म्हणी, वाक्प्रचार आणि त्यांचा उगम व अर्थ.

Submitted by कोदंडपाणी on 10 February, 2019 - 06:07

ग्रामीण बोली भाषांतील शब्द येथे वाचता येतील.

मला ग्रामीण भाषेतले शब्द आवडतात. रोजच्या बोलण्यामध्ये, ऐकायला छान वाटतात. त्यासाठी मी एक धागा काढला आणि त्याला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे मला फक्त शब्द अपेक्षीत होते पण येथे शब्दांबरोबर त्यांचे अर्थ, त्या वस्तुचा उपयोग आणि साधारण स्वरुप वगैरे खुप माहिती तर मिळालीच पण खूप जुन्या आठवणीसुद्धा जागवल्या गेल्या. प्रत्यक्षात मला मात्र यात शब्दांची, माहितीची जास्त भर घालता आली नाही. कुणा कुणाचे नाव घेऊ? सगळ्यांचेच खुप आभार. खुप सुंदर आणि नविन शब्द कळाले तुम्हा सगळ्यांमुळे.

त्या धाग्यावर भरत यांनी सुचवले की वाक्प्रचारांच्या चर्चेसाठी वेगळा धागा काढा. या अगोदर असा काही धागा असेल तर मला सापडला नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण आपल्याला माहित असलेल्या सुंदर, मजेशीर, विनोदी अशा म्हणी देऊयात. शक्यतो त्या म्हणींचा उगम आणि अर्थ माहित असेल तर वाचायलाही खुप छान वाटेल.

त्या धाग्यावर अप्पाने (शाली) दिलेल्या दोन म्हणींनेच सुरवात करुयात.

पुर्वी ऐनवेळच्या लढाईला सैनिकभरती व्हायची. सैन्य युध्दकुशल असण्याची आवश्यकता नसायची फक्त समोरच्या सैन्यावर दबाव टाकन्यासाठी संख्या महत्वाची असायची. त्यामुळे मिळेल त्याला सैन्यात भरती करत. त्यांची मोजदाद व्यक्तिनुसार न करता घोड्यानुसार करत. म्हणजे किती खोगीर जमा झाले हे पहात. (खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसण्यासाठीचे चामडी आसन.) त्यामुळे मुर्खांच्या किंवा अकुशल लोकांच्या भरतीला 'खोगीर भरती' नाव पडले. जे आपण आजही वापरतो. तसेच सैन्यामुळे मिळालेले अनेक वाक्प्रचार आजही वापरात आहेत. जसे पाचावर धारण बसणे. पाचावर धारण जाणे किंवा बसणे हा धान्याचा बाजार भाव आहे. साधारण एक ते सव्वापर्यंत धारण असेल तर सैन्यात धान्य स्वस्त आहे असे समजले जाई. पण अगदी पाचाच्या वर धारण गेली याचा अर्थ सैन्याला फाके पडणार हे नक्की. त्यामुळे सैन्य घाबरुन जाई. त्यामुळे घाबरण्यासाठी "त्याची पाचावर धारण बसली" म्हणतात. या मोजमापाविषयी जाणकार सांगतीलच.

गाशावरुन एक आठवले. घोड्यावर खोगीर घालायच्या अगोदर एक चामड्याचे तुकडे जोडुन तयार केलेले आच्छादन घोड्याच्या पाठीवर घालायचे. त्याचा बराचसा भाग हा घोड्याच्या दोन्ही पुठ्यांवर येई मग खोगीर आवळत असत व त्यावर गाशा टाकत. या चामडी आच्छादनाला पाखर म्हणत. त्यामुळे घोड्याच्या पुठ्यांना काट्याचा, झुडपांचा त्रास होत नसे. आपण "मायेची पाखर घालणे" असं म्हणतो ती हिच पाखर. मायेची पाखर घालणे हा वाक्प्रचार नसुन ती उपमा आहे. माझ्या आजोबांच्या घोड्याची पाखर आत्ता काही वर्षांपुर्वीपर्यंत आमच्याकडे होती.
(वरील तिनही म्हणींची माहिती शाली यांनी दिली आहे.)



तुमच्याकडे म्हणींचा उगम असेल तर उत्तमच नाहीतर फक्त म्हणी आणि वाक्प्रचार लिहिल्यातरी चालतील.
करुया सुरवात?... ... ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.maayboli.com/hitguj/grammar_and_language
भाषा आणि व्याकरण असा एक ग्रुप आहे.
आता आणखी थोडा आगाऊपणा.
मभादि येतोय, तर या विषयावरचा एक लेख संयोजक शालींकडून लिहून घेऊ शकतील.

पाचावर धारण बसणे हा वाक्प्रचार सैन्याशीच संबंधित आहे असे नसावे. धारण म्हणजे धान्य भाव किंवा बाजारभाव. ते इतके वाढले की रुपयाला किंवा एका ठराविक किंमतीला मिळणारे विपुल धान्य आता फक्त पाच पायल्या मिळू लागले. यामुळे लोक हवालदिल झाले , असा अर्थ आहे.

होय हीरा. धारण हा बाजाराशी संबधीत शब्द असावा म्हणजे आहे. पण मला तो सैन्यामुळे जास्त यासाठी लक्षात राहीला की शत्रुसैन्याची तयारी आजमावण्याची किंवा त्यांना कमजोर करण्याची जी साधने होती त्यात धान्याची रसद तोडुन भाव वाढवणे हा महत्वाचा भाग मानला जाई. त्यामुळे बाजारात हा शब्द जास्त वापरण्यापेक्षा सैनिकांमधे याचा जास्त वापर असावा. अमक्या तमक्याच्या सैन्यात काय धारण होती? या सारखे प्रश्न सैनिकांच्या तुकडीतच जास्त चर्चीले जात. अर्थात हा माझा अंदाज व ऐकीव माहिती आहे.

गगनाला गवसणी: गवसणी म्हणजे आवरण. एखादी गोष्ट झाकून ठेवायचे वस्त्र. जसे कि वाद्ये (तबला इत्यादी) झाकून ठेवण्याची गवसणी. त्यावरूनच एखादी अशक्यप्राय गोष्ट साध्य करणे म्हणजे आकाशाला गवसणी घातल्याची उपमा दिली जाऊ लागली. त्यातूनच पुढे खूप मोठ्या अभूतपूर्व पराक्रमाला "गगनाला गवसणी घालणे" म्हटले जाऊ लागले.

"सैन्य नॉर्मली विकत घेऊन वगैरे धान्य वापरीत असे" ही कन्सेप्ट मला जरा शंकास्पद वाटते आहे. ज्या काळी 'वॉर बाउंटी' नावाचा प्रकार होता, अशा काळाबद्दलच आपण बोलत आहोत ना?

आ.रा.रा. माझ्या माहितीप्रमाणे तरी पुर्वी सैन्याला रोजमुरा दिला जायचा. बरेचदा आणिबाणीची परिस्थिती असेल तर दोन किंवा तिन महिन्यांचा रोजमुरा युध्दाअगोदरच दिला जायचा. प्रत्येकाच्या हुद्याप्रमाणे हा रोजमुरा मिळे. तो कसा खर्च करायचा ते सैनिक ठरवे. सैन्याबरोबर रोजच्या गरजेच्या वस्तु आणि सेवांपासुन मनोरंजनापर्यत सगळे उपलब्ध असे. वैद्य असत, जवाहिरे असत, अनेक प्रकारचे कारागीर असत जसे शस्त्रे दुरुस्त करणारे, कपडे शिवणारे, नालबंद, शिकलगार वगैरे. तसेच गणिकाही असत. कवी, पंडीत, गायक असत. अनेक व्यापारीही असत. बँक व्यवस्थाही सोबत असे. हुंड्या (चेक) वटवता येत असत. युद्धाची मोहीम जास्त दिवस चालणार असेल तर त्या राज्याचे टांकसाळ देखील सोबत असे जे ऐनवेळी नाणी पाडु शकत. बहुतेक सैन्यांमध्ये लुटमारीला कठोर शिक्षा असे कारण लुटमारीच्या प्रकरणांमुळे सावकार, व्यापारी यांचा त्या राजावरील विश्वास उडुन बरेचदा अर्थव्यवस्था कमकुवत होत असे. बरेचदा घोडे हे सरकारातुन मिळत तसेच घोडेबाजार हे सैन्याचे फार मोठे आकर्षण असे. फार क्वचित प्रसंगी सैन्याला लुट करायची परवानगी असे पण ते फार अपवादात्मक आणि राजकारणाचा भाग म्हणुन असे. एक मोठे सैन्य म्हणजे एक चालते बोलते गाव असे, त्याची स्वतंत्र अर्थव्यवस्था असे. आणि हे फक्त शिस्तीच्याच जोरावर चालत असे.
यावर लिहिण्यासारखे बरेच आहे पण धाग्याचा विषय वेगळा असल्याने तुर्तास आवरते घेतो.

बहुतेक सैन्यांमध्ये लुटमारीला कठोर शिक्षा असे कारण लुटमारीच्या प्रकरणांमुळे सावकार, व्यापारी यांचा त्या राजावरील विश्वास उडुन बरेचदा अर्थव्यवस्था कमकुवत होत असे.
<<
महोदय,
नक्की कुणाच्या सैन्याबद्दल बोलत आहात?
वेगळा धागा काढा. बोलूच.

' ताकास तूर लागू न देता ' , याबददल मला खूप कुतूहल आहे. इथे कुणी तरी तें शमवेल असं वाटतंय

ताकास तूर हे खरे तर तागास तूर लागू न देणे असे आहे. ताग आणि तुरीची रोपं सारखी दिसतात. असा कुठे तरी वाचल्याचे आठवतंय.

'बाजारात तुरी आणि, भट भटणीला मारी' ही म्हण मी खुप वेळा ऐकली पण तिचा कधी अर्थ समजला नव्हता. एकदा वडिलांना विचारले असता त्यांनी ही म्हण अर्धी असुन
बाजारात तुरी, भट भटणीला मारी
आमटी पातळ करी की घट्ट करी
अशी पुर्ण म्हण आहे असं सांगितले. शब्द थोडे वेगळेही असतील. अर्थ समजतोच आहे. एखादी गोष्ट हातात यायच्या अगोदरच त्याचे काल्पनिक नियोजन करणे. अर्थात ही म्हण अनेकांना माहीत असेल पण मला माहीत नव्हती. Happy

शिवाजी महाराजां नी शत्रूसैन्याला चकवण्यासाठी बैलांच्या शिंगांना मशाली बांधून जंगलात सोडले, अशी काहीतरी हकीगत आहे कात्रजची.

मस्त धागा...आवडला.

पाचावर धारण चा उगम माहीत नव्हता. अप्पा धन्यवाद.

बऱ्याचदा आपण काही म्हणी अर्धवट वापरतो. पुर्ण वापरणे चारचौघात बरे वाटत नाही. त्यातलीच ही एक.
नावडतीचे मिठ आळणी. (पुर्ण म्हण: आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी. Lol )
ही म्हण मी कुठेतरी आंजावरच वाचली होती. कदाचीत माबोवरही वाचली असेल. खुप हसलो होतो. नक्की शब्द माहित नाहीत.
ज्याका आली हागाक, तो घाबरत नाही वाघाक. Proud

"तोंड करी बाता, ढुंगण खाई लाथा"
म्हणजे माणसं तोंडाने बोलून घाण करतात पण लाथा मात्र ढुंगणाला खाव्या लागतात.
उगम नाही माहिती.

"तुळशीला पाणी कळशी कळशी, वेळ मिळेल त्या दिवशी."
म्हणजे कोणतंही काम एखाद्या दिवशी इतकं करायचं आणि इतर दिवशी त्याकडे ढुंकुन पण पहायचं नाही.
उगम माहिती नाही.

"सोनार, शिंपी, कुलकर्णी आप्पा, यांची संगत नको रे बाप्पा"
कारण हे वर उल्लेखलेले सगळे लोक म्हणे स्वतः काम करत नाहीत आणि दुसर्‍याला ही करू देत नाहीत. फक्त गप्पा हाणित बसतात.

"तुळशीला पाणी कळशी कळशी, वेळ मिळेल त्या दिवशी.">>> ही म्हण पहिल्यांदा ऐकली. भारी आहे.

"सोनार, शिंपी, कुलकर्णी आप्पा, यांची संगत नको रे बाप्पा">>> यांची संगत नको म्हणजे बहुतेक असं असावं की यांची संगत आणि वैर दोन्ही नको. कारण थोडा वाद झाला तरी ही माणसे चांगलेच गोत्यात आणु शकतात. (म्हणजे पुर्वी)

"वाघ पडला बावी, कोल्हा त्याला कुल्ले दावी"
म्हणजे वाघ विहिरित पडला की त्याला कोल्हा पण घाबरत नाही आणि कुल्ले दाखवतो म्हणजे चिडवतो.
अर्थात एखादा बलाढ्य्/शक्तिवान माणूस संकटात सापडला की गरिब्/कमी शक्तिवान लोक त्याचा उपहास करतात.
उगम माहिती नाही.

"रंग झाला फिका, अन कोणी देईना मुका"
म्हणजे रूप ओसरलं की किंवा नव्याची नवलाई विसरली की गोष्टींचे नाविन्य रहात नाही.

"डाग झाला फिका आणि मला पतिव्रता म्हणा"
केलेले पाप जुने झाले की पुन्हा मला सभ्य लोकांत गणले जावे ही अपेक्षा बाळगणे.

"हौसेने केला वर, त्याला दिवसा खोकला अन रात्री ज्वर"
किंवा
हौसेने केला पती, त्याला झाला रगतपिती"
एखादी गोष्ट उत्साहाने सुरू करावी आणि त्यात खूप संकटं यावीत अशा अर्थाने.

"भाकरी पहावी काठात आणि बाई पहावी ओठात"
प्रत्येक गोष्टीचा कस पारखण्याची एक विशिष्ट ढब असते ती त्याच प्रमाणे करावी.

"वाघ पडला बावी, कोल्हा त्याला कुल्ले दावी" Biggrin Biggrin पहिल्यांदाच ऐकली.
दक्षिणा, कुठून आणल्या या म्हणी. सगळ्याच भारी. मी या वापरणार नक्की. Lol

भाषेमध्ये ज्या कुणी म्हणींचा शोध लावला असेल त्याला दंडवत.
१०० ओळीत जे सांगता येणार नाही ते एका ओळीत सांगाता येते, तेही अगदी अचुक.

"वाघ पडला बावी, कोल्हा त्याला कुल्ले दावी">>>>> हीच म्हण कोकणीत "वाघ पडलो घळी,केलडा(माकड) दाखयता नाळी(बहुधा बेंबी)"अशी वापरतात.

पेव फुटणे हा असाच एक वाक्प्रचार. पूर्वी घरात जमिनीखाली खड्डा खणून धान्य साठवण्याचे कोठार बनवले जाई. तो खड्डा धान्याने पूर्ण भरला कि शेणामातीने लिंपून बंद केला जाई. त्यास पेव म्हणत. दुष्काळात अथवा अन्यधान्य कमी पडू लागले कि हे पेव फोडून धान्य उपलब्ध करून दिले जाई. ह्या वाक्प्रचाराचा पेव नावाच्या वनस्पतीशी काही लोक संबंध जोडतात तो मात्र बादरायण संबंध आहे. मायबोलीवरील सदस्य हिरा यांनी याबाबत इथे तपशीलात लिहिले आहे.

गाढवाला दिला मान, त्याने उंच केले कान (वाक्प्रचार)
मुर्खाला नको तिथे मान दिला की तो गोन्धळ घालतो.

अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे
अर्थ - दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीनही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.

अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण
अर्थ - असं म्हणतात की मरण वेदनांपेक्शा भुकेच्या वेदना जास्त दु:खदायक असतात.

असेल तर दिवाळी, नसेल तर शिमगा
अर्थ - अनुकुल काळात चै आणि प्रतिकूल काळात उपास घडणे.

उतावळी बावरी, म्हातार्‍याची नवरी
अर्थ - अती उतावळेपणा नेहमी नुकसान करवतो.

करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते (वाक्प्रचार)
अर्थ - काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते, आणि नाही केल्या तरीही नुकसहीच होते.

कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात
अर्थ - हरवलेल्या गोष्टीचा अयोग्य ठिकाणी शोध घेणे.

Pages