत सारखे शब्द मलाही आवडतात. Happy

स्त्रैण, बाईलबुद्ध्या, बायल्या >> आताच्या निरनिराळ्या लिंगभावनांच्या अस्तित्वाचा स्वीकार केल्या जाणाऱ्या काळात हे शब्द अपमानकारक वाटणार नाहीत का? हे अजिबात आवडले नाहीत.

बरोबर.
काही विशेषणांचा कालानुरूप पुनर्विचार केला पाहिजे.

आसंदी

आज प्रथमच हा शब्द वाचला.

आसंदी = सिंहासन/ उच्चासन

आसंदी >> छान.

हे त्याचे अन्य अर्थ :
१. लांकडी चार पायांची घडवंची. ही मोळाच्या दोरीनें विणलेली असते. हिच्या विणलेल्या भागाच्यावर सुमारें हातभर पायांची उंची असतें. सोमयज्ञांतील सोमवल्ली हीवर ठेवतात.
२ (हिं.) खुर्ची; आसन; खाट.

आसंदी >> छानच.

यावरून एक शब्द आठवला 'विष्यंदी'. महाराष्ट्र राज्य विज्ञान परिभाषा कोशात हा आहे. व्हिस्कस फोर्ससाठी विष्यंदी प्रेरक असा शब्द त्यांनी दिला आहे. विष्यंद म्हणजे प्रवाह. द्रव (किंवा वायू) एका जागी स्थिर असेल तर हे बल लागू होत नाही. ते प्रवाही असेल तरच ते बल निर्माण होतं. मुख्यतः प्रवाहाच्या वेगवेगळ्या प्रतलांमध्ये होणार्‍या घर्षणामुळे ते निर्माण होतं. त्यामुळे विष्यंदी हा शब्द त्यांनी दिला असावा. आणि त्यावरून व्हिस्कॉसिटीसाठी विष्यंदिता असाही शब्द तिथे दिला आहे.

'विष्यंदी

विष्यंदिता

नवीन माहिती.

आभार !

दोन शब्द वाचनात आले (लेख प्रकाशन वर्ष १९२३)

१) घबाड- याचा अर्थ मी अवचित / फ़ार प्रयत्न न करता सापडलेली मौल्यवान वस्तू असा समजत आलो आहे. इथे तसा नव्हता.

२) गर्भध - हा शब्द ‘घबाड’ ला समानार्थी वापरला आहे.

दोन्हींचा अर्थ दिला आहे तो असा :

गर्भध = घबाड म्हणजे गर्भ धारण करवण्याचा अवयव, पुरुषाचे लिंग

Pages