भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>सवांतर - हा शब्द मजेशीर वाटला. पण व्याकरणदृष्ट्या चूक आहे. अवांतर हा अव + अंतर असा बनला आहे. त्यात अव हा उपसर्ग आहे. तिथे स वापरायचा असेल तर सांतर होईल. किंवा अवांतरासहित अशा अर्थाने हवा असेल तर सावांतर असा होईल. पण तो काही अवांतरच्या विरुद्धार्थी होणार नाही.
@हर्पा धन्यवाद. इतके दिवस मला 'सवांतर' हा शब्द मूळ खरा किंवा शुद्ध शब्द आहे, असे वाटे. हा कोणाच्या तरी टाळक्यातून निघालेला अशुद्ध (= व्याकरणदॄष्ट्या चूक) शब्द आहे हे आज कळले. आजपासून सवांतर बंद. फक्त अवांतर चालू Wink

मला वाटते भाग बोस डी के नंतर भाग हा शब्द काही काळ पडद्यामागे गेला होता. >> हा प्रतिसाद हीरा यांच्याकडून येणं अगदीच अनपेक्षित आणि सुखद होतं. Happy

!

‘ओंजळ’ साठी अंजलि व पसा हे दोन शब्द सर्वपरिचित.
अजून एक वेगळा शब्द प्रथमच वाचनात आला तो म्हणजे साक.

परंतु साकच्या बाबतीत शब्दकोशांमध्ये थोडी अर्थभिन्नता दिसते.

1. दातेंनी पसा साक यांना समानार्थी दिलेले आहे.

परंतु,
2. मोल्सवर्थनुसार साक ही (एका) हाताची ओंजळ , तर वझेनुसार पसा ही दोन हातांची ओंजळ.

(तसेच, साक = व्यापारी पत, अब्रू हे अन्य अर्थ).

‘जाया’ याला दोन भिन्न अर्थ आहेत.
नाम म्हणून ते संस्कृतमधून आले आहे तर विशेषण म्हणून अरबी-फारसीतून :

१. (सं) बायको, विवाहित स्त्री, भार्या.
२ (फा) वि० जायबंदी, निरुपयोगी.
(मूळ अरबी : झाइअ)

गदिमा लिखित “लळा जिव्हाळा शब्दच खोटे” या गाण्यातली,
‘कोण कुणाची बहीण भाऊ पती पुत्र वा जाया’

ही ओळ फारच सुरेख आहे. त्यात सुधीर फडके यांनी जाया शब्द फारच गोड उच्चारला आहे.

ट्विटरवर एकाने हेवी ब्रेकफास्ट हे पाश्चात्य खूळ आहे. आपल्याकडे ब्रेकफास्टची पद्धत नाही. आपल्याकडे ब्रेकफास्टसाठी शब्दच नाही ; असे तारे तोडले. तिथे त्याला कोणीतरी निहारी हा शब्द सांगितला. हा शब्द नहार (=सकाळ) या अरबी शब्दावरून आला.
त्यावरून मला न्याहरी हा शब्द आठवला. नाश्ता या शब्दाचा अर्थही सकाळचे खाणे असा आहे.

तुम्ही 'जाया' शब्दाबद्दल लिहीले आहे. त्यावरुन एक आठवले -

जायते म्हणजे जन्म घेते असा एक अर्थ आहे.

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति
- गणपती अथर्वशीर्ष

जायते ह्यातला मूळ धातु जन् हा आहे. जन् जायते असेच पाठ करावे लागते. फक्त भविष्य काळाच्या रूपात जनिष्यते असा मूळ धातूचा बोध होऊ शकतो.
कदाचित जाया म्हणजे जन्म देणारी, पत्नी
जनक, जननी हे शब्द पाहावे.
जात ( उच्चार जागृतीतल्या ज सारखा) म्हणजे जन्मलेला/ ली/ ले.
जन् ह्या धातूचे P I E रूप हे स्था सारखेच संपूर्ण इंडो एशियन, इंडो युरोपीय विश्वात वेगवेगळ्या रूपात पसरले आहे. generate, genetic, genesis, gene वगैरे.
To be born असा थोडा प्रयोजक कर्मणि अर्थ आहे.

पण ह्या विषयी खात्री नाही. >> +१
जायापती = नवराबायको; दांपत्य
असाही शब्द आहे.

https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE

वरील संदर्भात चारही प्रमुख शब्दकोश बायको असाच प्रथम अर्थ देत आहेत. बाळ झालेली स्त्री असं त्यापैकी कोणीही म्हणत नाही.

एक गंमत आहे.
जन् शब्दापासून निघालेले शब्द बोलताना किंवा वाचताना एक आध्यात्मिक अर्थछटा लक्षात येते.( यावी.)
मी जन्मलो हे मराठीत, पण संस्कृत मध्ये अहं जात: मला जन्म दिला गेला अथवा मिळाला. मी कर्ता नाही.
atharvSheerShaatahee तुझ्याकडून निर्मिले जाते असा अर्थ समजावा. मुळात अथर्वशीर्ष ही गणपती गजाननाची स्तुती नव्हती.
महादेवाची ( देवांचा देव, परम ईश्वर) स्तुती आहे. मुळात तसेही नाही. रुद्रादि गणांच्या अधिपतीची स्तुति आहे. तो कोणी एक निर्गुण आहे, त्याची स्तुति आहे.
गणपती गजाननाचे रूप कल्पून त्याच्याशी ती प्रार्थना जोडली गेली.
असो. शब्दविश्वात इतस्ततः विहार करायची माझी खोड काही जात नाही. ( इथे जात हा जाणे वरून निघालेला मराठी शब्द). थोडंसं tresspassing! परवानगीशिवाय केलेलं!

हीरा, वरील पूर्ण पोस्टशी सहमत. गणानाम् त्वाम् गणपतिम् हवामहे - हा श्लोकही रुद्राबद्दल/ गणांच्या अधिपतीबद्दल आहे. फक्त मी कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून हे आजकाल सांगायचं टाळतो. एका मित्राला सांगितलं होतं तो अनुभव फार वाईट होता. शिवाय सर्वदेवनमस्कार: केशवं प्रतिगच्छति असल्यामुळे एका देवाचा नमस्कार दुसऱ्याला करायला काहीच हरकत नाही.

>>> जन् शब्दापासून निघालेले शब्द बोलताना किंवा वाचताना एक आध्यात्मिक अर्थछटा लक्षात येते.( यावी.) मी जन्मलो हे मराठीत, पण संस्कृत मध्ये अहं जात: मला जन्म दिला गेला अथवा मिळाला. मी कर्ता नाही.

इन्टरेस्टिंग! धन्यवाद, हीरा.

हपा, याही कारणावरून कोणाच्या भावना दुखावू शकतात हे वाचून थक्क झाले.
तरी एक सिमिलर अनुभव (राजकारणासंबंधीत मत मांडण्यावरून) नुकताच घेतला आहे. या कारणासाठी नाती तोडत नाही आपण, पण असा चॉइस करावा लागणं हे किती अनफेअर आहे!

हीरा, पोस्ट आवडली. Happy
हर्पा, अरेरे. मूळ अर्थ किती सुरेख आहे खरंतर. आजकाल नवीन विचार-वेगळा दृष्टिकोन समजून घेण्याची क्षमता कमी कमी होत चालली आहे. पोस्टशी सहमत आहे.

सोनाराकडील एका उपकरणाचे नाव नुकतेच वाचनात आले. त्याला बरीच पर्यायी नावे अशी आहेत :
काकता / काकणता/ कांकणा/ ओताणा/वरताणा
अर्थ:
गोठ, पाटली, आंगठी, वाकी, किंवा यासारख्या दागिन्यास गोल आकार देण्यासाठीं केलेला खुंटा.

हा प्रत्यक्ष कोणी पाहिला आहे का ? मला चित्र नाही सापडले. आधुनिक सराफांकडे असतो का?

साक = व्यापारी पत, अब्रू
हिन्दी “साख” - अर्थ तंतोतंत

साक ही (एका) हाताची ओंजळ , पसा = दोनची हे नवीन समजले

हिन्दी “साख” - अर्थ तंतोतंत >>> अच्छा.
..
आता थोडी गंमत बघा.
साकी चे विभिन्न अर्थ पाहून अचंबा वाटेल :

* पत
* दारूचा पेला भरून देणारा (गुत्त्यांतील) पोर्‍या. [अर.]
* वि. (जुन्नरी) मागचे दोन पाय घोट्याखालीं पांढरे असणारी (मेंढी).
* एक मराठी वृत्त.

https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80+

.. चक्रीवादळाचे Biparjoy (Biporjoy) हे नाव बंगाली भाषेतील आहे….

लिहायचे राहिले, संस्कृत चा ‘विपर्यय’ आहे तो शब्द. ध्वस्त करणारा.

बंग उच्चारावरून माध्यमांनी बिपरजॉय प्रचलित केले आहे.

मागे नैऋत्य की नैरृत्य अशी चर्चा झाली होती. लष्कराच्या भाकर्‍या धाग्यावरून पुन्हा हा प्रश्न माझ्या डोक्यात घोळायला लागला होता. तिथलाच माझा प्रतिसाद इथे देतो आहे. ऋ या स्वरावर रफार देणं काही मला पटत नव्हतं. त्याबद्दल थोडं -

(पूर्वसूचना - खाली मी नैरृत्य/निरृति शब्दांत ऋ वर रफार दिला आहे. परंतु काही ब्राउजर/ऑपरेटिंग सिस्टिम्सवरती वाचताना तो र ला खाली ऋकार काढल्यासारखा दिसण्याची शक्यता आहे. तो तुम्हाला तसा दिसला तर कृपया तिथे ऋ वर रफार दिला आहे अशी कल्पना करा.)

थोडा शोध घेतला. मूळ शब्द आहे निर्ऋति = निस्/निर् + ॠति. तिची दिशा म्हणजे नैरृत्य.
निरृति - अर्थ - निर्गता ऋति: यस्मात् सा (जिच्यातून 'ऋति' निघून गेली आहे अशी). आता ऋतीचे बरेच अर्थ विकीवर आहेत - गती, स्पर्धा, निंदा, मंगल/कल्याण इ.
निरृति = अलक्ष्मी अश्या अर्थाने ऋग्वेदात हा शब्द आला आहे. ऋग्वेदनिर्मितीचा काळ आणि त्यातली भाषा पाहता हे आर्षरूप (शब्दशः आर्ष म्हणजे ऋषींचं) असणार. आर्ष संस्कृत हे पाणिनी/पतंजली यांच्याही पूर्वीचं आहे. त्याकाळी व्याकरणाचे नियम एवढे पक्के झालेले नव्हते. मूळ शब्द निरृतिमध्येच ऋ वर रफार असल्याने त्यापासून बनलेल्या नैरृत्य शब्दातही तो रफार तसाच्या तसा ठेवला जातो.

नवीन नियमांत स्वरांवर रफार येत नाही. (ऋ हा 'अ आ इ ई ..' प्रमाणे एक स्वर आहे)

( वरील प्रतिसादानुसार माझाही तिकडचा प्रतिसाद इथे पुन्हा डकवत आहे. म्हणजे पुढची चर्चा इथे करता येईल).

उत्तम विवेचन ! आता समजले.

रच्याकने...
बोलून टंकन करण्याच्या पद्धतीत तो शब्द' ' नैऋत्य' असाच उमटतो ; डोक्यावरील रफार नाही.
बऱ्याच प्रकारे उच्चारून पाहिले. Happy

खूप छान माहिती हपा.
निरृति = अलक्ष्मी
इथे अलक्ष्मीचा अर्थ काय? लक्ष्मी (धन/इतर समृद्धी)नसणे /त्यागणे?

धन धान्य समृद्धी - अश्या हव्या असणाऱ्या गोष्टी म्हणजे लक्ष्मी आणि दारिद्र्य, कष्ट, दुःख वगैरे नको असणाऱ्या गोष्टी म्हणजे अलक्ष्मी. श्रीसूक्तात क्षुत्पिपासामलाम् ज्येष्ठाम् अलक्ष्मीम् नाशयाम्यहम् असं म्हटलं आहे. म्हणजे क्षुधा-तहान इत्यादींनी लिप्त अशा, (लक्ष्मीची) मोठी बहीण (ज्येष्ठा) अलक्ष्मीचा मी नाश करतो/करते.

बाकी ह्याला आर्य/आर्येतर, सवर्ण / अवर्ण असे बरेच कंगोरे असल्याचे वाद होत असतात. त्याबद्दल मला फारशी माहिती नाही आणि धाग्याचा तो विषय नाही. त्यामुळे फक्त असे अर्थ असू शकतात इतकंच नमूद करून इथे थांबतो.

>>>>तो कोणी एक निर्गुण आहे, त्याची स्तुति आहे.
होय हीरा अगदी खरे आहे. रोज गणपती function at() { [native code] }हर्वशीर्ष म्हणताना त्या देवतेशी नव्हे तर त्या सर्वव्यापी आत्मरुपाशी, अगदी मूळ व असर्वव्यापी कॉन्शसनेस ची अशी ती प्रार्थना आहे , हे लक्षात ठेउनच म्हटले जाते. मग शैवांकरता तोच शिव, वैष्णवांकरता विष्णु वगैरे वगैरे.

Pages