देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!
'देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!'
असे वाक्य वहीवर लिहिले की परीक्षेत पेपर सोप्पा जातो, पेपराच्या प्रत्येक पानावर डोक्यावर लिहिले की चांगले मार्क मिळतात अशी एक युक्ती मला शाळेत सोडायलाआणायला येणार्या पुष्पाने जाताना सांगितली. माझे वय ७ आणि तिचे वय १५. तिने नववीत नापास झाल्यावर शाळा सोडली होती. एवढी पावरबाज युक्ती माहिती असून तू नापास कशी झालीस? हे विचारण्याइतकी अक्कल मला वय वर्ष सातमधे नव्हती. भारीच वाटली होती ती युक्ती.
मी लग्गेच अमलात आणले ते. सर्व वह्यांवर लिहिले. पेपरात प्रत्येक पानाच्या डोक्यावर लिहायचा विचार होता पण माझा लिखाणाचा वेग इतका सुपरफास्ट असायचा की बरेचदा पेपर लिहून पूर्ण व्हायचा नाही त्यात ही ब्याद कुठे लिहीत बसा. देव बघेल तेव्हा त्याला पहिले पान दिसेलच की. असा सोयीस्कर विचार करून मी हे वाक्य फक्त पहिल्या पानावरच लिहिले.
इयत्ता तिसरीत मला तसेही बरे मार्कच पडायचे, तेवढेच याही परिक्षेत पडले. वाक्य लिहिण्याचा स्पेशल असर काही दिसला नाही. मात्र पेपरात पहिल्या पानावर लिहिलेल्या वाक्यांबद्दल वर्गशिक्षिका बाईंकडून त्यांची आख्खं विश्व इकडचं तिकडे हलेल अश्या पावरची स्पेशल थोबाडित मात्र मिळाली.
तेव्हा शिक्षकांनी थोडेफार फटके हाणले तरी पालक आकांडतांडव करत नसत त्यामुळे घरी येऊन थोबाडितचे सांगितल्यावर 'तू काय केलं होतंस?' हाच प्रश्न पहिला. उत्तरादाखल भारी युक्ती आईला सांगण्यात आली.
आईने डोक्यावर हात मारला, स्वतःच्याच. लिहिलेल्या वाक्याचा अर्थ नीट स्पष्ट करून सांगण्यात आला. अभ्यासाशिवाय, स्वतःच्या प्रयत्नांशिवाय तरणोपाय नाही हे नीटच बसवले डोक्यात. परिक्षेला जाताना देवाला नमस्कार करणे हे फारतर केलेल्या अभ्यासाचा शांतपणे विचार करण्यापुरते उपयोगी पडते. हे पक्कं बसलं डोक्यात. आणि शिक्षणाच्या पुढच्या टप्प्यांमधे अजूनच खोल कोरलं गेलं.
कट टू पाचेक वर्षांपूर्वीची एक घटना.
"आपण या भागात शूट करण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला इथले सगळे रस्ते माहिती हवेत. आत्तापर्यंत आपण तीन चार वेळा इथून गेलोय. तेव्हाच तुम्हाला रस्ता लक्षात ठेवायचा सांगितलेले आहे. आता ड्रायव्हर वेगळा आहे. त्याला मुंढरपर्यंतचा रस्ता तुम्ही सांगायचा."
दिग्दर्शकाने त्याच्या तीनही एडीजना सांगितले. रत्नागिरी शहरातून राई-भातगाव पुलाच्या मार्गे आम्हाला मुंढर गावात पोचायचे होते. रत्नागिरीत कामे आटपता आटपता संध्याकाळचे साडेसात वाजून गेले होते. मला राई-भातगाव पुलापर्यंतचा रस्ता माहित नव्हता. पुढचा फारच ओळखीचा होता. शहरातून बाहेर पडतानाचा फाटा योग्य तो निवडला आणि मग निघालो. बराच वेळ जात राह्यलो तरी राई-भातगाव पूल येण्याचे चिन्ह दिसेना. डोंगरातला रस्ता, अंधाराची वेळ त्यामुळे रस्ता चुकलोय हे लक्षात यायला थोडा वेळच लागला. बर चुकलोय तर नक्की कुठे चुकलोय हे कळायला मार्ग नाही. आता काय करायचे?
एडी १ - अं अं अं
एडी २ - रस्ता चुकलो? रस्ता चुकलो? (खिशातून फोन काढून त्यात कुठल्या तरी गुरूच्या भजनाची ऑडिओ सुरू केली.)
एडी ३ - कुणाला तरी विचारायला पाहिजे.
ड्रायव्हर - आता कसा रस्ता कळणार? ( गाडीत वाजत असलेले किशोरकुमारचे गाणे बंद करून टाकले. खिशातून मोबाइल काढून कुठल्या तरी गुरूच्या फोटोचा वॉलपेपर बघून फोन डोक्याला लावणे सुरू)
दिग्दर्शक, मी आणि एडी ३ यांच्यात अजून थोडी वाक्यांची देवाणघेवाण होऊन आहे त्या रस्त्याने पुढे जाऊया. जे पहिलं गाव लागेल तिथे विचारूया. असे ठरले. गेलो.
वाटेत एक उजवे वळण आमचे सुटले होते त्यामुळे आम्ही पुळ्याच्या दिशेने निघालो होतो. पहिले जे गाव लागले तिथे हा उलगडा झाला. मग अजून चार पाच जणांना विचारल्यावर योग्य तो रस्ता कसा सापडेल तेही कळले. तसे गेलो. इप्सित स्थळी पोचलो. एक तासा दीडतासाचा उशीर झाला फारतर.
खाली उतरून किंवा गाडीतच बसून रस्त्याने येणार्या माणसाला थांबवून रस्ता विचारणे वगैरे करायला भाविक मंडळींची हिंमत होत नव्हती. कर्णकटू भजन सतत मोठ्ठ्या आवाजात ऐकणे आणि सतत फोनमधला गुरूंच्या फोटोचा वॉलपेपर बघत फोन डोक्याला लावणे यापलिकडे त्यांचे प्रयत्न जात नव्हते.
राई-भातगावच्या पुलावर आल्यावर पुढच्या रस्त्याबद्दल कुणालाच प्रश्न नव्हता. त्यामुळे पुलाशी पोचल्यावर 'चला आता प्रश्न नाही!' अशी आमची प्रतिक्रिया तर भाविक मंडळींचे भजन, नमस्कार, जप वगैरे चालूच होते. मुंढरला पोचल्यावर एडी २ म्हणे, 'स्वामींनी वाचवले!'. सर्वांनीच कपालबडवती करून घेतली तिथे.
कुणावर श्रद्धा असणे चुकीचे नाही पण प्रत्यक्ष प्रयत्न, प्रत्यक्ष मार्ग चालणे, प्रत्यक्ष कष्ट तुमचे तुम्हालाच करायचे आहेत. कोणी मार्ग बिर्ग दाखवायला येणार नसतो. आपल्यापेक्षा अनुभव जास्त असलेले लोक पॉइंटर्स देऊ शकतात. त्याचा विचार करण्याचा कदाचित उपयोग होऊ शकतो. श्रद्धेचा उपयोग फारतर मार्ग शोधताना डोके शांत ठेवायला होऊ शकतो. तुम्ही मनाने पुरेसे घट्ट असाल तर त्याचीही गरज नाही. मनाने घट्ट होत जाणे हे एका रात्रीत होत नाही. ती प्रक्रिया मोठी असते. पण आपल्याकडून प्रयत्न केल्याशिवाय ती सुरू होत नाही.
तस्मात 'अरे मूर्खा अभ्यास कर!' हेच अंतिम वगैरे सत्य...
डिंगडाँग...
मस्त !
मस्त !
संस्कृतीडुबुक्क
संस्कृतीडुबुक्क![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तस्मात 'अरे मूर्खा अभ्यास
तस्मात 'अरे मूर्खा अभ्यास कर!' हेच अंतिम वगैरे सत्य...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डिंगडाँग... >>> हे फारच आवडले..
लेख आवडला. देवा मला पास कर..
लेख आवडला.
देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर! हे वाक्य खूप दिवसांनी ऐकलं लहानपणी फार वेळा कानावर पडायचं ...
कोणाला हे वाक्य कशातलं (पुस्तक नाटक वगैरे) आहे ते माहीत आहे का?
२४ या आकडयाचा २४ तास जप
२४ या आकडयाचा २४ तास जप केल्यास इच्छित स्त्री ची प्राप्ती होते.
सिद्धतेची गरज आहे का?
ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये
ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये देवाची भजने आणि फोटो राहतात त्यांच्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅपसुद्धा राहु शकतो. गुगलबाबा हाही एक अतिशय पॉवरबाज देव आहे हे मात्र या मंडळींच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. यासाठी वेगळा डेटा पॅक घ्याय्ची गरज नाही. ज्या डेटापॅकवर व्हॉ अॅ आणि फॉरवर्ड्सचा बिजिनेस चालतो त्यावरच गुगलमॅप पण चालते, आणि हल्ली जळीस्थळी लोक व्हॉअॅ बघत असतात. म्हणजे १० रुपयाचा का होईना डेटापॅक वापरतात.
नीधप, मस्त लिहिल आहे.
नीधप, मस्त लिहिल आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कष्ट व श्रद्ध्हा या दोन
कष्ट व श्रद्ध्हा या दोन गोष्टी एकमेकाना पूरक होतात.
पण बरेच लोक श्रद्धा ही कष्टाना पर्याय म्हणुन वापरतात.
लेख आवडला. मस्तं लिहिलंय.
लेख आवडला. मस्तं लिहिलंय.
आपण खंबीर झालो की आपली
आपण खंबीर झालो की आपली स्वतःवर, आपल्या विचारंवर, कुवतीवर, बुद्धीवर श्रद्धाच असते.
>>>
+१
हेच म्हणायचंय मला.
कोणावर किंवा कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय कष्टाला फळ नाही. मी ही गोष्ट करूच शकते ही स्वतःवरची श्रद्धा झाली, मी जितकं केलंय तितकं काम मला यश देण्यासाठी पुरेसं आहे ही आपल्या टॅलेंट/ कामावरची श्रद्धा झाली.
श्रद्धा नेहमी देवावर/ माणसावर वगैरेच असायला हवी असं काही नाही
स्वतःच्या क्षमतेची कल्पना
स्वतःच्या क्षमतेची कल्पना असणे ही श्रद्धा नाही वस्तुस्थितीची जाणीव असते.
श्रद्धा हा ऑप्शनल प्रकार आहे. ज्याला हवा त्याने वापरावा.
ज्याला नको त्याचे त्याशिवाय काम होऊ शकते.
सुंदर लेख, आवडलाही आणि
सुंदर लेख, आवडलाही आणि पटलाही.
सुंदर लेख. खूप आवडला.
सुंदर लेख. खूप आवडला. प्रयत्न करणे, कष्ट करणे , एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे हे यशासाठी आवश्यकच आहे पण प्रयत्न केले तरी ही परमेश्वरी कृपेशिवाय यश मिळत नाही हे माझे वैयक्तिक मत.
हेमाताई तुमचं वाक्य पण पटतेय,
हेमाताई तुमचं वाक्य पण पटतेय, काही बाबतीत.
भारी लिहलायस!
भारी लिहलायस!
लेख आवडला आणि पटला. तुमच्या
लेख आवडला आणि पटला.
तुमच्या कोकणातल्या चित्रिकरणाचे अनुभव पण येउ ध्या. वेगळ्या विषयावर असले तरी चालतील. तुमची अनुभव कथनाची शैली आवडते.
वेल सेड!
वेल सेड!
>>>असे वाक्य वहीवर लिहिले की
>>>असे वाक्य वहीवर लिहिले की परीक्षेत पेपर सोप्पा जातो, पेपराच्या प्रत्येक पानावर डोक्यावर लिहिले की चांगले मार्क मिळतात अशी एक युक्ती मला शाळेत सोडायलाआणायला येणार्या पुष्पाने जाताना सांगितली. <<<
आणि
>>>एवढी पावरबाज युक्ती माहिती असून तू नापास कशी झालीस? हे विचारण्याइतकी अक्कल मला वय वर्ष सातमधे नव्हती<<<
तुम्हाला नंतर हे तरी जाणवले असेल ना की त्या वयात तिला काम करावे लागत होते आणि त्यामुळे हा प्रश्न तुम्ही तिला तेव्हा नाही विचारलात हेच बरे केलेत? तिचे उदाहरण देऊनच हा लेख लिहायला हवा होता का? पुढची एडीजची उदाहरणे चांगली चपखल आहेत.
लेख भरकटवायचा नाही असे खोटे लिहिणार नाही. ज्यांना त्या वयात तशी कामे करावी लागतात त्यांच्या घरी शिक्षणाबाबतचे संस्कारही बहुतेकवेळा कमी होत असतात. (संपादन - अश्यांकडे श्रद्धा / अंधश्रद्धा ह्यांचे प्रमाणही वेगळे असते)
आता माझे गृहीतकच चुकीचे असेल आणि ती चांगल्या धनिक घरची असूनही असे म्हणत असेल तर गोष्ट वेगळी!
मस्त...
मस्त...
मी ही गोष्ट करूच शकते ही
मी ही गोष्ट करूच शकते ही स्वतःवरची श्रद्धा झाली, मी जितकं केलंय तितकं काम मला यश देण्यासाठी पुरेसं आहे ही आपल्या टॅलेंट/ कामावरची श्रद्धा झाली.
<<
रियातै,
"श्रद्धा" व "आत्मविश्वास" यात गल्लत होतेय का?
श्रद्धा किंवा फेथ, या शब्दातच, "प्रश्न विचारू नका. विश्वास ठेवा." हे अध्यहृत आहे. जिथे प्रश्न न विचारता विश्वास ठेवला जातो, ती श्रद्धा. स्वतःवर विश्वास ठेवताना, स्वतःच्या क्षमतेची संपूर्ण जाणीव स्वतःला असते, अमुक गोष्ट करताना स्वतःलाच हजार प्रश्न विचारून मगच 'कॅल्क्युलेटेड रिस्क' घेतली जाते. भले ते प्रश्न तुमच्या अंतर्मनात तुमच्या 'सबकॉन्शसली' विचारले गेलेले असोत. मी केलंय तितकं काम/अभ्यास मला यश द्यायला पुरेसे आहे, ही श्रद्धा नव्हेच. तो आत्मविश्वास आहे. मी झोपा काढल्या तरी पास होईन, ही श्रद्धा. It is NOT possible to believe in yourself without asking questions.
उदा. पोहायला येत नसताना, शुद्धीवर असलेला माणूस 'रामभरोसे' खोल पाण्यात उडी मारत नाही. अशी उडी मारली, तर ती 'देव तारून नेईल' अशा श्रद्धेपायी, वा भावनेच्या भरात मारली जाते. व त्याचा परिणाम हमखास भयंकर होतो.
"क्ष" या स्वबाह्य वस्तू/व्यक्ती/शक्तीवर 'श्रद्धा' ठेवली की त्यात 'कॅल्क्युलेशन' संपलेले असते. उरतो केवळ आंधळा प्रवास.
याऊपर, भरपूर तयारी करूनही एकादी डिसीजन घेताना, एकाद्या कठीण प्रसंगाला सामोरे जाताना, आत्मविश्वासाच्या पलिकडे जी भीती मनात असते, ती दूर करण्यासाठी आपण 'जो होगा अच्छा होगा'="क्ष" माझ्या पाठीशी आहे असे म्हणून जबाबदारी पार पाडतो, व यशस्वीही होतो, त्यावेळी, "क्ष" माझ्या पाठी आहे म्हणूनच पार पडलं, हे म्हणणं चुकीचं आहे. कारण जबाबदारी पार आपणच पाडलेली असते. "क्ष" ने नव्हे.
यश मिळाल्याचं श्रेय 'विनयाने' "क्ष"ला देण्याच्या भरात आपण क्ष वर आंधळी श्रद्धा ठेवून मोकळे होतो. व त्यामुळे "क्ष" अधिकाधिक पावरफुल होत जातो. "A god is only as powerful as the number of his worshipers" असं एक वाक्य वाचनात आलं होतं.
हे श्रेय स्वतःला दिले तर क्ष च्या कुबड्यांची गरज लागत नाही. पण मग आपण अहंकारी आहोत अशी उगाचच संस्कारी टोचणी मनाला लागते. मग म्हणायचं काय? तर "आय ट्रीट, ही क्युअर्स". न म्हटलो, तर 'याला किती माज चढलाय', असं लोक म्हणतात, अन त्यापायी मी 'विनय' दाखवला, की पुन्हा "श्रद्धा" फोफावते.
तर, सारांश म्हणजे,
कोणत्याही स्वबाह्य अस्तित्वावरची, कोणतीही श्रद्धा, ही अंधश्रद्धाच आहे.
व, मी इतरत्र म्हट्ल्याप्रमाणे, नास्तिक, अश्रद्ध बनायला, व तसे टिकून रहायला, प्रचंड गट्स लागतात...
विश्व का निर्माण झाले आणि
विश्व का निर्माण झाले आणि त्या आधी काय होते (आणि जे काही होते ते कोठे होते) ह्याची 'गणिती' उत्तरे मनुष्याला मिळाली की हे सर्व वाद-प्रतिवाद संपतील. सध्याची उत्तरे प्रोटोटाईपमधून आलेली किंवा 'तर्केबाज' असून त्यातील ह्युमन फॅक्टर पुन्हा मर्यादीतच असावा.
न्यूबॉर्न बेबी स्विमिंग अश्या प्रकारच्या व्हिडिओजमधील बाळे येडचाप असतात. त्यांच्याकडे ना आत्मविश्वास असतो ना त्यांची कोणावर श्रद्धा असते. ते व्हिडिओजच खोटे असतात. उगाच रबरी इलेक्ट्रॉनिक बाळे पाण्यात बुचकळून बाहेर काढून दाखवली जातात. चांगली टवटवीत दिसतात.
बाकी हल्ली 'चांगला दिवस' बघून ऑपरेशनची तारीख ठरवणार्या डॉक्टरांची संख्या का वाढत आहे कोण जाणे!
प्रयत्नाशिवाय यश मिळत नाही हे
प्रयत्नाशिवाय यश मिळत नाही हे खरच आहे. पण माणसाला अनेक प्रकारच्या भीती ने ग्रासलेल असत.
मला हे जमेल का नाही? हे त्यातलंच एक. अर्थात भीती सुद्धा प्रयत्नपूर्वक कमी करता येते पण सर्वानाच जमत अस नाही आणि मग जो कोणी सांगतो माझ्यावर विश्वास ठेव तुझ काम होईल त्याच्या मागे लोक जातात
त्या प्रक्रिये मध्ये मग कधी प्रयत्न कमी आणि आंधळी श्रद्धा जास्त अस काहीस होत हे समजत नाही
काही चांगले झाले तर देवाला श्रेय द्या याच मूळ कारण कदाचित अस असेल कि त्याने माणूस नम्र राहील.
पण पुन्हा त्या प्रक्रियेमध्ये कुठे तरी कधी तरी प्रयत्न कमी आणि देव आहे ना मग होईल काम ही वृत्ती कधी बळावत गेली ते समजल नाही अस काहीसं घडत असेल
पण अभ्यास प्रयत्न यांना पर्याय नाही हे खरच आहे
पोस्ट आवडली
पोस्ट आवडली
Dima somwari ch uttar lihita
Dima somwari ch uttar lihita yeil. Mobile warun ewadh type karanyache petience nhit.arthat nea la hi charcha chalanar asel tar cause its her rangaberangi paan
बेफिकीर हे वाचा:
बेफिकीर हे वाचा: https://en.wikipedia.org/wiki/Primitive_reflexes#Swimming_reflex
सध्याची उत्तरे प्रोटोटाईपमधून आलेली किंवा 'तर्केबाज' असून त्यातील ह्युमन फॅक्टर पुन्हा मर्यादीतच असावा. >> हे काय बोललात ते कळले नाही. मात्र हे तर्क, त्यांची शक्याशक्यता व देव असण्या-नसण्याची शक्याशक्यता यावर भरपूर साहित्य उपलब्ध आहे. वाचलेत तर आपले बरेच 'तर्क' बदलतील.
आमचा एक किडनी फेलचा पेशंट
आमचा एक किडनी फेलचा पेशंट किडनी ट्रान्सप्लांट करणार होता.
गेल्या आठवड्यात विचारलं तर बोलला... एप्रिल के बाद करुंगा.
अबी ग्रह ठीक नै ऐसा पंडितजी ने बोला है !
बरं .. हा सर्जरी करुन घेणार आहे श्रीलंकेत ! पंडितजी भारतातला की लंकेतला म्हाइत नाही.
प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेसची
प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेसची लिंक वाचून काही मिळाले हे नक्कीच! हे सगळे असेच का ह्या प्रश्नांची उत्तरे संशोधनातून आलेलीही दिसली. संशोधन सतत सुरू असते व त्यातही झालेली प्रगती आधीच्या निष्कर्षांना रद्दबातल ठरवते हेही आठवले. माणूस शोध घेत आहे व क्षणोक्षणी आधीपेक्षा अधिक ज्ञानी होत आहे ह्याचा अर्थ न शोधलेल्या गोष्टी आहेत आणि कदाचित, कदाचित काय, नक्कीच त्याही शोधल्या जातील. स्विमिंग बेबीज ह्या माझ्या पोस्टचा मथितार्थ इतकाच की हे सगळे का, कशासाठी ह्याचे उत्तर मिळणे दुरापास्त आहे. दुसर्या शब्दांत, हे सगळे नसतेच तर कोणाचे काय बिघडले असते हे समजणे अशक्यप्राय आहे. प्रोटोटाईप (भुयारी) तयार करून प्रक्रिया समजून घेणे किंवा विविध तर्क मांडणे हे मानवी बुद्धीमधून निर्माण होते, जिला मर्यादा असतात हे प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेसच्या लिंकमध्येही काही प्रमाणात दिलेले आढळत आहे.
रिया, रंगीबेरंगीसुद्धा
रिया, रंगीबेरंगीसुद्धा मायबोलीवरच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Nee still it is always good
Nee still it is always good to take permission![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Please. Ignore typoz in last post not gng to edit that now
तुझ्या टायपोच काय.. इतरही
तुझ्या टायपोच काय.. इतरही बरंच काही इग्नोर करतेय. चिंता नसावी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages