निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋतूराज हे सर्व दिसायला लागेल की मग इतर काही दिसत नाही. तुला हे सगळं दिसत नाहीए तेच बरं आहे. फार विचित्र छंद आहे हा. काही सुचू देत नाही माणसाला. तरीही आपण योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य त्या दिशेला पहात असलो की सर्व काही दिसते.

आजचा दिवस सुरु होताना... ...

गप्पीदास (Asian Stonechat - Male)
हे साहेब सध्या प्रेमात पडलेले आहेत. हळूहळू याचे डोके अधीक काळे होईल व छाती चमकदार शेंदरी होईल.

Female Stonechat
आहे की नाही सुंदर?

ऋतूराज हे सर्व दिसायला लागेल की मग इतर काही दिसत नाही. तुला हे सगळं दिसत नाहीए तेच बरं आहे. फार विचित्र छंद आहे हा. >>> हि बाधा आधीच झाली आहे आता परतीचा मार्ग नाही....

मी येथे Long-tailed Shrike चे फोटो दिले होते. यात Wood Shrike, Brown Shrike, Black-headed Shrike, Isabelline Shrike असे बरेच Shrike आहेत. यातले बरेचसे महाराष्ट्रात आढळतात. आज दिवस संपता संपता मला Bay-backed Shrike दिसला. सकाळीही दिसला होता पण सगळे लक्ष मनोलीवर असल्याने मी याच्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. याला खाटीक का म्हणतात ते ऋतूराजने मागेच सांगीतले होते पण याचे नविन नाव मला फार आवडले. खाटीकला मराठीत अजुन एक नाव आहे 'गांधारी' आणि हे नाव देखील सार्थ आहे. याच्या डोळ्यावर काळी पट्टी असते. (कानूने के ऑंखोपर असते तशी ) या पट्टीमुळे याला गांधारी म्हणतात. काय काव्यमय नाव आहे. पण डोळ्यावर पट्टी असली तरी हा एका झडपेत किड्यांची शिकार करतो.

खालील फोटोत त्याची पाठ बऱ्यापैकी दिसते आहे. या पाठीमुळेच त्याला Bay-backed Shrike म्हणतात.

आणि माझ्या झोळीत भरपुर काही टाकून अजुन एक दिवस मावळला.

हा शिंजीरी सुंदर असला तरी अतिशय त्रासदायक पक्षी आहे. हा तुम्हाला फोटोही काढू देत नाही आणि "मरो तो शिंजीर" असं म्हणून नाद सोडून देवू देत नाही. तुमच्या आसपास इतक्या सुरेख पोझेस देत रहातो की सारखा सारखा कॅमेऱ्याकडे हात जातो. तरीही याचे माझ्याकडे बरेच फोटो आहेत. याच्या पंख साफ करत बसायच्या वेळा मला माहीत झाल्यात आता. तेंव्हा तो बराचसा शांत बसतो.

मराठी नाव: शिंजीर, सुर्यपक्षी
इंग्रजी नाव: Sunbird
शास्त्रीय नाव: Cinnyris asiaticus
आकार: ९ ते १२ सेंटीमिटर.
शिंजीर.jpg

याच्या या पोझवरुन एक आठवले. पुर्वी पोपट पकडण्यासाठी पारधी एक युक्ती वापरत. झाडाच्या एखाद्या लहान फांदीमधे नळी घालून ठेवत. नळीचा व्यास फांदीपेक्षा मोठा असल्याने ती फांदीभोवती फिरू शकते. (पाईप आणि त्यात घातलेले हाताचे बोट असे चित्र डोळ्यासमोर आणा) पोपट या फांदीवर येवून बसला की त्याच्या वजनाने नळी स्वतःभोवती फिरते व पोपट वरील फोटोतील शिंजीरसारखा फांदीला उलटा लटकतो. तो काही केल्या ती नळी सोडत नाही कारण त्याला भिती वाटते की फांदी सोडली तर आपण खाली पडू. मग पारधी येऊन त्याला झाडावरचे फळ तोडावे इतके सजह पकडत असे. याचा उल्लेख ज्ञानेश्वरीत देखील आहे. Lol

अजून एक आठवले. माकड फार चिकित्सक व लोभी असते. पारधी त्याच्या या स्वभावाचा वापर करुन त्याला पकडतो. झाडावर बसलेल्या माकडासमोर तो वारुळाला एक छिद्र पाडतो. त्याचा व्यास माकडाच्या मनगटाएवढा असतो. त्या छिद्रातुन तो काही खाद्यपदार्थ वारुळात टाकतो. माकड हे सर्व पहात असते. पारधी निघून गेला की माकड उत्सुकतेने वारुळाजवळ जाते व त्या छिद्रात हात घालून आत काय आहे ते पहाते. खाऊ आहे हे लक्षात आल्यावर तो मुठभरुन खाऊ उचलतो. पण आता त्याची मुठ भरलेली असल्याने त्या छिद्रातुन बाहेर येवू शकत नाही. कारण त्या बिळाचा व्यास फक्त त्याचे मनगट आत जाईल एवढाच असतो. माकड काही मुठीतला खाऊ टाकत नाही व त्याचा हात काही त्या छिद्रातून बाहेर येत नाही. पारधी जवळ येवून त्याला पकडतो तरी माकड मुठ मोकळी करत नाही. Proud

मग या पकडलेल्या माकडाला पारधी खुप खारट पदार्थ खायला देतो पण दिवसभर पाणी मात्र देत नाही. सकाळी या माकडाला सोडून दिले की तहानेणे व्याकूळ झालेले माकड सरळ पाणवठ्याकडे धाव घेते. त्याच्या पाठलागावर असलेल्या पारध्याला मग स्वच्छ पाण्याचा ठिकाण सापडते. हा प्रसंग Animals Are Beautiful People (१९७४) या डॉक्यूमेंट्रीत अगदी सविस्तर आहे. युट्यूबर आहे.

येथे ती माकडाची क्लिप पहाता येईल.

छान छान म्हणणार नाही असं ठरवले होते,पण शिंजीराची मनोवेधक पोझ टिपलिय की अतिशय छान म्ह्टल्याखेरीज गत्यंतर नाही. Wink

त्याच्या पाठलागावर असलेल्या पारध्याला मग स्वच्छ पाण्याचा ठिकाण सापडते>>>>> माणूस नावाचा वाईट्ट प्राणी!

भावना पोहचल्या होत्या देवकीताई, जरा गंमत केली इतकेच. Happy
जागूताई सध्या बिझी दिसतेय लेखन, फराळ वगैरेमधे.

मराठी नाव: दयाळ
इंग्रजी नाव: Oriental magpie-robin
शास्त्रीय नाव: Copsychus saularis
आकार: १७ ते २० सेंटीमिटर

इंडीयन रॉबिन, बुशचाट यांच्याच प्रजातीचा पक्षी आहे हा. यांचे वैशिष्ट म्हणजे शेपटी वर खाली नाचवत असतात सारखी. हा छान आवाजात शिळ घालतो. विणीच्या हंगामात याचा आवाज जास्त सुंदर होतो.

विणीच्या हंगामात याचा आवाज जास्त सुंदर होतो........आणि तुमचे फोटो जास्त सुंदर येतात
सगळे फोटो आणि माहिती मस्तच

राखी वटवट्या (Ashy Prinia)
याचे एक रहस्य अजुन तज्ञांनाही समजले नाही. हा उडताना फट फट फट असा तिव्र आवाज करत उडतो. हा आवाज तो नक्की कसा काढतो आणि का काढतो हे अजून गुढ आहे. मी खुप एकाग्रतेने अनेकदा तो आवाज ऐकला आहे. मला वाटते उडताना तो पंखांची टोके शेपटीवर आपटत असावा. हा आवाज तो का काढतो ते मात्र खुप विचार करुनही माझ्या लक्षात आले नाहीए. वर्षानुवर्ष न उमगलेली गोष्ट क्षणात समजावी तसे हे गुढ मला कदाचित समजेलही.

वटवट्यांमधे वटवट्या (Plain Prinia ), तांबड्या कपाळाचा वटवट्या (Rufos-fronted Prinia), रानवटवट्या (Jungle Prinia), राखी छातीचा वटवट्या (Grey-breasted Prinia), राखी वटवट्या (Ashy Prinia) या उपजाती आढळतात. वर Ashy चा फोटो दिला आहे. हा Plain Prinia आहे.

साधा वटवट्या
Plain Prinia with kill.
01D10591-97E1-4376-AF81-B0F8400F1635.jpeg

मराठी नाव: ब्राम्हणी मैना, भांगपाडी मैना
इंग्रजी नाव: Brahminy Starling
शास्त्रीय नाव: Sturnia pagodarum
आकार: २० सेंटीमिटर.
1BA3081D-A35D-4581-B43C-76C3E66D67F0.jpeg

पाऊस सुरु व्हायच्या अगोदर हा दिसायला पाहिजे होता, पण पाऊस जाताना पाावशा दिसला. दिवस बदलले हेच खरय. पुर्वी पावशा पाऊस घेवून यायचा आता तो पाऊस घेऊन जाताना दिसतोय. Proud

पावशा, कारुण्य कोकीळा (Grey-billed Cuckoo)

.

वेडा राघू (Green Bee Eater)
याची काही माहिती द्यायची आवश्यकता नाही. हा हवेतल्या हवेत किडे, मधमाशा, फुलपाखरे, चतुर वगैरे पकडतो.
अ)

ब)

क)

2019-10-21 20.38.01.jpg
.
2019-10-21 20.37.56.jpg

मार्टीनची पिल्ले आता मोठी झालीत पण अजून फार भित्री आहेत. लवकरच घरट्याबाहेर येतील. फारच लाजायला लागली तर मी शिडी लावून त्यांचा फोटो काढणार आहे. जरा वेळ घाबरतील एवढच.
B3B6A381-3A5E-4A68-8A31-E87B831B055A.jpeg

Pages