निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझीच एक जुनी पोस्ट इथे डकवत आहे.

मंदार आणि रुई

बरेचदा मंदार आणि रुई ह्या दोन्ही वनस्पतीबाबत संभ्रम निर्माण होतो. काहींच्या मते, या दोन वेगळ्या वनस्पती नसून एकच आहेत, असेही मत दिसून येते. या दोन वनस्पतीबाबतचे फरक व काही लक्षणे नमूद करत आहे.
वनस्पतीशास्त्रीय वर्गीकरणानुसार Calotropis giganteaCalotropis procera अश्या दोन भिन्न वनस्पती मंदार किंवा रुई म्हणून ओळखल्या जातात.
Calotropis ही समान प्रजाती (genus) असून त्यात giganteaprocera अश्या दोन भिन्न जाती (species) आहेत.

Calotropis ह्या शब्दाचा अर्थ:
Kalos (Greek) म्हणजे सुंदर
Tropis (Greek) म्हणजे keel (पाकळीवरील बोटीसारखा भाग)
Gigantea म्हणजे giant, भव्य
Procera म्हणजे procerous (Latin) उंच

दोन्ही वानसाच्या जातीवाचक नावाच्या अर्थावरून भव्य, उंच असा अर्थ निघत असल्याने त्यावरून दोन्हीत फारसा फरक नसल्याचे जाणवते. मात्र, यांच्या फुलांत फरक असतो परंतु, तो फार सूक्ष्म असतो.

Calotropis gigantea याची फुले थोडी मोठी असतात. यात निळसर व पांढरी अश्या दोन्ही रंगाची फुले असतात. या फुलाच्या पाकळ्या किंचित मोठ्या असतात. फुलाच्या पुंकेसराचे व किंजल्काचे मिळून एक अलंकारिक रचना तयार झालेली असते त्यास शास्त्रीय भाषेत Gynostegium असे म्हणतात.
Calotropis procera चा हा भाग किंचित उभट/उंच असतो. Gynostegium व पाकळ्यांना जोडून आणखी एक रचना यात दिसून येते त्यास शास्त्रीय भाषेत corona असे म्हणतात.

Calotropis procera याची फुले Calotropis gigantea जरा लहान असतात. Calotropis gigantea चे corona lobes हे gynostegium पेक्षा किंचित उंच असतात तसेच त्यांचा आकारही थोडा भिन्न असतो. तसेच Calotropis procera चे gynostegium किंचित बसके/ बुटके असते.

बारीक निरीक्षणावरून व gynostegium च्या रचनेवरून दोन वानसांमधे भेद ओळखता येतो

Identification Key:

Calotropis gigantea : Gynostegium उभट (मोदक)
Calotropis procera :Gynostegium बसके (पेढा)

Calotropis .jpgछायाचित्र आंतरजालावरून साभार
आता या वर्णनावरून कोणी रुईला मंदार म्हणत असेल तर कोणी मंदारला रुई.
पण वनस्पती शास्त्रीय दृष्ट्या या दोन प्रजातीतील भेद मी नमूद केले आहेत.
इथे यावर अधिक माहिती कोणाकडे असल्यास नक्की भर घाला.

शिवमानसातले “मंदारपुष्पसुपुष्पपूजीताय” मधले फूल म्हणजे हे होय ? मला मंदार म्हणजे हिमालयातला कुठलातरी भव्य वृक्ष असेल आणि त्याला exotic सुवासाची फुले येत असतील असे वाटत होते Happy my bad.

"कैलासराणा..." शिवस्तुतीत सुद्धा आहे मंदार चा उल्लेख.
मंदार बिल्वे बकुळी सुवासि , माला पवित्र वहा शंकरासि

तसेच मेघदूताचा उत्तरमेघात आहे मंदार वृक्षाचा उल्लेख .....अलकानगरीत पुत्राप्रमाणे वाढवलेला आणि पुष्पाच्या भाराने वाकलेला मंदार वृक्ष आहे दारात.

रुईचा उल्लेख अर्क म्हणून येतो. मारुतीने लहानपणी सूर्य हवा म्हणून त्याकडे झेप घेतली पण तो त्याला प्राप्त झाला नाही म्हणून रुईची म्हणजेच अर्कपत्रे त्याला वाहतात अशीही एक कथा वाचली आहे.

आपण सर्व वाचताय त्याबद्दल धन्यवाद
खर तर ही फक्त तोंडओळख आहे एका वनस्पतीवर सर्वांगांनी लिहायचे म्हटले तर एक एक लेख होईल.

विष्णुक्रांता
विष्णूक्रान्ता.jpgविघ्नराजाय नम:
विष्णुक्रांतपत्रं समर्पयामि।

Evolvulus alsinoides
Evolvulus - लॅटिन अर्थ पिळे नसणारी , सरळ
alsinoides - अलसायींन वनस्पतीप्रमाणे

जमिनीवर पसरत वाढणारी एक लहानशी वनस्पती. हिची पाने लहान, लांबट असतात. फुले निळसर व लहान असतात. तापात तसेच सर्वप्रकारच्या गाठीमध्ये याच्या पानांचा रस वापरतात.

डाळींब
डाळिंब.jpgबटवे नम:।
दाडिमपत्रं समर्पयामि।

Punica granatum
Punica - लॅटिन मध्ये डाळिंब
granatum - खूप बियांचे फळ

सर्वांच्या ओळखीचा एक वृक्ष. पाने बारीक व फुले भगव्या रंगाची फार मोहक दिसतात. डाळींब पित्तशामक आहे. डाळींबाची साल पोटाच्या विकारावर वापरतात. याची साल कृमिघ्न आहे. डाळींब उत्तम रक्तशुद्धीकर आहे.

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार

क्रमशः

देवदार
देवदार.jpgसुराप्रजाय नम:
देवदारपत्रं समर्पयामि।

Cedrus deodara
Cedrus - सूचिपर्णी वृक्षासाठी लॅटिन नाव
deodara - देवदार

भारतात हिमालयाच्या पायथ्याला आणि थंड प्रदेशात आढळणारा वृक्ष. याची पाने सुईसारखी टोकदार असतात. देवदाराच्या लाकडापासून जे तेल काढतात त्याचा अनेक व्याधींमध्ये उपयोग केला जातो. संस्कृत साहित्यात देवदाराचे अनेक संदर्भ सापडतात.

मरवा
मरवा.jpgOriganum majorana
Origanum - ओरेगॅनो सदृश्य वनस्पती
majorana - मरव्याचे लॅटिन नाव

एक लहानसे, सुगंधी झुडूप. याची पाने तुळशीच्या पानासारखी असतात. फुले लहान, पांढरट तर पाने सुगंधी असतात. आयुर्वेदात याचे पंचांग वापरले जाते. ताप, सर्दी, जुनाट व्रण यात मरवा वापरला जातो. याची पाने सुगंधी द्रव्यांमध्ये वापरली जातात.

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार

क्रमशः

धन्यवाद ऋतुराज भेद सांगितल्याबद्दल.फोटोमुळे जास्त चांगले कळले. आतापर्यंत Calotropis procera बघितले नाहीय.
मरवा खूप आवडतो.लहानपणी मरवा केसात माळायचो. आता ठा्ण्यात मरवा मिळतच नाही. दवणा मिळतो पण मरवा मात्र कोणी आणतच नाही.

पिंपळ
पिंपळ.jpgहेरंबाय नम: ।
अश्वत्थपत्रं समर्पयामि।

Ficus religiosa
Ficus - लॅटिन Ficus म्हणजे उंबरवर्गीय फळ
religiosa - धार्मिक महत्व असणारे

भारतातील सर्वपरिचित असा वंदनीय, पवित्र असा वृक्ष. वैदिक साहित्यात, पुराणात आणि संस्कृत साहित्यात याचे अनेक संदर्भ सापडतात. पिंपळाची पाने हृदयाकृती आकाराची व टोकदार असतात. याची फळे लहान व जोडीने येतात. पिंपळाची साल, पाने याचा मुख्यत्वे औषधात उपयोग होतो. "अश्वत्थ: सर्व वृक्षाणा" असे श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत म्हटलेच आहे. हा पुष्यनक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे.

जाई
जाई.JPGचतुर्भुजाय नम: ।
जातिपत्रंसमर्पयामि।

Jasminum grandiflorum
Jasminum - जाई वर्गीय फुलाचे पर्शियन नाव
grandiflorum - मोठी फुले असणारे.
जाईचा वेल असतो व तो बराच मोठा पसरतो. माध्यम आकाराची संयुक्त पाने समोरासमोर असतात. हिची फुले पांढऱ्या रंगाची व अतिशय सुगंधित असतात. जाईच्या पानांचा रस जखमेवर व इतर आजारात वापरतात.

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार

क्रमशः

केवडा
केवडा.jpgविनायकाय नम:। केतकीपत्रं समर्पयामि।
Pandanus odoratissimus
Pandanus - मलायन भाषेत केवडा
odoratissimus - अतिशय सुगंधी
ओढ्याकाठी किंवा समुद्राजवळ केवड्याची बेटे आढळतात. याची पाने लांब ,पातींसारखी असून कडा काटेरी असतात. केवड्याची नर व मादी अशी वेगवेगळी झाडे असतात. नरफुलांच्या कणसांना अतिशय सुगंध असतो. केवड्यापासून अर्क, तेल काढतात.

हादगा
हादगा.jpgसर्वेश्वराय नम: अगस्तिपत्रं समर्पयामि।
Sesbania grandiflora
Sesbania - अरेबिक नाव
grandiflora - मोठी फुले असणारा
हा एक मध्यम आकाराचा वृक्ष. पाने संयुक्त असतात. हादग्याची फुले मोठी व पांढरट पिवळी असतात. या फुलांची भाजी, भजी चवदार होते. याला लांबट शेंगा येतात. हादग्याच्या वापर काही व्याधींमध्ये करतात.

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार

क्रमशः

अनिंद्य, ssj, अन्जू, rmd, अमितव खूप धन्यवाद.
खरं तर आधी सांगितल्याप्रमाणे ही फक्त पत्रींची ओळख आहे
सविस्तर यावर लिहीनच

ऋतुराज, पांढर्‍या रुईला मंदार म्हणतात बरेच जण. पण 'मंदार वृक्ष' असाच उल्लेख वाचला आहे. तुम्हीही तसाच उल्लेख केला आहे. आणि रुईचे तर झुडूप असते. मग दोघात साम्य कसे काय असावे? (मला नेहमी पडणारा प्रश्न)

ऋतुराज
माहितीपूर्ण प्रतिसाद आहेत सगळेच

मनिम्याऊ, मामी, माधव, झकासराव,
तुम्ही ही मालिका वाचताय त्याबद्दल धन्यवाद.
नक्कीच यावर स्वतंत्र धाग्यावर आणखी लेख लिहिण्याचा प्रयत्न करेन.

@माधव,
वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही वानसाच्या जातीवाचक नावाच्या अर्थावरून भव्य, उंच असा अर्थ निघतो. आपल्याकडे दोन्ही जाती फार उंच वाढत नाहीत परंतु उत्तरेकडे त्या उंच वाढतात. मी स्वतः चित्रकूटला रुईची झाडे १२ फुटांपर्यंत वाढलेली पाहिली आहेत. पांढऱ्या फुलांच्या रुईला सर्रास मंदार म्हणतात. परंतु त्यांच्या वनस्पतीशास्त्रीय फरक मी वर सांगितला आहे. या अश्या उंच वाढलेल्या मंदार वृक्षाच्या मुळापासूनच गणपतीची मूर्ती केली जाते अशी माहिती ऐकिवात आहे

अर्जुन
अर्जुन.jpgगजदंताय नम:
अर्जुनपत्रं समर्पयामि।

Terminalia arjuna
Terminalia - लॅटिन terminus पासून, म्हणजे टोकाला पाने, फुले येणारा .
arjuna - भारतीय नाव अर्जुन यावरून.

भारतात सगळीकडे आणि नदी किंवा पाण्याच्या स्रोताशेजारी हमखास आढळणारा एक प्रचंड वृक्ष. अर्जुनाच्या खोडाची साल जाड व पांढरट असते. याची पाने लांब ऐनासारखी असून देठा जवळ दोन ग्रंथी असतात. अर्जुनाचे वैदिक व संस्कृत साहित्यात अनेक संदर्भ सापडतात. याला पाच पंखे असणारी फळे येतात. आयुर्वेदात अनेक व्याधींवर अर्जुनाची साल वापरतात. अर्जुनारीष्ट हे हृदयाला बल देणारे उत्कृष्ट औषध मानतात.

छायाचित्र आंतरजालावरून साभार

समाप्त

Pages