निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग गयी आग; बन में पलाश, नभ में पलाश, भू पर पलाश।
लो, चली फाग; हो गयी हवा भी रंगभरी छू कर पलाश॥>>>>>> मस्तच...

मराठीत पांगारा! त्याच्या पिचकार्‍या खेळायचो लहानपणी.>>>> पळस आहे हा..

पिचकारी च एक वेगळ झाड आहे...

वसंत पंचमीच्या शुभेच्छा. भरपूर बहर आला आहे.

१.IMG-20240326-WA0005.jpg
२.
IMG-20240326-WA0004.jpg
३.
IMG-20240326-WA0006.jpg
४.
IMG-20240326-WA0001.jpg
५.
IMG-20240324-WA0003.jpg
६.
IMG-20240326-WA0003.jpg

७. IMG-20240321-WA0006.jpg

८. IMG-20240321-WA0004.jpg

९.IMG-20240324-WA0010.jpg

१०. होळी पौर्णिमेचा चंद्रोदयIMG-20240323-WA0001_0.jpg

११.IMG-20240326-WA0002_0.jpg

हे गुलाब मी पहिले दोनतीन वर्षे कलम करून लावले आणि पूर्ण ताटवा केला. आता आपोआपच भरगच्च येतात.

अस्मिता मस्तच आहेत फोटो.
गुलाबाचा ताटवा तर काय बहरलाय.
त्यातल ते गुलाबी फुलांच Judas Tree आहे ना.?

पुणेकर्स
खालील कार्यक्रमांना जाता आले तर पहा.
Hello,
We are participating in
*Seed stories*
On 25th August.
*Displaying Wild seeds*
and presenting -
*"कवितेतील वनस्पती"* -
Poetry reading session related to wild plants and habitats.
@Fergusson college amphitheatre, Pune.

Moon Moth 11.jpg

Moon Moth

आपल्या लाडक्या गणपतीबाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात झालेले आहे. आबालवृद्धांचा लाडका देव. गणपतीच्या साग्रसंगीत प्रतिष्ठापनेत पत्रीपूजेला विशेष महत्व आहे. त्यानिमित्ताने दर दिवशी दोन पत्रींची छोटीशी माहिती गणेश चरणी अर्पण.
गणपती बाप्पा मोरया !

मालती: 
Madhavi Lata.jpeg
.
Hiptage_benghalensis_fruit.JPG
मालतीची फळे

सुमुखाय नम:
मालतीपत्रं समर्पयामि।


Hiptage benghalensis

Hiptage - ग्रीक Hiptamai वरून आले आहे याचा अर्थ उडणे असा होतो. मालतीच्या फळांना तीन पाती असतात त्यामुळे ती हवेत उडतात.
benghalensis - बंगाल प्रांतात आढळत असल्यामुळे.

ही वनात आढळणारी एक काष्ठवेल आहे. या वेलीला माधवीलता, मालती, मधुमालती, हळदवेल अशी नावेदेखील आहेत. पाने हिरवीगार व गुळगुळीत असतात. पाकळ्यांना कडेला झालरीसारखे तंतू असतात. फुले फार सुवासिक असतात. याच्या फळांना तीन पाती असतात. त्यामुळे वाऱ्याबरोबर उडत जावून याचा बीज प्रसार होतो. त्वचारोगावर याचा उपगोग करतात. कालिदासाच्या साहित्यात या वेलीचा उल्लेख आढळतो.
बरेचदा मालती म्हणून मोगरा, मधुमालती यांची पाने देखील वाहिली जातात.

माका:
Maka.jpgगणाधिशाय नम:
भृंगराजपत्रं समर्पयामि।

Eclipta prostrata
Eclipta - ग्रीक ekleipo वरून.
prostrata - जमिनीवर पसरणारे क्षुप.

पावसाळ्यात सर्वत्र मुबलक आढळणारी लहानशी वनस्पती आता काहीशी गायब होऊ लागली आहे. याची फुले अगदी लहान पांढरी शेवंतीसारखी असतात. माक्याच्या रसाने केस काळे होतात व केसांची वाढ चांगली होते. यामुळे याला आयुर्वेदात केश्य म्हणून गणले आहे. माक्याचा वापर व्रणावर तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील होतो. माका हा एक शापित गंधर्व असून त्याने शंकराकडून गणेश पूजेत व पितरांच्या श्राद्ध कार्यातही महत्वाचे स्थान मिळवले.

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार

क्रमशः

बेल:

aegle-marmelos-1000x1000.jpgउमापुत्राय नम:
बिल्वपत्रं समर्पयामि।

Aegle marmelos
Aegle - ग्रीक साहित्यातील एक अप्सरा, तिच्या नावावरून
marmelos - जॅम सदृश्य पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे फळ (पोर्तुगीज)

सर्वत्र आढळणारा एक पवित्र वृक्ष. याची त्रिदल पाने सर्वपरिचित आहेतच. शंकराच्या पूजेत ती अनिवार्य आहेत. ती तीन वेगळी पाने नसून एकच संयुक्त पान आहे. पानात काही उडणशील तैलग्रंथी असतात. आयुर्वेदातील दशमूळारिष्ट औषधात बेलाचा समावेश आहे. बेलफळाचे सरबत हे सर्व उष्माविकारात हितकर आहे. बेलफळाचे लोणचे, मुरंबा करतात. बेल चित्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. लक्ष्मी देवीचा या वृक्षात निवास असतो त्यामुळेच बेलाचे एक नाव श्रीफल असेही आहे.

दुर्वा:

Durva.jpgगजाननाय नम:
दूर्वां समर्पयामि।

Cynodon dactylon
Cynodon - ग्रीक kyon, तीक्ष्ण खवल्यांवरून
dactylon - ग्रीक डाक्टयलॉन म्हणजे बोटांसारखे

गणपतीला प्रिय असणारी, सर्वांना परिचित व सर्वत्र आढळणारी वनस्पती. दुर्वांची ऋग्वेदात "आपल्या मुळांच्या वाढीप्रमाणे आमच्या वंशाची वाढ कर” अशी स्तुती केली आहे. त्यामुळेच बहुप्रसवतेचे प्रतिक असणाऱ्यावा दुर्वांना वाढदिवसाला डोक्यावर ठेऊन औक्षण करतात. मूत्रदाह, नाकातून रक्त येणे अशा रोगांत दुर्वा वापरतात.

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार

क्रमशः

बोर

ber.jpgलंबोदराय नम:
बदरीपत्रं समर्पयामि।

Ziziphus moritiana
Ziziphus - पर्शियन नावावरुन
moritiana - अरेबियन नावावरून

बोरीचा मध्यम उंचीचा, काटेरी वृक्ष आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. याची पाने अंडाकृती व लवयुक्त असून त्यावर तीन ठळक शिरा असतात. याला पांढरट पिवळ्या रंगाची, बारीक फुले येतात. आयुर्वेदात बोरे रक्तशुद्धी, क्षुधाशामक म्हणून वापरतात. तसेच ते एक पौष्टीक खाद्य आहे. बोराच्या झाडावर लाखेचे किडे पोसतात

धोतरा

Datura.jpgहरसूनवे नम:
धत्तूरपत्रं समर्पयामि।

Datura stramonium
Datura - धत्तूर यावरून.
stramonium - काटेरी फळावरून

पडीक जागेत, रस्त्याशेजारी आढळणारे एक रानटी झुडूप. याची फुले मोठी, नरसाळ्यासारखी पांढऱ्या रंगाची असतात तर फळे काटेरी असते. हे अत्यंत विषारी झुडूप आहे. तरीही आयुर्वेदात याच्या पानांचा व बियांचा उपयोग केला जातो.

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार

क्रमशः

ऋतुराज.

सदस्यनाम सार्थक करणाऱ्या पोस्ट असतात तुमच्या.

जय हो !

तुळस

Tulsi.jpgगजकर्णाय नम:
तुलसीपत्रं समर्पयामि।
Ocimum santum

Ocimum - ग्रीक सुगंध घेणे
santum - पवित्र

सर्वांच्या परिचयाची आणि घराघरात असणारी पवित्र वनस्पती. तुळशीला अनेक धार्मिक संदर्भ आहेत. तसेच तुळशीच्या अनेक जाती आहेत. तुळशीच्या पानांत उडणशील तैलग्रंथी असतात. पानांतील थायमॉल व युजिनॉल या घटकामुळे तुळस सर्दी, ताप, फ्लू अश्या आजारात वापरतात.

शमी

shami.jpgवक्रतुंडाय नम:
शमीपत्रं समर्पयामि।
Prosopis cineraria

Prosopis - ग्रीकमध्ये काटेरी झाड
cineraria - राखाडी रंगाचा (खोड)

कोरड्या हवामानात आणि पाण्याच्या दुर्भिक्ष्यात आढळणारा बाभळीसारखा छोटेखानी वृक्ष. शमीला त्रिकोणी बारीक काटे असतात. शमीला बरेच धार्मिक संदर्भ आहेत. यज्ञात शमीच्याच समिधा वापरतात. शमीच्या लाकडाचे उष्मांक मूल्य जास्त असल्याने याचा उपयोग इंधनासाठी होतो. आयुर्वेदात देखील शमीचे उपयोग सांगितले आहेत. शमी हा धनिष्ठा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे.
शमीपत्रीत बरेचदा दुरंगी बाभूळ, बाभूळ, खैर यासारख्या वनस्पतींच्या पांनांची भेसळ केली जाते.

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार

क्रमशः

आघाडा
Achyranthes-aspera.jpgगुहाग्रजाय नम:
अपामार्गपत्रं समर्पयामि।

Achyranthus aspera
Achyranthus - ग्रीक भुश्यासारखी फुले यावरून
aspera - लॅटिन खरखरीत वरून
पावसाळ्यात मोकळ्या जागेत आपोआप उगवणारे एक छोटेसे झुडूप. याची पाने गोलाकार असून पानांच्या खालच्या बाजूला लव असते. आयुर्वेदात याचे पंचांग (मूळ, खोड, पान, फूल व फळ) वापरतात. दंतरोगात व मुखरोगात आघाडा प्रामुख्याने वापरला जातो.

डोरली
Bruhati-Solanum-Indicum.jpgएकदंताय नम:
बृहतिपत्रं समर्पयामि।

Solanum indicum
Solanum - अल्कलॉइड असणारी
indicum - भारतीय

साधारणतः वांग्याच्या झाडासारखे दिसणारे व पावसाळ्यात उगवणारे आणखी एक छोटे झुडूप. पानावर बारीक काटे असतात. दशमूळात डोरल्याचे मूळ वापरतात. ताप, खोकला, कफ यात दोरल्याचे मूळ वापरतात.

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार

क्रमशः

कण्हेर

Kanher.jpgविकटाय नम:
करवीरपत्रं समर्पयामि।

Nerium indicum
Nerium - Nerion या ग्रीक नावावरून
indicum - भारतीय

सर्वांच्या परिचयाचे हे फुलझाडं सगळीकडे आढळते. फुले सुंदर असली तरी हे एक विषारी झुडूप आहे. याच्या दोन जाती आहेत लाल व पांढरी. कण्हेरीच्या मुळाची साल औषधात वापरतात. टायगर व क्रो प्रजातीच्या फुलपाखरांची ही खाद्य वनस्पती आहे.

रुई

Rui.jpgकपिलाय नम:
अर्कपत्रं समर्पयामि।

Calotropis gigantea
Calotropis - ग्रीक kalos म्हणजे सुंदर व keel म्हणजे जहाजाच्या बुडासारख्या पाकळ्यांना आकार असणारे
gigantea - भव्य

पडीक जागेत मुबलक आढळणारी अशी ही वनस्पती. रुईला अर्क असेही एक नाव आहे. हिची फुले जांभळट असतात. हेदेखील एक विषारी झुडूप आहे. पाने मोठी, लवयुक्त व एका पेरावर दोन समोरासमोर अशी असतात. आयुर्वेदात अनेक व्याधीवर रुईचा वापर करतात. टायगर व क्रो प्रजातीच्या फुलपाखरांची ही खाद्य वनस्पती आहे.
रुईचीच एक जात म्हणजे मंदार (Calotropis procera). भ्रुशुंडी ऋषींच्या शापातून मुक्तता केल्यावर गणेशाने मंदार वृक्षाखाली वास्तव्य केले अशी कथा आहे त्यामुळे मंदार वृक्षाच्या मुळापासून गणेशमूर्ती बनवितात. रुई आणि मंदार मध्ये थोडा भेद आहे.

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार

क्रमशः

Pages