म्हणी, वाक्प्रचार आणि त्यांचा उगम व अर्थ.

Submitted by कोदंडपाणी on 10 February, 2019 - 06:07

ग्रामीण बोली भाषांतील शब्द येथे वाचता येतील.

मला ग्रामीण भाषेतले शब्द आवडतात. रोजच्या बोलण्यामध्ये, ऐकायला छान वाटतात. त्यासाठी मी एक धागा काढला आणि त्याला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे मला फक्त शब्द अपेक्षीत होते पण येथे शब्दांबरोबर त्यांचे अर्थ, त्या वस्तुचा उपयोग आणि साधारण स्वरुप वगैरे खुप माहिती तर मिळालीच पण खूप जुन्या आठवणीसुद्धा जागवल्या गेल्या. प्रत्यक्षात मला मात्र यात शब्दांची, माहितीची जास्त भर घालता आली नाही. कुणा कुणाचे नाव घेऊ? सगळ्यांचेच खुप आभार. खुप सुंदर आणि नविन शब्द कळाले तुम्हा सगळ्यांमुळे.

त्या धाग्यावर भरत यांनी सुचवले की वाक्प्रचारांच्या चर्चेसाठी वेगळा धागा काढा. या अगोदर असा काही धागा असेल तर मला सापडला नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण आपल्याला माहित असलेल्या सुंदर, मजेशीर, विनोदी अशा म्हणी देऊयात. शक्यतो त्या म्हणींचा उगम आणि अर्थ माहित असेल तर वाचायलाही खुप छान वाटेल.

त्या धाग्यावर अप्पाने (शाली) दिलेल्या दोन म्हणींनेच सुरवात करुयात.

पुर्वी ऐनवेळच्या लढाईला सैनिकभरती व्हायची. सैन्य युध्दकुशल असण्याची आवश्यकता नसायची फक्त समोरच्या सैन्यावर दबाव टाकन्यासाठी संख्या महत्वाची असायची. त्यामुळे मिळेल त्याला सैन्यात भरती करत. त्यांची मोजदाद व्यक्तिनुसार न करता घोड्यानुसार करत. म्हणजे किती खोगीर जमा झाले हे पहात. (खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसण्यासाठीचे चामडी आसन.) त्यामुळे मुर्खांच्या किंवा अकुशल लोकांच्या भरतीला 'खोगीर भरती' नाव पडले. जे आपण आजही वापरतो. तसेच सैन्यामुळे मिळालेले अनेक वाक्प्रचार आजही वापरात आहेत. जसे पाचावर धारण बसणे. पाचावर धारण जाणे किंवा बसणे हा धान्याचा बाजार भाव आहे. साधारण एक ते सव्वापर्यंत धारण असेल तर सैन्यात धान्य स्वस्त आहे असे समजले जाई. पण अगदी पाचाच्या वर धारण गेली याचा अर्थ सैन्याला फाके पडणार हे नक्की. त्यामुळे सैन्य घाबरुन जाई. त्यामुळे घाबरण्यासाठी "त्याची पाचावर धारण बसली" म्हणतात. या मोजमापाविषयी जाणकार सांगतीलच.

गाशावरुन एक आठवले. घोड्यावर खोगीर घालायच्या अगोदर एक चामड्याचे तुकडे जोडुन तयार केलेले आच्छादन घोड्याच्या पाठीवर घालायचे. त्याचा बराचसा भाग हा घोड्याच्या दोन्ही पुठ्यांवर येई मग खोगीर आवळत असत व त्यावर गाशा टाकत. या चामडी आच्छादनाला पाखर म्हणत. त्यामुळे घोड्याच्या पुठ्यांना काट्याचा, झुडपांचा त्रास होत नसे. आपण "मायेची पाखर घालणे" असं म्हणतो ती हिच पाखर. मायेची पाखर घालणे हा वाक्प्रचार नसुन ती उपमा आहे. माझ्या आजोबांच्या घोड्याची पाखर आत्ता काही वर्षांपुर्वीपर्यंत आमच्याकडे होती.
(वरील तिनही म्हणींची माहिती शाली यांनी दिली आहे.)



तुमच्याकडे म्हणींचा उगम असेल तर उत्तमच नाहीतर फक्त म्हणी आणि वाक्प्रचार लिहिल्यातरी चालतील.
करुया सुरवात?... ... ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जावई माझा भला आणि लेक बाईल बुध्या झाला.

दिवाळीत लेक घरी येते जावयासोबत. त्यामुळे ही बाई खूष होते.
तिचा लेक त्याच्या बायकोसोबत तिच्या माहेरी जातो, ते काही तिला आवडत नाही, आणि त्याला बाईल बुध्या ठरवते.

शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे पटले - शिंक्यातील दूध खाली सांडल तर बोक्याला आयता मेनू मिळतो . एखाद्याला अकस्मात फायदा झाला तर हि म्हण वापरतात .

पै दक्षिणा , लक्ष प्रदक्षिणा - फुकटात काम उकळून घेणे

बायकांत पुरुष लांबोडा - पण लक्षात कोण घेतो मध्ये हि म्हण आहे

बिगारीचं घोडं , तरवडयाचा फोक - स्वतःच्या घोड्याची काळजी घेतो तशी बिगाऱ्याच्या घोड्याची कोणी घेत नाही आणि त्याला मारूनमुटकून काम करून घेतात . थोडक्यात दुसऱ्याच्या वस्तूची कोण काळजी घेतो ?

रिकामा नाव्ही , भिंतीला तुंबड्या लावी - पूर्वी तुंबडी लावून शरीरातील नासके रक्त काढायचं काम न्हाव्याकडे असे . थोडक्यात रिकामा उद्योग करीत बसणे .

१.भीड भिकेची बहीण.
कोकणी अवतार = भिडे भिडे पोट वाढे.
२.पायावर पाणी घाल म्हटल तर तोरड्या किती तोळ्याच्या?
कोकणी अवतार= ढुं**वर पाणी घाल म्हटला तर लोंबता काय ता विचारु नको.

तुंबडी लावणे - शरीरातील इंद्रियांच्या विकारांवरील एका चिकित्सेला ‘तुंबडी लावणे’ म्हणतात. ज्या विकारांमध्ये शोथ (दाहयुक्त सूज) किंवा रक्त एकाच ठिकाणी गोळा होण्याची क्रिया प्रामुख्याने आढळते, त्याच विकारांकरिता ही चिकित्सा पद्धती एके काळी वापरात होती. या चिकित्सेचा हेतू रक्त शरीराच्या पृष्ठभागाकडे खेचून घेणे किंवा दूषित रक्त शरीराबाहेर काढून टाकणे, हा असे. तुंबडी लावण्याचे दोन प्रकार वापरात होते : (१) शुष्क आणि (२) आर्द्र. शुष्क तुंबडी लावण्यासाठी दूषित भागावरील त्वचेवर पैशासारखा गोल पदार्थ ठेवून त्यावर कापूर ठेवून तो पेटवितात. जाळ झाल्याबरोबर त्यावर धातूची लोटी उलटी ठेवतात. लोटीतील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे आतील हवेचा दाब कमी पडतो व त्वचा आत ओढली जाते. लोटीचे काठ जाड व गोल असले म्हणजे त्वचेला इजा होत नाही.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

हि अतिप्राचीन पद्धत असून मुहम्मद पैगंबरामुळे मुस्लिम युनानी हकीम लोकांत लोकप्रिय आहे. ते लोक त्याला अल-हिजामा म्हणतात . आपल्याकडे आयुर्वेदात जळू लावण्याचा जलौका विधी वेगळा आहे . आजकाल कपींग म्हणून जे प्रस्थ आलाय ते हेच .
स्रोत - मी (lol)

अच्छा हा अर्थ आहे का तुंबडीचा!
जळवा लावत हे वाचल्याने अनमान धपक्याने जळवा= तुंबडी धरलं.
मेधाविनां धन्यवाद.त्यांच्या शंकेने अर्थ कळला.

खर्चणाऱ्याचे खर्चते, कोठावळ्याचे पोट दुखते - खुद्द यजमान एखादा खर्च मंजूर करत असे पण खालचे मुनीम का-कु करत तर हि म्हण वापरात असायचे

गाड्यावर नाव ,नावेवर गाडा - नाव तयार केल्यावर नदीपर्यंत जायला गाड्यावर वाहून नेली जाते, आणि नदी पार करताना नावेत गाडा वाहून नेला जातो. म्हणजे कालपरत्वे परस्परांची मदत लागू शकते किंवा सर्व दिवस सारखे नसतात.

जशी देणावळ तशी धुणावळ - जसा खर्च होईल तसेच काम होईल . कमी पैशात चांगलं काम होत नाही

भिकेचे हंडी शिंक्यास चढत नाही - भिकारी जे मिळेल ते खाऊन उदरनिर्वाह करत असतो . त्याला त्याचा कटोरा शिंक्यावरती वर लटकून उपयोग नसतो कारण त्याला उद्या परत तो भिकेसाठी लागणारच असतो .

वळचणीचे पाणी आढ्याला जात (चढत ) नाही - बेडकाचा फुगून बैल होत नाही या म्हणीला समानार्थी

वळचणीचे पाणी आढ्याला जात (चढत ) नाही -
याचा शब्दशः अर्थ काय होतो?
वळचण म्हणजे घराबाहेर आलेला छपराचा भाग. ज्याखाली पावसापासून आडोसा मिळतो.
आढा म्हणजे छपराचा घरातील भाग.
बरोबर?

भरत :
धारण - घराचे २ मुख्य खांब ज्यावर आढे आडवे बसवतात

आढे/ आडे - घराचा छताचा मुख्य आडवा आधार

वळचण - छपराचा भिंती बाहेर आलेला भाग. पावसाचे पाणी भिंती वर उडू नये म्हणून थोडा पुढे घेत. त्याला पत्र्याच्या पागोळ्या सुद्धा असतात.

यावरून वळचणीची गंगा आढ्याला अशी म्हण आली. याचा अर्थ लहान माणसाला मोठी जबाबदारी देणे.

जुन्या काळात साधारण अशी घरं बांधत. देशी कौलं वापरत. नंतर मंगलोरी कौल वापरायला सुरुवात झाली.
https://www.youtube.com/watch?v=P73REgj-3UE

वळचणीचे पाणी आढ्याला जात (चढत ) नाही -
याचा शब्दशः अर्थ काय होतो?>>>>> परंपरेच्या उलटी गोष्ट घडणे.

जाणत्याआधी कनिष्ठ जाणे (ओवी नीट आठवत नाही)
वळचणीचे पाणी आढ्या गेले......खानोलकरांच्या अकाली मृत्यूवर पु.लं.नी लिहिलेल्या लेखाचे शीर्षक होते,वळचणीचे
वळचणीचे पाणी आढ्या गेले.

' तुंबडी ' म्हणजे जळू नव्हे, तुंबडी हे लोट्याच्या आकाराचे तांब्याच्या धातूचे पात्र असते, परंतू त्याच्या तळाला एक बारीक छिद्र असते. तुंबडीचे मोठे तोंड मुका मार लागलेल्या त्वचेवर दाबून ठेवून छिद्राला तोंड लावून हवा शोषली असता दूषित रक्त खेचले जाते . तुंबडीचा मधला भाग खोलगट असल्याने रक्त त्यात जमा होते,थेट तोंडात जात नाही . भींतीला तुंबडी लावून छीद्राकडील भागास कान लावले असता पलीकडचा आवाज स्पष्ट ऐकायला येतो , तुंबडी स्टेथेस्कोप सारखे काम करते . तुंबडी लावण्याचे काम न्हावी करत असे व न्हाव्यांना गावातल्या घरातील प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायचा स्वभाव असल्यामुळे हि म्हण जन्माला आली .
स्रोत : माझे ९३ वर्षीय आजोबा .

@ मार्मिक :
गावाकडे अशाच पद्धतीने तुंबडी लाऊन उपचार करताना पाहीले आहे. पण मी पाहीलेली तुंबडी आकाराने अन दिसायला चिलीमसारखी पण तांब्याची बनलेली होती

सवळं दाट आणि महारवाड्यातून वाट.
आळश्याच्या दारी आली गंगा, म्हणे कुणीतरी माझे पाय बुडवा
आडाण्याचा आला गाडा, वाटेवरल्या वेशी काढा.
गांडीखाली आरी आणि चांभार पोरं मारी
(आरी म्हणजे चाम्भारचे हत्यार जे मुलं खेळणं म्हणून खेळू शकतात. तर ते हत्यार हरवलं असं समजून चांभार पोरं धोपटतो पण ते सापडतं त्याच्या बुडाखालीच)
डोक्यावर पदर आणि वेशीवर नजर
हातभर गजरा आणि गावभर नजरा
ढुंगणाला सुटली खाज, हाताला नाही लाज
अगं माझे बायले, सारे तुला वाह्यले
("बायकोच्या म्हणण्याप्रमाणे वागला, तिला कितीही दिले ,तरी ती ती काय समाधानी राहत नाही.")
जिच्या घरी ताक, तिचे वर नाक
ज्याचे कुडे, त्याचे पुढे
(जो दुसर्‍याचे वाईट चिंततो, त्याचेच वाईट होते.)
जशी देणावळ, तशी धुणावळ ( आपण जसे दुसर्‍याच्या उपयोगी पडतो तसे दुसरा ही आपल्या पडतो)
अर्धा वैद्य आणि मरणाला खाद्य ( अर्धवट ज्ञान नेहमी घात करते)
अटक्याचा सौदा आणि येरझारा चौदा.
(छोट्या कामासाठी उगिचच केलेली जास्तीची मेहनत)
असेल ते मिटवा आणि नसेल ते भेटवा
(सहज साध्य होते ते कुणालाच नको असते, पण नसेल ते मिळण्याची अपेक्षा करणे)
अनोळखी उपाख्या आणि नऊ पट होम.
(अपरिचित माणसाशी केलेल्या व्यवहारात नुकसानच होते.)

मागो, तुम्ही सांगितल्यावर अर्थ समजला. तुंबडी म्हणजे काय ते माहित होते पण ती भिंतीला का लावत असेल न्हावी? हा प्रश्न सुटला नव्हता, तो तुम्ही सोडवला. धन्यवाद!

ये हुई ना बात दक्षिणा!
उगाच 'बरे दिसत नाही' या नावाखाली सभ्य भाषेत म्हणी लिहिल्या की म्हणींमधली मज्जा जाते. म्हणजे 'अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज' असं म्हणन्यात अर्थ नाही. जुनी लोकं जी भाषा वापरत असत त्याच भाषेत ती म्हण छान वाटते.
मी लिहिली असती तर "बुडाखाली आरी" असं लिहुन म्हणीची मजा घालवली असती. Lol

बऱ्याच म्हणी माहिती नव्हत्या. अर्थही माहिती नव्हते. Thank u सर्वांना.

दक्षे rocking एकदम. ग्रेट आहेस तू. कित्ती माहितेय तुला.

ग्रामीण शब्द काही अंगावर येतात मात्र वाचताना, अशा भाषेची सवय नसल्याने.

कामाचा कांगावा आणि माहेरचा सांगावा
आधीच हौस, त्यात पडला पाऊस
( काम करतोय असा नुसता भास निर्माण करून माहेरून निरोप आलाय म्हणून काम चुकवून पळ काढणे)

चुलिपुढं हागायचं आणि नशिबात होतं म्हणायचं
( काहीही झालं तरीही फक्त नशिबाला दोष लावणे)

वाक्प्रचार

लंकेची पार्वती होणे -
अंगावर दागिने न घातलेली स्त्री.
सीताहरण झाले तेंव्हा, रामाला मार्ग कळावा म्हणून सीतेने मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार उतरवून टाकले. ती जेव्हा लंकेला पोहोचली तेव्हा तिचे स्त्रीधनही तिच्याकडे नव्हते. त्यावरून हा वाक्प्रचार रूढ झाला आहे.

एका पिसाने मोर होणे
अपुर्‍या साधन सामुग्रीत काहीतरी अचाट साध्य करण्याचा प्रयत्न करणे.

आधीच नाचरी, त्यात पायांत बांधली घागरी. फाटक्याला मारावी गाठ आणि वार्‍याला द्यावी पाठ. हत्ती पा* , *दे फुस्स.

काम ना धाम आणि उघड्या अंगाला घाम.

आपलीच मोरी मुतायची चोरी.

लांबच्यावर लागले डोळे, जवळच्यावर हागले कावळे.

दक्षिणा व इतर जाणकाराना सलाम ! काय श्रीमंती आहे बोलीभाषेची !!
* सभ्य भाषेत म्हणी लिहिल्या की म्हणींमधली मज्जा जाते. * - खरंय. मला वाटतं, प्रत्येक म्हणीचं खास अस॔ नादमाधुर्य व ठसका असतो. शब्द बदलले कीं ती खासियतच जाते.

भाऊ काका __/\__
***************************************************

भिकेत कावळा हागणे.
(मोठ्या मुश्किलिने एखादी गोष्ट मिळाल्यावर तिचा सुयोग्य वापर करू न शकणे)

दुधात साखर अन अन्घोळीत मूत
(कामात काम केल्यावर काय केले याचा पत्ता लागत नाही)

पाटलाच घोडं महाराला भूषण
ज्याची वस्तु आहे त्याच्यापेक्षा इतरांनाच त्या वस्तूचे कौतुक वाटणे या अर्थाने हि म्हण वापरली जाते. पुर्वीच्या काळी पाटलाकडे वेगवेगळ्या कामांंसाठी नोकरगडी असायचे. त्यातच प्राणी सांभाळायला, फिरवायला महार लोक असायचे. तर पाटलापेक्षा त्या घोड्याचे कौतुक महारालाच जास्त अश्या लौकिकार्थाने हि म्हण वापरली जाते. (अर्थ नेटवरून साभार)

संडास मालकाचा, रूबाब भंग्याचा
दुसर्‍याच्या वस्तूवर हक्काने रूबाब दाखवणे.

चाय से किटली गरम
ही संज्ञा खास करून मंत्र्यांचे पी ए किंवा एखाद्या साहेबाचा खास शिपाई असतो त्यांना चपखल लागू पडते.
कारण साहेब हा त्याच्या कर्तृत्वावर मोठा झालेला असतो पण हे लोक निव्वळ मोठ्या लोकांबरोबर काम करतात म्हणून स्वत:ला बलवान समजू लागतात. अशा पावर ला 'उधार का सिंदूर' असं ही म्हण्तात.

राजा उदार झाला आणि भोपळा काढुन दिला
खरे तर एखादा राजा जेव्हां उदार होऊन बक्षीस देतो तेव्हां तो अंगावरील एखादे आभूषण किंवा भरपुर सोन्याच्या मोहरा वगैरे देतो असे आपण कथा कहाण्यामधून ऐकले आहे पण जेव्हां एखादा राजा खुश होऊन भोपळा भेट देतो, ज्याला काहीच किंमत नसते, अशा प्रसंगावर बेतलेली हि म्हण आहे.
या म्हणीचा अर्थ असा कि खुप मदत करतो आहे असा आव आणुन काहीही न करणे किंवा न देणे. (अर्थ नेट्वरून साभार)

"वळचणीचे पाणी आढ्याला जात (चढत ) नाही - याचा शब्दशः अर्थ काय होतो?" प्रतिसादात हे वाचल्यावर एक श्लोक आठवला. तो असा: ज्येष्ठा आधी कनिष्ठाने जाणे केले नारायणे हे उफराटे. उफराटे फार वाटे माझे मनी वळचणीचे पाणी आढ्या गेले. यावरून सन्त निव्रुत्तिनाथाना आपला धाकटा भाऊ सन्त ज्ञानेश्वर समाधिस्थ झाल्यावर काय वाटले असेल हे समजते. हे थोडे धाग्यापासून वेगळे लिहिले त्याबद्दल क्षमस्व.

दिगोचि, फार सुंदर. अवांतर तर अजिबात नाही. 'केले नारायणे उफराटे ' हे आठवत होते पण पूर्ण ओवी आठवत नव्हती. धन्यवाद.

Pages