भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरकारने जनतेवर बसविलेले कर ही लादलेली गोष्ट असते. कर भरण्यामागे कर्तव्याचाच भाग अधिक असतो; त्यात सहसा आनंद व्हायचे काही कारण नसते !

परंतु हा एक जुना शब्द बघा :
संतोषपट्टी - पुत्रजन्मादि उत्सवानिमित्त राजाने शेतकर्‍यांवर बसविलेला कर.

त्यातला 'संतोष' भाग बघून गंमत वाटली.

वेसकटकुसू हे दोन अपरिचित शब्द घराच्या वर्णनासंदर्भात वाचनात आले :

.. आवाराच्या बाहेरच्या वेसकटीतून आज शिरलं की घराकडे जाणारी पाऊलवाट लागावी .. .. घराच्या आवाराला कुसू घातलेलं असावं ..

वेसकट हा वेशीवरून आलेला शब्द.
कुसू = कुंपणाची भिंत

कुसू = कुंपणाची भिंत

यालाच ‘गडगा’ असेही संबोधन आहे. विशेषतः दगडी कुंपण

एका जुन्या लेखात (छापण्याचे वर्ष १९२३) नोकरी साठी ‘पाइकी‘ असा शब्द वाचला.

ती प्रार्थना आठवली…. ‘पाईक’ होण्याचा मी प्रयत्न करीन !

पाइकी‘ >>> भारी आहे.
फारसी दिसतोय :

पाइकी; पायकी
(स्त्री.) सेवा.
फारसी-मराठी शब्दकोश

वेसकट-कुसू व गडगा - शब्द फार आवडले. अस्सल गावाकडील मातीचा सुगंध आहे त्यांना. डोळ्यासमोर असे कुसू घातलेले कौलारु घर येते ज्याच्या अंगणात आणि परसदारी, प्राजक्त, बेल, नारळ, तगर, मोगरा, सीताफळ आणि पेरु, आवळा लावलेले आहेत.

पाईक म्हणजे सैन्यातला पायिक असावा का? पदाती? सर्वात निम्न स्तरावरचा सैनिक? चाकर?
मग पायकी म्हणजे चाकरमानकी, चाकरमानीपणा वगैरे?

वेसकट-कुसू
>>> हे शब्द आवडलेत तर थोडी भर घालतो.

मी ते शब्द लक्ष्मण लोंढे यांच्या 'कोंदण' या लक्ष्मणझुला पुस्तकात असलेल्या लेखात वाचले आहेत.
आपले घर कसे नैसर्गिकरित्या सौंदर्यपूर्ण असावे, या विषयावरील तो एक उत्कृष्ट लेख आहे.

>>> पाईक म्हणजे सैन्यातला पायिक असावा का? पदाती?
शक्य आहे.

त्यावरून थोडी टॅन्जन्ट मारू का?
काव्य/गायनाशी संबंधित अनेक शब्द पायांशी निगडीत असतात. उदा. (नाट्य)पदं, द्विपदी / अष्टपदी / दशपदी काव्यरचना, (अभंगां/ओव्यांचे) चरण - हे कशामुळे असेल?
मुळात 'संगीता'त 'गीतं च वाद्यं च नृत्यं च' या सर्वांचा समावेश असल्यामुळे असेल का?

पदाति याचे त्यांनी दोन्ही अर्थ दिलेत:
पदाति = A foot-soldier, a pedestrian.
(वझे शब्दकोश)
...
शब्दरत्नाकरनुसार मूळ संस्कृत शब्द पादिक आहे
>>>> पाईक, पाइकु

पद म्हणजे पाऊल. पद्य म्हणजे स्टेप बाय स्टेप पुढे चालत अथवा सरकत रहाणारी साहित्य रचना. गद्याला अशा पायऱ्या पायऱ्या नसतात. ते सरळ एका रांगेत सगळे शब्द कोंबून तयार केले जाते. छंदोबद्ध किंवा वृत्तबद्ध काव्याचे तसे नसते. त्यात स्टेप्स म्हणजे पदे असतात. म्हणून एकपदी, द्विपदी, चतुष्पदी, अष्टपदी असे प्रकार निर्माण झाले. चतुष्पदीचे चौपाई झाले. तुलसी रामायणातला प्रसिद्ध काव्यालंकार.
ध्रुवपद म्हणजे अढळपद. ते असतेच. सुरुवातीला, कडव्याच्या शेवटी वगैरे.
धृपद गायकीमध्येही स्थिरता अपेक्षित आहे. लंबी बिलंपत, पुष्कळसा भाग तालवाद्याशिवायची धीमी आलापी वगैरे.

होय, छंदोबद्ध किंवा वृत्तबद्ध काव्यालाच हे लागू होतं हे खरं आहे.
(कारण त्यात 'कडवे'पणा आहे - हा विनोद करायचा मोह टाळते आहे. Lol )

आणखी एक टॅन्जन्ट मारू का? विठ्ठलाचे 'समचरण' म्हणतात त्याचा अर्थ काय?

विठ्ठलाच्या मूर्तीचे दोन्ही पाय एकमेकांना लागूनच आहेत म्हणून त्याला समचरण म्हणतात माझ्या आठवणीप्रमाणे. मूळ मूर्ती पंढरपूर ची की माढ्याची यावर बराच वाद झाला होता असे आठवते. रा चिं ढेरे यांच्या पुस्तकातही आहे. वरदा जास्त सांगू शकेल.

कडवेपणा! Lol
समचरण मुद्रा आणि त्रिभंगी देहुडा अशा दोन मुद्रा आहेत. समचरण म्हणजे दोन्ही पाय सरळ ठेवून आणि शरीरही सरळ ठेवून.
दुसरी मुद्रा श्रीकृष्ण बासरी वाजवताना उभा असतो तशी. उजवा पाय डाव्या पावलावरून डाव्या बाजूला नेऊन तळवे टेकवून आणि टाचा अधांतरी ठेऊन शरीराला तीन ठिकाणी बाक देऊन - गुढगे, कंबर आणि खांदे हे परस्परविरुद्ध दिशांना वाकवलेले - म्हणून तो बांका, बांके विहारी, त्रिवक्र, त्रिभंग देही .
ओडिसी आणि भरत नाट्यम् नृत्यांमध्ये ही मुद्रा अधिक दिसून येते.

'समचरणा'बद्दलच्या माहितीसाठी धन्यवाद. Happy

>>> मेग्लोमेनिया साठी ‘महत्वोन्माद’ असा शब्द वाचला.
'दर्प' शब्द याच अर्थी वापरतात ना?

सूक्ष्म भेद करता येईल :

दर्प ( Pride. Boldness, daringness)
१ गर्व. २ धीटपणा; धाडसीपणा; बेगुमानपणा; साहस; निधडा उत्साह.

उन्माद (extravagant conceit)
१. उध्दटपणा; माज. (विद्या, संपत्ति इ॰ योगें). २ धुंदी; कैफ. (मादक पदार्थांमुळें येणारा) ३ भ्रम; वेड;

Megalomania
= a delusional mental illness that is marked by feelings of personal omnipotence

Megalomania उन्मादच्या अधिक जवळ जातो असे वाटते.

Megalomania - दंडेलशाही?
कोणाला उद्देश्युन असा प्रश्न नाहीये. कोणीही उत्तर देउ शकते अथवा दुर्लक्ष करु शकते. माझे स्वगत आहे.

Megalomania कडे मनोविकार या दृष्टिकोनातून बघावे असे मला वाटते.
दंडेलशाही कुठलाही (नॉर्मल ) माणूस देखील करू शकेल.

होय,
तसे पाहिले तर ते वरचे सगळेच शब्द काही अंशी एकमेकांचे समानार्थी आहेतच

मद म्हणजे (कशाचाही) कैफ (इन्टॉक्सिकेशन). त्यात तो ऑम्नीपोटन्सचा भ्रम असेलच असं नाही. आठवा: मदालसा, किंवा फार कशाला - मद्य! Happy

आता जरा वरच्या व्याख्या बाजूला ठेवून गंमत म्हणून थोडी ऐतिहासिक उदाहरणे पाहू.

१. चर्चिल यांनी भारतासंबंधी जी बरीचशी विधाने केलेली आहेत त्यातून दर्पोक्ती जाणवते, असे मी बरेच लेखांमध्ये वाचले आहे.

२. इथे (https://www.vocabulary.com/dictionary/megalomania#:~:text=Megalomaniacs%.... ) एक नजर टाकली तेव्हा
megalomaniac
म्हणून त्यांनी
चंगीज खान व नेपोलियन यांची उदाहरणे दिलेली आहेत !
(crazy hunger for power and wealth)

एक ऐतिहासिक शब्द वाचला:
शिकम >> सिकम
= पोट; मर्यादित जागा; पोटविभाग; हद्द; क्षेत्र

('फुल्वरीचे मकान फरासिसांचे सिकमांत आहे तें घेऊन बंदोवस्त करावा)

Pages