ह्या देशाने शेवटी एक कडू बातमी पचवलीच! ही बातमी बऱ्याच लोकांना निरनिराळ्या अर्थाने कडू आहे! कुणाला 'तो' ह्या विषयावर बोलता येणार नाही म्हणून तर कुणाला 'त्याच्या 'वर कीस काढता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'तो' खेळला की आपण हरतो हे ठासवता येणार नाही तर कुणाला 'तो' अंतिम सामन्यात खेळतच नाही हा तर्क लावता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'आता कुणाच्या श्रीमंती वर बोलावे' म्हणून तर कुणाला ' त्याच्याकडे इतका पैसा आहे ना .. की पुढच्या अमुक इतक्या पिढ्या ऐत्या बसून खातील' असं आता कुणाबद्दल बोलावे म्हणून कडू! कुणाला 'पण तो देव नाही आहे...' असं सारखे म्हणता येणार नाही म्हणून तर ' तो ग्रेट वगेरे असेल ... पण बाबा लोकांच्या मागे का फिरतो' हा आक्षेप घेता येणार नाही म्हणून कडू! आमच्यासारख्या लोकांना मात्र तो आता खेळणार नाही ह्या एकाच कारणासाठी ही बातमी कडू आहे!
सचिन केव्हातरी निवृत्त होणार होताच. प्रश्न फक्त आमच्या सारख्या लोकांचा होता जे ह्या बोचऱ्या सत्यापासून सतत लांब पळत होते. तरी अधून मधून विचार डोकवायचा. पण काही क्षण हृदयाचे ठोके चुकवून परत जाण्यापलीकडे ह्या विचाराने काहीही केले नाही. आणि आज मात्र ह्या अनपेक्षित बातमीने धक्का तर दिलाच पण मनात मिश्र भावनांचे वादळ देखील उठले. उद्यापासून सचिनला निळ्या जर्सी मध्ये बघता येणार नाही ही कल्पना तरी कशी करायची? २३ वर्ष लागलेली सवय अचानक मोडणार! 'माझं नाव आशय आहे' हे समजण्याची अक्कल आली त्या वयापासून ज्या व्यक्तीचे नाव आयुष्याशी जोडले गेले आहे ती व्यक्ती आता फक्त टेस्ट क्रिकेट खेळताना आणि ते सुद्धा काही दिवसच आपल्याला दिसणार?
कामावर आलो. रात्रपाळी सुरु असताना लॉबी मध्ये सचिनचा विषय निघालाच. आणि साक्षात्कार होत गेला की इतर खेळाडू हे खेळाडूच आहेत आणि सचिन मात्र 'आपला सचिन' आहे. माझ्या कलीग ने विषयाला वाचा फोडून दिली.
" तुम्हाला सांगतो...आमच्या गावी रेडियो वर आम्ही सामने ऐकत असू. आमच्या गावी ही बोचरी थंडी... अंगावर गोधडी घेऊन रेडियोला मध्ये ठेऊन गोल करून बसायचो... सचिन जेव्हा चौकी किंवा छक्की मारायचा तेव्हा अंगावरची गोधडी आम्ही हातात घेऊन नाचत नाचत गोल फिरवायचो! तेवढ्यापुरती थंडी-बिंडी काही नाही... मग पुढे काय होतंय हे ऐकायला आम्ही परत गोधडी पांघरून बसायचो... थंडी होती ना... काय ते दिवस होते.. " - सचिनसाठी अंगावरच्या थंडीची देखील परवा न करणारा हा माझा मित्र! आणि ते सुद्धा रेडियो वर ऐकताना.. टी . वी बघताना वगेरे नाही! ह्या खेळाडूने सर्वांच्या मनात घर कसं केलं होतं हेच ह्या उदाहरणातून दिसून येतं.
माझे मन लगेच बरीच वर्ष मागे सरकले. १९९३ हे वर्ष असावं. इंग्लंडचा संघ भारतात आला होता आणि त्यातील एक टेस्ट मुंबईच्या वानखेडे स्टेडीयम मध्ये होती. आई- बाबांनी मला क्रिकेटची match दाखवायचे ठरवले. त्यावेळेस पनवेल वरून लोकल वगेरे काही नसल्याने मुंबईला जाणे कठीण होते. पण तरीही 'आपण आज सचिनला बघणार' हे मला सकाळपासून सांगितले गेले होते आणि त्यामुळे मी आनंदाने तयार देखील झालो होतो. पण स्टेडीयम मध्ये पोहोचेपर्यंत समजले की सगळी तिकिटे संपली होती! आता काय करणार? शेवटी बाबांनी एका पोलिस हवालदाराला विचारून बघितले. " मुलगा लहान आहे.. पनवेल वरून आलो आहोत आम्ही... ह्याला सचिनला बघायचंय!" आणि आश्चर्य म्हणजे 'सचिन' हे नाव ऐकल्यामुळे आम्हाला विना तिकीट आत प्रवेश मिळाला! आणि आम्ही तो सामना 'टी - टाइम ' पासून खेळ संपेपर्यंत बघितला. त्यावेळेस मी होतो ६ वर्षांचा आणि सचिन तेंडुलकर ह्या व्यक्तीने खेळायला आरंभ केलेल्याला ४ वर्ष झाली होती. केवळ ४ वर्षात नावाभोवती हे वलय! त्या संध्याकाळी सचिन आणि कांबळी खेळत होते. सचिनने मारलेला तो 'कवर ड्राईव' मात्र मला अजून स्वच्छ लक्षात आहे... एखाद्या रंगलेल्या मैफलीत कलाकार चांगली जागा घेतो आणि आपल्याला ती आयुष्यभर लक्षात राहते तसं! आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा तो गजर ऐकला - ' सचिन, सचिन ...( तीन वेळा टाळ्या)'. त्या अनोळखी लोकांमध्ये ओरडण्यात मी देखील सामील झालो. आता मात्र ते त्याच्या नावाने ओरडणं यु -ट्यूब वरच बघायला मिळेल!
लगेच मला एक दुसरे उदाहरण आठवले. आता बऱ्यापैकी इतिहासजमा झालेल्या 'ऑर्कुट' ह्या वेबसाईट वर मी ते वाचले होते. एका अगदी छोट्याशा खेड्यात तो ऑर्कुटवर लिहिणारा इसम गेला होता. तिकडे त्याने पाहिले की त्या खेड्यात फक्त एका टपरीवाल्याकडे एक छोटा रेडियो होता. त्यादिवशी नेमका क्रिकेटचा सामना सुरु होता. एक म्हतारा शेतकरी तिकडे आला. तो मुका असल्यामुळे त्याने खुणेने काहीतरी विचारायचा प्रयत्न केला. टपरीवाल्याने सचिन आउट झाल्याचे त्याला सांगितले आणि तो म्हातारा चक्क जमिनीवर पाय आपटत रडू लागला! आणि वरती आकाशाकडे इशारे करीत निघून गेला. टपरीवाला नंतर स्वतः म्हणाला, " ह्या म्हाताऱ्याचे लांब ६-७ किलोमीटर वर शेत आहे. पण क्रिकेटचा सामना असला की केवळ सचिनने किती केले हे ऐकायला तो इथपर्यंत येतो." ही म्हणजे कमाल झाली. ह्या माणसाचा स्कोर ऐकायला ( बघायला नव्हे ) कुणाला एवढे श्रम घेण्यात सुद्धा काहीच वाटत नाही. मला एकदम आठवलं. दुकानात रेडियो सुरु असायचा. येणारी जाणारी लोकं दोन प्रश्न विचारायची. " कितना हुआ?" आणि "सचिन का कितना हुआ?"
असाच एक घरचा किस्सा आठवतो. कुठलासा सामना सुरु होता. सचिन नेहमीप्रमाणे बहरत होता. रात्रीची ९ ची वेळ असेल. तो साधारण ८५-८६ पर्यंत गेला असताना समोरच्या इस्त्रीवाल्याचा मुलगा इस्त्री केलेले कपडे घेऊन आमच्याकडे आला. माझ्यापेक्षा फक्त एक वर्षाने मोठा. त्यावेळेस मी १२-१३ वर्षांचा असीन. त्याने दारात कपडे देताच टी. वी वर स्कोर झळकला. सचिन तेंडुलकर - ९०. आता काय करायचं ह्या प्रश्नाने तो मुलगा अस्वस्थ झाला. दुकानात तर टी .वी नाही आणि सचिनचे तर शतक होत आहे! त्याच्या चेहऱ्यावरचा अस्वस्थ भाव माझ्या आईच्या लक्षात आला. आणि तिने त्याला सचिनचे शतक होईपर्यंत घरी थांबायला सांगितले. हे ऐकून प्रथम वाटणारा संकोच समोर सचिन असल्यामुळे निघून गेला आणि तो आमच्या बरोबर सामना पाहत बसला. मात्र ९० चे १०० होईपर्यंत सचिनला थोडा वेळ लागला. तोपर्यंत आपला मुलगा कुठे गेला ह्या काळजीत इस्त्रीवाला आमच्या घरी आला आणि बघतो तर मुलगा जमिनीवर बसून टी. वी बघतोय! इतकेच नव्हे तर आईने दिलेली बिस्किटे पण खातो आहे. " देखने दो उसको.. सचिन की सेंच्युरी हो रही है....", बाबा म्हणाले. इस्त्रीवाला पण थांबला. शेवटी सचिनचे शतक झाले आणि त्याचे भाव टिपण्यासारखे होते! एवढेच काय नंतरची एक ओवर सचिनने मारलेले चौकार एन्जोय करत तो त्याच्या बाबांबरोबर परत गेला. त्यादिवशी आम्हाला सर्वांना खिळवून ठेवणारा घटक हा 'सचिन तेंडुलकर' होता. अशा किती लोकांना - बऱ्याचद एकमेकांना ओळखत नसून सुद्धा - त्याने जोडून ठेवले असेल ह्याला गिनती नाही! बस मध्ये जा, ट्रेन मध्ये जा, टपरी वर उभे रहा, नाक्यावर फेरफटका मारा... त्याचा विषय निघाला की सगळे एकमेकांचे मित्र होऊन जायचे!
आठवून बघा ना! तुमच्या शहरातील किंवा गावातील टी. वी शोरूम. सचिन खेळतो आहे. १०० गाठायच्या जवळ आहे. समोर तोबा गर्दी. शोरूम चा मालक पण आनंदाने हे सारे बघू देतोय. आणि शतक झालं की टाळ्या! माझ्या लहानपणापासून मी हे सारे बघत आलो आहे. तुम्ही देखील अनुभवलं असेलच!
आमचे आई-वडील किंवा आजी-आजोबा आमच्या पिढीतील गोष्टींची सतत त्यांच्या पिढीशी तुलना करायचे. अजूनही करतात. म्हणजे, रफी आणि किशोर सारखं तुमच्याकडे कोण आहे? आमच्या पिढीत लेखक झाले तसा एक तरी आहे का तुमच्यात? सिनेमे, संगीत, अभिनेते, साहित्य, महागाई, शिस्त काहीही घ्या! सगळ्यांची तुलना होते! पण एक घटक आम्हाला ह्या सर्व पिढ्यांशी जोडून ठेवून होता - सचिन. मग चेंबुरला राहणाऱ्या माझ्या एका आजीचे, " सकाळी लवकर उठव ग.. सचिन आला आहे खेळायला ( ऑस्ट्रेलिया आणि न्यू-झीलंड मधल्या त्या सकाळी लवकर उठून बघितलेल्या टेस्ट्स आठवा..).. ", असे माझ्या आईला सांगणे असो किंवा " सचिनची सेन्चुरी झाली", अशी मी शाळेतून घरी येताना दारात उभं राहून माझ्या आजोबांनी केलेली घोषणा असो! मामाकडे गेलो आणि सामना सुरु असेल तर सचिनला दाद देताना माझ्या आजीचे भाव अजून लक्षात आहेत! पण सचिन आउट झाला की आजीला चेहऱ्यावरची नाराजी लपवता यायची नाही! मग किंचित हसून, जराशी मान हलवून ती आत निघून जायची की मग बाहेर यायचीच नाही! आई, बाबा सुद्धा घरी आले की दारातच उभं राहून टी. वी कडे बघत . , " सचिन आहे ना ... हुश्श " असं म्हणून त्या क्षणी निश्चिंत होऊन आत शिरायचे. प्रत्येक घरातील, प्रत्येक घटकाच्या आणि प्रत्येक पिढीच्या अपेक्षांचे ओझे वाहत हा माणूस गेली २३ वर्ष स्पर्धा करतो आहे - अर्थात स्वतःशी! आणि ह्या स्वतःची असलेल्या स्पर्धेमुळे तो आज क्रिकेटचा ध्रुव झाला आहे. १३-१४ वर्षांच्या वयापासून प्रोफेशनल आयुष्य सुरु केलेल्या ह्या व्यक्तीला ना कधी मित्रांबरोबर पाणीपुरी खायला मिळाली असेल ना मित्रांबरोबर पिक्चर बघायला जाण्याचा योग आला असेल! प्रसिद्धी मिळाल्या नंतर तर बायकोला साधे फिरायला घेऊन जाणे सुद्धा कर्मकठीण! लोकांसाठी समर्पित आयुष्य हे आतून किती एकाकी असते ह्याचेच हे उदाहरण आहे! अशावेळेस ह्या 'माणसाला' मानसिक स्थैर्य कुठे मिळत असणार? सचिन अमुक एका बाबाचा भक्त आहे ह्यावर त्याचा वारंवार समाचार घेणाऱ्यांनी त्याची ही बाजू जरूर विचारात घ्यावी.
सचिनला आंतरराष्ट्रीय लोकप्रियता किती लाभली आहे हे देखील आपण अनुभवले आहेच. म्हणूनच तो जेव्हा ऑस्ट्रेलियात खेळायला मैदानात उतरायचा तेव्हा तिकडचे लोक ' you are a legend ' असे कोरस मध्ये गायचे. जगातील प्रत्येक मैदानात तो आला की लोकं उभी राहून टाळ्या वाजवतात. ह्याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला आहे. अमेरिकेत असताना मॉटेल मध्ये काम करतानाचा अनुभव घ्या! दोन ऑस्ट्रलियन मुली मॉटेल मध्ये आल्या. बोलता बोलता मी कुठून आलो आहे हे विचारले आणि भारत हे कळताच त्यातील एक एकदम उद्गारली, " Ohh .. from the land of Sachin Tendulkar!" आणि नंतर तिने मला सचिन तिला का आवडतो.. त्याचा खेळ किती 'handsome ' आहे वगेरे सांगितले. ' पण तो आमच्या विरुद्ध खूप चांगला खेळतो...' अशी खंत पण व्यक्त केली! पण शेवटी गंभीर आवाजात हे देखील म्हणाली, " But his conduct ... exemplary !" असाच अनुभव आत्ता सुरु असलेल्या 'Hyatt ' च्या नोकरीत पण आला. एक इंग्लिश पाहुणा घाई घाई ने ऑफिस मधून IPL चा सामना बघायला आला आणि ' I started my day early today so that I could come back early and watch Sachin bat ' असं आल्या आल्या घोषित केलं! एका दक्षिण आफ्रिकन पाहुण्याने स्वतःच्या मुलाला, " This is Mumbai ...the city of Sachin Tendulkar ' असे सांगितल्याचे आठवतंय! किंवा एकदा एक ऑस्ट्रेलियन पाहुणा बिल भरायला आलेला असताना आणि मी त्याच्या क्रिकेट टीम ची स्तुती करताना, " But you have Sachin Tendulkar ' असं म्हणाल्याचे स्मरते!
अशी किती उदाहरणे देऊ? त्याच्या रेकॉर्ड्स बद्दल काय बोलावे? ते तर तो सर्वश्रेष्ठ आहे हे पटवून देतातच. जगाच्या प्रत्येक देशात जाउन आणि प्रत्येक संघाविरुद्ध त्याचे शतक आहे हे मी कितव्यांदा सांगू? त्याच्या कारकिर्दीत सर्वात बलाढ्य असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध त्याचा सर्वात चांगला रेकोर्ड आहे ह्यातच सारे आले! पण हा झाला बऱ्यापैकी 'राजमान्यतेचा' भाग! क्रिकेटचे पंडित ह्या गोष्टीवर बरेच 'चघळकाम' सुरु ठेवतील. खुद्ध विस्डेन आणि ब्रॅडमन ह्यांनी घोषित केले असलं तरीही तो श्रेष्ठ कसा नाही असले 'पुरावे' मांडणारे लोक पण आपल्याला भेटतील! पण तो 'लोकमान्य' कसा आहे ह्याचीच ही उदाहरणं आहेत! मी, वानखेडे मधला तो हवलदार, आमच्या आजी-आजोबांची पिढी, इस्त्रीवाला आणि त्याचा मुलगा, त्या अनोळखी ऑस्ट्रलियन मुली, पान टपरी वर 'स्कोर कितना' असं विचारणारे आणि सार्वजनिक ठिकाणी 'त्याची' चर्चा करणारे ह्यात काय समान आहे? तर आम्ही सर्वांनी सचिन अनुभवलाय! आणि त्यात आम्हाला असीमित आनंदाचे दालन उघडे करून मिळाले आहे!
माझ्याच काय पण त्या वेळेस जन्म झालेले सर्व जण मोठे होत असताना त्याची फलंदाजी साथीला होती. नव्हे, आयुष्यातला एक घटक होती! आमचे वय वाढत होते... तो मात्र तरुण होत होता. वयाच्या ३७ व्या वर्षी त्याने २०० धावा काढून रेकोर्ड बनवले ह्यातच मी काय म्हणतोय ते आले. माझ्या शाळेतल्या प्रत्येक वाढत्या वर्गात त्याच्या कुठल्या न कुठल्या शतकाची किंवा विक्रमाची चर्चा झाली आहे. मी १९९६ साली श्रीलंके विरुद्ध वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत त्याची एकाकी अपयशी झुंज बघून खूप रडल्याचे आठवते. १९९८ साली सहावीत असताना शारजाला त्याला वॉर्नला नमवताना कसे विसरणार? मी दहावीची परीक्षा दिली तेव्हा त्याने २००३ च्या वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानला नमवून अख्तर, अक्रम आणि वकार ह्या तिघांना लोळवले. २००५ मध्ये बारावीत असताना पाकिस्तान मध्ये जाउन तिथे ठोकलेली शतकं विसरणं तर निव्वळ अशक्य! अशी किती उदाहरणं देऊ? कुठल्याही सामन्यात तो खेळला, त्याचे शकत झाले की संध्याकाळी बिल्डींगच्या खाली क्रिकेट खेळताना आम्ही अधिक प्रसन्न आणि अति उत्साहात असू! आम्हीच काय, सगळ्या देशाची अशी परिस्थिती होती! म्हणूनच अमिताभ बच्चन म्हणतो ना - " जेव्हा सचिन खेळतो तेव्हा बँकेचा कॅशियर सुद्धा खुश असतो आणि आपल्याशी चांगला व्यवहार करतो." पानवाल्याच्या टपरीवर कुणी स्कोर विचारी, " सचिन का कितना हुआ?" तेव्हा शंभर हे उत्तर असले तर उत्तर देणाऱ्या पानवाल्याचे आणि ते ऐकणाऱ्याचे एक्स्प्रेशन्स आठवा! असा सर्वांना आनंद देणारा कलाकार होता हा! हो, कलाकारच! कारण, जसे पु. लं म्हणतात की , ' १००% लोकांना एकाचवेळी दिव्यत्वाचा साक्षात्कार करून देते ती कला!'
आणि कला हरण्याच्या आणि जिंकण्याच्या पलीकडे असते. त्यामुळेच बघा ना! भारत हरला आणि सचिनने शतक मारलं तरी आत मनातून 'तो खेळला' ह्याचे समाधानच आपल्याला वाटत आलेलं आहे. कारण त्याचे खेळणे ही निव्वळ एक आनंदाची स्थिती होऊन जाते. त्याच्या इतके प्रेम त्यामुळे इतर कुणालाच मिळालेले नाही. आणि मिळेल असे वाटत देखील नाही. कारण तो सचिन होता!
- आशय गुणे
माझे इतर लिखाण : http://relatingtheunrelated.blogspot.in/
आम्ही काही नमुने अजून आहोत हो
आम्ही काही नमुने अजून आहोत हो ऑर्कुटवर.>>>>>> आजकालच्या इतिहासात नमुनेच उरलेत ..:खोखो:
लेख मस्त झालाय एकदम.
लेख मस्त झालाय एकदम.
रोहन - ही घ्या ती लिंक..!
रोहन - ही घ्या ती लिंक..!
http://www.youtube.com/watch?v=aGNSU_Y_5IM
धन्यवाद अखी!
सचिन सचिन
सचिन सचिन
व्वाह!!! एकदम सह्ही झालाय
व्वाह!!! एकदम सह्ही झालाय लेख..!!
आमच्यासारख्या लोकांना मात्र तो आता खेळणार नाही ह्या एकाच कारणासाठी ही बातमी कडू आहे!>>>>
एक्झॅक्टली
saakshi आणि अस्मिता :
saakshi आणि अस्मिता : मनापसून धन्यवाद!
(No subject)
नमस्कार भाऊ! तुमची ही
नमस्कार भाऊ! तुमची ही सर्जनशील प्रतिक्रिया इतकी आवडली की तुमचे नाव नमूद करून मी ती माझ्या फेसबुक पेज वर शेर केली आहे! खूपच छान! धन्यवाद!
<<... मी ती माझ्या फेसबुक पेज
<<... मी ती माझ्या फेसबुक पेज वर शेर केली आहे! >> आशयजी, बरं केलंत ! तुमच्या लेखाला अशी तीट लावण्याची गरजच होती !!
(No subject)
लेख आवडला
लेख आवडला
धन्यवाद!
धन्यवाद!
फारच सुन्दर.....
फारच सुन्दर.....
आशय, आशय मस्त. मूर्ती लहान पण
आशय, आशय मस्त. मूर्ती लहान पण किर्ती महान.
छान लेख.
आशयगुणे, वरील लोकमान्य तेवढं
आशयगुणे,
वरील लोकमान्य तेवढं काढून टाका. सचिनला लोकमान्य म्हणावं या पलिकडचा आहे तो. उपाधी दयायचीच असल्यास एखादी नवीन उपाधी द्या. लोकमान्य म्हटल्यावर सचिन एका साच्यात बंद होणार, ते होऊ नये.
महात्मा=गांधी
नेताजी=सुभाषबाबू (आज काल तो सपचा यादव स्वत:ला नेताजे म्हणवून घेतो)
चाचा=नेहरू
पोलादी पुरुष=पटेल (मधे अडवाणीवर प्रयोग केला होता)
बाबासाहेब=आंबेडकर (अनेक बाबासाहेब आलेत अन गेलेतपण)
महर्षी=कर्वे
लोकमान्य=टिळक
स्वातंत्र्यवीर=वि.दा.
स्वरसम्राज्ञी=लताबाई.
ड्रिमगर्ल्=हेमाबाई
हॉकीका जादूगार= ध्यानचंद
...असे अनेक
हे सगळे कॉंबिनेशन्स अनबिटेबल आहेत.
तसं सचिनलाही अनबिटेबल काहीतर उपाधी हवी.
माझ्यामते....'शतकाधीश' पण मग विंग्रजीत काय म्हणायचं? 'सेन्च्यूरेअन?' छे छे... वन ओ ओ? किंवा वन झीरो झीरो? सुचत नाहिये!
बाकी लेख एकदम झकास...........
शतकेश्वर = शतकांचा इश्वर
शतकेश्वर = शतकांचा इश्वर
शतकमणी
अरे व्वा..... शतकमणी चांगलै
अरे व्वा..... शतकमणी चांगलै की राव. ते इंग्रजीवाल्याना म्हणायला फार अवघड जाणार नाही.
अन या निमित्ताने एक भारतीय शब्द दोन चार वर्षात ऑक्स्फोर्डच्या डिक्शनरीत अॅड होईल ते होईलच. दोन दोन फायदे.........
एक्दम ईमो केलं रे बाबा..
एक्दम ईमो केलं रे बाबा..
अतिशय सुंदर लेख.... जणुकाही
अतिशय सुंदर लेख....
जणुकाही आपल्याच मनातून आलाय असे वाटत राहीले. धन्यवाद !!
त्याला मास्टर ब्लास्टर हेच
त्याला मास्टर ब्लास्टर हेच विषेशण कायम योग्य राहील.
मित्रा आशय, सचिनच्या
मित्रा आशय, सचिनच्या खेळीसारखाच तडाखेबाज, दमदार, मास्टर ब्लास्टर लेख लिहिलास.
विद्यासुत, विक्रमसिंह, एम,
विद्यासुत, विक्रमसिंह, एम, उदयन, इंद्रधनु, विशाल कुलकर्णी, रोहन, किशोर मुंढे: धन्यवाद!
एम : नावांची यादीच करायची झाली तर 'सचिन सहस्त्रनाम' होऊन जाईल! ... तरी त्या यादीत माझे एक नाव - रनाधीराज!
खुप सुंदर लेख लिव्हलाय ..
खुप सुंदर लेख लिव्हलाय ..
अगदी मनातला..
<< तर 'सचिन सहस्त्रनाम' होऊन
<< तर 'सचिन सहस्त्रनाम' होऊन जाईल! >> अस्सल मराठी गळ्यातून उत्स्फुर्तपणें आलेल्या 'तेंडल्या !' ह्या एका नांवात सहस्त्रनामाचा जप केल्याचं पुण्य सांठवलेलं आहे. !!
फार सुंदर लेख......... सचिन
फार सुंदर लेख.........
सचिन मैदानावर खेळत असला की विरोधी संघावर दडपण असायचं....
भाऊ: एकदम बरोबर बोललात! शिवाय
भाऊ: एकदम बरोबर बोललात! शिवाय इतर खेळाडू हे आडनावाने उच्चारले जातात, उदा: " अरे, द्रविड ने किती केले?" ह्याचा उल्लेख मात्र नावानेच होत आलेला आहे.
रोहित आणि श्यामराव: धन्यवाद!
कारण त्याचे खेळणे ही निव्वळ
कारण त्याचे खेळणे ही निव्वळ एक आनंदाची स्थिती होऊन जाते. त्याच्या इतके प्रेम त्यामुळे इतर कुणालाच मिळालेले नाही. आणि मिळेल असे वाटत देखील नाही. कारण तो सचिन होता
मस्त !!
धन्यवाद!
धन्यवाद!
Pages