म्हणी, वाक्प्रचार आणि त्यांचा उगम व अर्थ.

Submitted by कोदंडपाणी on 10 February, 2019 - 06:07

ग्रामीण बोली भाषांतील शब्द येथे वाचता येतील.

मला ग्रामीण भाषेतले शब्द आवडतात. रोजच्या बोलण्यामध्ये, ऐकायला छान वाटतात. त्यासाठी मी एक धागा काढला आणि त्याला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे मला फक्त शब्द अपेक्षीत होते पण येथे शब्दांबरोबर त्यांचे अर्थ, त्या वस्तुचा उपयोग आणि साधारण स्वरुप वगैरे खुप माहिती तर मिळालीच पण खूप जुन्या आठवणीसुद्धा जागवल्या गेल्या. प्रत्यक्षात मला मात्र यात शब्दांची, माहितीची जास्त भर घालता आली नाही. कुणा कुणाचे नाव घेऊ? सगळ्यांचेच खुप आभार. खुप सुंदर आणि नविन शब्द कळाले तुम्हा सगळ्यांमुळे.

त्या धाग्यावर भरत यांनी सुचवले की वाक्प्रचारांच्या चर्चेसाठी वेगळा धागा काढा. या अगोदर असा काही धागा असेल तर मला सापडला नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण आपल्याला माहित असलेल्या सुंदर, मजेशीर, विनोदी अशा म्हणी देऊयात. शक्यतो त्या म्हणींचा उगम आणि अर्थ माहित असेल तर वाचायलाही खुप छान वाटेल.

त्या धाग्यावर अप्पाने (शाली) दिलेल्या दोन म्हणींनेच सुरवात करुयात.

पुर्वी ऐनवेळच्या लढाईला सैनिकभरती व्हायची. सैन्य युध्दकुशल असण्याची आवश्यकता नसायची फक्त समोरच्या सैन्यावर दबाव टाकन्यासाठी संख्या महत्वाची असायची. त्यामुळे मिळेल त्याला सैन्यात भरती करत. त्यांची मोजदाद व्यक्तिनुसार न करता घोड्यानुसार करत. म्हणजे किती खोगीर जमा झाले हे पहात. (खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसण्यासाठीचे चामडी आसन.) त्यामुळे मुर्खांच्या किंवा अकुशल लोकांच्या भरतीला 'खोगीर भरती' नाव पडले. जे आपण आजही वापरतो. तसेच सैन्यामुळे मिळालेले अनेक वाक्प्रचार आजही वापरात आहेत. जसे पाचावर धारण बसणे. पाचावर धारण जाणे किंवा बसणे हा धान्याचा बाजार भाव आहे. साधारण एक ते सव्वापर्यंत धारण असेल तर सैन्यात धान्य स्वस्त आहे असे समजले जाई. पण अगदी पाचाच्या वर धारण गेली याचा अर्थ सैन्याला फाके पडणार हे नक्की. त्यामुळे सैन्य घाबरुन जाई. त्यामुळे घाबरण्यासाठी "त्याची पाचावर धारण बसली" म्हणतात. या मोजमापाविषयी जाणकार सांगतीलच.

गाशावरुन एक आठवले. घोड्यावर खोगीर घालायच्या अगोदर एक चामड्याचे तुकडे जोडुन तयार केलेले आच्छादन घोड्याच्या पाठीवर घालायचे. त्याचा बराचसा भाग हा घोड्याच्या दोन्ही पुठ्यांवर येई मग खोगीर आवळत असत व त्यावर गाशा टाकत. या चामडी आच्छादनाला पाखर म्हणत. त्यामुळे घोड्याच्या पुठ्यांना काट्याचा, झुडपांचा त्रास होत नसे. आपण "मायेची पाखर घालणे" असं म्हणतो ती हिच पाखर. मायेची पाखर घालणे हा वाक्प्रचार नसुन ती उपमा आहे. माझ्या आजोबांच्या घोड्याची पाखर आत्ता काही वर्षांपुर्वीपर्यंत आमच्याकडे होती.
(वरील तिनही म्हणींची माहिती शाली यांनी दिली आहे.)



तुमच्याकडे म्हणींचा उगम असेल तर उत्तमच नाहीतर फक्त म्हणी आणि वाक्प्रचार लिहिल्यातरी चालतील.
करुया सुरवात?... ... ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुनाला कशाचं न माळनीला लसनाचं
महाराची अडवणूक कुठं तं येशीपाशी
शिकार का वखत हौर कुत्ते गये झाड्याकू
वरमाईच छिनाल तं कल्हवर्‍या कशा आस्तीन

कंडी पिकणे
सूप वाजणे
पोबारा करण
धादांत
दावणीला बान्धणे
षटकर्णी होणे
कह्यात असणे
पासंगाला पुरणे
धकाधकी
रिकाम्या रानी
खुष्कीचा मार्ग

हे कसं आलं

म्हण किंवा वाक्प्रचार कसे तयार झाले ते लिहा हो. नुसती यादी करायला दुसरा धागा आहे की.

झाड्याला म्हणजे नंबर टु.

षटकर्णी होणे = षट्कर्णी होणे म्हणजे दोन व्यक्तींमधील गुप्त गोष्ट तिसऱ्या व्यक्तीला समजणे , थोडक्यात गुपित उघड होणे. दोन माणसांचे चार कान व तिघांचे सहा म्हणून षट्कर्णी (सहा कान)

म्हण किंवा वाक्प्रचार कसे तयार झाले ते लिहा हो. नुसती यादी खरखयलख दुसरा धागा आहे की.
झाड्याला म्हणजे नंबर टु. ला

ओक्के स्सर. वेळ मिळेल तसं लिहितोच.

बाकी खरखयलख हा शब्द कसा तयार झाला याचं औत्सुक्य आहे Wink Wink

कृ ह घ्या.

अठरा विश्व दारिद्रय

खरा वाक्प्रचार अठरा विसे दारिद्रय असा आहे. अठरा विसे म्हणजे अठरा गुणिले वीस = ३६०. म्हणजे साधारण एक वर्ष. म्हणजेच कायम स्वरूपी दारिद्रय.

साधारण शब्दांचे अपभ्रंश होते. पण इथे उलट झाले आहे.

सूप वाजणे : १)शुभकार्याच्या वेळी भरपूर माणसे जेवणारी असतात. तेव्हा धान्य निवडून पाखडून ठेवलेले असते. शेवटी शेवटी धान्य संपत येते आणि पुन्हा सुपे घेऊन पाखडावे लागते. म्हणजे आता कार्य संपले आहे, कार्याच्या निमित्ताने केलेली साठवण संपली आहे, आता हलावे.
२)धान्य संपत आले की सुपात थोडे थोडे घेऊन पाखडतात. त्याचा आवाज जास्त होतो. म्हणजे कार्य आटोपल्याची खूण.
३) काही जातीत लग्नविधीआधी सुपात देवक मांडण्याची प्रथा आहे. (पण ही सार्वत्रिक नसावी.) लग्नाचे सर्व विधी संपले की ही सुपे
मंत्राक्षता टाकून थोडीशी हलवतात आणि देवक उठवतात. मग सुपातली सर्व मांडणी मोडून/विसर्जित करून सूप वापरात येते. ही
सुद्धा कार्य आटोपल्याची खूण.
खुष्कीचा मार्ग : खुश्क (पारसी) म्हणजे शुष्क, कोरडे. पूर्वी बायझन्टाइन साम्राज्यात रोमनांची सत्ता आशियात पसरली होती. त्याची राजधानी होती इस्तम्बूल. रोम आणि यूरपचा आशियाशी व्यापार हा कॉन्स्टॅन्टिनोपल मार्गे जमिनीवरून चाले. पुढे इ.स. १४५३मध्ये इस्तंबूल पडले आणि ऑटोमन तुर्कांच्या हाती सत्ता आली. जमिनीवरचा मार्ग बंद झाल्याने नवे पर्याय धुंडाळणे प्राप्त झाले. त्यातून समुद्री मार्ग उदयास आले. (आशिया समुद्रमार्गे गाठणारा मध्ययुगातला पहिला समुद्रप्रवासी वास्को द गामा -इ.स. १४९७/९८/९९) हा प्रवास समुद्रावरचा म्हणजे पाण्यावरचा. जमिनीवरचे शुष्क कोरडे व्यापार कमी झाले आणि ओल्या दमट हवेतून व्यापार सुरू झाला. म्हणून जुन्या तर्‍हेच्या व्यापारासाठी खुष्कीचा मार्ग ही संज्ञा प्रचारात आली. इतिहासाच्या जुन्या पाठ्यपुस्तकात हमखास हा खुष्कीचा मार्ग असे आणि लहान मुलांना त्याचे कुतुहल वाटे.
यूरपचा आशियाशी व्यापार खंडांतर्गत जमिनीवरून चाले. पुढे १४५३ मध्ये कॉन्स्टॅन्टिनोपलचा पाडाव झाला आणि

मनस्विता असाच प्रकार कोटी शब्दाबद्दल आहे. तेहतीस कोटी देव म्हणजे तेहतीस प्रकारच्या देवता. येथे कोटी हा शब्द संख्या म्हणून वापरलेला नाहीए. ‘उच्च कोटीचा’ अशा अर्थाने वापरला आहे. जरा अवांतर झाले.

हीरा, सुरेख माहिती.

पासंग म्हणजे तराजूची दोन पारडी समतोल करण्यासाठी हलक्या पारड्यात टाकलेले अगदी छोटे वजन. दोन पारड्यात सूक्ष्म फरक असला तर हे लहानसे वजन टाकावे लागते.

दावण किंवा दावणी म्हणजे गायीगुरांच्या मानेतली दावी बांधण्यासाठी खुंटे पुरून त्यांत अडकवलेल्या भक्कम दांड्या. एकदा गुरे या दावणीला बांधली की त्यांना आपल्या मनाप्रमाणे हलताफिरता येत नाही.

धादांत म्हणजे ढळढळीत, स्पष्ट, अनुभवसिद्ध. हा शब्द वेदांत या शब्दाच्या विरुद्धस अर्थासाठी बनवला गेला. वेदांत हा तर्काने जाणण्याजोगा तर धादांत म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण.

हीरा धन्यवाद.
माझा त्रास वाचवल्याबद्दल.
सूप वाजलं चा अजून एक उगम - लोकसत्तात वाचला होता. छान पुरवणी यायची -प्रश्नोत्तर स्वरूपात.

धान्य ....नाही कणसं मळायला खळं असायचं. मध्यभागी तिवडा असायचा. त्याच्याभोवती तोंडाला मुसक्या लावलेले बैल फिरायचे..
त्यांच्या पायाखाली धान्य तुसासहित कणसापासून वेगळं व्हायचे.
हे धान्य थोडा उंचवटा करून लगेच उफणलं जायचं जेणेकरून तूस वायलं व्हावं .
तर खळ्यातून हे धान्य सुपात गोळा केलं जायचं.
गडाद पडू लागलं (-उजेडाची सोय करणं जिकिरीचं व्हायचं) की दृश्यमानता कमी व्हायची. तोवर खळ्यातलं धान्यही कमी झालेलं असायचं . मग सूप जमिनीला कमीअधिक प्रमाणात खरडलं जाऊन सूप वाजायचं अर्थात त्याचा आवाज व्हायचा.
मग मळायचं , उफणायचं काम थांबवलं जायचं.

म्हणून एखादं काम ,कार्य पूर्ण झालं की सूप वाजलं

प्रचारक सुप वाजण्याचा तुम्ही उल्लेख केलेलाच अर्थ मला माहित होता.
खळ्याच्या शेजारीच वाऱ्याची दिशा पाहून तिवई उभी करत. बुमरॅंग सारखा आकार असलेल्या फळीला तिन पाय लावलेले असत. सहा फुटाच्या आसपास उंची असे. त्यावर एक जण उभे राही व दुसरा त्याच्या हातात धान्य तुस एकत्र असलेली पाटी देई. जसजसा वारा येई तसे ते धान्य वरुन सोडायचे. धान्य खाली पडुन तुस मागे उडायचे. कधी एका दमात पाटी मोकळी होई तर कधी वारा पडला की खुप वाट पहावी लागे. खळ्याशेजारीच बैल बांधायला तात्पुरती जागा केलेली असे. त्याला मांडव म्हणत. पहिल्या पावसापर्यंत हा मांडव शेतात असे. यात एखादी बाज टाकलेली असे. घरातील मुले उन्हाळ्यात मांडवाकडेच झोपायला असत.

भुईमुगाच्या काळात तर चार दिवस शेतातच मुक्काम असे. सुर्यास्तानंतर दगड मांडुन त्यावर ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी किंवा नुकत्याच काढलेल्या भुईमुगाच्या दाण्यांचे बेसन केले जाई. निव्वळ अप्रतिम दिवस होते ते. जे आता प्रयत्न करुनही परत अनुभवता येणार नाही.

जरा आवांतर.
आज सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध झाल्याने प्रत्येक गोष्टीची मजा गेलीय की काय ते समजत नाही. आज काही हजारांचे बिल करुनही झालेल्या पार्टीत मन रमत नाही. पुर्वी आईच्या मागे लागुन एखाद्या रविवारी आम्ही मित्र पार्टी करायचो. मेन्यु असायचा उडदाची आमटी, भरीत, तव्यावर मिठ टाकुन खरडलेल्या मिरच्या, कांदा, काकड्या आणि घट्ट दही. तिखट लागले की साबत काकवी. जेवण झालं की वाडगा भरुन चीम. आज त्या चविने, पार्टीच्या नुसत्या आठवणीने डोळे भरुन येतात. आणि असं भरुन आलं की मुलं वेड्यात काढतात.

ओके

घरल्या भ्येनं घेतलं रान, तिथं भेटला मुसलमान. Lol
आबा याला आमच्या भागात शेंगदाण्याचे बेसनच म्हणतात. यात उकडलेले रताळे कुस्करुन खातात. एकादशीला तर हे हमखास हवेच.
पाकृच्या बाबत आमचे तुमचे म्हटलेच पाहीजे कारण गावातल्या गावात वरच्या आळीची पाककृती खालच्या आळीत येईपर्यंत पुर्ण बदलते. Happy

Pages