भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

‘आकरेकनं’ म्हणजे बळकावणं. (मालवणी शब्द)
‘पुस्तकनाद’च्या प्रस्तावनेत असं एक वाक्य आहे:

“आईचं कपाट हळूहळू ‘आकरेकून’ त्यात मी माझी पुस्तकं लावायला लागलो”.

आम्ही सुद्धा आकरेकून नव्हे पण त्याच्या सारखाच आखून रेखून असा शब्द वापरतो आणि त्याचा अर्थ ' व्यवस्थित लावून, पसारा आवरून, प्लॅन करून, नियोजन करून' असा घेतो. काही जुने लोक आखूरेखून असेही म्हणतात.
न्हाऊमाखून, खाऊपिऊन सारखे.

“तुमच्यासारखी घुंगुरटी आमचे काय करणार कप्पाळ ते आहे ठाऊक !”
असे वाक्य वाचनात आले आणि घुंगुरटी या शब्दाचे कुतुहल वाटले.

थेट हा शब्द कोशात नाही परंतु शब्दरत्नाकरमध्ये
घुंघरट आणि घुंघरुट हे दोन समानार्थी दाखवले आहेत.
अर्थ: मच्छर, डास, चिलट.

असा शब्द प्रवास दिसतोय:
घुंरट >> घुंगुरट >> घुंगुरटी (अनेकवचन)..

पांदी शब्दावरून ही कवी यशवंत यांची ही सुरेख कविता आठवली. आमची आई आम्हाला थोपटून झोपवताना जी अनेक गाणी / कविता म्हणत असे त्यात ही होती.

वाट तरी सरळ कुठे, पांदीतील सारी
त्यातून तर आज रात्र, अंधारी भारी
आणि बैल कुठल्याही बुजती आवाजा
किरकिरती रातकीडे, झाल्या तिन्हीसांजा .... अजूनी कसे येती ना, परधान्या राजा

संपूर्ण कविता https://balbharatikavita.blogspot.com/2010/07/blog-post_6699.html इथे वाचता येईल.

दि ' आणि 'क ' घेऊन केलेल्या या दोन अक्षरी शब्दांची गंमत पहा:

दिक् = दिशा
दिक = मर्यादा
दिक्क = खिन्न, चकित, आजारी.

या तीन शब्दांचे उगम अनुक्रमे:
संस्कृत, प्राकृत आणि अरबी. >> वा! हे भारी आहे.

घुंगुरटा शब्दाच्या निमित्ताने

लहानपणी एक गांधीजींची गोष्ट वाचली होती. त्यात कोणीतरी उंदराला मारायला बघत असतं त्याला गांधीजी सांगतात "तुझ्याएवढाच जगण्याचा हक्क त्या घुंगुरट्यालाही आहे." हा घुंगुरटा हा शब्द तेव्हा पहिल्यांदा वाचला होता आणि नवा आणि वेगळा असल्याने लक्षात राहिला.

नुकतेच भारतीय संरक्षण खात्याशी संबंधित एक हेरगिरीचे प्रकरण उघडकीस आले.
त्यातील 'हनीट्रॅप' या इंग्लिश शब्दासाठी मधुमोहिनी हा सुंदर शब्द इथे वाचायला मिळाला:
https://www.loksatta.com/sampadkiya/columns/pune-drdo-scientist-arrested...

काही वृत्तपत्रांनी मोहजाल असे म्हटले आहे. परंतु हा तितकासा योग्य नाही.
मोहजालची अर्थव्याप्ती बरीच आहे:
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%9C%...

gripe या शब्दाचा अर्थ कधी माहीत करून घेतला नव्हता. ग्राइप वॉटर ग्राइप नावाच्या एखाद्या औषधी द्रव्यापासून बनवत असतील असे वाटायचे. आज कळले की टु ग्राइप म्हणजे किरकिर करणे.

बरोबर!
त्याचा वैद्यकीय संदर्भात असाही अर्थ आहे:
to cause pinching and spasmodic pain in the bowels of

बरोबर.
मोठा माणूस वेदनेचे वर्णन करू शकतो.
परंतु लहान मूल तसे करू शकत नसल्यामुळे ते किरकिर करते !

"वकील आणि वक्कस हे दोन, वकार वर्जावेत !"
हे मजेशीर वाक्य वाचले आणि
वक्कस
या शब्दाबद्दल कुतूहल वाटले. शब्दाचा उगम आणि प्रवास असा दिसतोय:

वक्ल् (अरबी) >>> वकल (मराठी)
वक्कस हा बहुधा अपभ्रंश असावा.

वकल= पत्नी, कुटुंब; वेश्या,भडवा
बहुअर्थी शब्द !

https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B2+

सुरक्षिताक्षर

नुकतेच वि. का. राजवाड्यांच्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत वाचले :-

पहिल्या, दुस-या व अठ्ठाविसाव्या पानांवर छिद्रे पडून काही अक्षरे फाटून गेली आहेत. बाकी ग्रंथ एथून तेथून सुरक्षिताक्षर आहे.

सुरक्षिताक्षर शब्द याआधी कधी वाचला नाही.

राजवाड्यांचा
मुमुर्षू
हा शब्द त्याकाळी भलताच गाजला होता.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी 1926 मध्ये "मराठी भाषा मुमुर्षू आहे काय?‘ या शीर्षकाचा लेख लिहिला. त्याचा अर्थ "मराठी भाषा मृत्युपंथाला लागली आहे काय?‘ असा होतो

सध्या राजवाडे वाचतोय आणि तत्कालीन मराठीचे एक वेगळेच रूप समोर येतेय. शब्दांचा वापर, अदलाबदल, अर्थछटा यांच्या बऱ्याच गमतीजमती. विरुद्धार्थी शब्द तर फारच आवडले.

उदा.:

'ओंगळ वि. सोंगळ
मानखंडना वि. मानमंडना
उत्कृष्ट वि. अपकृष्ट
अज्ञ वि. विज्ञ (हे संस्कृत- हिंदी दोन्हीकडे असेच आहे)
सन्मार्गगामी वि. उन्मार्गगामी
महात्मा वि. अल्पात्मा
शुद्ध / सोवळ्यातली वि. उष्टीमाष्टी
इंद्रपद वि. निंद्रपद

अजूनही बरेच शब्द आहेत. आधी अडखळले आणि मग आवडले Happy

Pages