म्हणी, वाक्प्रचार आणि त्यांचा उगम व अर्थ.

Submitted by कोदंडपाणी on 10 February, 2019 - 06:07

ग्रामीण बोली भाषांतील शब्द येथे वाचता येतील.

मला ग्रामीण भाषेतले शब्द आवडतात. रोजच्या बोलण्यामध्ये, ऐकायला छान वाटतात. त्यासाठी मी एक धागा काढला आणि त्याला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे मला फक्त शब्द अपेक्षीत होते पण येथे शब्दांबरोबर त्यांचे अर्थ, त्या वस्तुचा उपयोग आणि साधारण स्वरुप वगैरे खुप माहिती तर मिळालीच पण खूप जुन्या आठवणीसुद्धा जागवल्या गेल्या. प्रत्यक्षात मला मात्र यात शब्दांची, माहितीची जास्त भर घालता आली नाही. कुणा कुणाचे नाव घेऊ? सगळ्यांचेच खुप आभार. खुप सुंदर आणि नविन शब्द कळाले तुम्हा सगळ्यांमुळे.

त्या धाग्यावर भरत यांनी सुचवले की वाक्प्रचारांच्या चर्चेसाठी वेगळा धागा काढा. या अगोदर असा काही धागा असेल तर मला सापडला नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण आपल्याला माहित असलेल्या सुंदर, मजेशीर, विनोदी अशा म्हणी देऊयात. शक्यतो त्या म्हणींचा उगम आणि अर्थ माहित असेल तर वाचायलाही खुप छान वाटेल.

त्या धाग्यावर अप्पाने (शाली) दिलेल्या दोन म्हणींनेच सुरवात करुयात.

पुर्वी ऐनवेळच्या लढाईला सैनिकभरती व्हायची. सैन्य युध्दकुशल असण्याची आवश्यकता नसायची फक्त समोरच्या सैन्यावर दबाव टाकन्यासाठी संख्या महत्वाची असायची. त्यामुळे मिळेल त्याला सैन्यात भरती करत. त्यांची मोजदाद व्यक्तिनुसार न करता घोड्यानुसार करत. म्हणजे किती खोगीर जमा झाले हे पहात. (खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसण्यासाठीचे चामडी आसन.) त्यामुळे मुर्खांच्या किंवा अकुशल लोकांच्या भरतीला 'खोगीर भरती' नाव पडले. जे आपण आजही वापरतो. तसेच सैन्यामुळे मिळालेले अनेक वाक्प्रचार आजही वापरात आहेत. जसे पाचावर धारण बसणे. पाचावर धारण जाणे किंवा बसणे हा धान्याचा बाजार भाव आहे. साधारण एक ते सव्वापर्यंत धारण असेल तर सैन्यात धान्य स्वस्त आहे असे समजले जाई. पण अगदी पाचाच्या वर धारण गेली याचा अर्थ सैन्याला फाके पडणार हे नक्की. त्यामुळे सैन्य घाबरुन जाई. त्यामुळे घाबरण्यासाठी "त्याची पाचावर धारण बसली" म्हणतात. या मोजमापाविषयी जाणकार सांगतीलच.

गाशावरुन एक आठवले. घोड्यावर खोगीर घालायच्या अगोदर एक चामड्याचे तुकडे जोडुन तयार केलेले आच्छादन घोड्याच्या पाठीवर घालायचे. त्याचा बराचसा भाग हा घोड्याच्या दोन्ही पुठ्यांवर येई मग खोगीर आवळत असत व त्यावर गाशा टाकत. या चामडी आच्छादनाला पाखर म्हणत. त्यामुळे घोड्याच्या पुठ्यांना काट्याचा, झुडपांचा त्रास होत नसे. आपण "मायेची पाखर घालणे" असं म्हणतो ती हिच पाखर. मायेची पाखर घालणे हा वाक्प्रचार नसुन ती उपमा आहे. माझ्या आजोबांच्या घोड्याची पाखर आत्ता काही वर्षांपुर्वीपर्यंत आमच्याकडे होती.
(वरील तिनही म्हणींची माहिती शाली यांनी दिली आहे.)



तुमच्याकडे म्हणींचा उगम असेल तर उत्तमच नाहीतर फक्त म्हणी आणि वाक्प्रचार लिहिल्यातरी चालतील.
करुया सुरवात?... ... ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*ज्याचे कुडे, त्याचे पुढे
(जो दुसर्‍याचे वाईट चिंततो, त्याचेच वाईट होते.)* -
दक्षिणा, यावरची मालवणी म्हण आठवली -
केलां तुकां, झालां माकां !

आधी शिदोरी, मग जेजूरी
(आधी जेवण मग देवपूजा)

उधारीचे पोते, सव्वा हात रिते
(उधार दिलेली/आणलेली कोणतीही गोष्ट परिपुर्ण (उपयोगाची) असेलच असे नाही)

ओळखीचा चोर जीवे ना सोडी
(अनोळखी शत्रूपेक्षा ओळखीचा शत्रू हा अधिक धोकादायक असतो) (अर्थ नेटवरून साभार)

गाव करी ते राव ना करी
(श्रीमंत माणूस स्वत:च्या श्रीमंतीच्या बळावर जे करू शकत नाही ते गाव फक्त एकिच्या बळावर श्रीमंती नसतानाही करू शकते)

चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही
(लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत.)

जळत्या घराचा पोळता वासा
(आपत्तीतून जे काही वाचेल ते आपले म्हणून गोड मानून घ्यावे)

आतांच कुणीतरी ' धामापूरच्या तळ्या'वर धागा उघडलाय. त्यावरून आठवलेली म्हण-
चुकलां ढोर , धामापूरच्या तळयार !
(गुरं हरवलीं तर धामापूरच्या तळयाकडे शोधावीं . ' चुकला फकीर मशीदीत ' शीं जवळीक साधणारी म्हण)

या घ्या काही म्हणी.. (मालवणीतल्या आहेत).

अंधारात केला पण उजेडात इला
(चोरी पकडली जाणे)...

अडाणी बायलेशी पडली गाठ, म्हणता ऊठ मेल्या चटणी वाट
(केलेला वेडेपणा अंगाशी येणे)...

अशीच एक म्हण,
लंगडी शेणकूर करी , नऊ जणी कंबर धरी.

फार सुरेख आणि मजेदार म्हणी वाचायला मिळाल्या येथे. एक निरिक्षण, मी बोलताना कधी म्हणी वापरत नाही किंवा कुणाला वापरताना पाहिलेही नाही. जुनी लोक अजुनही म्हणी वापरताना दिसतात.
“काय आज्जे, काय म्हणतेय नविन सुनबाय?” असं विचारलं की आज्जीचे हमखास उत्तर “काही विचारु नको लेकरा. आडाण्याचा आला गाडा, तुमची विहिर बाजुला काढा अशी गत आहे. आहे ते बरं आहे.”

चार जणी बायला विस्तव जाईना वायला.
चार बायका असूनही वैलामध्ये ( चुलीचा एक प्रकार) विस्तवही नीट होत नाही.. वरच्या too many cooks ... चं अजून एक वर्जन.

चिडकू डिटेल्स द्या की.
प्रज्ञा सुरेख म्हण. वैलावरचे दुध किंवा कोणतीही भाजी फार टेस्टी लागते. स्लो कुकींग.

>>> आडाण्याचा आला गाडा, तुमची विहिर बाजुला काढा
आमच्याकडे ही 'अडाण्याचा आला गाडा, वाटेवरच्या वेशी काढा' अशी होऊन येते. Happy

वाचते आहे, ज्ञानात भर पडते आहे. Happy

>>>> अडाण्याचा अडला गाडा, वाटेवरच्या वेशी काढा
This is so much better!! Phonetically I mean. ती खडबड गडबड उच्चारांत आली! Happy

आधीही एकदा किंवा अनेकदा म्हटलंय इथे.

म्हणी अन वाक्प्रचार, हे 'its inculcation of hundreds of years of human experience,' अन हे सगळे अगदी व्हर्नाक्युलर लँग्वेजमधे असते.

"भले तरी द्यावी गांडीची लंगोटी" हे त्याकाळचे शिष्टसंमत मूळ असताना, कासेची लंगोटी आजच्या सभ्य भाषेत बसवले जाते. पण म्हणींतून ते थोडे रावडि, वात्रट भासणारे नागडे सत्य डोकावते. अन खरे असते म्हणून भावते.

इट्स टू पॉवरफुल नॉट टु गेट थ्रू.

*its inculcation of hundreds of years of human experience,' * - खरंय. म्हणूनच तर कुणा एका पुल देशपांडेला निवृत्तीनाथांनी वापरलेली ' वळचणीचे पाणी.... ' हीच म्हण 20व्या शतकातही चपखलपणे वापरता आली !

"उखळ पांढरे होणे" म्हणजे भरपूर द्रव्य (संपत्ती) मिळणे.

पूर्वी घरोघरी उखळ असे. शेतातील भाताच्या पिकापासून तांदूळ वेगळा करण्यासाठी अथवा पोहे बनवण्यासाठी याचा वापर करत असत. याला भात कांडणे म्हणतात. उखळ-मुसळ चा वापर यासाठी केला जात असे. या कामात हि उखळ अर्थातच पांढरी होत असे. यावरूनच उखळ पांढरी झाली म्हणजे शेतात धन्यधान्य पिकून घरी सुबत्ता आली असा त्याचा अर्थ होतो.

उखळ विषयी विविध स्त्रोतांमधून उपलब्ध झालेली माहिती इथे चिकटवत आहे:

विकिपीडिया: उखळ ही विविध प्रकारचे धान्य व शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी बनविलेली वस्तू आहे. ही कठीण दगडापासून बनवली जाते. दगडाला खोलगट आकार दिला जातो. धान्य कुटण्यासाठी लाकडी मुसळ किंवा अखंड खोडाचा वापर केला जातो.

लोकसत्ता: गावातील माजघरात दणकट लाकडाचे एक उखळ असे. जाड बूड असलेल्या, खाली निमुळते आणि वरच्या बाजूला पसरलेल्या तोंडाचे उखळ चांगलेच वजनदार असे. त्यामुळेच ते माजघरातील एका कोपऱ्यात मुक्कामाला असे. या उखळाचे भावंड ‘मुसळ’ असल्याशिवाय ही जोडी कार्यभागासाठी अपूर्णच म्हणावी लागेल. मुसळ हे दणकट सागवानी लाकडाचा एक चारफुटी दांडा. खालच्या टोकाला पितळी पट्टीने बांधलेला. उखळ-मुसळ या सहयोगी जोडीचा उपयोग, जुन्या काळी गावाकडील घरात भात कांडण्यासाठी होत असे. हा कांडण्यासाठीचा भात म्हणजे आपण पानात वाढून घेतो तो शिजलेला भात, असा समज नवपिढीचा होण्याची शक्यता आहे. पण कांडण्यासाठीचा भात म्हणजे शेतात तयार झालेल्या लोंब्यातून, झोडून वेगळा केलेला टरफलयुक्त तांदूळ. टरफल वेगळे केले की त्याचा होतो कोंडा. भात उखळात टाकून मुसळाने हलकेच दाबला की टरफल वेगळे होऊन तांदूळ तयार होतो. आता हे काम भातगिरणीमध्ये होत असले तरी जुन्या काळी ते घरीच करावे लागे.

दैनिक प्रभात (डॉ.नीलम ताटके यांचा लेख): उखळ आणि मुसळ हे दोन्हीही लाकडाचं असायचं, परंतू मुसळानं कुटता-कुटता त्याच्या लाकडाला चिरा पडू नयेत म्हणून, एक लोखंडी चकती बसविलेली असायची. त्यामुळे कुटणंही थोडं सोप व्हायचं; पण यात केवळ पदार्थ कुटले जायचे नाहीत तर भाताचे पोहे करण्यासाठी उखळाचा उपयोग केला जायचा.

Pages